नवीन लेखन...

तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी:

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख


माझा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच होता. प्राथमिक शिक्षण जन्मगावी वाघोड ता. रावेर (जळगाव) या माझ्या जन्मभूमीतच घेतलं. माध्यमिक शिक्षणही दहावीपर्यंत गावातच झालं. अकरावी (मॅट्रीक) साठी रावेर या तालुक्याच्या गावी माझे मामा गुरुवर्य ना.भि. वानखेडे यांच्या घरी राहिलो. तेव्हा मला खरी शिक्षणाची गोडी आणि शिक्षणक्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. नंतर दोन वर्षे खिरोदा येथे ओ.टी. डी. (चित्रकला शिक्षक) कोर्स केला. पहिला आलो. रावेरच्याच माझ्या सरदार जी. जी. हाय. ज्यु. कॉलेजात चित्रकला शिक्षक म्हणून रूजू झालो. त्यापुढचं शिक्षण बहि:स्थ पद्धतीने घेणं सुरु ठेवलं. डी.एम. आणि ए. एम. (बहि:स्थ) जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुटीत परीक्षा देऊन पूर्ण केलं. इंटर आर्टस (कला) भोपाळ बोर्डामार्फत इंदूरला परीक्षा देऊन केल्यावर पुणे विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादित केली. पुढे अमरावती विद्यापीठाची एम.ए. मराठी आणि बी.ए. मराठी स्पेशल या पदव्या प्राप्त झाल्यात. एम. ए. ला मेरीट मध्ये आलो. त्याठिकाणीच गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब मांडवकरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.

प्राप्त झाली. १९७३ ते १९९० पर्यंतचा हा प्रवास शिक्षकी पेशा सांभाळून स्वत:च्या उच्चशैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याने पूर्ण झाला. त्यानंतर मूळजी जेठा महाविद्यालयात जळगाव येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून आणि विभाग प्रमुख असा १९९१ ते २०११ पर्यंतचा पल्ला गाठला. २०११ ते २०१४ तीन वर्षे महिला महाविद्यालयात प्राचार्यपदी सेवानिवृत्त झालो. सुमारे ४१ वर्षांचा हा दीर्घ प्रवास कष्ट, जिद्द, चिकाटी आणि विधायक सर्जनशील निर्मितीच्या संदर्भातील आजीवन विद्यार्थी असल्यासारखाच पूर्ण झाला. जगाच्या व्यावहारिक भूमिका, समाजातील गुणवत्तेची चाड असलेला माणसांची सोबत, शिक्षण क्षेत्रात सतत धडपडणाऱ्या वृत्तीतून प्रयोगशील जगण्याची कला आणि विधायक सर्जनशीलतेतून लेखन चिंतन, वाचन, मनन करण्याची प्रेरक शक्ती  प्राप्त होत गेली. त्यामुळे “तृप्त मी; अतृप्त मी; तरीही संतृप्त मी!” असा माझा कष्ट-वेदनांवर मात करणारा आनंददायी प्रवास घडला. या काळात अनेकांना योग्य मार्ग दाखवत त्यांच्या पायावर उभं करताना आनंद वाटला. सहकारी मित्रांना मदत करीत त्यांच्या सोबत विविध प्रकल्प उभे करता आले. शैक्षणिक गुणवत्ता आणि दुर्बल घटकांतील मुला-मुलींना प्रवाहात आणता आलं.

चित्रकला – कलेचा इतिहास आणि रसग्रहण, सौंदर्यशास्त्र या बरोबर साहित्य-संशोधन आणि समीक्षा तसेच साहित्य चळवळीत सक्रीय होऊन नवनव्या वाटा चोखाळता आल्या. पूर्वाधातील कला शिक्षण आणि उत्तरार्धातील साहित्य क्षेत्रातील वाटचाल अशा दोन विश्वात रमताना ललित कला आणि काव्यकला यांचा सुंदर मेळ माझ्या आयुष्यात बसला. प्रत्येक गोष्ट अनुभवाने सिद्ध झाली. स्वयंअभ्यासातून अनुभवविश्व विस्तारत गेलं. जीवाभावाचे मित्र, मार्गदर्शक गुरु आणि सुस्वभावी संस्थाचालकांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे माझ्या धडपडणाऱ्या वृत्तीला, अतृप्ततेला यशाची तृप्तता लाभत गेली. आपण एक कर्मशक्तीचे उपासक आणि ही  पर्यावरणातली माणसं प्रेमाचं सिंचन करणारे विशाल अंत:करणाचे सुहृद लाभले. त्यातून जे घडत गेलं, ते आज संतृप्त करणारं विश्व मला वाटते. यामध्ये कोणतीही गोष्ट मागच्या दारानं, वशिल्यानं किंवा दुसऱ्याचा हक्क डावलून कधी मिळवली नाही. बुद्धीमत्ता, विवेकपूर्ण विचार, चारित्र्यसंपन्न शिकवण, आणि कर्मभक्तीचा श्रद्धाशील डोळस श्रमसंस्कृतीचा संस्कार यामुळेच ही प्रगतीची वाटचाल घडून आली. यातील अतृप्तता ही नवं करण्याची प्रेरकशक्ती होती, त्यातून जिद्द-चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा वाढत होती. तृप्ततेच्या वाटेवरून जाता जाता सेवानिवृत्ती नंतरची संतृप्तता आज अनुभवता येते. इतकं सरळमार्गी जीवन जगता आलं. हा योग घडता घडता घडवून आणला त्याला अनुभवला आणि भाग्ययोग म्हणून स्वीकारला.

मानवी जीवनात ‘अतृप्तता’ ही नवनव्या वाटा शोधण्याची जननी असते. गरजा आणि नवे प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा यातून कष्टमय प्रवासात, साधनामय अभ्यासात, कर्ममय सेवेत सामावत गेली की यशप्राप्तीचे क्षण येतात. तेच तृप्ततेचा क्षण घेऊन येतात. समृद्ध – संपन्न भावविश्वाला कर्मशील घामाचं सिंचन केलं की, कष्टाची गोंडस फुलं आणि फळं बहरतात. संकल्प करणं आपल्या हातात असतं, त्यासाठी कष्ट झेलणं हे आपल्या रक्तात असतं परंतु सर्वच संकल्प सिद्धीस जातातच असं नसतं. तेव्हा क्षणभर उदासीनता येते. प्रयोग अपूर्ण राहतात. त्यातून अतृप्तीचा भाव उत्पन्न होतो. नव्या वाटा – नवे प्रयोग करण्यास हा भाव बळ देत राहातो. त्यामुळेच निराशेचं मळभ झटकून टाकलं की आशेचा नवा किरण सापडतो. नवा खेळ, नवी विटी, नवा दांडू, नवे मैदान, नव्या दिशा आणि नवे सर्जनशील निर्मितीचे डोहाळे लागतात. अतृप्ततेला तृप्ततेचा गंध लाभला की शेवटी संतृप्तीचा आनंदघन बरसू लागतो.

या आनंदमय जीवन प्रवाहात काही क्षण असतात वेदनामय, दुःख देणारे किंवा कटुअनुभवांचे धनी. एकदा एकाविद्यापीठात विभाग प्रमुखाची जागा भरायची होती. त्यासाठी रीतसर प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु सरळमार्गी चालण्याचा माझ्यासारख्या आणखी दोन तीन लोकांना या अनुभवाचे साक्षीदार व्हावे लागले. विद्यापीठीय राजकारण, मा. कुलगुरुंना सल्ला देणारे स्वार्थी लांगूलचालन करणारे आणि एकूण निवडप्रक्रियेचा कब्जा करून स्वतःची वर्णी लावणारे काही कुटील लोक असतात. त्यामुळे अशा व्यक्तीने त्या पदावर स्वत:ची वर्णी लावून घेतली. या चाकोरीबाहेरच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी न होता सरळमार्गी मुलाखत दिली. विषयतज्ञांना आधी न भेटता किंवा कोणतीही सेटींग न लावता सामोरा गेलो. परंतु सहा महिन्याने मा. कुलगुरु महोदयांकडून निरोप आला. “अहो, तुम्ही भेटला पण नाही. आम्हाला कळलं नाही. चांगल्या माणसांवर अन्याय झाला हे आता उशीरा लक्षात आलं. स्वार्थी माणूस ओळखायला वेळ लागला. तुम्ही भेटला नाहीत तर कसं कळेल तुमच्या गुणवत्तेबाबत? ” मी शांतपणे ऐकून घेतलं, स्थितप्रज्ञ राहण्याचं कसब अनुभवातून मिळालं होतच. वाईट वाटत नाही पण मनात खंत वाटते. खदखदून येतं. त्या विभागात ॲकॅडॅमिक प्रगती होऊ शकली नाही.

पदव्युत्तर संशोधन, अभ्यासक्रमांची कालबद्ध मांडणी, उत्तम अध्ययन अध्यापनाचे कौशल्य आणि भाषा-साहित्य, बोली भाषांचे अध्ययन आणि अभ्यास पुढे जाऊ शकला नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो अशी म्हण आहे. त्याचीच प्रचिती येत राहिली काळ पुढे सरकला. स्वार्थीवृत्तीच्या माणसाने तो विभाग सोडून अन्यत्र जम बसवला. जर मला ही संधी मिळाली असती तर कदाचित काही सातत्यपूर्ण आणि दूरगामी विचारांचे प्रागतिक कार्य उभे राहू शकले असते. परंतु ग्रामीण लोकभाषा, बोलींचे आणि तौलनिक भाषा अभ्यासाचे संदर्भात जे उद्दिष्ट ठेवून विभाग उभारला गेला जे अपूर्ण राहिले. याची खंत वाटणारचं.

दुसरा अनुभव अशाच एका दुसऱ्या विद्यापीठातील पदभरती संदर्भातला आहे. तिथे ही मी प्राध्यापक पदासाठी पात्र असल्याने अर्ज केला. मला मुलाखतीचे पत्र ही प्राप्त झाले. परंतु एका विद्वान, सेवानिवृत्त प्राध्यापक मित्राकडून निरोप आला. “तुम्ही या पदासाठी मुलाखतीला जाऊ नये. कारण मा. कुलगुरुंनी त्यांचा जवळचा एक मित्र त्यासाठी निश्चित केला आहे. त्याचा बायोडाटा तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. तुम्ही गेला तर उगाच अडचण येईल, चर्चा होईल, म्हणून तुम्हास हा निरोप देण्यास मला सांगण्यात आले आहे.” मला क्षणभर खिन्न झाले. परंतु दुसऱ्याक्षणी मी विचार केला. जर आपण गेलो, निवड झाली तरी ज्या महाशयांच्या प्रशासनात काम करायचे ते दुखावल्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा मुलाखतीत न जाण्याचे मी निश्चित केले. नंतर कळले ते अपेक्षित ठरलेल्या व्यक्तीला नेमण्यात आले. गुणवत्तेला डावलून या उच्चशिक्षण क्षेत्रातल्या निवडी, नेमणूका होतात. त्यात राजकारण केलं जातं. गुणवत्ता घसरते. अशी उथळ माणसं, वशिलेबाज व्यक्ती आतून जे गौडबंगाल करतात ते वेगळंच असते. असो. या घटना प्रासंगिक असतात. त्यामुळे फारसं नुकसान होत नाही, अशी स्वतःची समजूत करून घ्यावी लागते. सर्वच क्षेत्रात लागलेला हा भ्रष्ट विचारांचा रोग, आणि वशिलेबाजी याचे समर्थन कोणीच करत नाही. परंतु विरोधही फारसा होत नाही. यामुळे मनात खंत उत्पन्न होणारच! मी याला अन्याय म्हणणार नाही. माझा काही व्यक्तिगत स्वार्थ दुखावला म्हणून मी याचा निषेध ही करणार नाही. परंतु प्रवृत्ती कशा विकृतीमय होतात आणि सुसंस्कृतीचे विकृतीकरण करतात. याची अनुभवरुपी समृद्धी मला अतृप्तीतून तृप्तीकडे वाटचाल करण्यास वाट दाखवते.

‘अनघा दिवाळी अंक २०१८’ यांनी आवाहन करीत या संदर्भात लेखनासाठी प्रवृत्त केलं. आपल्या संपन्न आयुष्यातील यशासोबतच ‘अपयशाची सल’ कशी असते? या संदर्भात हे आत्मनिष्ठ लेखन करायला संधीच दिली. ‘यश’ ही जशी सापेक्ष संकल्पना तशीच ‘अपयश’ सुद्धा असते. संधी मिळाली तर यशाचं सोनं होत असते. असा मानवी मनातला विचार असतो. अनेक अनुभव येतात, संधी दार ठोठावून येते. परंतु काही ठिकाणी आपण कमी पडतो. नैतिक मूल्यांचा पिंड आपणास प्रलोभनापासून दूर ठेवतो. आपल्या इच्छा-आकांक्षांचा आपल्यासमक्ष बळी दिला जातो. त्यामुळे तात्कलिक खंत निर्माण होऊ शकते. दीर्घकालीन आणि शाश्वत विचार केला तर आपण ज्याजागी आहोत त्या सेवेतच आपण जे जे उत्तम, उदात्त आणि विधायक करतो ते खूप महत्वाचे असते. त्यातूनच कर्मयोगाची तृप्तता मिळत असते. त्यामुळे आयुष्यात कोणाबाबत कटुता उरत नाही. क्षणैक मतभेद, वाद असले तरी त्यातून अलिप्तता पाळल्यास उत्तम परिणाम उपभोगता येतात. त्याचा उत्तम परिपाक म्हणजे उत्तम आरोग्य, सुदृढ प्रकृती आणि निरामय जीवनाची सुमारे ६६ वर्षे आज पूर्ण करताना कृतार्थ वाटते. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जोडले गेलेत, शिक्षण आणि कला क्षेत्रात तसेच विविध पातळीवर ते जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रेमळ ऋणानुबंध हीच अनमोल शिदोरी मी मानतो. १६ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी., दहा विद्यार्थ्यांचे एम.फील मराठी साहित्य-भाषा आणि लोकसाहित्य या विषयात ALP मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. आनंदाची ही अनुभूती गाठीशी आहे. प्राचार्य पदी विराजमान झाल्यावर संस्थाचालक, सहकारी प्राध्यापकवृंद यांच्या सहभागाने महिला सक्षमीकरण आणि उच्चशिक्षणात त्यांचा सहभाग वाढत गेला. सावित्रीबाई फुले दत्तक पाल्य योजनेतून आर्थिक दुर्बल मुलींना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य संपन्न झाले. ही आत्मिक आनंद देणारी घटनाच आहे.

साहित्य, समीक्षा, संशोधन आणि शिक्षण तसेच प्रत्रकारिता अशा विविधक्षेत्रात अनेक जीवाभावाची प्रेमळ-सज्जन माणसं भेटलीत. अनेक नवे ग्रामीण-दलित लेखक-कवी यांना प्रोत्साहन देता आले. साहित्यसंमलने, चर्चासत्रे, षदा आणि नियतकलिकातील समीक्षा तसेच शोधनिबंध या दृष्टीने एक मोठा कार्यकर्तृत्वाचा वाटा निर्माण झाला. नव्या हातांना लिहितं करीत, त्यांची खडतर वाट सुकर करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रात अनेक सेवाभावी संस्था, वाचन चळवळ, वृत्तपत्रे-आकाशवाणी माध्यमे, स्काऊट गाईड चळवळ, सानेगुरुजी कथामाला, बालबोधपीठ इत्यादि ठिकाणी सततकार्य करण्याची संधी मिळाली.

मराठी बोली साहित्यसंघाचे उपाध्यक्षपद, जनसाहित्यसंमेलनाचे आणि खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, बोली साहित्यसंमेलन आणि जिल्हा साहित्य संमेलनांचे आयोजनात सक्रीय सहभाग लाभला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अ.भा. म. साहित्य महामंडळावर सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत राहिलो. मासिके, ग्रंथसंपादन समितीवर कार्य केलं. माध्य. उच्च माध्य. शिक्षण मंडळावर मराठी अभ्यासमंडळ सदस्य म्हणून (तज्ज्ञ) कार्य केले. इ. ९वी ते १२वीची आठपाठ्यपुस्तके तयार केली.

राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या अंतर्गत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश (तीन खंड) संपादनाच्या समितीवर कार्य केले. विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, बहि:स्थ परीक्षक, प्रबंधाचे परीक्षण इत्यादि कार्य अत्यंत निष्ठेने केले. या दीर्घ प्रवासात भेटलेले विद्यार्थी, सहकारी संस्थाचालक आणि प्रशासनातील मान्यवर यांच्या प्रती जिव्हाळा वाढला.

या सर्वांचा सहवास मला चैतन्यदायी वाटला. निराशा नव्हतीच, आशा पल्लवित होत होत्या. म्हणून आज स्वार्थपणानं म्हणेन की, “तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी” अशी भाव विश्वातली सद्भावना आणि लौकिकप्राप्त जगातली मी निर्माण केलेली स्वतःची ओळख, प्रसिद्धी मला लाभली. अहंगंडाचा ऱ्हास आणि न्यूनगंडाचा निरास करीत माझा विजयरथ जीवनाच्या विजयपथावर वाटचाल करीत राहिला. याचे समाधान वाटते.

-प्राचार्य डॉ. किसन पाटील

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..