नवीन लेखन...

पर्यटन आणि संरक्षण

कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो.

घराबाहेर पडताना अनेक जण तिकीट बरोबर घेतलं का? सुट्टे पैसे घेतले का? याची खातरजमा करतात. पण किती जण प्रवासी विमा संरक्षण घेतलं का? त्याची प्रत सोबत घेतली का याची खातरजमा करतात!

देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करताना आपलं आरोग्य, आपली सुरक्षा आणि आपल्या सामानाची सुरक्षा याबाबत जागरूक असायला हवं. किंबहुना एक चेक लिस्ट बनवून सर्वच गोष्टींची पूर्तता केल्यावर घराबाहेर पडायला हवं. जेणेकरून कुठलेही अडथळे, अडचणी न येता सहलीचा निखळ आनंद लुटता येईल.

याखेरीज प्रत्यक्ष प्रेक्षणीय स्थळी, हॉटेलमध्ये, विमानतळावर काळजी घ्यायला हवी. उदा. अगदी पॅरिसमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरचा संपूर्ण भाग पॅरिसमधल्या लोकांनी काही काळासाठी बंद केला होता. पर्स आणि पाकीट मारण्याच्या घटना एव्हढ्या घडल्या की तिथल्या लोकांनी पोलीस आणि प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत पर्यटकांसाठी तो भाग बंद केला. अशा घटनांनी पॅरिस आणि फ्रांसच्या नावाला काळिमा फासला जात होता. त्यासाठी अशी टोकाची भूमिका घ्यावी लागली होती.

या घटना फक्त पॅरिसमध्ये होत नाहीत. जगाच्या पाठीवर जेथे पर्यटकांची गर्दी होते, तिथे अशा घटना होतात. पर्यटकांची भाषेची अडचण असते त्यामुळे रितसर तक्रार नोंदवण्यात त्रास होतो. जर यात्रा संस्थेच्या गटाबरोबर सहल असेल तर गाईड मर्यादित मदत करू शकतो. त्याला बाकीचा गट पुढे घेऊन जायचा असतो. यावर उपाय म्हणजे मौल्यवान वस्तू हॉटेल किंवा खोलीमधील लॉकर मधे ठेवाव्यात. किंवा कपड्याच्या आतमध्ये पोटाला मनी बेल्ट बांधायचा आणि त्यात पारपत्र आणि पैसे ठेवायचे.

पारपत्र, तिकीट, आगाऊ नोंदणी केलेली पावती विसरणं किंवा आज ज्यावर प्रत्येकजण अवलंबून आहे असा मोबाईल, कॅमेऱ्याच्या बॅटरी आणि मेमरी कार्ड विसरणं हे अगदी सहजपणे घडतं. विमान, बस किंवा रेल्वेचे आसन सोडण्यापूर्वी आपण काही विसरलो तर नाही, याची खात्री करून घेणे गरजेचं आहे.

घराबाहेर पडल्यावर जिथे जातो तिथे निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात आणि पाणी प्यायलं जातं. यातलं काही प्रकृतीला मानवलं नाही तर प्रकृती अस्वस्थ होऊन त्रास आणि जास्तीचा खर्च होतो. परदेशात जाताना विमा संरक्षण घेणं शहाणपणाचं ठरतं.

याच्या जोडीने क्रेडिट कार्ड सर्रास वापरलं जातं. हे हरवलं किंवा चोरीला गेलं आणि त्याचा गैरवापर झाला तर आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवासात आणि दैनंदिन जीवनात क्रेडिट कार्डसाठी एक विमा असतो. ज्याला क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन असं म्हणतात. परदेशात तिथली भाषा बोलणारा दुभाषी, पारपत्राची नक्कल मिळवणे व काही पैसे रोख आणि इतरही सुविधा मिळतात.

देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करताना तिथलं हवामान आणि राजकीय परिस्थिती याच्याबद्दल थोडी माहिती घ्यावी. हवामानाला अनुकूल कपडे जवळ बाळगावे. बंद आणि मोर्चे फक्त भारतातच निघत नाहीत. उदा. हाँगकाँगमधील अस्थिरता, युरोपमधील इंग्लंडमधील किंवा विमान कर्मचाऱ्यांचा संप. अशा वेळी भारतीय आणि दूतावासाशी आप्तस्वकीयांशी संपर्क करणं गरजेचं असत. हल्ली यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप सारखी समाजमाध्यम देखील खूप उपयोगी पडतात.

प्रत्येक ठिकाणचे टॅक्सीवाले हे एकच जातिकुळातले असल्याचा आपल्याला प्रत्यय देतात. अपवाद काही प्रामाणिक आणि चांगली सेवा देणाऱ्यांचा. भाषेची अडचण असलेल्या नवख्या प्रवाश्यांना लुबाडण्याच्या अनेक क्लुप्त्या आहेत. थायलंड मधे प्रवाशाने दिलेली परकीय चलनातली (बहुतेक वेळा अमेरिकन डॉलर) नोट हात चलाखीने बदलून खोटी नोट परत देतात. आणि सांगतात तुमची नोट चालणार नाही. भांबावलेला प्रवासी दुसरी नोट देतो. त्यावर ही चालेल असं म्हणत सुट्टे पैसेही देतात. जेथून चलन घेतलं त्यांच्या नावाने खडे फोडत प्रवासी पुढे निघून जातो. त्याचप्रमाणे परकीय चलन बदली करून देणारे बहुतेक वेळा चलन दरापेक्षा कमी पैसे देतात. यासाठी बँकेच्या अधिकृत शाखेत योग्य चलनदराने पैसे बदलून मिळतात.

जे तरुण अथवा तरुणी एकट्याने किंवा दोन-तीन असे प्रवास करतात, त्यांनी अधिक सावधान राहील पाहिजे. थायलंडमध्ये रस्त्यावर फिरताना आपुलकीने चौकशी करून, कुठून आलात, काय बघितलं अशी विचारपूस करतात. त्यांनतर स्वस्त आणि चांगली बियर कुठे मिळते, माहीत आहे का असं विचारून तिथे घेऊन जायची तयारी दाखवतात. जे पर्यटक याला बळी पडतात त्यांना रितसर लुबाडले जाते. घेऊन जाणारा स्थनिक त्या भाषेत अत्यंत स्वस्त म्हणून बियर आणि इतर पदार्थ मागवतो आणि फोन आल्याच्या निमित्ताने बाहेर निघून जातो. जेव्हा बिल येतं तेव्हा सर्व नशा उतरते. सोबत गुंड असतात ते पैसे वसुलीसाठी दबाव आणतात आणि बरेच पैसे मोजून सुटका करून घ्यायला लागते. जवळपास प्रत्येक देशात थोड्याबहुत फरकाने अनेक प्रवासी फसवले जातात. याला मोह आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत.

थोडा संयम, सावधगिरी बाळगली आणि योग्य मार्गदर्शन मिळवलं तसेच संपूर्ण माहिती घेऊन आणि खात्री करून पाऊलं टाकली तर प्रवास खूप काही शिकवून जातो आणि आयुष्यभरासाठी चांगल्या आठवणी देतो.

यात्रा आयोजकांबरोबर किंवा स्वतः प्रवासाला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. परदेशात प्रवासाला जाताना पारपत्राच्या फोटोकॉपी आपल्याजवळ आणि घरी ठेवाव्या. त्या देशातील चलन आणि ते खरेदी केल्याची पावती सांभाळून ठेवावी. ऋतु आणि हवामानाची आगाऊ माहिती घेऊन त्याप्रमाणे कपडे बाळगावे. या बाबतीत गुगल वापरून तासातासाचे हवामान मोबाईलवर सहज बघता येते. औषधे आणि त्याचे प्रिस्क्रिप्शन जवळ ठेवावे. बऱ्याचदा कस्टम अधिकारी या दोन्ही गोष्टी तपासतात. मोबाईलचा चार्जर, कॅमेऱ्याच्या लेन्स आणि बॅटऱ्या यासारख्या गोष्टी आपल्या जवळच्या बॅगेत ठेवाव्यात. विमानाने जाताना सर्व बॅगांचे वजन तपासावे. वजन जास्ती झाल्यास विमानतळावर दंड भरावा लागतो.

या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर प्रवास सुखाचा होईल. सुखद आठवणी आणि वेगवेगळ्या संस्कृती, खाद्यपदार्थ यांचा आनंद लुटता येईल.

अभय फाटक

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..