नवीन लेखन...

थ्री गोल्डन स्ट्राइप्स

फेब्रुवारी 2015 च्या अखेरीस अमेरिकेच्या फिलाडेल्फिया पोर्ट मधून जहाजावरुन उतरल्यावर आता बस झाली समुद्रातील नोकरी असे विचार यायला लागले होते. घरची शेती आणि जागा जमीन असल्याने बांधकाम व्यवसाय असं काहीतरी करून आता घर आणि कुटुंबापासून लांब जहाजावरील एकाकी जिवन सोडुन द्यावे असं सारखं वाटायचे. वर्षभरापूर्वी बांधकाम सुरु केलेली बिल्डिंग पुढील वर्षभरात पूर्ण झाली आणि त्यानंतर मे 2016 ला नवीन घराचे भूमिपूजन करून पुढील वर्षभरात घराचे बांधकाम पूर्ण होऊन 10 जुन 2017 साली नवीन घराची वास्तुशांती करून नवीन घरात राहायला सुद्धा आलो.

नवीन घरात राहायला आल्यावर एक महिन्याने सानिश चा जन्म झाला. मोठी मुलगी साडे चार वर्षाची झाली होती तिच्या सुरवातीच्या दोन वर्षांत माझे एक वर्षं जहाजावर गेले पण नंतरची अडीच वर्ष मी जहाजावर न गेल्याने कमर्शियल बिल्डिंग आणि त्यानंतर घराचे बांधकाम यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवले होते. परंतु सानिश झाल्यावर पुन्हा एकदा समुद्र आणि जहाजावरील नोकरी खुणावू लागली. 2008 साली जे करिअर निवडलं होतं ते सोडून बांधकाम व्यवसाय करताना कुठंतरी मनात खटकायचे की हा व्यवसाय तर कोणीही करू शकतो पण जहाजावर काम करण्यातील वेगळेपणा आणि चॅलेंज याची भुरळ पडली म्हणून हे करियर स्वीकारले आणि त्याच वेगळेपणाला आणि चॅलेंज ला कंटाळून आपण जहाजावरील जॉब सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय.

प्रियाला माझा जहाजावर पुन्हा एकदा जाण्याचा निर्णय झालाय असे सांगितले तिने नाखुशीने का होईना पण जाण्यासाठी परवानगी दिली.

2009 साली जुनियर इंजिनियर म्हणून पहिल्या जहाजावर साडे आठ महिने काम करून परतल्यावर लगेच लग्न आणि वर्षभरात मरीन इंजिनियर ऑफिसरची क्लास 4 ही परीक्षा पास होऊन पुढे कधी पाच महिने कधी साडे तीन तर कधी सहा महिने असे सहा वर्षांत पाच वेगवेगळ्या जहाजांपैकी पहिल्या दोन जहाजांवर फोर्थ इंजिनियर तर तिसऱ्या जहाजावरच ऑनबोर्ड प्रमोशन होऊन थर्ड इंजिनियर बनलो मग पुढील दोन जहाजे थर्ड इंजिनियर म्हणून काम केले होते. क्लास टू ची परीक्षा देण्यासाठी क्लासेस वगैरे केले. पण जवळपास अडीच वर्ष घरी असल्याने कंपनी पुन्हा जहाजावर पाठवेल की नाही, पाठवले तरी मागच्या वेळेस जेवढी सॅलरी दिली तेवढी तरी देईल की नाही की कमी करेल असे बरेच तर्क वितर्क करून ऑफिसमध्ये फोन केला. आमच्या क्रू मॅनेजरने सगळे डॉक्यूमेन्ट्स घेऊन ऑफिसला बोलावले. ऑफिसमध्ये गेल्यावर बॉस ने अडीच वर्षे काय केलेस वगैरे वगैरे विचारून झाल्यावर क्रू मॅनेजरकडे पासपोर्ट, सीडीसी द्यायला सांगितले.

क्रू मॅनेजरने कडे सगळे डॉक्युमेंट्स दिल्यावर, घरी निघताना त्याने विचारले तुझ्या एका जहाजावर तुझ्यासोबत जो चीफ इंजिनियर होता तो आता तीन जहाजांचा सुपरीडेन्ट बनला आहे आणि आपल्या ऑफिस मध्येच बसतो आहे, तुला घाई नसेल तर त्याला भेटून जा. एकदा फोर्थ इंजिनियर असताना जो चीफ इंजिनियर होता तोच आणखी एका जहाजावर काम केल्यावर पुढील जहाजावर जॉईन होताना आम्ही दोघे सिंगापूर हुन एकाच दिवशी जॉईन झालो होतो आणि साडे चार महिन्यांनी एकाच दिवशी सिंगापूर वरूनच साईन ऑफ झालो होतो. त्या जहाजावर मी त्या चीफ इंजिनियर सोबत थर्ड इंजिनियर म्हणून काम करत होतो. दोनवेळा दोन वेगवेगळ्या जहाजांवर एकदा फोर्थ आणि एकदा थर्ड इंजिनियर म्हणून माझे काम त्याने पाहिले असल्याने मी जवळपास चार वर्षांनी ऑफिसमध्ये त्याला भेटल्यावर त्यानेसुद्धा मी मागील अडीच वर्षें जहाजावर का नाही गेलो, घरी राहून काय काय करत होतो अशी सगळी माहिती घेतली. सुप्रिडेंट बनल्यावर त्याच्याकडे आमच्या कंपनीकडे इंडोनेशिया मध्ये उभ्या असलेल्या तीन जहाजांचा चार्ज दिलेला होता. ज्यापैकी एक गॅस टँकर तर दोन ऑइल टँकर जहाजे होती.

या जहाजांवर सेकंड इंजिनियर, चीफ इंजिनियर, इलेक्ट्रिकल ऑफिसर, ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि कॅप्टन एवढे पाचच भारतीय अधिकारी आणि उरलेले सगळे अधिकारी व खलाशी हे स्थानिक इंडोनेशियन असतात. ही तिन्ही जहाजे इंडोनेशियातील ऑइल फिल्ड मध्ये एकाच जागेवर वर्षोनुवर्षे बांधलेली असतात ज्यांचे काम स्टोरेज टँकर म्हणून केले जाते. यामध्ये ऑइल फिल्ड मधून समुद्राखालून निघणारे क्रूड ऑइल समुद्रात उभ्या असलेल्या प्रोसेसिंग प्लांट मधून पाण्यापासून वेगळे काढल्यावर समुद्राखालून येणाऱ्या पाईप लाईन मधून जहाजाच्या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि पुरेसा साठा झाल्यावर समुद्रातील पाईप लाईन द्वारे बाजूला अर्ध्या मैलावर दुसरे जहाज आणून त्यामध्ये ट्रान्सफर करून स्थानिक इंडोनेशियन किंवा परदेशातील ऑइल रिफायनरी मध्ये पाठवले जाते. माझा चीफ इंजिनियर जो या इंडोनेशियातील जहाजांचा दोन वर्षांपूर्वी सुप्रिडेंट बनला होता, त्याने मला इंडोनेशियातील या जहाजांवर जाशील का अशी विचारणा केली. मी त्याला म्हटले, साब मागील वेळेस मी बॉस ना या जहाजांवर पाठवा म्हणून विनंती केली असता त्यांनी विचारले की तुला ह्या जहाजांवर का जायचंय? मी सांगितले की तिथे पाच ऐवजी तीन महिन्याचे शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणून जायचंय. त्यावर बॉस ने सांगितले की शिपिंग मध्ये शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट करण्यापेक्षा घरीच का नाही राहत, हे ऐकून मी अडीच वर्षे घरीच राहिलो पण आता पुन्हा एकदा बॉस जिकडे पाठवेल तिकडे जायचा विचार करून आलो आहे.

सुप्रिडेंट म्हणाला ठीक आहे तुझी जायची तयारी असेल तर मी बोलतो बॉस सोबत एकदा, असे सांगून त्याने मला घरी जायला सांगितले.

क्रू मॅनेजरशी पाच सहा मिनिटं बोलल्यावर निरोप घेतला मी लिफ्ट मधून खाली जायला निघालो तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर थांबत थांबत लिफ्ट खाली आली आणि ग्राउंड फ्लोअर ला लिफ्ट बाहेर पडतोय तोच ऑफिस मधूनच मोबाईल वर फोन आला. वाटले बॅग किंवा काही विसरलो तर नाही ना वर पण रिसेप्शनिस्ट ने सांगितले की बॉस ने बोलावलंय लगेच. तेवढयात समोरच्या दुसऱ्या लिफ्ट मधून ऑफिस मधील प्युन पण मला बोलवायला खाली आला, बोलला तुम्ही बाहेर पडलात ऑफिस च्या आणि लगेच तुमचा फोन लिफ्ट मध्ये गेल्यावर आऊट ऑफ नेटवर्क दाखवायला लागला म्हणून मला पण खाली बोलवायला पाठवले.

ऑफिस मध्ये शिरताच रिसेप्शनिस्ट ने बॉस च्या केबिन मध्ये जायला सांगितले.

अडीच वर्ष काय काय केले, जहाजावर का नाही गेला वगैरे सगळे अर्ध्या तासापूर्वी विचारणाऱ्या बॉस ने इंडोनेशियन क्रू आणि जुनियर ऑफिसर ना हॅन्डल करशील का?

बॉस ने सरळ सरळ तीन महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट सह थ्री गोल्डन स्ट्राइप्स असणाऱ्या सेकंड इंजिनियर रँकच्या प्रमोशनची ऑफर दिली आणि मी क्षणातच, भारतीय अधिकारी व खलाशी नसलेल्या जहाजावर काम करण्याचा पहिला अनुभव माझ्या परीने प्रयत्न करून मिळवीन याची खात्री दिली. अडीच वर्षाच्या गॅप नंतर सुद्धा त्यापूर्वीचा अनुभव आणि केलेल्या कामाचे अप्रेजल समुद्रातील करियर रिस्टार्ट करताना कामी आले होते.

इंडोनेशिया मध्ये यापूर्वी कधी गेलो नसल्याने तेथील राहणीमान, संस्कृती, खाणे पिणे आणि लोकं हे सगळं पहिल्यांदा अनुभवायला मिळणार होतं, ते सुद्धा खांद्यावर सुप्रिडेंट आणि बॉस कडून मिळालेल्या अनपेक्षित आणि अकल्पित अशा तिसऱ्या सोनेरी पट्टीच्या नवीन जवाबदारीने. परंतु ऑक्टोबर 2017 पासून वर्षातून दोन वेळा तीन सव्वा तीन महिने सुमारे पन्नास एक इंडोनेशियन अधिकारी, खलाशी आणि आम्ही चार किंवा पाच भारतीय एकमेकांच्या सहकार्याने एकाच जहाजावर काम करतोय.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B.E.(mech), DIM

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..