नवीन लेखन...

‘डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही…

’“व्यवसायवृद्धीबरोबर प्रशिक्षित, बुद्धिमान मनुष्यबळाची योजना आणि अद्ययावत तंत्रज्ञान ही दोन लक्ष्य..
टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल

बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक अशी ओळख असलेले टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल यांच्याशी साधलेला सुसंवाद त्यांच्या दूरदृष्टी आणि सखोल अभ्यासाची प्रचिती देतो. नुकतीच त्यांनी टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. तत्पूर्वी टीजेएसबी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते. वाणिज्य कायद्याचे पदवीधारक असलेले शरद गांगल मानव संसाधन आणि व्यवस्थापन क्षेत्र यातील पदवीधर आणि तज्ज्ञ आहेत. त्यांनी भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योग समूहात विविध उच्चपदांवर दीर्घकाळ काम केले आहे. औद्योगिक, व्यावसायिक संस्था, भारतीय आणि विदेशी विद्यापीठ येथे ते तज्ज्ञ व्याख्याते आहेत. तसेच ते सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य बँक प्रकोष्ठ प्रमुख आहेत. विविध सामाजिक कार्यात असलेले शरद गांगल विद्यार्थी विकास योजना या शैक्षणिक उपक्रमाचे संस्थापक सदस्य आहेत.

सहकारी बँका, अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि टीजेएसबी सहकारी बँकेची आगामी वाटचाल याविषयी आमच्या ‘पासबुक आनंदाचे’ वार्षिकांकाच्या टीमसोबत त्यांनी संवाद साधला. त्यांची प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण मुलाखत घेण्याचे काम महेंद्र वसंत कोथळे यांनी केले आहे. श्रीयुत कोथळे यांनी टीजेएसबी बँक, सारस्वत बँक आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक येथे विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय सहकारी बँक कर्मचारी महासंघ आणि सहकारी बँक अधिकारी संघटना यामध्ये काही काळ पदाधिकारी होते. ‘पासबुक आनंदाचे’ अंकाच्या वाचकांसाठी ही विशेष भेट!

 

  1. सर आपण कॉर्पोरेट क्षेत्रात सुमारे 40 वर्षे उच्च पदांवर काम केले आहे. सहकारी क्षेत्राबाबत आपला दृष्टिकोन काय आहे?

शरद गांगल भारतासारख्या प्रगतशील देशात विकासाची खरी संकल्पना सहकार चळवळीच्या माध्यमातूनच जनमानसात रुजली. साम्यवादी आणि भांडवलशाही या दोन क्षेत्रांचा आर्थिक पातळीवर विशेष प्रभाव होता. साम्यवादामुळे नुकसान कमी झाले पण भांडवलशाहीचा प्रभाव एकतर्फी होता. साम्यवाद आणि भांडवलशाही या दोघांची विचारधारा प्रचंड टोकाची होती. मग अशा परिस्थितीमध्ये समतोल राखणाऱ्या सहकाराची जास्त गरज भासू लागली. साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही याचा सुवर्णमध्य म्हणजेच सहकार चळवळ.  ‘एक व्यक्ती एक मत’ हे सहकार चळवळीचं वैशिष्ट्य ठरलं कारण ती लोकशाही मार्गाने जाणारी होती आणि आजही आहे. स्वातंत्र्यानंतर सहकाराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला. सहकाराचा आयाम बँका, पतसंस्था, कृषी व ग्रामीण सहकारी संस्था, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, विणकर संस्था, मच्छीमार संस्था, बचत गट, ग्राहक भंडार, हाउसिंग संस्था, अभिनव संस्था यांसह अनेक क्षेत्रात व्यापला गेला. सर्वसमावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल तर सहकार चळवळीशिवाय पर्याय नाही.

  1. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी बँकांचे आजचे स्थान आणि भूमिका काय आहे?

शरद गांगल सहकारी चळवळीचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाला नवी दिशा मिळाली आहे. सहकार चळवळीत नागरी सहकारी बँकांचा उल्लेख सन्मानाने केला जातो. एकेकाळी स्थानिक गरज भागविण्यासाठी स्थापन झालेल्या सहकारी बँका आज जिल्हा, राज्य या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यामध्ये सहकाराचा संदेश घेऊन पोहोचल्या आहेत. जनमानसात आपल्या वाटणाऱ्या या सहकारी बँका आधुनिक सोयीद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. तसेच निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच भरभरून मदत करीत आहेत. त्यामुळे सहकारी बँकांची पारदर्शकता व आपुलकीची भावना सर्व समाजाला ज्ञातच आहे. याचं कारण असं सामान्य ग्राहक असो, खातेदार असो, कर्जदार असो यांना खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सहकारी क्षेत्रामध्ये, मग त्या ग्रामीण भागातील सहकारी बँका असोत, पतपेढी असो, ग्रामीण बँका असो यांचाच आधार वाटतो. कारण हातावर पोट असणारी माणसं, छोटे विक्रेते, छोटे उद्योजक यांना खाजगी किंवा राष्ट्रीय बँका तेथील व्यवस्थापनामुळे परवडू शकत नाहीत. खरं तर याच सामान्य किंवा दुर्बल घटकांना आर्थिक सहकार्याची गरज असते. अशांना सहकार चळवळ हा नक्कीच आशेचा किरण ठरतो. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार कायमच परिणामकारक ठरलेला आहे. एक गोष्ट सांगतो, 1948 साली भारताचा आर्थिक गणनेत जगात सहावा क्रमांक होता आणि त्यावेळी दरडोई उत्पन्न जगाच्या सरासरी 18 टक्के होतं. 2020 साली भारताचा क्रमांक पाचवा आला आणि दरडोई उत्पन्न होतं सरासरी 18 टक्केच. या 75 वर्षात आर्थिक स्थिती तिथेच आहे, आर्थिक मॉडेल तिथेच आहे. 1980 ते 90 या काळात आपण तेराव्या स्थानी होतो. 1990 च्या काळात दरडोई उत्पन्न प्रचंड प्रमाणात घसरले होते. 1990 नंतर नवीन आर्थिक धोरणामुळे हळूहळू वेग घ्यायला सुरुवात झाली. आर्थिक सुधारणेचा वेग हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आपला देश लवकरच पोहोचेल अशी आशा आहे. आणि यात सहकार क्षेत्राचं मोठं योगदान तळागाळातील घटकांकरिता असणार आहे.

  1. पण आज मग सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे का?

शरद गांगल सहकारातून स्वाहाकार होण्याची काही उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण त्या साखळीत संस्कारांची कडी नव्हती. म्हणून ‘सहकारभारती’ सारख्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी हे ब्रीद घेतले की संस्कारातून सहकाराची निर्मिती करू आणि ते करावं लागेलच. रिझर्व बँकेचे किंवा केंद्र व राज्य सहकार खात्याचे जे गव्हर्नन्स मॉडेल आहे, त्याला मजबुती आणावी लागेल आणि दुर्दैवानं होतं असं की, सहकारी बँकेमध्ये एखादा गैरव्यवहार झाला की, त्याला प्रसिद्धी खूप मिळते. गेल्या पाच-सहा वर्षात जर आपण बघितलं तर काही खासगी बँका, काही व्यापारी बँकांमध्येदेखील काही प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांचं नाव आपण अगदी आदराने घेतो, परंतु त्याच्याकडे जास्ती लक्ष दिले जात नाही. याचं एक कारण म्हणजे सहकारी संस्था या सामान्य माणसाच्या असल्यामुळे इथे गैरव्यवहार होऊच नये अशी अपेक्षा असते. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं की, Co-Operative banks are subject to socialaudits. परंतु अशा प्रकारचे  सोशल ऑडिट इतर क्षेत्रातल्या बँकांचे होत नाही आणि मग लक्षात राहते ती सहकारी बँक.

  1. 1990-91 नंतर जागतिकीकरणाचं वारं सुरू झालं. त्याचा परिणाम सहकारी बँकांच्या व्यवस्थापनावर आणि व्यवसायावर झाला का?

शरद गांगल जागतिकीकरणापेक्षा प्रायव्हेट सेक्टरला मिळालेली एन्ट्री महत्त्वाची आहे. ग्लोबलायझेशन झालं पण परदेशी बँका आपल्याकडे आल्या नाहीत. उलट होत्या त्या कमी झाल्या. कारण या स्पर्धेमध्ये आपल्या खासगी बँकांनी अधिक जलद गतीने विस्तार केला. खरं तर त्यामुळे फॉरेन बँकांना आपला गाशा गुंडाळावा लागला. मला विचाराल तर जागतिकीकरणाचा फायदा झालाय. कारण जो छोटा कारखानदार होता, उद्योजक होता, उत्पादक होता त्याला ग्लोबलायझेशनमुळे निर्यातीच्या संधी मिळाल्या. आज भारतामध्ये ‘एमएसएमई’चं जे योगदान आहे ते मोलाचं आहे. कारण त्यांचे बँकर्स कोण आहेत तर प्रामुख्याने सहकारी बँका.

त्यामुळे ग्लोबलायझेशनचा बँकिंग क्षेत्राला तोटा झालेला नाही. झाला असेल तर तो फायदाच झालेला आहे. हे भाष्य मी पूर्ण अर्थव्यवस्थेसंदर्भात करत नाहीये तर बँकांपुरतं मर्यादित करतो आहे. जो आमचा छोटा कारखानदार होता, त्याला जागतिक बाजारपेठ मिळाली. त्याची निर्यात व्हायला लागली.  त्याला माल उत्पादन करण्यासाठी आयात सोयीची झाली. आणि त्यातून तो निर्यात करू लागला.

  1. अलीकडच्या काळात डिजिटल बँकिंग वाढले आहे याचा सहकारी बँकांवर काय दूरगामी परिणाम जाणवतो.

शरद गांगल आता डिजिटलायझेशनला पर्याय नाही.आज भारतामध्ये अनेक आर्थिक सुधारणा झालेल्या आहेत त्या डिजिटलायझेशनमुळेच. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत जाहीर केलं की डिजिटलायझेशनचा हा टप्पा आम्ही गाठणार आहोत. त्यावेळी त्याकडे थोडं शंकेने बघितलं गेलं. पण ज्या प्रमाणात क्यू आर कोड आणि यूपीआयद्वारे रोज होणारे व्यवहार आपण पाहिले तर आपण फार पुढे गेलो आहोत. सध्या भारतातील 40% आर्थिक व्यवहार हे डिजिटल व्हायला लागलेत. याबाबतीत आपला जगात

क्रमांक पहिला आहे. खरंतर डिजिटलायझेशन भारतातल्या प्रत्येक नागरिकाने स्वीकारलेले आहे. सहकारी क्षेत्राबाबत सांगायचे तर मला अभिमान

वाटतो की, आपली टीजेएसबी बँक यूपीआय सेवा सुरू करणारी देशातील पहिली बँक होती. त्यामुळे डिजिटलायझेशनचा सहकारी क्षेत्रावर होणारा परिणाम हा सकारात्मक असेल.

  1. डिजिटलायझेशनमुळे पर्सनल टच जातो का?

शरद गांगल अनेक ग्राहक बँकेमध्ये जाऊन आणि स्मार्टफोन वापरून व्यवहार करतात आणि त्याला आपल्या सहकारी बँकेतील कर्मचारी मदत करतो. डिजिटलायझेशनने जरी व्यवहार झाला तरी ग्राहकांशी काही ना काही कारणाने संपर्क करणं यासाठी काही बंदी नाही. ग्राहक मेळावे असतील ते घेता येऊ शकतात. जी त्रिसूत्री आहे ‘जनधन’, ‘आधार’ आणि ‘मोबाईल’, हे जर नसतील तर आर्थिक महाशक्ती होण्याचं स्वप्न आपलं कधी पूर्ण होऊ शकणार नाही. 2030 चं दहा ट्रीलियनची अर्थव्यवस्था होण्याचं देश स्वप्न पाहतोय, याला डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही आणि बँक हा त्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

त्यामुळे पर्सनल टच जातोय का तर मला नाही वाटत जात आहे. कारण तुम्हाला पर्सनल टच असण्यासाठी ज्या काही तुमच्या कार्यपद्धती आहेत त्यावर कोणतीही बंदी नाही. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असंच म्हटलं जातं की, आज तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, वर्चुअल रियालिटी आहे, मशीन लर्निंग हे आल्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांशी असलेला तुमचा संपर्क तुटतो की काय? आज ‘वर्क फ्रॉम होम’ म्हटल्यानंतर तुमचा कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नाहीये असं म्हटलं जात होतं. पण कॉर्पोरेट क्षेत्र यामधून हळूहळू शिकतेय. ज्याला आपण म्हणतो रिमोट वर्क टीम आणि रिमोट engagement model हे विकसित होत आहेत. त्यामुळे बदलत्या परिस्थितीशी जमवून घेणं म्हणण्यापेक्षा आहे ती परिस्थिती आपल्यासाठी फलदायीच आहे असं म्हणून त्याच्यासाठी नवीन धोरणे कॉर्पोरेट क्षेत्राने केली आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेक कंपन्यांचे खर्च वाचत आहेत. त्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होते आणि त्यामुळे त्याचा ग्राहक वाढतो. ग्राहक वाढला की पुन्हा उत्पादन वाढते. रोजगार वाढतो अशी साखळी विकसित होत जाते.

  1. बँकिंग हा व्यवसाय आहे की सेवा आहे आपल्याला काय वाटतं?

शरद गांगल मी यापूर्वी एचडीएफसी लाईफ इन्शुरन्समध्ये काम केलेलं आहे. हा प्रश्न नेहमी विचारला जायचा आणि माझं नेहमी हेच उत्तर असायचं की, विमा क्षेत्र असो किंवा बँकिंग असो हा ‘सेवा देण्याचा व्यवसाय आहे’.

आज कोणतेही क्षेत्र असेल, बँकिंग, आयटी, इन्शुरन्स तिथे केंद्रबिंदू हा ग्राहकच आहे. तेच कॅपिटल आहे. तुमची कॉम्प्युटर किंवा तंत्रज्ञानाची इन्व्हेस्टमेंट किती आहे, लाखो लोक जी काम करतात ती एक सेवाच आहे.

  1. सामान्य माणसाचं अर्थकारण आणि अर्थसंकल्प याची सांगड आपण कशी घालाल?

शरद गांगल आपला अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला जाहीर होतो आणि जे बदल त्यामध्ये होत असतात ते कुठलंही सरकार असलं तरीसुद्धा ते त्यांचं आर्थिक गणित अशा स्वरूपात बसवतात की ज्याच्यामुळे देशातील सामान्य माणसाची आर्थिक घडी व्यवस्थित राखली जाईल. म्हणजे जे कर असतात, त्यामधून तो आर्थिक मदत देऊ शकतो किंवा गुंतवणूक करतो. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिफेन्स असेल, पोस्ट असेल या सेवा आहेत. या सेवा देण्यासाठी महसूल revenue निर्माण करावा लागतो आणि trickle down effect शेवटच्या माणसापर्यंत जातो. आज आपल्याला वाटतं भारतामध्ये टॅक्सेस खूप आहेत. पण जगाचा विचार केला तर भारतामधील इन्कम टॅक्स हा इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. कॉर्पोरेट टॅक्स जर का बघितला तर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींनी त्यावेळी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही हा टॅक्स 25% वर आणू आणि तो तसा आणलाही. आज मोठ्या प्रमाणावर जीएसटी संकलन होत आहे. पण कुठेतरी गैरसमजूत आहे की जीएसटीमुळे टॅक्सेस वाढले. पण 90% commodities  म्हणजे 90% ज्या आपण वस्तू घेतो त्यांच्यावर असणाऱ्या सेल्स टॅक्स आणि इतर टॅक्स याची जर बेरीज केली तर ती जीएसटीपेक्षा जास्त होते. आज जीएसटीच्या प्रणालीमुळे आपण आर्थिक नियंत्रण आणू शकलो आहोत. One Nation One Tax याच्यामुळे हे शक्य झाले. दुसरं असं की, याच्यात जी गळती होत होती ती टेक्नॉलॉजीमुळे कमी झाली. त्यामुळे सरकारी उत्पन्न वाढलंय. कोविडपासून आज 80 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं रेशन दर महिन्याला दिलं जातं. हे आपल्याला परवडलं नसतं पण आता हे या कर संकलनामुळेच शक्य होत आहे.

आपण बरेच आर्थिक बदल केले आहेत. जी करप्रणाली होती ती अतिशय मजबूत केली. जगातील एक असा मापदंड आहे की Tax to GDP ratio तो भारतात खूप कमी म्हणजेच साधारण 10% आहे व काही प्रगत देशात तो 40% च्या वर आहे. इतर देशांमध्ये सेवा चांगली मिळते कारण टॅक्स कलेक्शन जास्त आहे. तो जसा वाढत जाईल तसतसा आपला, जो शेवटचा नागरिक आहे त्याच्यापर्यंत सरकारी फायदे जाऊ शकतील. त्याला हात देऊन मूळ प्रवाहात आणणं हे जर झालं तर तोही करप्रणालीत येईल व अधिक समृद्धी येईल. हा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आपण त्या दिशेने नक्कीच वाटचाल करतो आहोत.

  1. आपल्या प्रदीर्घ व्यवस्थापकीय अनुभवाच्या जोरावर आपण पुढील दहा वर्षात टीजेएसबी बँकेकडे कशा पद्धतीने पाहत आहात?

शरद गांगल दहा वर्षांचा विचार नक्कीच करायला पाहिजे. आज जगामध्ये जो विचार केला जातोय तो पुढील पाच वर्षांचा आहे. कारण अनिश्चितता खूप  वाढली आहे, खरं तर कोविडच्या आधीपासूनच याची सुरुवात झाली होती. कोविडनंतर निश्चितच आपण पाच वर्षांचाच विचार करणे आवश्यक आहे.

2025 सालापर्यंत आम्ही (टीजेएसबी सहकारी बँक)  पंचवीस हजार कोटी व्यवहाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी बँकेचा व्यवहार वीस हजार कोटी होता. आर्थिक क्षेत्रात काम करत असताना आपण व्यावसायिक वाढ आणि नफा याचा समतोल ठेवायला पाहिजे. आर्थिक वाढीला मर्यादा नाहीत. भारतात सर्वच उद्योगांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याचं कारण प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता. भारताला पाच ट्रिलियन आणि दहा ट्रिलियनपासून जर कोणी रोखू शकत असेल तर फक्त प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता. त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या कर्मचाऱ्यांना कसं सर्वोत्तम प्रशिक्षण देता येईल याचा विचार करत आहोत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत टीजेएसबीने पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, राष्ट्रीयकृत बँकांच्या सुद्धा आधी ठाण्यामध्ये पहिलं एटीएम टीजेएसबीने सुरू केलं. सध्या आपण TCS चं Core Banking Solution Implement करतोय. खासगी बँका ज्या ग्राहक सेवा देतात त्याच्यापेक्षा अधिक चांगली अशी सेवा आपण देऊ असा मला विश्वास आहे.नवीन Core Banking Solution Implemention द्वारे ग्राहकांना अनेक सेवा अतिशय वेगाने मिळतील. मुख्य म्हणजे ज्या पिढीने टीजेएसबी सहकारी बँकेशी व्यवहार केला ती पिढी आता हळूहळू कमी होत आहे. त्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी आता पुढे आली आहे. त्यांना जुन्या पद्धतीचे बँकिंग माहितीच नाही. त्यांना टेक्नॉलॉजी असलेले बँकिंग माहिती आहे.

त्यामुळे व्यवसायवृद्धी बरोबरच प्रशिक्षित आणि बुद्धिमान मनुष्यबळाची योजना आणि टेक्नॉलॉजी ही दोन लक्ष्य सध्या डोळ्यांसमोर आहेत. याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर व्यवसाय वृद्धीला नक्कीच यश येईल यावर विश्वास आहे. आपली अर्थव्यवस्था आहे ती Consumption lead आहे. म्हणजे आपल्याला निर्यात पाहिजे का? तर हो, आवश्यक आहे. पण निर्यात जर कमी झाली तर आमची अर्थव्यवस्था गडबडेल का? तर इतर देशांची गडबडेल इतकी आपली गडबडणार नाही. कारण आपली लोकसंख्या. जर दरडोई उत्पन्न वाढत गेलं तर consumption वाढणारच आहे. उत्पादनाच्या वाढणाऱ्या संधी, नोकरी व्यवसाय करण्याच्या संधी हे वाढत जाणार आहे. त्यामुळे अतिशय प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उच्च तंत्रज्ञान यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हे करणं शक्य आहे कारण आमची बॅलन्स शीट मजबूत आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना आम्हाला मागे बघावं लागत नाही. फक्त आमचा कटाक्ष एकच असतो तो म्हणजे येणारी नवीन टेक्नॉलॉजी खासगी बँकांपेक्षा आधी आपल्याकडे कशी येईल. सहकारी बँकेमध्ये हे नक्कीच शक्य आहे.

आपलं आर्थिक भविष्य उज्ज्वल आहेच फक्त गरज आहे सुयोग्य नियोजनाची.. प्रशिक्षणाची आणि उच्च तंत्रज्ञानाची!!

–मुलाखतकार – महेंद्र कोथळे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे  दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..