नवीन लेखन...

वानखेडे स्टेडियमची गोष्ट

 

सत्तरच्या दशकातील गोष्ट. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे.

विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे कॉंग्रेसचे जुने आणि जाणते नेते होते. महाराष्ट्राचा पहिला अर्थमंत्री बनण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता. राजकारणासारख्या रुक्ष प्रांतात राहूनही  त्यांनी क्रिकेटचा शौक जपला होता.  यामुळेच १९६३ पासून त्यांच्याकडे  मुंबई क्रिकेट असोसिएशन चं अध्यक्ष पद होतं. त्यावेळच तीच नाव बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणजे बिसीए असं होतं.

नवीन बांधलेले वानखेडे स्टेडियम

मुंबई ही भारतीय क्रिकेटची राजधानी समजली जाते. आणि बीसीए इथल्या क्रिकेटची व्यवस्था पाहते. असं असूनही या संस्थेच स्वतःच क्रिकेट स्टेडियम नव्हत. मुंबई मध्ये असलेलं ब्रेबोर्न स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या मालकीच होतं.

ब्रेबॉर्नला भारताचा लॉर्डस म्हणून ओळखलं जायचं. इंग्रजांच्या काळात म्हणजे १९३७ साली मरीन ड्राईव्हला समुद्रकिनाऱ्याजवळ हे सुंदर स्टेडियम बांधण्यात आलं होतं. तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्नवरून स्टेडियमला हे नाव देण्यात आलं .  भारतातले अनेक महत्वाचे सामने याच मैदानात खेळवले जायचे.  २५००० प्रेक्षक बसतील एवढी या स्टेडियमची क्षमता होती.

एकदा विधानसभा अध्यक्ष असताना शेषराव वानखेडेकडे राज्यातले तरुण आमदार आले. त्यांनी मागणी केली……

“विधानसभेत रोज राजकीय चर्चा वाद चालेले असतात. या स्ट्रेसपासून रिलीफ मिळावी यासाठी आमदारांची एक बेनेफिट क्रिकेट मॅच खेळवावी.”

जुने वानखेडे स्टेडियम

क्रिकेट सामना म्हणल्यावर शेषराव वानखेडे खुश झाले. पण काही क्षणात त्यांना लक्षात आले की सामना खेळवायचा तर तो कुठे खेळवायचा? त्याकाळात सीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोशिएश्नमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये राखीव सीटवरून वाद सुरु होते. मॅच खेळवायची तर सीसीआयकडे जावे लागणार. वानखेडेना वाटलं की हा काही मोठा इश्यु नाही. आणि राज्याचे आमदार मंत्री खेळणार मग सीसीआय काय अडवणूक करणार नाही.

तेव्हा सीसीआयचे प्रेसिडेंट होते भारताचे डॉन ब्रॅडमन म्हणून ओळखले जाणारे पुर्व क्रिकेटपटू विजय मर्चंट. त्यांना भेटायला आमदारांची एक टीम त्यांच्या घरी पोहचली. यात होते शेषराव वानखेडे, उदयसिंहराव गायकवाड आणि एम. डब्ल्यू, देसाई .

विजय मर्चंटनी चहा वगैरे देऊन त्यांच स्वागत केलं. पण बेनिफिट मॅच साठी ब्रेबॉर्न देण्याचा विषय निघाल्यावर स्पष्ट नकार दिला.  बोलता बोलता त्यांच्यात आणि वानखेडे यांच्यात शब्दाला शब्द लागून वाद झाला.दोघाची खडाजंगी झाली. वानखेडे म्हणाले,

” तुम्ही मैदान देत नसाल तर आम्ही आमचं स्वतःचं स्टेडियम उभा करू.”

विजय मर्चंट तोऱ्यात म्हणाले,

“तुम घाटी लोग स्टेडियम क्या बनाएगा”

या नकारामागे सीसीआय आणि बीसीए वादाची पार्श्वभूमी तर होतीच पण शिवाय विजय मर्चंट यांचा मराठी द्वेष देखील होता. विजय मर्चंट हे मुंबईत एका श्रीमंत गुजराती कुटुंबात जन्मले होते. त्यांना आपल्या गुजराती असण्याचा अभिमान होता. क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांच्या बरोबरची त्यांची रायव्हलरी खूप गाजली होती. मराठी माणसांबद्दल त्यांच्या मनात का कुणास ठावूक एक अढी होती. याच मुळे महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला असले अपमानजनक उद्गार त्यांनी काढले.

सगळ्या आमदारांना विजय मर्चंट यांचा राग आला होता. पण काही पर्याय नव्हता. झालेला अपमान गिळून सगळे तिथून निघून आले. काही दिवसात ही झालेली गोष्ट बाकीचे विसरून गेले पण शेषराव वानखेडे हा अपमान विसरले नव्हते. मात्र ते राग मनात ठेवून बसले नाहीत. त्यांनी आता एक स्टेडियम उभा करायचेच अशी खुणगाठ बांधली.

राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे ते आपल्या सोबती आमदारांना घेऊन गेले. वसंतराव नाईक म्हणाले,

“एक स्टेडियम असताना दुसरे स्टेडियम कशासाठी?”

आमदारांनी विजय मर्चंट यांच्या घरात घडलेली हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. वसंतरावाना माहित होते एवढे मोठे स्टेडियम बांधायचे तर पैशाची मोठी तरतूद करावी लागेल. राज्याच्या तिजोरीवर एवढा मोठा भर कसा टाकायचा? वानखेडे त्यांना म्हणाले,

“आम्हाला पैसे नकोत. फक्त आम्ही म्हणतो ती जागा स्टेडियमसाठी मिळवून द्या. बाकीचे पैसे आम्ही उभे करतो.”

मुख्यमंत्र्यांनी जागा मिळवून दिली. बॅरिस्टर वानखडेनी जिद्दीने अवघ्या तेरा महिन्यात ब्रेबॉर्नपेक्षा मोठे आणि सुंदर स्टेडियम उभे केले. याचे आर्किटेक्टसुद्धा शशी प्रभू नावाचे एक महाराष्ट्रीयनह होते.  विजय मर्चंट यांच्या नाकावर टिच्चून बांधलेले हे स्टेडियम मरीन ड्राईव्हवर ब्रेबॉर्न स्टेडियमपासून अगदी हाकेच्या अंतरावर थाटात उभे आहे.

मराठी माणसाची अस्मितेसाठी अख्खं एक स्टेडियम उभा करणाऱ्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचं नाव सर्वानुमते या नव्या स्टेडियमला देण्यात आलं. पुढे जाऊन शेषराव वानखेडे बीसीसीआयचे चेअरमन देखील झाले.

१९७४ साली वानखेडे स्टेडियम उभे राहिल्यापासून भारतीय संघाचे ब्रेबॉर्नवरचे कसोटी सामने खेळवणे थांबवण्यात आले. कधी तरचं तुरळक एखादा वनडे सामना, रणजी सामना वगैरे तिथे खेळवला जात होता.  पुढे अनेक वर्षांनी जेव्हा वानखेडे स्टेडियमचं रेन्यूएशनचं काम सुरु होतं तेव्हा म्हणजे जवळपास ३६ वर्षांनी ब्रेबॉर्नवर कसोटी सामना झाला. सेहवागने या मॅचमध्ये द्विशतक ठोकले.

आज वानखेडे स्टेडियम हे फक्त भारतातच नाही तर जगातल्या सर्वोत्तम स्टेडियमपैकी एक आहे. इथेच रवी शास्त्रीने सहा चेंडूत सहा सिक्सर मारले होते. २०११ साली भारताने वर्ल्ड कप याच स्टेडियमवर जिंकला होता. जगातला बेस्ट बॅट्समन आणि मुंबईकरांचा आपला लाडका सचिन याच मैदानात आपला शेवटचा सामना खेळला होता.

अशा अनेक कटू गोड आठवणी या स्टेडियमशी जोडल्या गेलेल्या आहेत. इथे क्रिकेट खेळताना एक वेगळीच उर्जा जाणवते असं अनेक खेळाडुंच मत आहे.  पण जेव्हा भारतीय टीम साठी चीअर करणारा मुंबईकरांचा वानखेडेमधला आवाज घुमतो तेव्हा मात्र काही न करताच  निम्मी मॅच आपण मारलेली असते.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..