नवीन लेखन...

गवाक्षवाली खोली

 

(ओ’ हेन्रीच्या The Skylight Room’ या इंग्रजी कथेचे मुक्त रूपांतर)

सुदर्शन लॉजच्या मालकीणबाई, मिसेस पालेकर सर्वात आधी मोठ्या खोल्या दाखवायच्या. दाखवताना त्या खोलीच्या ‘सद्गुणांची’ – म्हणजे हवेशीरपणा, आकार, कपाटे, बाथरूम, फर्निचर अशा सुखसोयी, आधीचा डॉक्टर भाडेकरू कसा सलग आठ वर्षे तिथं आनंदात राहून गेला वगैर वगैरे- यांची अशी काही भलामण लावत सुटायच्या की होतकरू भाडेकरूला त्यांना थांबवताच यायचं नाही. आणि तरी धाडस करून मध्येच तो, “नाही हो बाई, मी कुणी डॉक्टर किंवा डेंटिस्ट नाही, तेव्हा ही १००० रुपये महिना भाड्याची खोली मला परवडायची नाही” असं बोलू शकलाच तर पालकरबाईंच्या चेहऱ्यावर, ‘तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तशा भाड्याची खोली परवडेल अशा उच्चभ्रू व्यवसायात जाण्याइतपत शिक्षण का दिलं नसेल?’ असा कुत्सित भाव उमटायचा.

मग त्या दुसऱ्या मजल्यावरच्या महिना ७५० रुपये भाड्याची खोली दाखवायच्या. त्यांच्या मते खरं तर तिचं भाडं ९०० होतं आणि “तुळपुळे नावाचे एक गृहस्थ तितकं भाडं दर महिन्याला अगदी वेळच्यावेळी देऊन बरेच महिने राहिले होते. अगदी त्यांच्या थोरल्या भावानं तासगावमधल्या त्याच्या द्राक्षमळ्याची देखभाल करायला आग्रहाने बोलवून नेईपर्यंत. मग एक शेवडेबाई येऊन रहायच्या तीन तीन महिने सलग, उन्हाळ्याची सुट्टी घालवायला म्हणून. हवेशीर आणि स्वतंत्र बाथरूम होती ना ! त्याना आवडायची ती खोली.”

पण मग भाडेकरूनं “नाही हो, याहून कमी भाड्याची आहे का एखादी?” अस्ं विचारलं की पालेकरबाई तिसऱ्या मजल्यावर शेकदार नावाचे गृहस्थ रहात असलेली खोलीकडे न्यायच्या. हे गृहस्थ नाटककार होते. दिवसभर लिहित आणि विड्या फुंकत असायचे खोलीत. त्यांच्या खोलीत खिडक्याना लावलेले कलाकुसरीचे पेल्मेट्स दाखवायला म्हणून घेऊन जायच्या खऱ्या पण खरा उद्देश असायचा की ‘नवीन भाडेकरू आणलेला असावा, तेव्हा थकलेले भाडे द्यायला हवे नाहीतर आपल्याला खोलीतून हुसकून लावणार मालकीणबाई’ अशी भीती शेकदारांच्या  मनात निर्माण करायची. अशानं शेकदार दुसऱ्या दिवशी थकबाकीतली काही तरी थोडीफार रक्कम आणून द्यायचे.

पण भाडेकरूनं “नाही, महिना दोनशे रुपयेच्यापलीकडं भाडं आपल्याला परवडणारच नाही” असं सांगितलं तर पालेकरबाई त्याला आणखी खोल्या दाखवायला स्वत: यायच्या नाहीत. “लिंगव्वा” अशी मोठ्यानं हाक मारायच्या आणि मग लिंगव्वा नावाची ठार काळ्या रंगाची आणि दातवण लावून त्याहूनही काळे झालेल्या दाताची त्यांची मोलकरीण “बरुत्तेन रीSS (येते हो मी)” म्हणत वर यायची आणि चवथ्या मजल्यावरची छपरात गवाक्ष असलेली खोली दाखवायला त्याला घेऊन जायची.

७ फूट X ८ फूट मापाची आणि समोरासमोरच्या दोन भिंतीना लाकडी फडताळं असलेली अशी ती खोली होती. खोलीत एक लोखंडी कॉट, एक खुर्ची, आरसा आणि वॉशबेसिन एव्हढंच ‘फर्निचर’ होतं. छपरात उजेड येण्यासाठी २ फूट X २ फूट मापाचं जाड पारदर्शक तावदान बसवलेलं गवाक्ष होतं त्यातून दिवसा निळं आणि रात्री काळं आकाश दिसायचं.

“तुला सांग्तंय बSSग, बाई चिवाट हाय. भाडं अडीच्शाच्या खाली हुनार न्हSSई. परवाडतंSS तं  बग.” कानडी हेल काढत लिंगव्वा म्हणायची.

आणि एक दिवस आश्लेषा सावे आली घर शोधत. एक जुना टाईपरायटर – जड होता तो – दोन्ही हातात पेलून धरला होता. लहानखुऱ्या चणीची, सावळी, गोल काळे पण स्वप्नाळू डोळे आणि जाडजूड लांबसडक वेणी. शरिराची उंची वाढायची थांबली होती पण केसांची लांबी नाही. ती लांब वेणी बहुधा म्हणत असावी, ”बाई ग, माझ्या पावलावर पाउल ठेवून वाढत का नाहीस तू?”

पालेकरबाईनी पहिल्या मजल्यावरची मोठी खोली दाखवली. “बघ, या खोलीत किती मोठी कपाटं आहेत. अगदी आख्खा उभा सांगाडासुध्दा मावतो यात. नाही तर भूल देण्याची सिलिंडरं, नळ्या, अवजार, सगळी……”

“हो, पण बाई, मी डॉक्टर नाही नि डेंटिस्ट पण नाही असलं काही माझ्याजवळ बाळगायला.” आश्लेषा अंगावर शहारा आल्यासारखं थरकापत बोलली.

पालेकरबाईनी डॉक्टर किंवा डेंटिस्ट असू न शकलेल्या क्षुद्र व्यक्तींसाठीचा त्यांचा राखीव कुत्सित कटाक्ष टाकला आणि दुसऱ्या मजल्यावर मोर्चा वळवला.

“साडे सातशे? बापरे, मी गडगंज श्रीमंत नाही हो! साधी, गरीब टायपिस्ट आहे. अगदी कमी भाड्याच्या जागा असतील तर दाखवा ना.” आश्लेषा म्हणाली.

तिसरा मजला, शेकदारांची खोली.

दारावर थाप ऐकताच शेकदार गडबडीनं उठले. त्या गडबडीत टेबलावरचा भरलेला अॅश ट्रे खाली पडली. विड्यांची थोटकं जमिनीवर विखुरली.

“अरे…, शेकदार….., आहात होय घरात? मला जरा पेल्मेट्स दाखवायची होती याना म्हणून आले.”

“वा. खूप छान. पण महागातली असणार ! होय ना?” छानसं हसून आश्लेषानं कौतुक केलं.

त्या दोघी जणी दाराबाहेर गेल्यानंतर शेकदारांनी लगबगीनं त्यांच्या नव्या नाटकाच्या नायिकेचं ‘उंच, गोरी आणि खांद्यापर्यंत केस’ असं केलेलं वर्णन रद्द करून नवीन वर्णन लिहीलं….’लहानखुऱ्या चणीची, सावळी, गोल काळे पण स्वप्नाळू डोळे आणि जाडजूड लांबसडक वेणी.’ “निर्माते सोहन घाग नक्की खुश होतील” म्हणत त्यांनी नवी विडी पेटवली.

दोघी दाराबाहेर पडताच कर्कश्श हाक गेली’ “लिंगव्वा.”

लिंगव्वा तीन जिने चढून आली आणि आश्लेषाला चवथ्या जिन्यावरून गवाक्षाच्या खोलीत घेऊन गेली. “आडीच्शे. वाटाघाट न्हाई.”

“चालेल. घेते मी.” आश्लेषा झोळणा झालेल्या कॉटवर बसत म्हणाली.

*****

आश्लेषा काम मिळवण्यासाठी रोज बाहेर जायची. संध्याकाळी परत येताना हातानी लिहिलेले कागद घेऊन यायची आणि रात्री बसून आपल्या टाईपरायटवर ते टाईप करायची. कधी कधी तिला काम नसायचं तेव्हा रात्री इतर भाडेकरूंबरोबर जिन्याच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या गप्पाटप्पांत सामील व्हायची. खरं तर गवाक्षवाल्या खोलीसाठी आश्लेषाचा जन्म झालेला नव्हताच ! शवपेटीसारखी दिसणारी उदास खोली आश्लेषासारख्या उत्साही, हसतमुख, मजेशीर हळुवार आणि रोमांचक कल्पना मनात बाळगणाऱ्या जीवासाठी? छे !! उदासवाण्या, आणि एकट्याच पडून असलेल्या त्या शवपेटीचा आणि मिळून मिसळून राहाणाऱ्या आश्लेषाचा काय जोड? शेकदारांना  त्यांच्या अद्याप अपूर्ण असलेल्या विनोदी नाटकातले तीन प्रवेश तिला ऐकवायचे होते आणि तिनंही ते ऐकायला संमती दिली होती. अशी ही कुणाला न दुखावणारी आश्लेषा, त्या मनहूस खोलीत ! दैवा, किती क्रूर आहेस तू?

आश्लेषा जेव्हा तास दोन तासांसाठी जिन्यात येऊन बसायची तेव्हा लॉजमधल्या पुरुष भाडेकरूंना आनंद व्हायचा. पण वरच्या पायरीवर बसलेल्या, म्युनिसिपालिटीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या, पिंगट केसांच्या उंच मानकामेबाई, ज्याना कुठल्याही वाक्यावर “खरं की काय?” असा उद्गार काढायची सवय होती त्या आणि सगळ्यात खालच्या पायरीवर बसलेल्या, सनराईज मार्टमध्ये काम करणाऱ्या नेमबाज कुसाळेबाई या दोघीच फक्त नाक मुरडायच्या. आश्लेषा मधल्या पायरीवर बसायची आणि सगळे पुरुष तिच्याजवळच्या मिळतील त्या पायऱ्यांवर. खास करून शेकदार. त्यांनी तर मनातल्या मनात स्वत:च्या आयुष्याच्या नाटकात आश्लेषाला नायिकेची भूमिका देऊन टाकली होती. नायक, अर्थातच तेच होते. तसेच दुसरे एक मिस्टर हविरे. ४५ वर्षांचे, चांगली प्राप्ती असलेले, लठ्ठ, आणि मठ्ठही. आणखीही एकजण, तरुण, पण सिगारेट ओढणारा जीवन म्हांब्रे. तो उगीचच कोरडा खोकला काढून तिचं लक्ष वेधून घ्यायचा, “जीवन, सिगारेट ओढत जाऊ नकोस रे” असं तिनं म्हणावं म्हणून. या तीनही पुरुषांनी तिला ‘छान, हसरी, मनमोकळी’ ठरवली होती. पण वरच्या आणि खालच्या पायऱ्यांवरची नाकं मात्र कायम मुरडलेलीच होती.

*  *  *  *  *  *

पालेकर बाईंचे भाडेकरू त्या दिवशी रात्री नेहमीसारखेच जिन्यात पायऱ्यांवर बसले होते. आश्लेषाच्या खोलीच्या उघड्या दारातून तिच्या छपरातलं ते गवाक्षही दिसत होतं. तिनं मान वर करून त्यातून दिसणाऱ्या आकाशाकडं नजर टाकली आणि खुद्कन् हसली आणि उद्गारली, “अरे व्वा, कानडा विठ्ठलु आला की! इथूनपण दिसतोय मला.”

सगळ्यांनी माना वर केल्या, एखादं विमान दिसतंय का बघायला जे कदाचित या खुळ्या पोरीचा मित्र उडवत असेल या अपेक्षेनं.

“नाही हो, तो तारा बघा. तो मोठा आणि चमचमतोय तो नाही. ती तर चांदणी आहे. पण तोSS तिच्या शेजारचा. स्थिर, उगाळलेल्या चंदनगंधाच्या रंगासारखा प्रकाश देतोय तो. माझ्या गवाक्षातून मी रोज रात्री बघते त्याला. मीच नाव दिलंय त्याला ‘कानडा विठ्ठलू’ असं. छान आहे नं? आमच्या पंढरपूरच्या विठोबाच्या ललाटावर कस्तुरी टिळा असतो ना, त्याचा मला भास होतो त्याच्यात म्हणून.” आश्लेषानं स्पष्टीकरण दिलं.

“खरं की काय? मला नव्हतं बाई माहित तू ग्रह ताऱ्यांची जाणकार आहेस हे.” मानकामे बाई नाक मुरडतच म्हणाल्या.

“अहो नाही. थोडीफार माहिती आहे इतकच.” आश्लेषा उत्तरली.

“खरं की काय?,” मानकामेबाई म्हणाल्या, “ पण तू जो दाखवते आहेस ना तो गॅमा नावाचा तारा आहे. कॅसिओपिया नक्षत्रातला. सूर्याच्या खालोखाल त्याचा नंबर लागतो आकारात आणि त्याचा भ्रमणमार्ग………”

“असेल हो बाई. पण ‘कानडा विठ्ठलू’ हेच नाव छान शोभतंय त्याला.” जीवननं संधी साधली. आणि मिस्टर हविरेनी त्याला अनुमोदन दिलं, “मानकामेबाई, खगोलशास्त्रज्ञांना आहे तितकाच अधिकार आश्लेषालाही आहे ताऱ्याला नावं द्यायला.”

“खरं की काय?”

“शूटिंग स्टार तर नाही ना तो? आणि हो, गेल्या रविवारी मी दहापैकी नऊ टार्गेट्स शूट केली बरं का शूटींग रेंजवर !” कुसाळेनी नेम साधला.

आश्लेषा अजून हरवलीच होती ताऱ्याकडं बघण्यात. “इथून तो तितकासा स्पष्ट दिसत नाही. माझ्या खोलीतून पहायला हवं तुम्ही त्याला. एखाद्या कोळश्याच्या खाणीतल्या खोल खोल विवराच्या तळातून वर बघताना काळं काळं आकाश आणि चमकते तारे दिसावे ना तसं दृश्य दिसतं माझ्या गवाक्षातून. विठ्ठलमूर्तीच्या काळ्या भाळावरला कस्तुरीगंधाचा टिळा,” आणि तिनं तल्लीनतेनं अभंगाची ओळ म्हटली. “कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेणे मज लावियेला वेधू.”

*****

काही दिवस गेले. आश्लेषाला आता कामं जरा कमी कमी मिळत गेली. या ऑफिसमधून त्या ऑफीसमध्ये चकरा टाकत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत टायपिंगसाठी पेपर्स मिळावेत म्हणून. पण आता बऱ्याच ऑफिसांनी त्यांचे स्वत:चे टायपिस्ट नेमले होते त्यामुळे सगळीकडे नन्नाचा पाढाच ऐकायला मिळे. प्राप्ती अर्थातच कमी कमी होत जवळजवळ थांबलीच.

आणि एक दिवस वणवण फिरून रात्री आश्लेषा लॉजवर परत आली ती अगदी गलितगात्र अशी. नेहमी याच वेळी परतायची ती खानावळीतून रात्रीचं जेवण जेवून. आज जेवली नव्हती. त्यासाठीचे पैसे नव्हते तिच्याजवळ.

हॉलमध्ये पाउल टाकलं आणि हविरेमहाशयानी तिला अडवलं. संधी साधून एकटी बघून चक्क लग्नाची मागणी घातली. त्याना कसंतरी टाळून तिनं पहिल्या पायरीवर पाय ठेवला तर हविरे तिचा हात धरायला सरसावले. हात वर करून आणि असलेला नसलेला जोर एकवटून तिनं त्यांच्या श्रीमुखात ठेवून दिली आणि पटकन् जिन्याच्या कठड्याला त्याच हातानं पकडलं. हळू हळू करत आश्लेषा तिसऱ्या मजल्यावर आली. शेकदार त्यांच्या खोलीत त्यांच्या ‘साभार परत’ आलेल्या नाटकातल्या नायिकेला, मीनलला (खरं तर त्यांच्या मनातल्या आश्लेषाला) स्टेजवरची हालचाल समजावणारी ओळ लिहित होते – ‘कसलेल्या बॅलेरिनासारख्या सफाईदार गिरक्या स्वत:भोवती घेत मीनल स्टेजच्या डाव्या बाजूकडून उजव्या विंगकडे जाते’-१, २, ३, ४ स्टॉप’. कसा तरी पाय ओढत आश्लेषा जिना चढून आली आणि तिनं आपल्या खोलीचं दार उघडलं. दिवा लावायला किंवा कपडे बदलायलाही त्राण नव्हतं तिच्या अंगात. कशीतरी जाऊन कॉटवर पडली. तिची आधीचीच बारीक आणि त्यात उपासमारीनं हलकी झालेली काया त्या कॉटच्या कमकुवत  स्प्रिंगांना देखील हलवू शकली नाही.  अंधारात कॉटवर पडल्यापडल्या तिनं डोळे उघडून गवाक्षाकडं पाहिलं आणि तिच्या मुखावर हलकसं स्मित झळकलं. तिचा कानडा विठ्ठलू शांतपणे प्रकाशत होता आकाशातून तिच्याकडं बघत. छोट्याश्या गवाक्षातून येणाऱ्या त्याच्या प्रकाशाशिवाय तिच्या भोवती विश्वच नसल्यासारखा अंधार होता. त्या छोट्याशा चौकोनातून दिसणारा कानडा विठ्ठलू, आपण का त्याला हे नाव दिलं? कदाचित मानकामेबाई म्हणतात तसा तो कॅसिओपिया नक्षत्रातला गॅमाच असेल. पण नाही. त्यानं कानडा विठ्ठ्लूच असायला हवं, गॅमा नाही.

पाठीवर झोपल्या झोपल्या तिनं दोनदा हात उचलायचा अयशस्वी प्रयत्न केला. तिसऱ्या वेळी तिनं दोन बोटं ओठांवर टेकली आणि त्यांचा फ्लायिंग किस विठ्ठलूकडं फेकला. हात त्राण नसल्यासारखा कॉटवर पडला. “चलते रे मी विठ्ठलू, निरोप घेते तुझा. तू आहेस तिकडं लक्षावधि मैल दूर माझ्यापासून. एकदाही डोळा मिचकावला नाहीस माझ्याकडं हसून बघून. पण तरी आपली ओळख झाल्यापासून मला दिसत राहशील अशी ही तुझी जागा नाही सोडलीस. कारण तुला माहित होतं, माझ्या भोवती या अंधाराशिवाय काहीच नाही ते. हो ना? पण आता मी चालले रे. काळजी घे स्वत:ची माझ्या कानड्या विठ्ठलू.”

सकाळी दहा वाजता लिंगव्वा वर आली साफसफाईला तेव्हा तिला आश्लेषाचं दार आतून बंद दिसलं. हाका मारूनही उघडलं नाही तेव्हा तिनं बाजुच्यांच्या मदतीनं धक्के मारून ते उघडलं. कॉटवर आश्लेषा उताणी पडली होती. श्वास चालू होता पण शुध्द नव्हती. हालवलं, कांदा हुंगवला, पाणी मारलं पण काही केल्या शुद्धीवर येईना. तेव्हा कुणी तरी अँब्युलन्ससाठी फोन केला.

थोड्या वेळातच सायरन वाजवत सुलेखा हॉस्पिटलची अँब्युलन्स सुदर्शन लॉजच्या दारात आली. तिच्यातून पांढरे कपडे घातलेला, स्टेथास्कोप गळ्यात लटकवलेला, तरतरीत, काळासाच पण हुशार दिसणारा डॉक्टर उतरून आला आणि त्यानं समोर आलेल्या पालेकरबाईना विचारलं, “तुम्ही कॉल केला होता? काय झालंय?”

“होय होय डॉक्टर, आम्हीच केला होता कॉल. काय झालंSS आमची एक भाडेकरू, आश्लेषा सावे बेशुध्द पडली आहे तिच्या खोलीत. टायपिस्ट आहे ती. आम्ही सगळ्यानी खूप प्रयत्न केले तिला उठवायचे पण उठतच नाहीय. असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं हो माझ्या लॉजमध्ये. त्याचं काय आहेSS……”

“कितवा मजला? खोली नंबर?” डॉक्टर पालेकरबाईंची कहाणी ऐकत थांबण्याच्या मूडमध्ये नव्हते. जराश्या जरबेच्या आवाजातच त्यांनी विचारलं आणि जिन्याकडे धावले.

“चौथा मजला, एकच खोली आहे मजल्यावर, गवाक्षाची खोली.”

दोन दोन पायऱ्या एका वेळी चढत डॉक्टर गवाक्षाच्या खोलीकडं धावले. पालेकरबाई सवयीनुसार सावकाश एक एक पायरी करत त्यांच्या मागून जिने चढायला लागल्या. त्या दुसऱ्या मजल्यावर पोचल्या तेव्हा डॉक्टर आश्लेषाला दोन हातांवर उचलून घेऊन घाईघाईनं खाली येताना भेटले. क्षणभर थांबून डॉक्टरांनी कॉल करण्यात दिरंगाई केल्याबद्दल तिखट शब्दात बाईंची कानउघाडणी केली आणि तडक खाली उतरले. काय चाललंय ते बघण्याच्या कुतूहलाने जमा झालेल्या सगळ्या भाडेकरूंच्या आणि इतर बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत ते पळतच अँब्युलन्सपर्यंत पोचले. आश्लेषाला तशीच हातावर घेऊन चपळाईनं ड्रायव्हरनं उघडून धरलेल्या दारातून आत शिरले आणि ड्रायव्हरला म्हणाले, “आंबिले, फास्ट. तिसऱ्या मिनिटाला पोचायला हवंस कॅजुअल्टीमध्ये.”

****

दुपारी तीनच्या सुमाराला जीवन म्हांब्रे सायकल दामटत सुलेखा हॉस्पिटलमध्ये पोचला. रिसेप्शन काउंटरवर चोकशी करायला गेला. तिथल्या नर्सला त्यानं आश्लेषाचं नाव सांगून घाबरत घाबरतच “शुद्धीवर आली का ती आणि कशी आहे आता?” असं विचारलं. तेव्हढ्यात काउंटरच्या मागे पाठमोरे उभे असलेले सकाळचे डॉक्टरच वळून पुढं आले आणि म्हणाले, “आश्लेषा सावे ना? शुद्धीवर आली आहे. मीच आणलं होतं तिला सुदर्शन लॉजमधल्या तिच्या खोलीतून उचलून. दोन दिवसांपासून पोटात अन्न गेलेलं नव्हतं. उपासमार झाल्यानं ग्लानीत गेली होती. ठीक आहे आता. माझ्याकडेच आहे तिची केस. नक्की बरी होईल. काळजी करू नका. पण ताकत येईपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहील ती. वाटलं तर फोन करून तुम्ही चौकशी करू शकाल वेळोवेळी. ठीक आहे?”

“थँक्स डॉक्टर. मी फोन करेन आपल्याला. पण आपलं नाव नाही समजलं?” जीवननं कृतज्ञतेनं विचारलं.

उत्तर आलं:

“मी डॉ. विठ्ठल कानडे.”

–- मुकुंद कर्णिक

****

(ओ’ हेन्रीच्या The Skylight Room’ या इंग्रजी कथेचे मुक्त रूपांतर)

Avatar
About मुकुंद कर्णिक 22 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

5 Comments on गवाक्षवाली खोली

  1. छान कथा.अशाच सुंदर सुंदर कथा येऊ देत.

  2. सुंदर, नविन विषय, जुन्या जमान्यातील लाॅजीगचे चित्र डोळ्या समोर रेखाटणे. तसेच डाॅक्टर विठ्ठल कानडे यांचा आगळीक प्रवेश खूपच भावला व कथा वाचताना सजीवतेचा आभास जाणवला.

  3. किती सुंदर कथा ! वातावरण इतकं चपखल की हा अनुवाद आहे हे ठाऊक असूनही विसरायला झालं …. पात्रं अगदी आपल्या मातीतली वाटतात …. शेवट तर भारीच , डॉक्टरांचे नाव कल्पक !

  4. अप्रतिम! मुकुंदजी तुम्ही लिहलेला अनुवाद खूपच सुंदर आहे. अनुवाद न वाटता स्वतंत्र अशी गोष्ट वाटते. प्रत्येक पात्र डोळ्या समोर उभे राहत.

    शेवट वेगळा आहे, जीव वाचवणाऱ्या डॉक्टरंच विठ्ठल कानडे हे नाव ह्या अनुवादाला एका वेगळ्याच ऊच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे!

  5. अप्रतिम! मुकुंदजी तुम्ही लिहलेला अनुवाद खूपच सुंदर आहे. अनुवाद न वाटता स्वतंत्र अशी गोष्ट वाटते. प्रत्येक पात्र डोळ्या समोर उभे राहत.

    शेवट वेगळा आहे, जीव वाचवणाऱ्या डॉक्टरंच विठ्ठल कानडे हे नाव ह्या अनुवादाला एका वेगळ्याच ऊच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..