नवीन लेखन...

पाण्याचे संकट होत चालले बिकट !

’’ पृथ्वीव्य त्रिणी रत्नांनी जलमन्नं सुभाषितम्।मुढै पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधियते ।। ‘‘

प्रस्तावना 

पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय.

प्राचीन काळात पाण्याची मुबलकता असतांनाही, सजीवांच्या अस्तित्वामागील पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सुभाषितकारांना रत्नांची उपमा बहाल करून वाड्ःमय साहित्यात पाण्याला स्थान देणे भाग पडले. आजच्या विज्ञान युगात पाण्याच्या संकटाने विकराल रूप धारण केले तरीही मानवप्राणी पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जलसंकटाने जागतिक स्वरूप धारण केले आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे. शहरीकरण व औद्योगिकरण यांमुळे प्रदुषण, शेतीला सिंचनासाठी तुटवडा, जलदगतीने भूजलपातळीत होणारी घसरण, वार्षिक सरीसरी पर्जन्यात होणारी घट, रासायनिक खते व किटकनाशके यांच्या वापरामुळे होणारे प्रदुषण या सर्व बाबी लक्षात घेता नजिकच्या भविष्यात जल संकटाची युद्धजन्य परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणी ह्या निसर्गदत्त देणगीच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकविणे शक्य नाही. त्यासोबतच पाणी प्रयोगशाळेत निर्माण करता येत असले तरी आवश्यकतेच्या प्रमाणात निर्माण करणे आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही. राष्ट्राच्या विकासातील एक महत्वपुर्ण घटक म्हणून पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. ही मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती सामाजिक मालकीची आहे.

पृथ्वीच्या पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण ः-पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या ७०.८० टक्के भूभाग पाण्याने आणि २९.२० टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. जमिन आणि पाणी यांच्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी मानवाला वापरण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या ९७.३ टक्के पाणी सागरात आहे. सागरातील पाण्यात क्षारतेची पातळी अधिक असल्याने दैनंदिन उपयोगासाठी व शेतीसाठी वापर करणे अशक्य आहे. सागरातील पाणी मासेमारी, मीठ उत्पादन तसेच जल वाहतूक इत्यादी महत्वपूर्ण उपयोगाचे आहे.

सरोवर, हिमनद्या, तलाव, विहीरी, कुपनलिका, धृवीय प्रदेशातील पाणी आणि भूजलसाठा यांचे एकूण पाण्याच्या २.७ टक्के एवढे प्रमाण होते. यावरून असे लक्षात येते की, मानवाला जास्त उपयोगात येणारे पाणी नगण्य आहे. भूतलावरील सर्व सजीवांना (सागरातील वगळून) ह्या २.७ टक्के पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

भारत हे विविधतेचे राष्ट्र आहे. भारतात जवळपास २००० (दोन हजार) नद्या आहेत, अनेक धरणे आहेत तसेच वार्षीक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १२०० मि.मि. एवढे आहे. परंतू उन्हाळ्यात पाण्याचे संकट एवढे रूद्ररूप धारण करते की, जणू अवर्षनच झाले असावे. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील लोकांना स्थलांतर करावे लागते. एकट्या महाराष्ट्रात ४०,००० (चाळीस हजार) खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावरून जलसंकटाची कल्पना येणे शक्य आहे. शेतीव्यवसाय, औद्योगिकरण, विजनिर्मिती, मानव, प्राणी, अन्यसजीव, वनस्पती आदिंसाठी लागणा-या पाण्याची टक्केवारी २.७ टक्के एवढीच असतांनाही मानव मात्र जलसाक्षरतेकडे दुर्लक्ष करीत आहे.

शहरीकरण आणि पाण्याचे वाढते संकट ः-विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोकसंख्यावाढ आणि चैनिचे जीवन जगण्याची वृत्ती यांमुळे शहरीकरण जलदगतीने होत आहे. याबरोबरच औद्योगिकरणाचाही वेग वाढलेला आहे. लोकांचा ओढा शहरांकडे वाढत चाललेला आहे.त्यामुळे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पुणे, नागपूर, चेन्नै , बंगलोर, भोपाळ, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांची पाण्याची मागणी वाढली. मुंबईला भूजलसाठ्याचे पाणी अपूरे झाल्याने ’तानसा‘ व ’ मोडकसागर ‘ या धरणांमधून पाणी पुरविले जाते. पुण्याला ’ पानशेत ‘ आणि ’ खडकवासला ‘ धरणांमधून पाणी द्यावे लागत आहे. इतरही मोठ्या शहरांची हिच स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे तसेच इतर वापराच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने “पाण्याचे सुयोग्य नियोजन” ही बाब लोकचळवळ बनने गरजेचे आहे.

धरणांचा मुख्य उद्देश शेतीसाठी सिंचन व विजनिर्मिती हा असतांना गरजेनूसार त्याचा शहर व उद्योगांना पाणीपुरवठ्यासाठी वापर करावा लागतो.

पाण्याचे नियोजन म्हणजे काय ?“भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे योग्य विश्लेषण करून संयुक्तरित्या कार्यक्षम वापरास पाण्याचे नियोजन असे म्हणता येईल.”

पाण्याची कमतरता आणि सुयोग्य नियोजनाचा अभाव, जनतेची या बाबत अनास्था, शासकिय धोरणांमधील विलंब या सर्व बाबींमुळे नवनविन समस्या निर्माण झाल्यात. पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम झालेत. निसर्गाचा समतोल बिघडला, अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या महत्वपुर्ण जाती काळासोबत नष्ट झाल्यात.

वनांचे प्रमाण कमी झाल्याने मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

निसर्गातील प्राणी, वनस्पती यांचे मानवासाठी महत्व ः-निसर्गाने विविध सजीवांमध्ये संतुलन निर्माण करून ह्या सृष्टीला फुलविले. परंतू वैज्ञानिक प्रगती बरोबर मानवाने निसर्गाचे दोहन सुरू केले. चित्ता,वाघ, माळढोक, गिधाढ, डोडो, कावळे, चिमण्या, माकड, साप ह्यांसारखे सजीव नष्ट होत आहेत.

मानवाला पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मुत्राशयात मिळतात. सापांच्या माध्यमातून, प्लेग पसरविणा-या उंदरांवर नियंत्रण ठेवले जाते. अॅन्थ्रॅक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या “कॅरियॉन” या विषाणूला आळा घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे. कुत्र्यापासून होणा-या जलसंत्रास या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशायापासून बनविली जाते. पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करी अळी यांसारखे रोग चिमण्यांच्या माध्यमांतून नियंत्रित केले जातात. अशाप्रकारे मानवाला उपयोगी पडणार्‍या पशू पक्षांचे अनेक उदाहरणे देता येतील. अनेक वृक्ष उगविण्यासाठी पक्षांचा आधार घ्यावा लागतो. वड, पिंपळ, उंबर, पाकळी, केव्हारिया यांसारखे हजारो वर्ष जगणारे वृक्ष पक्षी नष्ट झाल्यास पृथ्वी वरून नष्ट होतील. डोडोच्या नष्ट होण्यामुळे मॉरिशस बेटावरील केव्हारिया नष्ट झाल्यातच जमा आहे.

प्राण्यांसारखेच वनस्पतीही औषधांसाठी सर्व परिचीत आहेत. परंतू मानवाने निसर्गातीन इतर सजीवांचे जीवनच संपविण्यास सूरूवात केले आहे.

सजिवांच्या नामशेष झालेल्या जातीसंदर्भात आकडेवरी वरून दृष्टीक्षेप घातल्यास असे लक्षात येते की, पर्यावरणातील असमतोलाने एके दिवशी सृष्टी संपुष्टात येईल. आज सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे,वेळीच काळजी घेतली नाही तर मानवाला सुद्धा आपले अस्तित्व गमवावे लागेल.

उपरोक्त सजीवांचे अस्तित्व हे वनांची कत्तल, शहरीकरण, औद्योगिकरण, दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्याचे प्रमाण, तापमानातील वाढ यांमुळे बाबींमुळे धोक्यात आले. वनांच्या कत्तलीमुळे वाहून जाणा-या पाण्यातील अडथळे कमी झाले त्यामुळे पावसाचे पाणी जलदगतीने समुद्रात वाहुन जाते. जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे जलसाठा कमी होत आहे. या सर्व बाबी नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे सुयोग्य नियोजन महत्वाचे आहे.

पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने, दरवर्षी धृवीय प्रदेशातील हिमपर्वत (ग्लेशिअर) १० फुट या गतीने वितळत आहेत. या प्रकारामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढून अनेक बेटे आणि अनेक देशांचा किनारी प्रदेशातील भूभाग नजिकच्या भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या -हासामुळे एकामागून एक अशी श्रृंखलाच निर्माण होत आहे. ह्या समस्या मानवाने आपल्या महत्वाकांक्षेनेच निर्माण केल्या आहेत. याबाबत आजच्या पिढीने जागरूक होणे गरजेचे आहे.

औद्योगिकरणामुळे पाण्याच्या प्रदुषणाची समस्या ः-वैज्ञाानिक संशोधनाच्या माध्यमातून मानवाला नवनविन चैनिच्या वस्तूची निर्मिती करणे शक्य झाले. मनुष्याच्या अवाक्याबाहेरील अवजड कामे करणे शक्य झाले, पृथ्वीवरील नव्हे तर परग्रहावरील माहीती मिळविणे अंतराळयात्रा करणे शक्य झाले. या सर्व बाबींसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे प्रमाणही वाढले. परंतू ह्या निसर्गाच्या समतोलाकडे दुर्लक्ष झाले. जलप्रदुषण ह्यासारखी नवि समस्या व्यापक स्वरूपात समोर आली. कारखान्यांमधून निघणा-या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात घातक रसायने सोडली जातात. ते पाणी नदी, नाले यांना दुषीत करते. रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्यावर, दैनंदिन वापराच्या जलस्त्रोतांमध्ये ती रसायने मिसळली जातात.

भारतातील मोक्षदायिनी गंगा नदी जलप्रदुषणाने घातक रसायनांच्या विळख्यात सापडली आहे. गंगेला शुद्ध करण्यासाठी ५९ ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्प निर्माण केले आहेत. याबरोबरच यमुना नदीच्याही शुद्धीकरणाचे प्रकल्प कार्यरत असतांना ह्या नद्या प्रदुषणापासून मुक्त करणे शक्य झाले नाही.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील महाऔष्णिक विद्यूत केंद्रातून निघणारे गंधकयुक्त पिवळ्या रंगाचे पाणी परिसरात एक मोठी समस्या बनली आहे. तसेच केरळमधील ’पलक्कड‘ जिल्ह्यातील ’प्लाचीमदा‘ येथील ’’ कोकाकोला‘‘ या कारखान्यातून निघणा-या पाण्यात कॅडमिअम नावाचे घातक रसायन मिसळले असते. हे सांडपाणी जमिनीत मिसळल्याने परिसरातील विहीरींचे पाणी प्रदुषीत झाले व लोकांना आंदोलन करावे लागले.

जनहिताचा दावा करणा-या या चंगळवादी व भोगवादी पाश्चात्य संस्कृतीने स्वतः बरोबर संकटाचे डोंगर आणलेत. सुखासीन जीवन जगणा-या लालसेने समोरच्या पिढीला संकटात सापडण्याची पाळी येऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे.

चैनिच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायाने पाण्याचा वापर अनियंत्रितपणे होतो.चारचाकी वाहन तयार करून बाजारात येईपर्यंत त्या वाहनाचे पोलाद व सुटे भाग बनविण्यासाठी १,००,००० लि. (एक लाख लिटर) पाणी वापरले जाते. एक लिटर पेट्रोल शुद्धीकरणात ५० लिटर पाणी वापरले जाते. यावरून पाण्याच्या वापराबाबत कल्पना येणे सहज शक्य आहे. कारखान्यांच्या चिमण्यांमधून सोडल्या जाणा-या विषारी कार्बन डॉय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरिन, कार्बन मोनोऑक्साईड असे घातक वायू असतात. यासोबतच आझोनचे प्रमाण कमी करणारे ’ कार्बन फ्ल्युरोकार्बन‘ सारखे प्रदुषके वातावरणात सोडली जातात.

कार्बन डॉय ऑक्साईड, व नायट्रस ऑक्साईड, या विषारी वायुंमुळे पावसाळ्यात सुरूवातीला आम्लवर्षा होते आणि पाण्याचे जलस्त्रोत प्रदुषीत होतात.आम्लवर्षा झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते.

अशाप्रकारे आद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. औद्योगिकरणाला विरोध करण्याचा प्रश्न नाही.परंतू पर्यावरण -हास आणि असमतोल होऊ नये त्याबाबत वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रमाणात नुकसान होते.

रासायनिक किटकनाशके आणि खते यांच्या वापरामुळे जलस्त्रोत प्रदुषित होतात, मानवाला हानिकारक असणारे अविघटनशिल रसायने पाण्यात मिसळली जातात. अमेरिकेत “थायमेट” या किटकनाशकावरती विक्री व वापर करण्यास सरकारी बंदी आहे. परंतू ते रसायन निर्धोकपणे भारतात विकले आणि वापरले जात आहे, याचे आश्चर्य वाटते.या बाबीचे आश्चर्य वाटते की, भारतीय कृषी विभागाने आंतरराष्ट्रीय स्थितीचे अवलोकन करू नये आणि घातक रसायनांवर बंदी आणु नये ही शोकांतिकाच आहे.

दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर ः-दैनंदिन व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदींसाठी पाण्याची गरज आहे. परंतू पाणी वापराच्या पद्धतीमधील बदलाने पाणी कमी अधिक लागते. मनुष्याला बादली वापरून आंघोळ करण्यासाठी २० लिटर पाणी लागते परंतू फवारा (शॉवर) वापरल्यास ८० लिटर पाणी लागते.

नळाच्या तोटीतून थेंबथेंब पाणी जात राहिल्यास दर दिवसाला ५.२ लिटर आणि आठवड्याला ३४.५ लिटर पाणी वाया जाते. नळातून बारिक धार वाहत राहिल्यास आठवड्यात ७५४ लिटर पाणी वाया जाते. नळ सुरू ठेवून तोंड धुतल्यास जवळपास १० लिटर पाणी वाया घालविले जाते. आशाप्रकारे पाणी वाया जाण्याचे प्रमाण आहे.

मानवाला अन्न ग्रहण करण्याची क्रिया, शरीराला उर्जा देण्यासाठी पार पाडावी लागते. जेवणात शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारच्या अन्नाचे सेवन केले, तरी दोन्हीतून सारखीच उर्जा (कॅलरिज) प्राप्त होते. परंतू शाकाहारी अन्नापेक्षा मांसाहारी अन्नातून जास्त पाणी वापरले जाते.

गव्हाच्या १०० ग्रॅम पीठापासून बनलेल्या पदार्थातून मनुष्याला ३४८ कॅलरिज उर्जा मिळते तर बोकडाचे १०० ग्रॅम मास खाल्ल्यास १९४ कॅलरिज उर्जा प्राप्त होते. शरिराची उर्जेची गरज गव्हाच्या माध्यमातून मासापेक्षा अधिक प्रभावीपणे पूर्ण केली जाते. एक किलो गहू उत्पादन करण्यास जेवढे पाणी वापरले जाते त्यापेक्षा ७ ते ८ हजार लिटर अधिकचे पाणी एक किलो मास उत्पादनास लागते. यावरून एक किलो मांस खाण्याऐवजी गव्हाचा वापर केल्यास ७ ते ८ हजार लिटर पाणी वाचविले जाईल. म्हणून शाकाहारी माणसांच्या माध्यमातून पाण्याची प्रभावीपणे बचत होते.

शेतीव्यवसाय आणि जलसमस्या ः-भारत हा शेतीप्रधान देश आहे ते शाळांमधून शिकविले जाते आणि ते खरेही आहे. परंतू भारतीय शेती समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय शेती सोयी सुविधांना आणि अधावत तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. परंतू खरी समस्या आहे ती सिंचनसुविधाची कमतरता आणि नियोजनाचा अभाव.

शेती व्यवसाय हा सर्व पाण्यावर अवलंबून आहे. भारतात वार्षिक सरासरी ११६० मि.मि. पर्जन्य पडते. परंतू योग्य नियोजन नसल्याने शेतक-यांना प्रभावीपणे विक्रमी उत्पादन घेणे शक्य नाही. शेती व्यवसायात अग्रगण्य मानल्या जाणार्‍या “इस्राईल” या १२ हजार चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या छोट्याश्या देशात वार्षिक सरासरी पर्जन्य भारतापेक्षा ८० टक्के ने कमी पडतो. परंतू शेती व्यवसायात या देशाने मजल मारली. इस्राईल मध्ये पडणार्‍या एकूण पर्जन्याचा सत्तर टक्के पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो.

भारताचे क्षेत्रफळ व्यापक आहे. इजराईलचे क्षेत्रफळ भारताच्या पासंगालाही पुरणार नाही, शिवाय पर्जन्यमान भारतात ८० टक्के ने जास्त आहे. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता आम्हाला इजराईलचा कित्ता गिरवावा लागेल तरच शेती व्यवसायात प्रगती करता येईल.

महाराष्ट्राचाच विचार लक्षात घेतल्यास ३,०७,७६२ चौ.कि.मि. क्षेत्रफळाच्या या प्रदेशातील, एकूण लागवडीखालील शेतीपैकी फक्त १५.५ टक्के शेतजमिन ओलिताखाली आहे. तसेच फक्त १३ टक्के शेती बागायती आहे.

सन १९६२ च्या बर्वे आयोगाच्या अहवालानुसार अवर्षण, प्रादेशिक उंच सखलपणा आणि सिंचनसुविधा लक्षात घेता ३० ते ३१ टक्के शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते. तसेच महाराष्ट्रात भूगर्भिय पाण्याच्या स्त्रोतांपैकी ५० टक्के स्त्रोतांचा वापर करणे शक्य आहे.

नैसर्गिक स्त्रोतांसोबत पाण्याच्या वापराबाबत नियोजन करतांना भूगर्भिय जल स्त्रोतांची विशेष काळजी घेतली पाहिजे. जमिनीतील पाण्याचा उपसा १०० ते ५०० फुट खोलीपेक्षा अधिक खोलीतून पाणी काढले जात आहे. परंतू त्या प्रमाणात त्याचे पुनर्रभरण होत नाही. यामुळे भूजलपातळी खोलात जात आहे. विहीरी, नदी, नाले, कुपनलिका, आज कोरड्या बनलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो ते ५० ते १०० वर्ष अगोदर जमिनीत जीरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरतांना १०० फुट खोलानंतर १ फुट खाली जाण्यासाठी पाण्याला ४ महिने (१२० दिवस) लागतात. यावरून जमिनीत पाणी खोल जाण्याची कल्पना यऊ शकते. “जमिनीतील पाणी जेवढे शुद्ध आणि निर्मळ तेवढे त्या पाण्याचे वय अधिक.” या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला जलसाक्षरतेचे महत्व लक्षात यईल.

भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होण्याची कारणे ः-मानवाला दैनंदिन वापर, शेती, उद्योग, विद्यूत आदी. बाबींसाठी तसेच अन्य सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हवे.पाण्याची मागणी वाढल्याबरोबर जमिनीतील पाण्याचा जलदगतीने उपसा केला जातो. त्याप्रमाणात पुनर्रभरण होत नाही. वनांची बेसुमार तोड करण्यात आली. पर्वतांच्या माथ्यावरील झाडे नष्ट झालीत त्यामुळे पावसाचे पाणी अडविले जात नाही. सरळ वाहत जाते आणि जमिनीत जिरविले जात नाही.

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला, प्लॅस्टिक पिशव्यांचे नैसर्गिकपणे त्वरीत विघटन होत नाही. वर्षानुवर्षे मातीमध्ये राहत असल्याने पाणी जिरविण्यास अडथळे निर्माण होतात.

शहरीकरण आणि काँक्रिटिकरण ह्या दोन क्रिया वैज्ञानिक प्रगतीबरोबर जलद गतीने वाढत गेल्यात. शहरांमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, परंतू पाणी जिरविण्याची प्रभावी यंत्रणा नाही. पर्यायाने शहरांमधील पाणी जलदगतीने वाहुन जाते.

कोलबेल्ट एरियामध्ये (कोळश्याचा पट्टा) दगडी कोळसा एक ते दिड किलोमिटर खोलातून काढला जातो. परंतू भूमिगत (अंडरग्राउंड) खाणींमध्ये पोकळ झालेला भाग पूर्णपणे मातीने भरला जात नाही. तसेच इतरही खनीजांच्या अंडरग्राउंड खाणींमध्ये हीच स्थिती आहे. जमिनीचा भाग पोकळ राहिल्याने वरील भागातील पाणी लवकर ओढले जाते. तसेच परिसरातील बाजूला दूरवरपर्यंत असलेले पाणी खाली ओढले जाते. त्यामुळे खाणींच्या वरील भागात व सभोवतीच्या परिसरात वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण हाते. वृक्ष नष्ट होतात आणि पर्जन्यमान कमी कमी होत जाते.

वाढत्या जलसंकटामुळे सामाजिक स्वास्थावर होणारे परिणाम ः-वैज्ञानिक प्रगतीमुळे मानव जास्तीत जास्त सुखवस्तू साधनांच्या आहारी जात आहे. सुखवस्तू साधनांच्या उत्पादनामध्ये निसर्गचक्र खंडित होत आहे. शहरीकरण, औद्योगिकरण, विविध संशोधने यंामुळे जास्तीत जास्त पाण्याचे प्रदुषण होत आहे. पाण्याचे संकट “कमतरता आणि अशुद्धता” अशा दुहेरी बाजूने भेडसावत आहे.

भारतामध्ये ७० टक्के जनता, विहीर, कुपनलिका, तलाव, नदीनाले, सरोवरे, आदी जलस्त्रोतांचे पाणी वापरते. मानवी शरिरात निर्माण होणारे ९० टक्के रोग पाण्यापासून होतात. कॉलरा, काविळ, अतिसार, टायफाईड, पोलिओ, पचनसंस्थेचे रोग तसेच फ्लोराईडयुक्त पाण्यापासून उद्भवणारे दातांचे आणि हाडांचे विकार होतात.

जलसंकट वाढत गेल्यामुळे शुद्ध व निर्मळ पाणी मिळणे दुरापास्त होत चालले आहे. आरोग्यासाठी जनतेला तसेच शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. हा खर्च वाचविता आल्यास अन्य विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविता येतील.

जलद गतीने पाण्याचा उपसा केल्यामुळे काही घातक अविद्राव्य रसायने पाण्यात मिसळली असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शरिराला असाध्य व्याधी होतात. घातक रसायने पाण्यात सांडपाण्याच्या स्वरूपात सोडली गेल्याने ते पाणी जमिनीत मुरल्यानंतर विहीरी व कुपनलिका मध्ये झिरपते आणि लोकांच्या स्वास्थाला घातक ठरते.

शहरीकरणात बहुमजली इमारतींच्या बांधकामाच्या वेळी पाण्यामध्ये जहाल किटकनाशके व विषारी औषधांचा वापर केला जातो. तसेच युद्धांमुळे घातक रसायने पाण्यात मिसळली जातात. पाण्याचे संकट बिकट असतांना मानवाच्या हस्तक्षेपामुळे अधिकच बिकट होत चालले आहे.

भूजलपातळी वाढविण्यासाठी उपाय आणि पाण्याचा पर्याप्त वापर : – उपलब्ध पाणी म्हणजे काय ?“कायमचा मरणोक्त बिंदू आणि जलधारणक्षमता या दरम्यानच्या पाण्यास उपलब्ध पाणी असे म्हणतात.”

पाण्याचा नियोजनशुन्य आणि अनियंत्रित वापरामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. समोरच्या पिढीला जलसमस्येमुळे हतबल होण्याची वेळ येऊ नये म्हणून वर्तमान काळात प्रभावी योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के एवढे वनांचे प्रमाण असायला हवे. तसेच वनांचे संवर्धन व संगोपण करणे आवश्यक आहे. तरच निसर्गचक्राचे संतुलन कायम राहील. परंतू भारतातील एकूण जमिनीच्या २१ टक्के पेक्षा कमी वने (जंगल) शिल्लक आहेत. वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्जन्याचे प्रमाण कमी होते. तसेच अडथळे कमी झाल्याने पावसाचे पाणी अडविले न जाता जलदगतीने वाहुन जाते. पर्यायाने भूजलपूनर्रभरणाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित झाल्याने जलसाठा कमी होते. या सर्व प्रकारामुळे निसर्गातील सजीवांचे एकमेकांवर अवलंबून असणारे अस्तित्व धोक्यात येते. म्हणून वृक्षांची लागवड, संवर्धन व संगोपन हा प्रभावी उपाय होय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याचा कारभार दुर्गम भागातील गडकिल्ल्यांवरून चालत असे. उन्हाळ्यात तसेच शत्रूने दिर्घकाळ गडाला वेढा दिल्यास पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता अप्रतिम पाणी साठवण योजना अंमलात आणली जायची. गडावर मोठा हौद बनवून, गडावरील पावसाळ्याचे संपूणी पाणी त्या हौदात साठविले जाई. त्यामुळे बाराही महिने गडावरील विहीरींना मुबलक पाणी राहत असे. या विहीरीचे पाणी संकट काळीच वापरले जात असे. एरव्ही गडाच्या पायथ्याजवळील गावातून गडावर पाणी पुरविले जात असे. आजच्या युगातही ही शिवकालिन पाणी साठवण योजना उपयुक्त आहे. घरांच्या छतांवरील पाणी जमिनीत खड्डे करून जिरविल्यास भूजलपातळीत वाढ होईल.

मोठ्या शहरांमध्ये पाण्याचे संकट अधिकच बिकट आहे. परंतू ह्या शहरांमधून निघणारे सांडपाणी शहराच्या वापरात येऊ शकते. ’’रिसायकल्ड वाटर‘‘ ही संकल्पना महत्वाची ठरू शकते. सांडपाणी शुद्ध करून त्याचा विद्यूत निर्मिती, औद्योगिक प्रतिष्ठानंामध्य, शेतीला सिंचनासाठी, बांधकाम तसेच उन्हाळ्यात कुलरमध्ये अशा विविध प्रकारे त्याचा वापर करणे शक्य आहे. रिसायकल्ड पद्धतीने पुनर्रवापर केल्यास पाण्याची समस्या कमी होईल तसेच सांडपाण्यामुळे प्रदुषीत होणारे जलस्त्रोत वाचविता येतील. असा दुहेरी फायदा होऊ शकतो. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, नागपूर, हैद्राबाद, बंगलूर, चेन्नई, सुरत अशा मोठ्या शहरांमध्ये सांडपाण्याचा वापर करणे शक्य आहे.

या सोबतच जलसमस्या सोडविण्यासाठी खालील उपाययोजना करणे शक्य आहे.शोषखड्डे निर्मिती करणे, शेततळे निर्मिती करणे, वनराई बंधारे बनविणे, प्रवाहित पाण्याला बांध घालणे, वृक्षलागवड करून नैसर्गिक अडथळे निर्माण करणे, विहीरींमध्ये पाणी साठविणे अशाप्रकारे विविध उपाययोजना केल्यास भूजलपातळीत वाढ होऊन विहीरी व कुपनलिकांना बारमाही पाणी उपलब्ध होईल.

उपरोक्त उपाययोजना करण्यासोबतच पाणी संकटाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. या दृष्टीने पुढील दिवस आणि सप्ताह साजरे व्हावेत. जागतिक जलदिन, प्राणी कल्याण पंधरवाडा पृथ्वीदिन, जागतिक आरोग्यदिन जागतिक पर्यावरण दिन, परिसर स्वच्छतादिन, कृषीदिन, वन महोत्सव सप्ताह,जागतिक आझोन दिन, जागतिक स्वच्छता अभियान, वन्यजीव सप्ताह, नैसर्गिक आपत्ती निवारण दिन, जागतिक अन्नदिन, राष्ट्रीय पर्यावरण जागृती अभियान, जागतिक जैव विविधता संवर्धन दिन आणि सप्ताह साजरे करून जनजागृती घडविणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी समस्या लोकचळवळ बनेल.

सारांश ः-पाण्याचे संकट आपल्याला आज व्यापक वाटत नसले तरी त्या संकटाची तिव्रता क्षणोक्षणी वाढत आहे. जलसंकटाच्या संदर्भातील निष्काळजीपणा मानव जातीच्या तसेच सृष्टीतील सर्व सजीवांच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. सजीवांच्या अस्तित्वासाठी शुद्ध व निर्मळ पाण्याची गरज आहे. सजीवांना आवश्यक असलेले पाणी मिळणे दुरापास्त होत आहे. जलप्रदुषणाने सजीवांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे.

पाण्यात विरघळलेल्या ऑक्सीजनचे प्रमाण प्रतिलिटर ८ मिलीग्रॅम पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रदुषीत होते. हे प्रमाण प्रतिलिटर ४ मिलीग्रॅम पेक्षा कमी झाल्यास सजीवांचे अस्तित्व नष्ट होते.

गरजेच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. याबाबतचे अमरावती जिल्ह्यातील चारगड प्रकल्प फार बोलके आहे. पाण्याची कमतरता, त्यातही घातक रसायनांचा भरणा, हरितगृह वायुंचे संकट आणि सजीवांचे अस्तित्वच नष्ट करणारे जलप्रदुषण या सर्व बाबतीत जनता व शासनाचा दुर्लक्षितपणा ह्या सर्व बाबींचा संकलित विचार केल्यास मती गुंग होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी जनता आणि शासन यांनी कालबद्ध नियोजन करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

1 Comment on पाण्याचे संकट होत चालले बिकट !

  1. खूप मोलाची माहिती दिलेली आहे .प्रत्येकाने पाण्याचा सदुपयोग केला तर भविष्यात पाण्याची समश्या उद्भवणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..