नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल – ३

 

— आज नुसता आत्मा तडफडत नव्हता. तो आत्मा ,ज्या शरीरात होता , ते शरीर तडफडत होतं . लाथा बुक्यांनी तुडवलं जात होतं. बेल्टच्या प्रत्येक फटक्याबरोबर शिव्यांचा जाळ बरसत होता. शरीर बोंबलत होतं. किंचाळत होतं. कारणही तसंच होतं. त्या पोरानं आमदारसाहेबांची बुलेट चोरली होती आणि साहेबांच्याच कामासाठी अनेक दिवस वापरली होती. अर्थात बुलेट साहेबांच्याच नावावर होती. गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या बुलेटच्या फायरिंगची चर्चा होती . त्यावरून फिरणारा ‘ तो ‘ साहेबांचा खास माणूस मानला जायचा .

तोंडात मावा , डोळ्यावर गॉगल , चेहऱ्यावर गुर्मी , समोर येणाऱ्या प्रत्येकाला फाट्यावर मारण्याची भाषा , पायातलं पायताण कारकार वाजणारं आणि एकूण देहबोली , साहेबाच्या मर्जीनुसार , वृत्तीनुसार समोरच्याला अपमानित करणारी .

पण हे घराबाहेर !

घरात मात्र चिडचिड . म्हाताऱ्या आईबापाला दमात घेणं , अर्ध्या एकराच्या शेतीत काम करणाऱ्या आईबापाला मदत न करणं , वेळप्रसंगी त्यांच्यावर हात उचलणं , साहेबांचं काम नसेल तेव्हा गावभर उंडारत रिकामपणी उकिरडे फुंकणं , कानाला मोबाईल चिकटवून सगळ्यांना मोबाईलची ऐट दाखवणं, साहेबांच्या फोटोबरोबर छापलेल्या दोनचार डझन पोरांबरोबरचा , लांब कोपऱ्यात असलेल्या स्वतःच्या फोटोच्या फ्लेक्सचा फोटो काढून तो सगळीकडे शेअर करणं , मारामाऱ्या , दमदाटी करणं , पानाच्या गादीवर , टपरीवर , टुकार हॉटेलात उधारी करणं , ती फेडण्यासाठी आईबापाला मजबूर करणं ही काही किरकोळ कारकीर्द होती त्या पोराची. पँटच्या पाठच्या खिशात चपटी आणि शेवेचं पाकीट घेऊन फिरणारा डेरिंगबाज होता तो .

अर्थात नोकरी करून चांगलं आयुष्य जगणं आणि आईवडिलांचा आधार होणं म्हणजे साहेबांबरोबर बेईमानी करण्यासारखं होतं . ते शक्यच नव्हतं . साहेबांचा शब्द आणि साहेबांची सेवा म्हणजे लोकशाही , हे समीकरण पक्कं होतं . ते आईवडिलांना कळत नव्हतं. आईवडिलांना त्यानं सांगून ठेवलं होतं , ‘ एकवेळ उपाशी मरेन पण नोकरी करणार नाही ‘ हा स्वाभिमान खिशात ठेवलेलाच होता , माव्याच्या पुडीबरोबर.

अशा त्या विख्यात पोराला पोलिसांनी उचलला होता .खुद्द साहेबांची तक्रार म्हटल्यावर जसा , जिथे सापडला तिथून त्याला उचलला होता. पोलीस वाटच बघत होते. हा केव्हातरी तावडीत सापडावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कारण पोलिसांच्या वर्दीच्या आत माणूस दडलेला होता. ‘ त्या ‘ ला कस्टडीत टाकून पोलीस स्टेशनच्या बाहेच्या बाजूला असणाऱ्या चहाच्या टपरीवर सगळे पोलीस आले. आणि सगळी पानं अगदी मोकळेपणानं फडफडू लागली …

‘ माज आला होता साल्याला . साहेबांच्या जीवावर उडत होता.’ ‘ अरे पण ती बुलेट साहेबांनीच त्याला दिली होती ना ?’
‘ त्याला गंडवलं . बँकेतून कर्ज उचललं , हप्ते त्या पोराला भरायला लावले , त्यासाठी त्याला कर्ज काढायला लावलं , इन्श्युरन्स साठी आईचं मंगळसूत्र विकलं त्यानं . गाडी त्याच्या नावावर करतो म्हणून सांगितलं .आणि हप्ते थकवल्यावर त्यानं गाडी चोरली अशी तक्रार केली .’

‘ नाय रे बाबा , आमदार साहेब पक्षांतर करतायत , त्या गोष्टीला यानं विरोध केला . त्याला वाटलं आपल्यामुळं साहेब निवडून येतायत . म्हणून मिटिंगमध्ये हा नको नको ते बोलला . अंडीपिल्ली बाहेर काढीन म्हणाला . उंटाच्या **चा मुका घ्यायला गेला आणि कर्मात मेला आता हा ‘

‘ ह्याला कुजवणार साहेब आता ‘

‘ त्या म्हातारा म्हातारीचं वाईट वाटतंय बघ ‘

‘ अरे त्या रागानं मी बुकलला त्याला.’ ‘ चांगली शेती होती , ती पण आता दोन दिवसांपूर्वी गहाण टाकलीय , आणि त्याच्या म्हाताऱ्याला , म्हातारीला माहीतच नाहीय .’
‘ या राजकारण्यांच्या नादाला का लागतात ही पोरं ? आयुष्य फुकट का घालवतात ? साहेब आपलं करिअर बनवतायत आणि यांचं करिअर बिघडत चाललंय. ‘ ‘ मी ऐकलंय , की हा पोर अपोझिशनचं काम करणार म्हणत होता .’
‘ म्हणजे मालक बदलणार , गुलामगिरी तशीच. ‘ सगळे हसायला लागले .

‘ चला , त्याला आणखी दोन लाथा घालू. लोकशाही जिवंत ठेवणार आहे ना तो.’ आता मात्र टपरीवाला पण हसू लागला .

सगळे कस्टडीकडे वळले.

आत्म्यानं न लिहिलेल्या सगळ्या पानांची सुरळी झाली होती. चोरीला गेलेली बुलेट त्या पोराच्या घरात सापडल्यानं पुराव्यासह गुन्हा दाखल झाला होता. बुलेट साहेबांकडे गेली होती आणि त्याची किल्ली साहेबांनी लोकशाहीच्या नव्या तरुण शिलेदाराकडे दिली होती. अर्थात उरलेले हप्ते त्या नव्या शिलेदारानं फेडायचे आहेत , हे ते सांगायला विसरले नव्हते …

( पूर्णतः काल्पनिक ! )

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

१७ जुलै २०२०

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 88 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..