नवीन लेखन...

पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, ‘गिरीजाघर’ आणि ‘पुराण’..

The nostalgic memories of Portuguese in Mumbai

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही दोन समुद्राकाठची ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली ती त्यांच्या ताब्यात १६६१ साला पर्यंत होती.

दर्यावर्दी पोर्तुगीज जरी व्यापाराच्या निमित्ता आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश येथील स्थानिकांना बाटवून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा होता. त्यामुळे मुंबईच्या नैसर्गिक बंदराच्या असण्याचा व्यापारासाठी म्हणावा तसा उपयोग पोर्तुगीजांनी केला नाही. माहीम–वसई परिसरातील स्थानिकांना येनकेनप्रकारेण बाटवून त्यांना ख्रिश्चन करणे हा त्यांचा मुख्य धंदा होता. येथील राज्यकारभारात पोर्तुगीज शासकांपेक्षा त्यांच्या धर्मगुरूंचा जास्त पगडा होता. मुंबई माहीम-वांद्रे किंवा वसई भागात जे बहुसंख्येने ख्रिश्चन दिसतात ते या तेंव्हाच्या पोर्तुगीज प्रभावामुळेच. हे स्वत:ला ‘इस्ट इंडीयन ख्रिश्चन’ म्हणवतात.

कोणीही परकीय धर्मप्रसारक सत्ता करते त्याप्रमाणे पोतुगीजनीही आक्रमक धर्मप्रसार करताना येथील काही देवळे व मशिदी पडून त्या जागेवर चर्चेस उभारण्याचा पवित्रा घेतला. माहीमचे सेंट मायकेल चर्च, अंधेरीचे सेंट जॉन द बाप्टीस्ट चर्च (सध्या हे चर्च अंधेरी येथील सीप्झ संकुलाच्या आत आणि पडीक अवस्थेत आहे.), भायखळ्याचे ग्लोरिया चर्च, दादरचं पोर्तुगीज चर्च, वांद्रे येथील ‘माऊंट मेरी’ पोर्तुगीजांचीच देन आहे. ही सर्व ठिकाणं आजही सुस्थितीत असून आणि सर्वाना पाहता येतात.

या व्यतिरिक्त आताच्या ताज लॅण्ड्स एंड (किंवा हॉटेल सी रॉक येथे) या ठिकाणी अजूनही असलेला वांद्र्याचा किल्ला, धारावीचा किल्ला, मालाडच्या मढ येथील सध्या वायूदलाच्या ताब्यात असलेला वर्सोव्याचा किल्ला किंवा मुंबईचा प्रसिद्ध ‘फोर्ट’ (आता फक्त नांव. आपण ज्याला इंग्रजांचा ‘फोर्ट विभाग’ म्हणून ओळखतो, तो किल्ला मुळात पोर्तुगिजांचा होता.) या पोर्तुगेजांच्या खुणा अजूनही मुंबईत शिल्लक आहेत. काल-परवापर्यंत दहिसरच्या नदीवर एक पोर्तुगीजकालीन सुस्थितीत असलेला अप्रतिम ब्रीज होता, तो विधी-निषेधशुन्य राजकारण्यांनी तोडून त्याजागी राजकारण्यांनी, त्यांचं थडगं म्हणता येईल अशा अत्यंत कुरूप पुलाचं ‘निर्माण’ करून ठेवलं आहे.

पोर्तुगीज सत्तेचे आंधळे धार्मिक स्वरूप वजा केल्यास त्यांच्या कित्येक गोष्टी त्या कालच्या इथल्या लोकांनी स्वीकारल्या. साहेबी पोषाखाचा स्विकार मुंबईकरांनी करण्यास येथून सुरूवात झाली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात ‘पावा’चा शिरकाव झाला तो यांच्यामुळेच. विहिरीत ‘पाव’ टाकून ते पाणी स्थानिकांना पिण्यास देऊन त्यांना सामुहिकपणे बाटवण्याचा उद्योग पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला. आणि म्हणून इथल्या ख्रिश्चनांना आजही आपण ‘पाववाले’ म्हणून ओळखतो.

पोर्तुगीजांनी आपल्या भाषेत एक नविन शब्द रूढ केला, ‘गिरीजाघर’..!! चर्चला हिन्दी भाषेत ‘गिरीजाघर’ असं म्हणतात. पोर्तुगीज भाषेत चर्चला ‘Igreja (इग्रेजा)’ असा शब्द आहे. स्थानिकांनी या ‘इग्रेजा’चा सोप्पा उच्चार ‘गरेजा-गिरीजा’ असा केला व पुढे जाऊन ‘चर्च’ म्हणजे ‘गिरीजाघर’ असा शब्द कायम झाला..

जाता जाता-

पोर्तुगीज सत्तेचा मुंबई व परिसरातील वावर व्यापारापेक्षा धर्मप्रसारासाठी जास्त होता..Igrejaचं झालेलं ‘गिरीजा’ भाषांतर पोर्कुगीजांच्या पथ्थ्यावरच पडलं असावं..

गिरीजा हे पार्वतीचं नांव..! इथल्या स्थानिकांना ख्रिस्ती धर्म जबरदस्तीने किंवा नाईलाजाने स्विकारताना ‘गिरीजा’ हे नांव काहीसं आश्वासक वाटलं असावं..सर्वच धर्माना व त्यांच्या देवताना भाबड्या भाविकतेने पुजणाऱ्या मुळच्या हिन्दू मानसिकतेने ‘गिरीजे’चं घर स्विकारून आतल्या मेरीला ‘मावली’ मानलं असणं शक्य असल्याचं नाकारता येत नाही.. पार्वतीचं हे नवं रुपडं त्यांनी स्विकारलं..वान्दऱ्याच्या ‘माऊंट मेरी’चं आपण हिन्दूंनी केलेलं ‘मोत मावली’ हे नामकरण याच मानसिकतेतून झालेलं आहे..

सन १६१६ मध्ये इंग्लीश धर्मप्रसारक फादर थाॅमस स्टीफन्स यांनी पोर्तुगीज शासकत्वाखाली असलेल्या गोव्यात ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी येशू ख्रिस्ताची चरीत्र सांगणारे ‘ख्रिस्त पुराण’ हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले. ‘गिरीजा’, ‘मावली’ हे स्विकारणाऱ्या स्हिन्दूंच्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास केलेल्या या मिशनऱ्याने, येशुचं महात्म्य तेथील हिन्दूंच्या मनावर ठसवण्सासाठी आपल्या पुस्तकासाठी ‘पुराण’ या हिन्दू मनावर कोरल्या गेलेल्या शब्दाचा वापर मोठ्या हुशारीने करून या पुराणाची रचना आपल्या रामायण, महाभारतादी रचनांप्रमाणेच केली होती..हिन्दूंनीही ‘गिरीजा’, ‘मावली’ प्रमाणे ख्रिस्ताला स्विकारले ते या ‘पुराण’ शब्दामुळे..

-गणेश साळुंखे
9321811091

संदर्भ-
१. मुंबईचे वर्णन – सन १८६३ – गो.ना.माडगांवकर
२. मुंबई नगरी -सन १९८२ – न.र.फाटक
३. जागर-नरहर कुरूंदकर

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, ‘गिरीजाघर’ आणि ‘पुराण’..

  1. This is a very nice article series that you have started. Look forward to know more such places in Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..