मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

The first published literature in Marathi - Vivek Sindhu

मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे.

मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि मराठीचे पालकत्व स्वीकारणार्‍या किती जणांना विवेकसिंधू व त्याचे लेखनकर्ते मुकुंदराज माहीत तरी आहेत का, असा प्रश्न मुकुंदराजांचे अनुयायी विचारतात.

भाषिक आक्रमणाच्या या काळात मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह तिच्या विकासासाठी साहित्य संमेलने वगैरेंची नितांत गरज आहे. परंतु अशी संमेलने साजरी करताना ज्यांनी या महाराष्ट्राला मराठी दिली त्या मुकुंदराजांचा उल्लेख कुठेच दिसत नाही, ही मोठीच शोकांतिका आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून केवळ ७० किलोमिटरवर असलेल्या अंभोरा या पाच नद्यांच्या संगमस्थळावर मराठीचा पहिला शब्द कागदावर उतरला. पण किती मराठी सारस्वतांना हे माहीत आहे, याचाही विचार झाला पाहिजे आणि जर माहिती नसेल तर मुकुंदराजांची ही दिव्य साहित्यकृती का उपेक्षित राहिली याचे उत्तरही मराठीच्या उद्धारकांनी दिले पाहिजे.

महाराष्ट्रातील बहुसंख्यांची भाषा असलेल्या मराठीत समाजाला दिशा देणारा ग्रंथ असायला हवा, अशी हरिहरनाथांची अपेक्षा होती. ती त्यांनी त्यांचे शिष्य रघुनाथांकडे व्यक्त केली. रघुनाथांनी या पुण्यकार्यासाठी त्यांचे शिष्योत्तम मुकुंदराजांना निवडले आणि शके १११० मध्ये विवेकसिंधू प्रत्यक्ष साकार झाले.

मुकुंदराजांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे रघुनाथांच्या समाधीस्थळी अंभोर्‍यात बसून विवेकसिंधू लिहिला. ज्ञानेश्‍वरी इसवी सनाच्या बाराव्या शतकात आली. म्हणजे ज्ञानेश्‍वरीच्या शंभर वर्षाआधी मुकुंदराजांनी विवेकसिंधू लिहिला. स्वत: ज्ञानेश्‍वरांनी त्यांचे गुरू आणि वडीलबंधू निवृत्तीनाथांना विवेकसिंधूबद्दल सांगितले व तसाच ग्रंथ पुन्हा लिहिण्याची इच्छा प्रकट केली होती, असे संदर्भ इतिहासात आढळतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की विवेकसिंधू हा ज्ञानेश्‍वरीच्या आधी आलेला ग्रंथ आहे. परंतु ज्ञानेश्‍वरीच्या तुलनेत तो वाचक, समीक्षकापर्यंत पोहचू शकला नाही. म्हणूनच आजही श्री क्षेत्र अंभोर्‍यात मुकुंदराजांचे स्मारक बनू शकले नाही.

अंभोरा येथे पाच नद्यांचे संगम होत असल्याने रोज हजारो भाविक येतात. परंतु त्यांना या ठिकाणचे मराठीविषयक माहात्म्य माहीतच नाही.

स्मारक झाले की मराठीचा विकास होईल, असे अजिबात नाही. परंतु महाराष्ट्राला मराठीचा पहिला ग्रंथ कोणता व तो कोणी लिहिला हे कळायलाच हवे, तरच हे मराठीचे उपेक्षित जन्मस्थळ आपले हरवलेले वैभव परत मिळवू शकेल.

— दिपक पुरोहित

11 Comments on मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

 1. मला मुकुंदराज कृत विवेकसिंधु ग्रंथ पाहिजेत विकत कुठे मिळेल

 2. मला विवेक सिंधू व परमामृत हे ग्रंथ हवे आहेत, कुठे मिळतील ते कळविणे.

 3. काही जण लीळा चरित्र म्हणतात ते कितपत खरे आहे ?

 4. मला सदरचा ग्रंथ विकत पाहिजे आहे त्याची काय किंमत आहे

 5. सर मुकूंदराजांची समाधी श्रीक्षेत्र आंबाजोगाई ये थे आहे

 6. विवेक सिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ असुन आज तो समाजापासून वंचित आहे ही फार खेदाची गोष्ट आहे. आणि हा ग्रंथ दत्त संप्रदायाचा आहे आणि दत्त सांप्रदायाचं जे ज्ञान ते फार गुढ आहे. त्या ज्ञानाची माहिती फार कमी लोकांना आहे. माझ्याकडे हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ समजुन देणारे गुरु देखिल आहेत

  • सर मला ग्रंथ मिळेन का वाचण्या साठी ९७६३९४०२०२

  • काय नाव आहे आपल्या गुरूंचे? आणि त्यांच्या पवित्र स्थान कुठे आहे

 7. श्री. पुरोहित जी,
  आपला विवेकसिंधूवरील लेख वाचला. आपले म्हणणे अतिशय योग्य आहे. मराठी साहित्याच्या इतिहासाचचाअभ्यास/विचार करणार्‍यांव्यतिरिक्त कुणी मुकुंदराजांचा उल्लेख करत नाहीं.
  ( हल्ली वेगळे विदर्भ राज्य मागणार्‍या मंडळींनी या बाबीचाही पाठपुरावा करायला हरकत नाही. आपले विद्यमान मुख्यमंत्री वैदर्भीय आहेत. त्यांनाही कुणीतरी साकडे घालायला हवे. )
  # याचबरोबर चक्रधरस्वामी व महानुभावी साहित्याचाही विचार करावा लागतो. (उदा. महिमभट्टाचे लीळाचरित्र. ) पण महानुभावांनी ( यांनांच मानभाव असे म्हणतात) आपले साहित्य गुप्त लिपीत लिहिल्यामुळे, तें पॉप्युलर झाले नाही. मध्यंतरी मला एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट कळली, की महानुभाव पंथ पंजाबमध्ये पॉप्युलर होता / आहे. आपल्या संत नामदेवांचे झाले आहे, तसेच हें.
  पंजाबी लोक ‘नामदेव बाबां’ना फार मानतात. ( गुरु ग्रंथसाहेबात त्यांची कांही पदे आहेतच). पण , आपल्याकडे ( वारकरी सोडल्यास ) नामदेव काहींसे झाकोळून गेलेले आहेत. नामदेवांचा गाथा तुकारामांना पूर्ण करायचा होता, ही खरोखर महत्वाची गोष्ट आहे.
  स्नेहादरपूर्वक
  सुभाष स. नाईक
  सांताक्रुझ,मुंबई

Leave a Reply to अजिंक्य Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..