नवीन लेखन...

तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

Tapobhoomi Shree Kanakeshwar in raigad District

कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे श्रेय मिळते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते. असे हे अलिबागच्या ईशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.

कनकेश्वर देवस्थान प्राचीन असून त्यास पौराणिक पार्श्वभूमी आहे. देवस्थान पर्वतावर ७५० पायऱ्या चढूनच दर्शनाला जावे लागते. या पायऱ्यांचे व पुष्करणीचे बांधकाम अलिबागच्या सरखेल राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकांनी १७६४ मध्ये स्वखर्चाने करवून घेतले. या सर्व पायऱ्यांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा – अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असे. मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे कनकेश्वर देवासाठी वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्याकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा. ही कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला भरत असते. कार्तिक शु.१४ ला भरणाऱ्या श्री नागेश्वराच्या मोठ्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव येतो. पूर्वी यात्रेच्या दिवशी आवास येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलिकडे फक्त आवास येथीलच पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वर स्थानाबद्दल दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासूर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासूराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिध्यर्थ शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव पडले. सर्व पृथ्वी जिंकून परशुरामाने ती ब्राम्हणाला दान दिली. हे दान घेतल्यावर ब्राम्हणाने परशुरामाला सांगितले की, दान दिलेल्या भूमीवर तुला राहता येणार नाही. तेंव्हा या भूमीचा तू त्याग कर. ब्राम्हणाचे हे वाक्य ऐकून परशुरामाने सह्याद्री पर्वतावर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाशवाणी होऊन, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे, तो समुद्रात जेथे पडेल तेथपर्यंत नवीन भूमी तयार होईल. या आकाशवाणीप्रमाणे परशुरामाने समुद्रात परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली. असा हा कनकेश्वर परशुराम सृष्टीतला आहे. रेवसपासून कन्याकुमारीपर्यंत परशुरामाने प्रवास करुन अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. त्रिपुरी पोर्णिमेला येथील दीपमाळेला दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.

(‘महान्यूज’मधून साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..