नवीन लेखन...

टेबल मॅनर्स

मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिटयूट (MERI), मेरी मुंबई या आमच्या कॉलेज मध्ये एक वर्षाच्या प्री सी ट्रेनिंग कोर्सचा पहिला दिवस होता. मुंबईत दादरच्या रेल्वे पोलीस क्वार्टर्स मध्ये बाबांना मिळालेला सरकारी फ्लॅट असूनसुद्धा मुंबईतल्याच रे रोड कॅम्पस मधील हॉस्टेल वर राहायला लागले होते, कारण जहाजावर काम करायचे म्हणजे घरापासून लांब राहायचे असा काहीसा प्रकार असलेला अभ्यासक्रम म्हणजे एक वर्षाचं प्री सी ट्रेनिंग. संपूर्ण वर्षभर हॉस्टेल वर राहून एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. इंडियन नेव्हल डॉकयार्ड मध्ये आठवड्यातील तीन दिवस वर्कशॉप आणि नौसेनेच्या जहाजांवर ट्रेनिंग आणि तीन दिवस कॉलेज कॅम्पस मध्ये लेक्चर्स. रविवारी शोर लिव्ह म्हणजे सकाळी आठ वाजता रिपोर्टींग करून निघायचे आणि रात्री नऊ वाजताच्या रिपोर्टींग साठी हजर राहायचे. अशा सगळ्या सूचना देऊन झाल्यावर इन्स्ट्रक्टर ने सांगायला सुरवात केली, जंटलमन यु ऑल आर वेलकम इन धिस डिसीप्लिन्ड अँड प्रिव्हिलेजड प्रोफेशनल करियर. वी विल टिच यु हाऊ टू ऍक्ट, रिऍक्ट, बीहेव्ह अँड सर्वाईव्ह इन एनी कन्डिशन ऑर सिच्यूएशन.

पहिलाच दिवस पहिलेच लेक्चर जहाजच काय समुद्र कसा असतो ते सुद्धा पहिल्यांदाच कॅम्पस मध्ये आल्यावर बघितलेले आम्ही सर्व ११० कॅडेट्स भक्तिभावाने आणि निमूटपणे ऐकत होतो. तुमचे केस कापले जातील, मेजरमेंट घेऊन लवकरात लवकर युनिफॉर्म दिले जातील, हॉस्टेल मध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून कसं राहायचं वगैरे वगैरे सूचना दिल्या. 110 पैकी महाराष्ट्रातील जवळपास 35 जण सोडून भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्यातून थोडे फार जण आले होते. जहाजावर भारतातीलच काय पण वेगवेगळ्या देशातील सहकाऱ्यांसोबत काम करावे लागेल म्हणून हॉस्टेल मध्ये रूम पार्टनर किंवा प्रॅक्टिकल बॅचेस करताना रोल नंबर प्रमाणे केल्या गेल्या. बंगाली सोबत केरळ आप्पा, आणि तेलगू अण्णा सोबत पंजाबी सरदार असे जोडले गेले. शिक्षणासह जेवण खाणे, राहणे सगळ्यांना एकच, एकत्र, ठरवलेल्या वेळेतच कोणताही भेदभाव न करता देण्यात येणार होते.

सगळ्यांचा एकच हेअर कट, एकाच रंगाचे स्पोर्ट्स युनिफॉर्म, शूज वगैरे देण्यात आले. सहा ते सात रनिंग, एक्सरसाईझ करुन पुन्हा आठ वाजता नेव्हल डॉकयार्ड मध्ये किंवा लेक्चर साठी जायला वॉर्डन ऑफिस समोर परेड करताना उभं राहतात तसं तीन तीन रांगांमध्ये उंची प्रमाणे उभं राहून रिपोर्टींग करायचं.

जेवणाच्या वेळा पण जहाजावर असतात त्याप्रमाणे सकाळी सात ते आठ नाष्टा, दुपारी बारा ते एक लंच आणि संध्याकाळी सहा ते सात डिनर. जहाजावर न जाता तिथे राहण्याचा अनुभव व्हावा असा काहीसा कार्यक्रम.

फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी.

पहिल्या जहाजावर जुनियर इंजिनियर असताना दुपारी जेवणावर चीफ कुक ने ताक ठेवले होते प्यायला. जहाजावर बऱ्याच दिवसांनी ताक दिसल्यावर घरी भातावर घायचो तसं प्लेट मध्ये भातावर ताक ओतलं, ते पाहून समोर बसलेल्या फोर्थ इंजिनियरने डोळे मोठे केले. मनात म्हटलं बघ कसही आता चमचा टाकून हाताने भुरके मारत जेवतो बघ पण मग विचार बदलला आणि चमच्यानेच जेवण आटोपले. जहाजावर जुनियर ऑफिसर एका टेबलवर तर सिनियर ऑफिसर एका टेबलवर आणि ईतर खलाश्यांची वेगळी मेस रूम असते. प्रत्येक टेबलवर वेगवेगळ वातावरण. जुनियर ऑफिसर गंम्मत जम्मत करीत तर सिनियर ऑफिसर गंभीर गोष्टी करत जेवत असतात तर खलाशी एकेएकटे जेवत असतात. ज्याचा तो टेबल मॅनर्स सांभाळीत निमूटपणे येतात आणि जेवून जातात.

आम्ही लहान असताना हाताने जेवायला लागल्यापासून मी आणि भाऊ दहा बारा वर्षाचे होईपर्यंत बाबांच्या ताटातच जेवायचो. एका ताटात दोघ किंवा तिघेही जेवायचो. बाबाच काय गावातल्या घरी आल्यावर सगळ्यात मोठे काका किंवा मोठ्या चुलत भावांच्या ताटात ते जेवायला घ्यायचे. आमच्या घरात तर माझी मुलगी चालायला लागायच्या पहिले पासून बाबांच्या ताटात जेवायला लागली, स्वतःच्या हाताने जेवता यायला लागल्यावर तर ती दोन्ही वेळचे जेवण बाबांच्याच ताटात जेऊ लागली. माझ्या जवळ कधी जेवली नसेल पण माझे बाबा बाहेर गेले आणि त्यांना यायला उशीर झाला तरी ती जेवायची थांबते. तिचे बघून तिच्यामागे दोन वर्षांनी झालेली भावाची मुलगी पण बाबांच्याच ताटात जेवायला लागली. मध्ये बाबा आणि दोन बाजूला दोन नाती एकत्र एकाच ताटात जेवतात. या दोघींमध्ये आता अजून तिसऱ्याची म्हणजे माझ्या मुलाची पण भर पडली. टेबलच्या चार बाजूपैकी एका बाजूला बाबा दोन बाजूने दोन नाती आणि एका बाजूने नातू असे चौघेजण एकाच ताटात जेवत असतात. त्यांना चौघाना टेबलच्या चारही बाजूने एकत्र जेवताना बघून कसले टेबल मॅनर्स ना कसलं काय असा विचार करून हसायला येत.

आमच्या घरातल्या तिन्ही मुलांच्या मागे मागे लागून त्यांना जेवू घालावे लागत नाही. हे खा आणि ते खाऊ नका असं जबरदस्तीने सांगावे लागत नाही. बाबांच्या ताटात जे वाढले जाते ते तिन्ही मुलं निमूटपणे खात असतात मग वरण भात, भाजी असो नाहीतर मटण मच्छी असो. बाबा मला चिंबोऱ्यातला बाऊ काढून द्या, माशातला काटा काढून द्या, नाहीतर कोलबी सोलून द्या असा एका मागोमाग तिघांचा गोंगाट चाललेला असतो. कधी कधी दोन, चार आणि सहा वर्षांच्या त्या तिघांची जेवताना भांडण होतात ती सोडवता आली तर सोडवून नाहीतर मग दम देऊन बाबा त्यांना जेवायला लावतात. वेळ आल्यावर तिघांपैकी एखाद्याला ओरडतात तरीपण दुसऱ्या दिवशी तिघेच्या तिघेही बाबांच्या ताटात जेवायला हजर. तिघांच्या जागा आणि वयानुसार लहान मोठ्या आकाराच्या खुर्च्या पण ठरलेल्या. आजोबा आणि नातवंड एकत्र एकाच ताटात जेवतानाचा एक मोठा कौतुक माया आणि ममतेचा आनंद सोहळाच आमच्या घरात दिवसातुन दोन वेळा अनुभवायला मिळतो.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर.

B.E.(mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..