नवीन लेखन...

सुटका

“गल्लीच्या शेवटी त्याची रहायची खोली .. त्यातच लॉन्ड्री …. . घर जेमतेम १० बाय १० .. पण स्वतःचं .. कष्टानी कमावलेलं .. बायको सुद्धा लॉन्ड्रीच्या कामात मदत करायची .. शिवाय भरीला चार घरी धुणी-भांडी-स्वयंपाक.. दोघंही दिवसभर राब राब राबायचे .. फार नसलं तरी जगण्यापूरतं कमवायचे ..

सगळं काही सुरळीत असताना कॅलेंडर बदललं .. २०२० आलं .. “पृथ्वी फिरत राहिली ” .. पण सगळं “जग मात्र थांबलं” लॉक डाऊन मुळे सगळं ठप्प .. भांडी घासण्यात सगळे “आत्मनिर्भर” झाले … कपड्यांना इस्त्री “अत्यावश्यक” राहिली नाही..

सुरवातीचे काही दिवस गेले असेच .. हे “वाईट स्वप्न लवकर संपेल” ही आशा बाळगत .. स्वप्न तसंच राहिलं पण घरातला किराणा आणि साठवलेले पैसे मात्र हळूहळू संपले. पोटापाण्याचा प्रश्न आता त्यांच्यासाठी “अत्यावश्यक” झाला होता .. कधी सरकारी योजनेतून थोडंफार धान्य मिळायचं .. कधी कोणी समाजसेवी संस्था किंवा राजकारणी मंडळी पॅकेट वाटायचे .. सोबतीला विषाणूचं भूत मानगुटीवर होतंच .. सतत टांगती तलवार ..

काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले .. न राहवून त्यानी शेजारच्या मेडिकल दुकानदाराला विचारलं .. तो म्हणाला, “ अरे .. दोघे पॉझिटीव्ह निघाले होते ना sss .. २ आठवडे सेंटरवर कॉरंटाईन होते.. आज “सुटका” झाली त्यांची ; आजारातून आणि कोव्हिड सेंटर मधून .. म्हणून शेजारी-पाजारी स्वागत करतायत .. बाकी काय नाय . “सुटका” झाली रे बाबा एकदाची !!!..

असेच दिवसमागून दिवस , कसेबसे ढकलले जात होते .. परिस्थिति दिवसेंदिवस अजूनच बिकट होत होती .. इकडून तिकडून काही खाण्यापिण्याची व्यवस्था झाली ss तर झाली .. नाहीतर पाणी पिऊन झोपायचं .. “उद्याच्या आशेवर आजचं पोट भरायचं” .. गावाला जायची सोय नाही .. प्रवास बंदी होतीच पण तसंही गाव केव्हाच सुटलं होतं .. आता मुंबईच कर्मभूमी .. सगळं शहर भयाण वाटत होतं .. त्यात ही “”उपासमारीची साथ”” .. कसलीच शाश्वती नाही ..

एक दिवस.. सकाळपासूनच बायको खोकायला लागली .. मेडिकलवाल्याच्या मदतीने लगेच फोन करून कळवलं.. टेस्टिंग साठी माणसं येऊन गेली .. दोघांचे रीपोर्ट पॉझिटीव्ह .. ताबडतोब रवानगी कोव्हिड सेंटरमध्ये .. लक्षणं सौम्य होती पण .. १४ दिवस सक्तीची विश्रांती .. पूर्ण कॉरंटाईन.. डॉक्टर-नर्स .. देवमाणसं .. सगळ्या पेशंटची नीट काळजी घ्यायचे .. वेळोवेळी तपासणी करायचे .. आपुलकीनी विचारपूस करायचे .. सगळा दिनक्रम आखून दिल्याप्रमाणे .. सकाळी नाश्ता.. दिवसातून दोनदा चहा .. जेवण .. सगळं ठरलेलं .. दोन दिवसांनी त्याच्या शेजारच्या पेशंटची डिस्चार्जची वेळ आली .. त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नव्हता ..
तिथून “सुटका’ होत असल्याचा आनंद .. पण या जोडप्याची अवस्था मात्र त्याच्या अगदी विरुद्ध .. .. त्यांना इथे कोव्हिड सेंटरमध्ये आणल्यावर खरं तर त्यांची “सुटका” झाली होती .. त्या बाहेरच्या स्तब्ध झालेल्या विश्वात होणाऱ्या हालअपेष्टातून ..“सुटका”.. अनिश्चिततेच्या सावटात न दिसणारा मार्ग चाचपडण्यातून… “सुटका” ..

गमावलेलं सगळं मागे सोडत , पुन्हा नव्याने उभं राहता येईल का ? कधी ? कसं ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यापासून ….“सुटका” जीवघेणा आजार आणि उपासमार या कात्रीत सापडूनही जिवंत राहण्याची धडपड करण्यातून …“सुटका” पोटाची खळगी भरण्याच्या रोज रोजच्या विवंचनेतून …“सुटका”

इकडे दोन वेळच्या जेवणाची तरी भ्रांत नव्हती.. किमान अजून काही दिवस तरी .. एरव्ही स्वाभिमानानी आणि कष्टानी जे काही मिळायचं त्यात खुश असणारे .. आज भीषण आणि अनपेक्षित वास्तवामुळे असा वेगळा विचार करायला लागले .. सहाजिकंच होतं ते … परिस्थितीमुळे आलेली हतबलता .. अगतिकता ..

अखेर १४ दिवस पूर्ण झाले .. आणि त्यांच्याही “सुटकेची” वेळ आली .. सोबत इतर काही पेशंट सुद्धा होते .. सगळे “सुटकेसाठी” आतुर…. पण यांची देहबोली वेगळीच होती … बाहेर मृत्यूचे आकडे ऐकून आपण या आजारातून सही सलामत सुटलो ही “सुखद जाणीव” असली तरी .. उद्यापासून उदरनिर्वाहाचं काय ?? ..

पुन्हा तीच वणवण .. पुन्हा तेच दुष्टचक्र सुरू होणार .. या विचारांनी दोघेही उद्विग्न .. जगाच्या दृष्टीने यांचीही “सुटका” होत असली तरी वास्तविक त्यांच्या १४ दिवसांपूर्वीच झालेल्या “सुटकेचा आज शेवटचा दिवस” होता .. त्यांच्यासाठी ही “सुटका निःश्वास सोडण्यासारखी नव्हती” .. होती .. .. “चटका लावणारी सुटका”..

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..