सन सिटी – रस्टनबर्ग

२००४ साली, मला अचानक रस्टनबर्ग इथे नोकरी चालून आली. वास्तविक, पीटरमेरीत्झबर्ग इथे तसा स्थिरावलो होतो पण नवीन नोकरी आणि नवीन शहर, याचे आकर्षण वाटले. खरे तर २००३ मध्ये इथे माझा इंटरव्ह्यू देखील झाला होता पण, तेंव्हा काही जमले नाही. मनातून, या गावाचा विचार काढून टाकला होता पण, एके संध्याकाळी, त्यांचा फोन आला आणि दोन दिवसांत सगळे नक्की झाले. सन सिटी, या गावाच्या जवळ आहे, हे माहित होते, अर्थात, मी याआधी देखील सन सिटी इथे एकदा जाउन आलो होतो पण ती भेट तशी उडत, उडत झाली होती. एका रणरणत्या दुपारी, मी इथे पोहोचलो. प्रथम दर्शनी गाव तसे लहानखोर वाटले आणि पुढे जवळपास वर्षभर राहिल्यावर, हे मत पक्के झाले. माझे घर भारतीय कम्युनिटीमध्ये होते. इथे तसा विचार केला तर या गावात जवळपास २००० भारतीय वंशाची लोकवस्ती आहे, यात, मुस्लिम देखील आले. एक गमतीचा भाग मला वारंवार अनुभवायला मिळाला. परदेशात रहाताना, भारतीय, पाकिस्तानी लोकांच्यात अजिबात वैमनस्य नसते. देशाचा अभिमान असणे, यात काहीही गैर नाही परंतु जेंव्हा अडचण येते, तेंव्हा कुणीही असला विचार करीत नाही.

वास्तविक, या गावात, आपल्याकडे जसे वाणी असतात, त्याप्रमाणे पण जरा मोठ्या प्रमाणावर काही दुकाने आहेत आणि ती बहुतांशी पाकिस्तानी लोकांनी चालवलेली आहेत परंतु तिथे खरेदी करणारे, प्रामुख्याने भारतीय वंशाचे लोक आहेत. इतकेच नसून, एकमेकांच्या घरी सातत्याने येणे,जाणे चालू असते. धर्माबाबत कडवा अभिमान, तिथेही आहे पण, मैत्रीच्या आड या गोष्टी येत नाहीत. इतकेच कशाला, एखाद्या शनिवारी रात्री, काही पाकिस्तानी, माझ्या मांडीला मांडी लावून, ड्रिंक्स घ्यायला बसले आहेत. एक अलिखित नियम तिथे नेहमी पाळला जातो, देश आणि राजकारण, याला गप्पांत कधीही स्थान नसते. तसेच धर्माबद्दल कधीही कुठलाही विषय निघत नाही.
इथेच मला, एकदा एका पाकिस्तानी मित्राने, मेहदी हसनच्या एका खासगी मैफिलीची सीडी ऐकवली होती. संगीताच्या बाबतीत, साउथ आफ्रिकेने मला अनंत हस्ते मदत केली आणि जाणीवा विस्तारित केल्या, हे नक्की. पुढे जेंव्हा मी, रस्टनबर्ग सोडून, दुसरीकडे नोकरीसाठी निघालो, तेंव्हा याच पाकिस्तानी मित्रांनी, माझ्या साठी रात्रभर चालणारी अशी मेजवानी दिली होती. एक नक्की होते, आता आमच्या गाठी भेटी होणे जवळपास अशक्य आहेत, म्हणून असेल पण, त्यांनी मला इथे या नव्या गावात स्थिरावण्यासाठी निरपेक्ष मदत केली होती.
भारतीय वंशाचे लोक तसे फार नाहीत आणि कारण असे, इथे फार मोठ्या इंडस्ट्रीज नाहीत, आजूबाजूला प्रचंड खाणी आहेत पण तिथे बहुतांशी गौर वर्णीय किंवा कृष्ण वर्णीय!! घर तसे दुमजली मिळाले होते. ऑफिसमध्ये, मजुरीची कामे बहुतांशी कृष्ण वर्णीय लोकं करीत असत पार त्यांच्या वर देखरेख ठेवायचे काम, भारतीय लोकं करीत असत. कंपनीच्या व्याप फार मोठा होता. प्रचंड सुपर मार्केट आणि त्याला जोडून, होलसेल मार्केट असल्याने, तिथे गर्दी ही कायमची!! या कंपनीत, आम्ही ४ जण, सडाफटिग होतो. मी वगळल्यास, बाकीचे गुजराती, त्यातून माझ्या आणि त्यांच्या वयात बराच फरक. त्यामुळे,त्यांनी मला “अनिलभाय” म्हणायचे ठरले. आम्ही एकत्रच जेवणाचा कार्यक्रम करत असू, म्हणजे कधी माझ्या घरी जेवण तर कधी त्यांच्या घरी जेवण, असला प्रकार चालायचा. अर्थात, मला कधी मांसाहार खायची लहर आली तर मात्र मी वेगळा!!
इतर शहरांत जो प्रकार आढळतो, तसाच प्रकार या शहरात देखील आहे, गौर वर्णीय लोकांची वस्ती वेगळी आणि अर्थात अधिक आटोपशीर, देखणी तसेच वैभवशाली!! या भागात गेल्यावर, लगेच तुम्हाला फरक जाणवतो. वास्तविक या गावात तशी हिरवी झाडी फारशी नाही पण या भागात गेल्यावर, हिरव्या रंगाचे अस्तित्व डोळ्यांत भरणारे असते.नशिबाने, घरात जाण्याचा प्रसंग आला तर स्वच्छता आणि टापटीपपणा डोळ्यांत भरणारी असतो. अर्थात, इथे एक बाब अनाकलनीय आढळते आणि केवळ इथेच नाही साउथ आफ्रिकेत सर्वत्र आढळते. सार्वजनिक स्वच्छतेला इतके प्रचंड महत्व देणारे, वैय्यक्तिक स्वच्छतेबाबत फार गलथान असतात. एकतर, याची आंघोळीचे वेळ ही संध्याकाळची असते!! युरप/अमेरिकेत हे चालून जाते कारण तिथे बारमाही गारठा असतो पण या देशात तसे नसते. ऑफिसमध्ये, सकाळी आपण जेंव्हा शिरतो तेंव्हा नाकाशी परफ्युमचा सगंध दरवळत असतो पण कधी जवळ जायची वेळ येते, तेंव्हा घामाचा उग्र वास येतो. केवळ युरप/अमेरिकेचे अंधानुकरण, इतपतच याचा अर्थ पण, हे लोण केवळ गौर वा कृष्ण वर्णीय लोकांत आहे, असे नसून, इथे सगळ्या समाजात, हीच पद्धत आहे!! त्यामुळे, इथे लोकांना भेटावे तर ऑफिस सुटल्यावर!!
मी जवळपास, १७ वर्षे या देशात काढली पण आपली आंघोळीची पद्धत कधीही मोडावीशी वाटली नाही, अगदी पुढे जोहान्सबर्गच्या हाडे गारठवणारया थंडीत राहताना देखील, सकाळची आंघोळ चुकली नाही. जरी हे लहानखोर गाव असले तरी, गावातील रस्ते तसेच दृष्ट लागणारे!! इथूनच पुढे ४० कि.मी.वर जगप्रसिद्ध सन सिटी आहे. साउथ आफ्रिकेचा सगळा ऐय्याशी आणि विलासी राहणीचा अत्युच्च बिंदू म्हणजे सन सिटी. वास्तविक, सन सिटी आणि लॉस्ट सिटी, असे एकाला जोडून, दोन भाग आहेत. सन सिटी म्हणजे casino चे आगर. इथले जग(च) वेगळे आणि कधीही शांत न होणारे!! सगळ्या आफ्रिका खंडात इतका मोठा casino बहुदा नसावा आणि अर्थातच आर्थिक उलाढाल देखील तितकीच अवाढव्य. शुक्रवार संध्याकाळ पासून ते सोमवार सकाळ पर्यंत, इथे अक्षरश: जत्रा असते. तसे सन सिटी आड मार्गाला आहे, त्यामुळे तिथे जायचे म्हणजे तिथे हॉटेल बुक करूनच जायला हवे अन्यथा जवळ असलेल्या रस्टनबर्ग मध्ये रहायची सोय करायला हवी. इथे लोकं जाबडल्यासारखी यंत्राला चिकटून असतात सन सिटी मधील हॉटेल्स त्यामानाने स्वस्त आहेत परंतु लॉस्ट सिटी म्हणजे सगळा जगावेगळा कारभार!!
अगदी मिलियन डॉलर्सची बक्षिसे असतात. मी स्वत:, एका भाग्यवंताला २.५ मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्याचे बघितले आहे आणि त्या रात्री, त्याने सगळ्यांना दिलेली पार्टी देखील!! “इस रात को सुबह नही” याची अचूक प्रचीती इथे बघायला मिळते.
लॉस्ट सिटी, हे हॉटेल आहे पण, तुमच्या ऐय्याशीच्या कल्पनांना सुरुंग लावणारी आलीशानता इथे आहे.इथे राहायचे म्हणजे केवळ पैसे उधळायला यायचे. सन सिटीत तुमचे बुकिंग असेल तर इथे तुम्हाला फिरायला परवानगी मिळते. हॉटेलच्या बाहेरूनच, आपल्याला त्याच्या स्वरुपाची झलक मिळते.
आता, इतका प्रचंड खर्च करून प्रवासी येणार म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनाची साधने निर्माण करणे, ओघाने आलेच. आजूबाजूचा भाग तसा सगळा रखरखीत असल्याने, इथे विज्ञानाला हाताशी धरून, अनेक मनोरंजनाची साधने निर्माण केली आहेत. इथे पाण्याचा कृत्रिम जलाशय तयार केला आहे आणि विज्ञानाच्या सहाय्याने, प्रचंड आकाराच्या लाटा निर्माण केल्या जातात आणि तदनुषंगाने इतर पाण्यावरचे खेळ खेळले जातात. वास्तविक, एक प्रचंड डोंगर फोडून हे गाव वसवले आहे, तेंव्हा त्या डोंगराच्या खडकांत, निरनिराळे प्राणी तयार केले आहेत आणि अगदी “जिवंत” वाटावेत, इतके अप्रतिम केले आहेत आणि जसे तुम्ही जवळ जाल, तशी त्या प्राण्यांच्या भयप्रद आवाजाची डरकाळी, पूर्वसूचना न देता ऐकवतात!! तसेच एके ठकाणी, कृत्रिम भूकंप केला जातो. अक्षरश: पायाखालची “जमीन” हादरते आणि सरकते देखील!! मध्यरात्री, हा प्रकार फार भयप्रद वाटतो. इथे पाण्यासारखा पैसा खर्च होतो. रात्री सगळा डोंगर वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी मढवला जातो आणि दर शनिवारी रात्री इथे, केवळ धनवान व्यक्तीच भाग घेऊ शकतील, अशा आलिशान पार्ट्या रंगतात.
मी तिथे रहात असताना, सन सिटीमध्ये, आपल्या बॉलीवूडच्या कलाकारांचा ताफा आला होता. हा देश वर्णद्वेषाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर, इथे भारतीय कलाकार नित्यनेमाने येतात. त्या वर्षी, शाहरुख, सैफ, राणी, प्रीती, मलायका असे कलाकार आले होते. अर्थात, अस्मादिक तिथे गेले होते – पास मिळवला होता. कार्यक्रमाला, भारतीय वंशाच्या लोकांनी तुडूंब गर्दी केली होती, अगदी जोहान्सबर्ग वरून लोकांचे जत्थे आले होते. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. दूर असून देखील तिथल्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या कार्यक्रमात, इथे शाहरुख किती लोकप्रिय आहे, याची झलक बघायला मिळाली. तसे बघितले तर इथल्या लोकांचे हिंदी म्हणजे सगळाच आनंद आहे पण, भारतीय कलाकारांबद्दल इथे प्रचंड आकर्षण आहे. पुढे डर्बन इथे हरिप्रसाद चौरसियांचा कार्यक्रम असाच तुफान गर्दीत झाला.
रस्टनबर्ग, गाव तसे लहान आहे, फार तर तालुका म्हणता येईल. इथे मोठ्या शहरांप्रमाणे आलिशान व्यवस्था नाहीत, घरे देखील बुटकी, टुमदार अशी आहेत. त्यामुळे असेल, पण, गावांत एकोपा आहे. भारतीय सण, जमतील तशा प्रकारे साजरा करतात. बहुतेक सण, गावातील, हिंदू देवळांत होतात, अगदी गणपती,दसरा, दिवाळी आणि नवरात्र. वर्षातून एक वीक एंड सामुदायिक पिकनिक निघते आणि तेंव्हा मोजून सगळ्या धर्मातील माणसे एकत्र जमतात!! इथे सगळे धर्मीय राहतात, पण प्रत्येकजण आपला धर्म पाळतो आणि त्यात कुणीही “नाक”खुपसत नाही!!
अर्थात, इथे सगळा “गोडीगुलाबी” किंवा “भाबडेपणा” नक्कीच नाही पण आपापल्या मर्यादा जाणून घेऊन, सगळे व्यवहार चालतात.
इथेच मला, “तान्या” नावाची, पहिली गौर वर्णीय मैत्रीण भेटली. माझ्याच सोबतीने काम करत होती. मुळची “डच” संस्कृतीत मुरलेली पण, आता या देशातली सातवी पिढी!! गोऱ्या समाजाची प्रातिनिधिक प्रतिनिधी, असे म्हणता येईल. वागायला अतिशय मोकळी, सतत स्मोकिंग करणारी, प्रसंगी ड्रिंक्स घेणारी आणि वयाच्या १७ व्या वर्षी घरापासून वेगळे राहण्याचा आपणहून निर्णय घेतलेली, निळ्या डोळ्यांची ही मैत्रीण, मला गोऱ्या समाजाची जवळून ओळख करून देणारी. तोंडाने अति फटकळ पण कामात मात्र वाघ!! ओळख झाल्यावर, साधारणपणे, एका महिन्यात, तिने माझ्यासमोर, तिच्या आयुष्याचा “पंचनामा” स्वच्छ डोळ्याने मांडला.
सध्याचा Boyfriend हा, तिचा तिसरा असून, पहिल्या दोघांशी नाते का तोडले, हे तिने मला अगदी सहज, बिनदिक्कतपणे सांगितले. सांगताना, स्वर अतिशय थंड, कुठलाही अभिनिवेश न घेतलेला!! खरेतर, सगळा गोरा समाज,हा याच प्रवृत्तीचा, निदान मला तरी इथे आढळला. तसेच, माझ्या CEO ची गोरी सेक्रेटरी, “बार्बरा” अशीच माझ्या चांगल्या परिचयाची झाली. तिची देखील अशीच कथा म्हणजे, पहिले लग्न मोडलेले पण सध्या Live-in-relation मध्ये रहात होती. पदरी चार वर्षाचा मुलगा असून, या नात्यात, त्याची जबाबदारी मात्र बार्बराची!!
 या दोघींनी, मला वारंवार त्यांच्या घरी बोलावले.त्यानिमित्ताने, गोरा समाज कसा आहे, त्याची विचारसरणी कशी असते, स्वभाव कसा असतो, याचा अंदाज आला. पुढील काळात मी आणखी नोकऱ्या केल्या आणि प्रत्येक ठिकाणी अशाच गोऱ्या मुली संपर्कात आल्या आणि त्यावेळी, माझा “बुजरेपणा” मात्र लोपलेला होता. या दोघींच्या, मित्रांशी माझी चांगली ओळख झाली आणि त्यांच्या स्वतंत्र गाठीभेटी होण्याइतपत जवळीक साधली. अर्थात, त्यावेळी मनाशी बांधलेले “ठोकताळे” तेच प्रत्येकवेळी कायम अनुभवास आले, असे नाही पण, तरी देखील, प्रमाणाबाहेर अंदाज चुकले नाहीत, हे नक्की!!
इथल्या लोकांची एक बाब मात्र शेवटपर्यंत “अगम्य” राहिली. इथे वैय्यक्तिक व्यवहार, शक्यतो “क्रेडीट कार्ड” वर चालतात, अगदी Underwear सारख्या गोष्टी विकत घ्यायचे झाले तरी, “पेमेंट” मात्र क्रेडीट कार्डाने करायचे!! शक्यतो Cash व्यवहार चालत नाहीत. याचा परिणाम असा होतो, महिन्याचा पगार झाला की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, बहुतेक सगळे “कफल्लक”!! मग, पगार कितीही मोठा असो. जितका पगार अधिक, तितका क्रेडीट कार्डचा वापर अधिक!! किंबहुना, जितके उत्पन्न अधिक, तितकी क्रेडीट कार्ड्सची संख्या अधिक!! एक अनुभव सांगतो. पुढे मी प्रिटोरिया मध्ये नोकरी करताना, तिथला आमचा IT Manager, जेम्स माझ्या चांगल्या ओळखीचा झाला. तिथून, जेंव्हा डर्बन इथे जायची वेळ आली तेंव्हा, मी घरातील काही सामान विकायला काढले, त्यातील, “प्लास्टिक मोल्डेड” फर्निचर तसे फार स्वस्त म्हणून घेतलेले होते, ते विकायला काढले.
घराच्या बाहेरच्या व्हरांड्यात बसण्यासाठी, मी चार खुर्च्या आणि एक टेबल घेतले होते. तशी काही फार महागडी नव्हती पण, त्याने विकत घेतले आणि त्याचे पेमेंट, तो Cash देऊ शकत होता पण, त्याने क्रेडीट कार्ड वापरले!! मला नवलच वाटले पण इथे अशीच पद्धत आहे.
या शहरात, मी जवळपास एक वर्ष काढले. एखादा दुसरा मित्र सोडला तर आता कुणाशीच संबंध राहिलेले नाहीत. अर्थात, एका वर्षात “घनिष्ट” म्हणावी अशी मैत्री होऊ शकते, या वर माझाच विश्वास नाही. तेंव्हा या शहराने मला काय दिले? गोऱ्या लोकांशी कसे वागावे, हा समाज कसा आहे, या सगळ्याची ढोबळ ओळख करून दिली. पुढील वाटचालीसाठी, हे निश्चितच उपकारक ठरले.
– अनिल गोविलकर

About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…