नवीन लेखन...

सुखी माणसाचा सदरा हवाय ?

पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे . वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती . सुंदर पत्नी ,हो अजूनही म्हणजे वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने  स्वतःस सुरेख मेनटेन केलाय . मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड .  मुलगा – सून बेन्ग्लोरला , आयटी क्षेत्रात . आम्ही दोघे पुण्यात . राहायला छोटेसेच असले ,तरी सर्व सोयीनीयुक्त घर . दोन वेळेच्या वरण भाता साठी पेन्शन मिळतीय . चार पैसे बाळगून आहे . दृष्ट लागण्या सारखा संसार आहे माझा ! माझ्या सारख्या ‘ सुखी ‘ माणसाचा ‘सदरा’घेण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागेल . पण मी ‘तो’ कोणालाच देणार नाही !

का ? तुम्ही विचारलं .

आजवर याचे उत्तर मी कोणालाच दिलेले नाही . पण आज मात्र मी तुम्हाला सागणार आहे ! फक्त एकाच विनंती आहे , हे गुपित फक्त तुमच्या पुरतेच ठेवा , इतरांशी शेयर करू नका .

000

पाहता क्षणी जान्हवी मला आवडली . किंचित सावळी , नजरेत भरणारी उंची , सडपातळ बांधा ,रेखीव चेहरा ,( थोडासा गंभीर) , मधेच मंद स्मित करण्याची सवय , आणि त्या वेळेस पडणारी गालावरची खळी ! या पेक्षा अप्सरा वेगळी असते का हो ? मी त्याच बैठकीत होकार देवून टाकला . मुलगी पहाण्यासाठी घेतलेली सी. एल . प्रीव्हीलेज लिव मध्ये वाढवून घेतली . पंधरा दिवसात आमचे लग्न झालेही !

मझ्या लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस थोड म्हणजे तब्बल पाच वर्ष लांबले ! तोवर स्वाती आणि शेखर अंगणात खेळत होते . हळू हळू मला जान्हवी समजू लागली . ती घरात खूप कमी बोलायची . घरची सगळी काम करायची . आईच्या औषध पाण्याचा वेळा , मुलाचं खाण – पीण ,माझा डब्बा . सगळ व्यवस्तीत वेळच्या वेळी !

“जान्हवी , काय झाल ?तू खूप अबोल असतेस . ” मी एकदा तिला विचारल .
“काही नाही . मला बोलणच कमी आहे !”

” मोकळ बोलत जा ना. लग्न झाल्या पासून पहातोय ,तू कधी काही मागितल नाहीस . कशाचा हट्ट हि केला नाहीस. मी जे आणीन ते नबोलता ठेवून घेतेस . अजून तुझी आवड -निवड पण मला कळू शकली नाही . ”
“मला सगळ मिळतय .मग हट्ट का करू ?”
असतो एखाद्याचा स्वभाव समाधानी . आणि अश्या स्वभावाची बायको मिळायला शेकडो जन्माची पुण्याई लागते ! माझ्या मनातल्या तिच्या बद्दलच्या प्रेमाला आदराची प्रभावळ लाभली .
000
एक दिवस मी ऑफिस मधून येताना मला वेडावणारा गंध नाकात शिरला . मोगऱ्याच्या फुलाचा वास ! जीव टाकतो याच्या साठी मी ! पांढऱ्या शुभ्र ,ताजा  टवटवीत , मोगऱ्याच्या फुलांचे गजरे त्या फुलवाल्याच्या दुरडीत ऐटीत बसले होते .  गजरा मळलेली जान्हवी डोळ्या समोर तरळून गेली . आजवर कसे लक्षात आले नाही कोणास ठावूक ? जान्हवीच्या नाजूक चेहऱ्याला हा गजरा काय शोभून दिसेल ! आता रोज जानू साठी गजरा घेणार ! मी गजरा घेवून घरी आलो .
“जान्हवी ,गजरा पाहताच तुझी आठवण झाली . मुद्दाम तुझ्या साठी आणलाय . “मी जान्हवीला गजरा देत म्हणालो . तिने होकारार्थी डोके हलवून गजरा एक शब्द हि न बोलता घेवून गेली . मला तिचा अबोल स्वभाव पुन्हा खटकला .
चार दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले कि जान्हवी मी आणलेला गजरा घालत नाही.
“जान्हवी , मी तुझ्या साठी मुद्दाम गजरा आणतो . पण तू घालत नाहीस . का ?”
“घालते कि !”
“मला कधी दिसल नाही. ”
“—“ती पुन्हा गप्प बसली .
“आजवरच जावू दे . आज घाल . ”
“हो.जेवण झाल्यावर घालते . “तिने मी दिलेली वेणी माठा वरच्या ओल्या झाकणीत ठेवली . आणि कामात गुंतली .
“जानू ,आग वेणी ?”
रात्री मी पुन्हा विचारले.
“आता कंटाळा आलाय. सकाळी घालीन. ”
सकाळी घाईत ऑफिसला जाताना माझे लक्ष माठा कडे गेले. मलूल झालेला तो गजरा माठा खालच्या बादलीत तरंगत होता.
संध्याकाळी पुन्हा मी वेणी आणलीच . घरात जाताना अंगणातल्या तुळशी वृदावनात पडलेले कालच्या गजऱ्याचे कलेवर पडलेले दिसले !
“जानू ,हे काय ?तुला गजरा छान दिसतो . घालत जा ना. माझ्या साठी तरी!”
“खरे सांगू . मला मोगऱ्याचा वास नाही आवडत !आणि मोगराच काय मला कुठलीच फुल नाही आवडत . नका आणत जावू माझ्या साठी काही !”
बापरे ! किती तोडून टाकणार बोलली आज . तारुण्यात बायकांना फुलांचा तिटकारा असू शकतो ? असेल हि . नसेल तिला फुलांची आवड . मी तरी का एव्हडा ‘गजरा घाल’ म्हणन हट्ट करावा ? हि बळजबरी बरी नाही. माझी आवड तिच्यावर का लादावी? तिच्या दृष्टीने मी विचारच केला नव्हता . मला बराच वेळ अपराधी वाटत राहील . मग मी तिच्या साठी वेणी /गजरा आणणे बंद केले . आणि झाला प्रकार विसरूनही गेलो .
एक दिवस मिटिंग कॅनसल झाली म्हणून लवकर घरी आलो. घराला कुलूप होते. बायको माहेरी गेल्याचे शेजारच्या काकुनी सांगितले . माहेर गावातच असल्याने ती आधन – मधन माहेरी जावून येते . ऑफिस सुटण्याचा सुमासार ती परतली. मस्त लाईट मूड मध्ये होती. काही तरी गाण गुणगुणत होती. आणि मोकळ्या केसात नाजूक जाईची वेणी ! मला पहातच एकदम गप्प झाली. चेहऱ्यावर गंभीर मुखवटा आला.
“काय ,आज माहेर ?काही विशेष ?”
“हो ,आईने बोलावल होत . ”
“तुला फुल आवडत नाही ना ?मग आज वेणी कशी ?”मी नको तो प्रश्न विचारल्याची झाली.
“घालते कधी कधी ! माझ्या मूडवर असत ! “तुटक उत्तर देत घरात निघून गेली! काही तरी चुकतय याची मनाला जाणीव झाली.
000
त्या दिवशी दिनकरकाका रस्त्यात भेटले. त्यांच्याच मध्यस्तीने आमचे लग्न जुळले होते.
“का हो काका , जान्हवी लहानपणा पासूनच अशी अबोल आहे का हो ?”
बोलता बोलता मी सहज विचारले.
” कोण ? बबडी ! छे रे तिला खूप बोलायला आवडत !तोडात तीळ भिजत नाही तिच्या!पण तू का विचारतोयस ?”
“काही नाही . लग्न झाल्यापासून खूप अबोल असते . ”
“अरे ,नव्या संसाराच्या  जवाबदारीने थोडी बावरली असेल. तू नको काळजी करूस. पोर खूप गोड आहे. लग्नाला पण ‘नको’ म्हणत होती, मीच तिची समजूत घालून तयार केली होती !”

मग मात्र मन सर्व गोष्टींची उकल करू लागल .गजराच काय मी आणलेल्या साड्या ,ड्रेस पण ती घालत नव्हती !तिने मला विरोध कधीच केला नाही ,पण सहकार्य पण केले नाही !’ नव्या संसाराच्या  जवाबदारीने थोडी बावरली असेल.’म्हणे ! हे बावरेपण पाच वर्षा नंतर हि टिकू शकत ? म्हणजे हे लग्न जान्हवीच्या मना विरुद्ध झालेलं होत! तिच्या तुटक बोलण्या -वागण्याचा अर्थ आता लागत होता! तिच्या पद्धतीने तो केलेला आणि आज तगायत चालू ठेवलेला , लग्नाचा निषेध होता!
प्रेम म्हणजे व्यभिचार आणि प्रेमविवाह म्हणजे सामाजिक गुन्हा! हा अलिखित नियम असणारा तो काळ होता . एक वेळ जगाशी दोन हात करता येतात ,पण आपल्याच आप्तांशी , जन्मदात्यांशी नाही सगळ्यानाच नाही झगडता येत! अश्या इमोशनल अत्त्याचाराचे बळी घरोघर असत. वडिलधाऱ्या मंडळीच्या संमतीनेच लग्न ठरत. पाच – सात मिनिटाच्या ‘कांदा-पोह्या ‘ने जन्माचा गाठी करकचून बांधल्या जायच्या. त्यातहि मुलीना खूप कमी स्वातंत्र्य असायचे. काही विरोधी सूर लावला कि ‘ सहवासान प्रेम होत निर्माण ! आमचे नाही का झाले संसार सुखाचे !’ हा ठोकळेबाज सल्ला तयार असायचा.
मला या सर्व परस्ठीतीची पूर्ण कल्पना आहे . मी जान्हवीची बाजू समजू शकतो . हा घे ‘नवरा ‘ अन कर प्रेम. अस नाही करता येत प्रेम ! सहवासाने आदर , आपुलकी ,वाटेलही पण प्रेमाची उस्पुर्ततता नाही येत. जान्हवी एक आदर्श गृहिणी आहे, आई आहे, सून सगळ आहे !आणि हो , काल पर्यंत ती आदर्श बायको पण होती !पण –पण आता मला तिचा छुपा विरोध जाणवतोय !
आजवर जे झाल ते झाल. या नंतर मीही खूप संयमाने वागतोय. तिच्यावर माझ्या आवडी – निवडी लादण्याच टाळतोय . पूर्वी सारख हक्काच अस काही राहिलेलं नाही. जगाच्या दृष्टीने ती एक आदर्श गृहिणी/पत्नी आहे . मी हि एक आदर्श पती आहे . सहवास , संगत ,सोबत ,सामंजस्य आहे पण ——
आज आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत. गेल्या चाळीस वर्षात ती एकदाही ‘ LOVE U ‘ नाही म्हणाली .किवा त्या अर्थाची जाणीव पण होवू दिली नाही ! मी अजूनही वाट पहातोय ! मावळतीला आलेली एक आशाअजूनहि आहे. केव्हा तरी तिला माझ्या बद्दल प्रेम वाटेल .
000
आता सांगा ज्या माणसाच्या बायकोचे त्याचावर प्रेम नाही, आणि हे त्याला पक्के माहित आहे अश्या माणसाचा ‘ सदरा ‘ तुम्ही घ्याल का ? आणि जरी तुम्ही घेतला तरी तो मी तुम्हास कसा देईन ? न भरून येणाऱ्या जखमा साठी मी कारणीभूत का ठरू?माझे ते संस्कार नाहीत !

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..