नवीन लेखन...

सुखाचे सोपे मार्ग?

‘आपल्या मेंदूला सुखद अनुभव डोपामिनमुळे मिळतात. समाजमाध्यमातून आपण अशा जाणिवा निर्माण करण्याचे शिक्षण या डोपामिन यंत्रणेला देतो’.

संगणक व मोबाईल याद्वारे समाजमाध्यमे वापरणारांचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या बाबतीत व्यसनाच्या पातळीवर हा वापर पोचलेला आहे. याचं कारण सुरुवातीला नोंदलेल्या वाक्याने स्पष्ट होईल. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमातून सुखद जाणिवा कशा मिळतात?

  1. आपल्या पोस्टवर लाइक्स मिळाल्यावर.
  2. स्वतःच्या दिसण्याचं, स्वभावाचं व एकूणच आयुष्याचं अतिशयोक्तीपूर्ण प्रदर्शन केल्यावर.
  3. इतरांची आपल्याबद्दल कशी समजूत होत असेल या विचारांत गुंतल्यावर.
  4. समाजमाध्यमांवर कुणी जास्त प्रसिद्ध होत असल्यास त्याहून वरचढ काही केल्यावर.
  5. या समाजमाध्यमातून दिसते, भासते तेवढेच जग आहे या धारणेला कवटाळून राहिल्यावर.
  6. आपल्या मित्रांची आणि पाठीराख्यांची संख्या पाहिल्यावर.

सतत समाजमाध्यमांवर वावरणारे, अशा सुखद संवेदना मेंदूत झिरपत असल्याचा अनुभव घेत असतात. त्यामुळे सुखाचा मार्ग आपल्याला गवसला आहे अशी त्यांची समजुत होते. दैनंदिन कामकाजात ताणतणाव, अप्रीय प्रसंग निर्माण झाल्यास सुसह्य भवताल निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा आश्रय घेतला जातो व तो सहज उपलब्ध असल्याने, त्यावर हाच एक उपाय आहे ही भावना दृढ होते. परिणामी समाजमाध्यमांवर जास्त वेळ खर्च करणे समर्थनीय वाटते. कोणालाही दिवसाचे 24 तासच उपलब्ध असतात. आपण वेळ कुठून काढायचा हा प्रश्न उभा राहिल्यास प्रथम झोपेच्या वेळेला कात्री बसते; नंतर एखादी प्रत्यक्ष भेट टाळली जाते वा कुटुंबाबरोबरच्या भोजन-गप्पा बंद होतात. माध्यमांसाठी वेळ काढण्याच्या या वाटा चोखाळताना आपण एका कात्रीत सापडत असतो. माध्यमांचे व्यसन हे मानसिक आरोग्याशी खेळते, तर झोपेची व भुकेची कुचंबणा शरीर व मन या दोहोंवर परिणाम करते.

समाजमाध्यमातून मिळणारे जे काही आहे तेच खरे सुख आहे अशी सुखाच्या परिपूर्णतेची भ्रामक कल्पना घट्ट होते. सुखासाठी आसपासच्या कोणाची आवश्यकता नाही असे वाटते. यामुळे एकलकोंडेपणा वाढतो. समाजमाध्यमातले मित्र ‘किती सच्चे’ आहेत ते कठीण प्रसंगी समजून यायला वेळ लागत नाही. कधीतरी सुखाच्या कल्पना बदलण्याची वेळ येते. नवे मार्ग अनुसरण्यासाठी जर समाजमाध्यमांवर व्यतित केला जाणारा वेळ कमी करायचे ठरविले तर समाजमाध्यमांच्या व्यसनापासून मुक्ती मिळवावी लागते. आपल्याला हे भ्रामक सुखद अनुभव दूर करावे लागतील हे स्वतःला पटवावे लागते. समाजमाध्यमांपासून जर दूर राहिले तर डोपामिन यंत्रणा अशा प्रकारच्या सुखद जाणिवा निर्माण करणार नाही. पण सुख तर आवश्यक आहे. मग डोपामिन यंत्रणेला नवे प्रशिक्षण दिले पाहिजे. नव्या छंदातून हे साध्य होऊ शकते. वाचन, चित्रकला, गायन, वादन वगैरे अनेक छंद आहेत. यासाठी वेळ लागला तरी हे अशक्य नाही. स्वतःविषयीच्या चुकीच्या कल्पना दूर करणे मात्र आवश्यक आहे. काही काळ कंपूतून बाजूला फेकले गेल्यासारखे वाटेल. दुर्लक्ष करावे लागेल. हेच असणार आहे मनाचे प्रशिक्षण. योग्य मार्गावर असण्याचे हे लक्षण आहे. सुखाची नवीन व्याख्या जास्त भावणारी असेल. सुखाचा हा मार्ग खडतर वाटला तरी मिळणारे सुख चिरंतन असेल. डोपामिनला चांगले वळण लागेल व परिणामतः आपण चांगल्या मार्गावर येऊ.

— रविंद्रनाथ गांगल 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

1 Comment on सुखाचे सोपे मार्ग?

  1. समाज माध्यमांचा वापर ही ऐक दुधारी तलवार आहे. त्याचा वापर जबाबदरीने व आवश्यक तेवढाच केला पाहीजे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..