नवीन लेखन...

सुजाण नागरिकत्व म्हणजे काय?

‘ज्या देशाचा नागरिक सुजाण आहे, तो देश समृद्ध आहे.’

या वाक्याने मी लेखाची सुरुवात करीत आहे. त्यातील शब्दांची संकल्पना अशी आहे.

नागरिकः

सृष्टीमधील घटक सजीव व निर्जीव या प्रकारांमधे विभागता येतात. सजीवांचे वनस्पती व प्राणी यात वर्गीकरण करता येते. प्राण्यांचे मनुष्य व इतर प्राणी असे भाग पाडता येतात. ‘मनुष्य’ या प्राण्याचे पुढील भेद देश, समाज यानुसार बदलतात. काही ठिकाणी काळे-गोरे, काही ठिकाणी उंच-ठेंगणे, काही ठिकाणी प्रगत-अप्रगत, काही ठिकाणी उच्च-निम्न, काही ठिकाणी सुशिक्षित-अशिक्षित, काही ठिकाणी श्रीमंत-गरीब, काही ठिकाणी शहरी-वनवासी वगैरे वगैरे. झाले ना खूप भेदाभेद? मग नागरिक यात कुठे बसतो? यातील प्रत्येक जण हा ‘नागरिक’ आहे.

नागरिक म्हणजे कोणताही मनुष्य. एखाद्याचे नागरिकत्व तो ज्या देशात जन्मला त्या देशाच्या नियमानुसार ठरते. जसजसे मूल मोठे होते तसतसे ते मूल घडत जाते. कुटुंब व समाज यांचे संस्कार त्याच्यावर होतात. नागरिक घडण्याची प्रक्रिया सुरू राहते, अगदी शेवटपर्यंत. हे मूल पुढे वेगवेगळ्या वयोगटात ‘नागरिक’ म्हणून कोणत्या प्रकारे आविष्कृत होते? चांगल्या की वाईट? कसं ठरवायचं? कोणी ठरवायचं? सर्वांनी ते का मान्य करायचं? खूप प्रश्न पडतात. यांची उत्तरं मिळवून आपल्याला काय साधायचे आहे? आपल्याला बघायचे आहे की ‘सुजाण नागरिक’ कोणाला म्हणावे. नागरिक हा समाज व देश यांची ओळख असतो. एखादा समाज वा देश कसा आहे हे त्या देशातील ‘नागरिक’ ठरवितो. म्हणून नागरिक जर चांगला असेल तर तो ज्या देशात राहतो तो देश चांगला असे म्हणता येईल.

सुजाणः

या शब्दाची व्याप्ती जितकी जास्त करता येईल तितका तो जास्त समर्पक बनेल. सुजाण नागरिक म्हणजे, चांगले-वाईट यातील भेद समजणारा, स्वतःबरोबर दुसर्‍याचा विचार करणारा, नियम हे सर्वांच्या हितासाठी आहेत ही धारणा असणारा व नियम सर्वांना लागू आहेत हे जाणणारा, नियमानुसार आचरण करण्यास न लाजणारा व नियम पाळल्याचा अभिमान बाळगणारा, नियम सर्वांसाठी सारखे आहेत यानुसार कायद्याची अंमलबजावणी कारणारा नागरिक. तो सेवा देणारा असो वा सेवेचा उपभोक्ता असो; तो मालक असो वा कामगार असो; तो शास्ता असो वा प्रजा असो. तो सुजाण असल्यास समाजाचे व देशाचे चित्र छान दिसेल.

समृद्धीः

आवश्यक त्या सोयी-सुविधांची उपलब्धता म्हणजे समृद्धी. प्राथमिक गरजांची पूर्तता करीत असताना आपण फसविले जात नाही अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात असायला पहिजे. उदाहरणार्थ, एखादी वस्तू महाग, वजनात कमी, निकृष्ट दर्जा असलेली मिळणे वा कमी प्रतीची सेवा मिळणे यामुळे फसविले गेल्याची ग्राहकाची भावना होते. एकाच वस्तूचे वेगवेगळ्या गिर्‍हाइकांना वेगवेगळे भाव सांगणारे व्यापारी, पैसे घेताना कबूल केलेल्या गोष्टींची पूर्तता न करणारे सेवा पुरवठादार यांचा अनुभव आलेले लोक असतात. त्यांची फसवणुक झालेली असते. हे अनुभव जेव्हा वारंवार येतात तेव्हा लोकांमधे अस्वस्थता पसरते. रोजच्या जगण्यामधील सातत्य व संतुलन बिघडते. हे सर्व ‘समृद्धी’ च्या आड येणारे असते.

वरील संकल्पनांच्या अनुसार सुजाण नागरिक असलेला देश समृद्ध असणारच. एक गोष्ट खरी की हे कल्पनेत रंगविणे सोपे आहे. कारण कुठल्याही कसोटीवर 100 टक्के उतरणे म्हणजे आदर्श स्थिती असणे, जे सहसा असत नाही. मग समृद्ध देश आपल्याला पहावयास मिळतात ते कसे? त्यांनी आदर्शाच्या दिशेने जास्तीत जास्त टक्के मिळवलेले असतात म्हणून. अशा देशांतील व्यवस्था पाहणाराला तेथील माणसांच्या वागण्या-जगण्याविषयी आश्चर्य वाटते. आपण मनात देखील आणू शकणार नाही अशा प्रकारची शिस्त व जबाबदारपणा नागरिकांत दिसून येतो. याचे कारण त्या लोकांना असणारा देशाभिमान. हीच एक गोष्ट देशातील विविध पार्श्वभूमी लाभलेल्या लोकांना बांधून ठेऊ शकते. मनातील विचारांची बैठक समान पातळीवर असल्यास हे जमते. हे संक्रमण नव्या पिढीवर होणार्‍या संस्कारातून घडू शकते. म्हणून आजचे बालक आपल्या देशाला भावी काळात, ‘सुजाण नागरिकांचा देश’ या विशेषणाचे दावेदार बनवू शकतात. स्वातंत्र्यानंतरच्या तीन पिढ्या हा दावा करू शकलेल्या नाहीत. आपल्याकडे अनेक व्यक्तींनी जगण्याचे आदर्श लोकांपुढे ठेवले. यापुढे हे करण्यासाठी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणारी पिढी हवी. ही पिढी आजच्या तरुणांची असली पाहिजे. त्यांचा त्याग, त्यांचे कर्तुत्व नव्या पिढीला दिसले पहिजे. म्हणजे ही साखळी पुढे गूंफली जाईल. यातून देशाची ओळख अपेक्षित दिशेने, म्हणजेच देश सुजाण नागरिकांचा बनण्याच्या दिशेने, बदलत जाईल.

हा बदल घडून येण्यासाठी ‘नियम’ या शब्दाशी काडीमोड घेतलेल्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील. ‘सुजाण’पणाची कल्पना मांडताना ‘नियम’ या शब्दाचा वापर फार वेळा केला असे वाटणे साहजिक आहे. आपल्याकडे हा शब्द अल्पपरिचित असल्याचे दिसते. विचारातून आणि पर्यायाने वागण्यातून हा बदल होणे गरजेचे आहे. पुस्तकातून शिकविले जाणारे नागरिकशास्त्र व्यवहारात उतरलेले जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याची पोपटपंची परीक्षेत गुण मिळविण्यापुरती झाली असे म्हणावे लागेल. आजच्या बालकांना शिक्षणापासून सुरूवात करीत ‘सुजाण’ बनविण्याचे काम ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण तयार झाले पाहिजे. विद्यार्थ्याचे खेळ वा कलेतील प्रविण्य जसे विचारात घेतले जाते, तसेच त्याची नागरी वागणुक कशी आहे यालाही तितकेच, किंबहुना जास्त महत्व दिले पाहिजे. अंतर्गत मूल्यमापनात हा घटक समाविष्ट केला पाहिजे. शिक्षण संपवून विद्यार्थी सुजाण नागरिक बनेल व ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या ऊक्तीनुसार अशा मुलांची पिढी सुजाण समाजाचे दर्शन घडवेल. आपला देश समृध्द समजला जाईल. ‘सुजाण बनूया’ हा विचार व्यक्तिगत पातळीवर केला तर समृद्धी देश पातळीवर दिसून येईल.

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

1 Comment on सुजाण नागरिकत्व म्हणजे काय?

  1. अर्थपूर्ण, अनुकरणीय स्फुट!अशांचे संकलन करून पुस्तक प्रकाशित करावेस.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..