नवीन लेखन...

Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग २

जसजसा मी कामात रुळायला लागलो तशी, विशेषत: गोऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवायला जमू लागले. एक गोष्ट इथे मी स्पष्ट नक्की करतो. माझ्या बरोबरचे किंवा माझे वरिष्ठ जेंव्हा, तेंव्हा केंव्हा काम करीत त्यावेळेस, फक्त काम. अगदी प्रियकर/प्रेयसीचा फोन आला तरी जेव्हढ्यास तेव्हढे!! अर्थात, संध्याकाळचे ५.०० वाजले की ऑफिसच्या बाहेर!! इथे एकतर ऑफिस सकाळी ८.०० वाजता सुरु होते, त्यामुळे सगळेच, सकाळी लवकर घर सोडतात. जोहान्सबर्ग इथे तर सकाळी ६ किंवा ६.३० वाजता घर सोडणारे, पुढे या शहरात काम करताना बघितलेले आहे. इथेच माझी एक समजूत पार खोटी ठरली!!
साधारणपणे असे मानण्यात येते, गोरे लोकं अतिशय प्रामाणिक आणि वक्तशीर असतात पण या मताला इथेच छेद मिळाला!! माझा स्टीवन हाच Accountant पैसे खाण्याच्या प्रकरणात पकडला गेला!! त्याचे असे झाले, तो आमच्या ऑफिसची Cash आणि Petty Cash सांभाळायचा. साधारणपणे, तो ५०,००० Cash व्यवहार बघत होता. त्याच्या या कामावर मी तसा देखरेख ठेवत असे, पण मला कधीकधी शंका यायची. एकदा त्याला, मी आणि तो, एकत्र बसून Reconcile करूया, म्हणून सुरवात केली आणि पैशात बरीच गफलत आढळली. तशी, मी त्याच्यावर प्रश्नांची फैर झोडली. लगेच मी स्टीफनला बोलावले आणि त्याच्या समोर स्टीवन कडून कबुली जवाब लिहून घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु फक्त ५,००० Rand (साउथ आफ्रिकन चलन) इतकीच हेराफेरी केली होती. त्याचा पगार त्यापेक्षा जास्त होता!!
लगेच हेड ऑफिसला रिपोर्ट करणे भाग पडले. त्याला पैसे तर भरणे भाग पडलेच परंत्य “या पुढे अशी चूक करणार नाही” असे लिहून द्यायला लागले. इथे असे लिहून देणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पडून घेण्यासारखे आहे. वास्तविक नोकरीच जायची पण, त्याचे त्याच सुमारास लग्न ठरले असल्याने, लिहून देण्यावर भागले!!
या प्रकारानंतर मात्र, मी इथे जम बसवला. तशी माझी वागणूक फार ताठर नसायची. मी, एक नियम केला होता, कामाच्या वेळेत काम, नंतर एकत्र ड्रिंक्स घ्यायला बसायला, मी कधीच हरकत घेतली नाही. डेला आणि बार्बरा मात्र खरच मनमिळाऊ आणि मोकळ्या स्वभावाच्या होत्या, दोघीही सतत स्मोकिंग करणाऱ्या तरीही स्वत:चा आब राखणाऱ्या. मला महिन्यातून दोनदा जोहान्सबर्ग इथे हेड ऑफिसला मिटिंगसाठी जावे लागायचे, कधीकधी डेला देखील माझ्याबरोबर असायची. अर्थात, घरी परतायला उशीर व्हायचा, इतका की Standerton इथे पोहोचेपर्यंत रात्रीचे ८ ते ९ वाजायचे. अर्थात, घरी जाऊन जेवण करणे म्हणजे जीवावरचे दुखणे वाटायचे.
अशा वेळेस, मी आणि डेला, कितीतरी वेळा पबमध्ये जाऊन, ड्रिंक्स घेत असे. त्यात तिला काय किंवा मला काय, काहीच वावगे वाटले नाही. हाच मोकळेपणा मला इथे बहुतेक सगळ्याच गोऱ्या लोकांच्या कुटुंबात आढळला. कधीकधी, स्टीफनच्या घरी जेवायला गेलो असता, त्याची मुलगी/बायको माझ्याशी अतिशय मोकळेपणी वागत असायचे. त्याच्या घरी तर २ वेळा चक्क उशीर झाला म्हणून शनिवारी रात्री झोपलो देखील होतो!!
स्टीवनच्या लग्नात मात्र मला खऱ्याअर्थी गोऱ्या माणसाचे लग्न, अथपासून इथिपर्यंत अनुभवायला मिळाले. कदाचित, मी त्याचा वरिष्ठ असल्याचा परिणाम असेल पण लग्नाच्या आधीपासून २ दिवस,मी त्याच्या बरोबर होतो. चर्चमध्ये जाणे फारसे नवलाचे नव्हते परंतु लग्न बघणे, हा, माझ्या आकर्षणाचा भाग होता. शनिवार दुपारी सगळे मित्र, जवळचे नातेवाईक, इथल्या चर्चमध्ये जमलेंअवर मुलगा, वधू येईपर्यंत आमच्यातच गप्पा मारत होता, तशी चर्चमध्ये फारशी सजावट वगैरे नव्हती. बिशपच्या मागील स्टेजवर ऑर्गन होता, त्यापाठीमागे येशूची मूर्ती. कशी वधू चर्चमध्ये आली, तशी नवऱ्या मुलाने, तिच्या स्वागतार्थ मिठीत घेऊन, ओठांवर ओठ टेकवले आणि त्यासरशी ऑर्गनच्या घनगंभीर सुरांवर प्रार्थना सुरु झाली. संपूर्ण चर्चमध्ये त्या ऑर्गनचे सूर ऐकणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव होता. त्यानंतर पुढे, अर्धा तास, तो बिशप आणि वर/वधू यांच्यात हलक्या सुरात मंत्रोच्चारण आणि शेवटी मान्यतेची ओठांवर मुद्रा उमटवल्यावर टाळ्यांचा गजर.
अगदी थोडक्यात सगळा विधी पार पडला आणि लगेच सगळेजण इथल्या “फाल” या नदीकिनारी असलेल्या अप्रतिम हॉटेलमधील पार्टीला निघाले. (वास्तविक नदीच्या नावाचे स्पेलिंग VAAL असे आहे पण जर्मन, डच आणि इथल्या आफ्रिकान्स भाषेत V चा उच्चार F होतो!!) हॉटेलमध्ये आल्यावर लगेच स्टीवनने Champagne फोडली आणि एकच गजरात “चियर्स” सुरु झाले. लगोलग, नवपरिणीत जोडप्याने Dance Open केला. त्यांचा Round झाल्यानंतर इतर जोडपी त्यांना सामील झाल्या. इथे ड्रिंक्स घेणे, हे चहा पिण्यासारखे असते, त्यातून आज शनिवार रात्र मग काय, नृत्याला उधाण आले तर काय नवल!! मी देखील त्यात सामील झालो. अर्थात Champagne आणि त्यानंतरची स्कॉच घेतल्याचा खरा परिणाम होता.
जसजसे दिवस जायला लागले तशी, जबाबदाऱ्या वाढायला लागल्या, डेपो भेट सुरु करणे भाग होते. डेपो सगळे अति अंतर्भागात असल्याने, जाण्याचे रस्ते मातीचे, दगडाचे आहेत. तिथे मोटार कार नेणे संय्युक्तिक नाही, त्यातून मी तर मुळातला परदेशातला!! त्यामुळे, माझ्याच ऑफिसमधील एक काळा ड्रायवर घेतला आणि निघालो. इथे या visits तशा गुप्त ठेवाव्या लागतात, कारण मी stock checking साठी येत आहे, म्हटल्यावर रिपोर्टनुसार Stock ठेवला जातो. पहिला डेपो, ऑफिसपासून १०० किलोमीटरवर होता. जातानाच लक्षात आले, मी शहरापासून पार दूर जात आहे आणि सगळीकडे राखाडी वातावरण पसरलेले आहे. इथे पहिल्या डेपोत गेलो.
तपासात फार चुका नव्हत्या, तशी मी इथल्या पबकडे मोर्चा वळवला. साधारणपणे पब म्हटल्यावर जे काही चित्र डोळ्यासमोर येते, त्याला संपूर्ण छेद देणारा इथला पब आहे. मी, भारतात गिरगावात करेल वाडीत राहतो आणि तिथे बरेच वर्षे देशी दारूचा गुत्ता चालत होता, त्यामुळे भारतातला गुत्ता तसा माझ्या परिचयाचा होता. इथे त्याचीच आवृत्ती दिसली. अत्यंत गचाळ वातावरण, कितीतरी काळे लोक किळसवाण्या पद्धतीने झिंगत होते, एकाद्या टेबलावर शिळी बियर ग्लासातून टेबलावर पडलेली असल्याने, त्याचा अत्यंत उग्र दर्प येत होता. त्यांचे बोलणे देखील लडबडलेल्या जिभेने ओंगळ स्वरात चाललेले होते. मला तर ५ मिनिटांतच मळमळायला लागले. इतकी वर्षे, पीटरमेरीत्झबर्ग,डर्बन आणि रस्टनबर्ग या शहरात राहिल्यानंतर हा अनुभव मन ढवळणारा होता. कशीबशी कामे  आटोपली आणि तासाभरात बाहेर येउन, स्वच्छ श्वास सोडला!!
नंतर लक्षात आले की इथल्या घरांत अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही!! कारण वीज घेणे परवडत नाही, इतकी हलाखीची परिस्थिती आहे. काही घरांत गेलो असता, याची प्रचीती आली. असे असले तरी आमची बियर घेणे,हे सत्कर्म व्हायलाच हवे आणि या बियर सेवनाला चक्क घरातून हार्दिक पाठींबा!! रोज, साधा ब्रेडचा रोल खायला मिळणे, ही इथे चैन आहे!! चक्क पाण्यातून ब्रेड खाणाऱ्या व्यक्ती, मी प्रत्यक्ष पहिल्या आहेत. मला नेहमी या विषम आर्थिक परिस्थितीचे नवल वाटते. कुठे ती ऐषोआरामाची सन सिटी आणि कुठे इथली भयाण परिस्थिती!!
कसलाच मेळ बसत नव्हता. पुढे जसजशा माझ्या visits वाढायला लागल्या तशी इथल्या श्रीमंती राहणीच्या मागील अस्तर दिसायला लागले. इथल्या झोपड्या सगळ्या चिखलाच्या भिंतीने बांधलेल्या , सिमेंट परवडणे शक्यच नाही!! बरे इथे असे एखादे गाव आहे, अशातला भाग नाही!! अशी गावेच्या गावे याच हलाखीत रहात असतात. अशा परीस्थितीत इथे गुन्हेगारी वाढली तर काय नवल!!
इथे भर दिवसा देखील प्रवेश करणे, म्हणजे मनावर दडपण यायचे. नोकरीचा भाग म्हणून इथे येणे आवश्यक होते. त्यातून, आमची बियर हलक्या प्रतीची असल्याने, शहरात कुठेच बियर विकण्याचा प्रश्नच नव्हता. इथले काळे देखील दिसायला उग्र!! सतत बियर  सेवनाने,तांबारलेले डोळे, त्यातून काळ्यांचा खर्जातील आवाज!! सुरवातीला तर मी फारसा बोलतच नव्हतो. त्यातून, इथले काळे इंग्रजी असे काही बोलायचे की एक शब्द कळेल तर शपथ!! बरेचसे काळे, आफ्रिकान्स भाषा बोलतात, आणि तिथे तर माझी बोंब!! काही आफ्रिकान्स शब्द मी शिकलो तरी शेवटपर्यंत नवशिकाच राहिलो.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..