नवीन लेखन...

वेग..

सावधपण शिकवणारा मित्र

अगदी ४ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. सिग्नल ला गाडीवर पहिल्या रांगेत थांबले होते. हिरवा दिवा लागल्यावर गाडी सुरु करून पुढे गेले. अर्थातच नुकताच pick up घेतल्यामुळे माझा वेग कमीच hota. क्रॉसिंग चे पट्टे ओलांडून पुढे जाते न जाते तो भरदाव वेगाने सिग्नल मोडून बाईक चालवत २ किरकोळ पोट्टी जोरात ओरडत समोरून पुढे आली. जणू काही आपणच बाईकचे जनक आणि पहिल्यांदा या जगात आपणच ती चालवतोय या आविर्भावात ती मुलं ओरडत होती. मी वेळेवर ब्रेक लावला नसता तर अर्थातच काय झालं असतं हे सांगायला नको. बरं माझी चूक नसतानाही त्यांनी मला शिवी घातलेली मला ऐकू आली. मात्र, अत्युच्च दर्जाच्या शिव्या येत असतानाही मी त्या हाणु शकले नाही. भरदाव वेगाने ती पोट्टी पुढे निघून गेली . त्यांचा पाठलाग करण्यातही अर्थ नव्हता. त्यांच्या बाईक च्या स्पीड ला माझी गाडी पळवणं म्हणजे कासवाला घोड्याच्या वेगाने पळ सांगण्यासारखं झालं असतं. काही सेकंद माझं अवसान गळालं, भीती वाटली हे मी कबूल करते. थोडी पुढे येऊन मी माझी दुचाकी थांबवली. दीर्घ श्वास घेतला. आपल्याला काहीही झालेलं नाही असं म्हणत स्वतःलाच धीर दिला. आपण काय काम करायला बाहेर पडलोय याची स्वतःला आठवण करून दिली आणि पुढे निघाले.

वेगाची नशा चढलेले कितीतरी जीव आपल्याला आसपास दिसतात. अलिकडे आलेल्या एका सिनेमात सुद्धा त्यातला नायक हेच म्हणताना दाखवलाय “मुझे रफ्तार पसंद है”..ही रफ्तार..हा वेग , केवळ वाहन चालवण्याचा नाही तर तो आहे आपलं जीवन जगण्याचा. हो, निकष मात्र त्याला वाहन चालवायचेच आहेत बरं का! पण आयुष्य जगण्याच्या नादात याचा विसर पडत नाही ना याचा विचार आपण करायला हवाय खरा.

आयुष्यातली सुखं उपभोगण्यासाठी जणू आपण एकमेकांशी स्पर्धा लावल्यासारखे झपाटले गेलोय. स्पर्धा ही स्वतः स्वतःशी असली पाहिजे हेच विसरलोय आणि या नादात आपण केवळ वेग वाढवत बसलोय. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ यावी लागते, we need to trust the timings of our life… केवळ वेग वाढवला कि सगळं पटकन मिळतं या गैरसमजापायी आयुष्याची धावपट्टी करून घेण्यात कसलं आलंय शहाणपण!

काळ पुढे जायला लागला तशी आपली जीवन शैली बदलली , राहणीमान बदललं. काळाप्रमाणे बदलायला हवं , नवीन गोष्टी स्वीकारायलाहि हव्या हे अगदी खरं. तरी , आपल्याला आयुष्याच्या वेगावर पूर्णपणे आपलं नियंत्रण असायला हवं. मात्र आपण इतरांचं अनुकरण करण्यातच धन्यता मानतोय, ते अजून कुणाचं तरी आणि तेही अजून कुणाचं तरी अनुकरण करतायत.

नाव, पैसा , प्रसिद्धी , प्रमोशन, लग्न, मूल , व्हेकेशन, गाडी, कपडे, घर, या सगळ्याचा दिखावा, हे सगळं वायू वेगाने आपल्याला मिळण्याकरता एक जास्तीचं इंजिनच जणू आपण बसवलंय..मात्र आपण यंत्र नाही आणि रोबो सुद्धा नाही हे आपल्या लक्षातच येत नाही.

गेल्या दीड वर्षाने हेच शिकवायचा प्रयत्न नसेल का केला आपल्याला ? ध्यानी मनी नसताना आपल्या जगण्याला ब्रेक लागलाय..Everybody’s life has gone for a toss to some extent.. निदान आता तरी या वेगाच्या बाबतीत सावध होऊया …गेल्या दीड वर्षाने आपल्या जगण्याचा वेग कमी केला आणि मृत्यू चा वेग मात्र अचानक वाढवला..बळजबरीने आपल्याला आपला वेग कमी करायला भाग पाडलं या काळाने ..

माणसाची स्वतःची बुद्धिमत्ता , आणि सर्व शक्तिमान असण्याचा अहंकार कुठेतरी आड येतोय, काहितरी चुकतंय.. आयुष्य जगताना इतर सगळ्या गोष्टी वायू वेगाने मिळवायच्या आहेत आपल्याला, मृत्यू मात्र वेगाने यायला नकोय… जो जन्मला, त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्या नंतर या उसन्या वेगाचा आणि आपला काहीही संबंध नसणार आहे हे सत्य जाणूनही या वेगाने आपण झपाटलो गेलोय.

वेग वाढवण्याचा काळ आयुष्यात नक्की येतो आणि त्यावेळी तो वाढवताही आला पाहिजे. मात्र कुठे वेग कमी करायचा , आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर वेग स्थिर ठेवायचा आणि आखेर, कुठे थांबायचं…वाहन चालवताना हे सगळे निकष लावून मन स्थिर ठेवून जसं आपण ड्राईव्ह करतो तसंच आयुष्य का ड्राईव्ह करू नये? ‘नजर हटी दुर्घटना घटी’ चं तत्व आयुष्य जगतानाही का अवलंबवू नये..?

याचा अर्थ वेग वाईट नाही ..वाईट काही असेल तर वेगात असताना सावध नसणं ..समर्थ रामदासांच्या चौपदीत प्रभू श्रीरामांकडे एका ओवित ते हेच मागतात. “सावधपण मज दे रे राम”..”

अखंड सावधपण आणि विवेक जपून जसं आपल्या आयुष्याचं नुकसान होणार नाही तसं आपण इतरांच्याही आयुष्याचं नुकसान होऊ देणार नाही.
मला आलेला तो वेगाचा अनुभव त्या दिवशी माझी चूक नसताना माझं नुकसान करून गेला असता..कदाचित थोडंफार सावधपण दाखवल्यानेच वाचू शकले..

सावध होऊया!!!

— गौरी सचिन पावगी

Image courtesy: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..