नवीन लेखन...

स्मृती-विस्मृती

 

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’. आपल्याला एखादी गोष्ट, नाव, शब्द न आठवल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. हे सर्वांच्या बाबतीत घडते. फरक असतो तो विस्मृतीच्या प्रकारांचा व परिणामांचा. याची कारणे अनेक असतात. या स्मृती-विस्मृतीच्या चक्रात नेमक्या कोणत्या क्रिया घडतात ते आता समजू लागले आहे. मेंदूचे गूढ वाढत्या संशोधना बरोबर आणखी वाढत आहे.

स्मृती — स्मृती म्हणजे मज्जापेशींची विशिष्ठ प्रकारे झालेली जोडणी (लेखाच्या शेवटी आकृती बघा). मेंदूच्या विविध भागात स्मृती निर्माण होतात व त्या दृष्य, ध्वनी, शब्द, भावना यांच्याशी निगडित असतात. माहिती साठवणे व नंतर आठवणे यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया ‘स्मृती’ शी निगडित असतात.

स्मृतींचे प्रकारः
1) तात्कालिक स्मृती (Sensory Memory) – पंचेंद्रियांकडून येणार्‍या संवेदना 0.2 ते 0.5 सेकंद राहतात. हे नेणिवेच्या पातळीवर घडते. उदा. डोळ्यांसमोर अर्धा क्षणच असलेली वस्तू पुन्हा आठविणे.

2) अल्पकालीन स्मृती (Working Memory) – केवळ 10 ते 15 सेकंद राहते व यात जास्तीत जास्त 7 घटकांविषयी माहिती उपलब्ध असते. उदा. वाचत वा ऐकत असलेल्या वाक्याचा सुरुवातीचा भाग वाक्य पूर्ण होईपर्यंत लक्षात राहणे.

3) दीर्घकालीन स्मृती (Long Term Memory) – या स्मृतीचे दोन प्रकार असतात. एखाद्या घटकाविषयी `काय’ व `कसे’ (What and How) या प्रश्नांची माहिती यात असते. उदा. गिटार वाजविणे, सायकल चालविणे.

पंचेंद्रियांकडून आलेल्या संवेदना मेंदूत नोंदण्यायोग्य करणे म्हणजे सांकेतन (Encoding). ही पहिली पायरी आहे. यामध्ये मज्जापेशींच्या जोडण्या तयार होतात. काही वेळाने ते जोड घट्ट होतात. काही दिवसांनंतर आवश्यकतेनुसार पेशींची ही घडण `स्मृती’त रूपांतरित होते. एखाद्या घटनेत तयार झालेले जोड किती मजबूत होतात (Consolidation) यावर ती घटना किती लवकर आठवते ते अवलंबून असते. याला स्मृतीची साठवण (Storage) म्हणतात. समोरील वस्तू वा व्यक्ती आधी पाहिली आहे असे वाटणे म्हणजे ओळखणे (Recognition) आणि या वस्तूच्या संदर्भातील इतर तपशील लक्षात येणे म्हणजे `आठवणे’ (Recall). या दोन्ही क्रिया म्हणजे माहितीची पुनःप्राप्ती (Retrieval).

विस्मृती — नोंदणी, साठवण आणि पुनःप्राप्ती यापैकी कोणत्याही पायरीवर गडबड झाली तर ती `विस्मृती’ ठरते. आपल्या स्मृतीला जेव्हा दगा-फटका होतो तेव्हा विस्मृती जाणवते. स्मृतीचे काम सात प्रकारे बिघडू शकते (Memory Malfunction).

पहिले तीन प्रकार योग्य स्मृती साठवलेली असूनही हवी ती गोष्ट न आठवण्याचे आहेत.

1 विसरणे (Transience)

काळाबरोबर स्मृती कमजोर होते अथवा नष्ट होते. अल्झायमर झालेल्या व्यक्तीच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भाग नीट काम करीत नाही त्यामुळे नवीन स्मृती तयार होत नाहीत. जेवणाचे टेबल आवरले की आपले जेवण झाले असल्याचे आठवत नाही. असा स्थितीत HM (पेशंटची आद्द्याक्षरं) ने 50 वर्ष काढली. काही वयोवृध्दांना 50 वर्षापूर्वीचे लख्ख आठवते पण 15 मिनिटांपूर्वी सांगितलेले काम ते विसरतात.

2 दुर्लक्ष होणे (Absent Mindedness)
स्मृती नोंदली जात असताना वा परत मिळवीत असताना लक्ष (ध्यान) विचलित झालेले असते. किल्ल्या हरवणे, कपाळावर वा डोक्यावर सरकवलेला चष्मा शोधणे ही काही उदाहरणे आहेत. अमेरिकेच्या National Memory Champion स्पर्धेतील विजेती तातियाना कूली हिला विचारले गेले, `तुला रोजच्या कामात स्मरणशक्तीचा खुप उपयोग होत असेल ना?’ ती म्हणाली, `मी अतिशय विसरभोळी आहे. बाजारातून आणायच्या वस्तूंची यादी केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही.’ तिने स्पर्धेसाठी स्मरणशक्तीच्या निरनिराळ्या युक्त्या वापरल्या, पण दैनंदिन जीवनात पोस्ट-इट स्टीकर्स वापरते.

3 अडखळणे (Blocking)

भेटलेल्या व्यक्तीचा चेहरा ओळखीचा वाटतो पण त्याचे नाव आठवत नाही, असा अनुभव बहुतेकांना येतो. नावाचे पहिले अक्षर, नावात किती अक्षरे आहेत हे आठवते पण नाव नाही आठवत. स्मृतीत आहे पण ओठांवर आणता येत नाही. याला TOT म्हणतात, ‘It’s on the tip of my tongue’. विशेष नामांचे (जोशी, नागपूर) विस्मरण आधी होऊ लागते. नंतर सामान्यनाम (मांजर, गाडी), विशेषणे (ऊंच, जड), क्रियापदे (धावलो, पडलो) विसरली जाऊ लागतात. या शब्दांपाशी बोलणारा अडखळतो. प्राध्यापक बारटक्के (तरूण तुर्क म्हातारे अर्क या नाटकातील पात्र) यांना वाक्य पहिल्यांदा बोलताना बरेच शब्द `ह’च्या बाराखडीत उच्चारावे लागतात, पण पुन्हा तेच वाक्य बोलताना योग्य शब्द आठवतात. डाव्या बाजूच्या Cerebral Hemisphere ला इजा झालेल्या LS पेशंटला चित्रातील प्राण्याची सर्व माहिती नीट सांगता येत असे पण त्या प्राण्याचे नाव आठवत नसे.

पुढील चार प्रकार स्मृतीच्या सदोष नोंदणीचे आहेत.

4 चुकीची जुळणी (Misattribution)

आठवणीला चुकीच्या स्त्रोताशी जोडल्याने अथवा घटनेला चुकीच्या जागेशी वा वेळेशी जोडल्याने असा गोंधळ होतो. चेहरा ओळखणारी यंत्रणा नवीन व्यक्ती पाहिल्यावर उत्तेजित होते व उगाचच कोणीतरी ओळखीचे वाटू लागते. मेंदूतील Fusiform Gyrus या भागाला इजा झाल्यास प्रसिध्द व्यक्तींचे चेहरेही अनोळखी वाटतात, उदा. आइन्स्टाईन, राजकपूर. रस्त्यात भेटलेल्या देशपांड्यांना `जोशी’ समजणे ही चुकीची जुळणी आहे.

5 सूचनीयता (Suggestibility)

दुसर्‍याच्या सांगण्यावरून तयार झालेली स्मृती. आपल्या मूळ अनुभवात दुसर्‍याचे मत ऐकून बदल केल्यास असे घडते. थोडासा चुकीच्या जुळणीचाच प्रकार. कोर्टात चुकीचा कबुलीजबाब देणे, मग शब्द मागे घेणे. अगदी लहान मुलांच्या शाळा प्रवेशाच्या मुलाखती (Aggressive Interviewing) दरम्यान असे घडू शकते व मुलांच्या स्मृती बिघडू शकतात, हे लक्षात आले आहे.

6 पूर्वग्रह (Bias)

आपल्या आतापर्यंतच्या अनुभवांनुसार स्मृतीत बदल घडवणे अथवा एखाद्या व्यक्ती वा घटनेबाबत पूर्वग्रह दूषित मत व्यक्त करणे. उदा. आपल्याला अनुकूल असे स्पष्टीकरण देणे. परीक्षा किती अवघड होती पण आपण कमी अभ्यास करूनही कसे पास झालो हे सांगताना आपली खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न.

7 सतत आठवणे (Persistence)

युध्द, नैसर्गिक आपत्ती, अत्याचार यामुळे जबर मानसिक धक्का बसलेली व्यक्ती ती घटना विसरण्याचा प्रयत्न करते, पण ते जमत नाही. मेंदूच्या उजव्या Prefrontal Lobe पेक्षा, डाव्या Prefrontal Lobe ला इजा झाल्यास माणूस जास्त निराश होतो. सतत आठवत राहणार्‍या घटना भावनेशी जास्त जोडल्या गेलेल्या असतात. त्यांची उजळणी होत असते. पूर्वायूष्यातील चूक, PTSD (Post Traumatic Stress Disorder) अशी त्यामागची कारणे असतात.

असा आहे हा स्मृती-विस्मृतीचा फेरा. स्मृतीने दिलेला दगा हा दोष न मानता स्मृती सह निघालेले बाय-प्रॉडक्ट मानायचे. स्मृती चांगल्या प्रकारे साठवली  जावी, आठवली जावी असे वाटणे साहजिकच आहे. पण त्याकरिता काही पथ्ये (खाण्याची नव्हे) पाळणे आवश्यक आहे.

1) झोप — झोपेत दिवसभरातल्या घटनांचे स्मृतीत रुपांतर करणे व जोड मजबूत करणे या क्रिया होतात. सात ते नऊ तास झोप शरीर व मेंदूसाठी   आवश्यक असते. याहून कमी झोप म्हणजे या क्रियांशी तडजोड.

2) व्यायाम — नियमित व्यायाम हा शरीर, ह्रदय याबरोबरच झोप व पर्यायाने मेंदूसाठी महत्वाचा आहे.

3) उजळणी — आपण शिकत असलेल्या घटकाची उजळणी होणे (spaced out over time) हे माहिती दृढीकरणासाठी (Consolidation) उपयोगी असते. घोकंपट्टी म्हणजे उजळणी नव्हे.

4) आठवणे — आपल्याला नीट आठवते का याची चाचपणी करणे चांगले. गरज पडल्यास आवश्यक ते बदल करावयास वेळ मिळतो.

5) सांकेतिक खूण — परिचित माहितीशी अथवा शब्दाशी नवी घटना जोडल्यास स्मृती मिळविणे सोपे जाते. कारण ती मिळवण्यासाठी एकापेक्षा अधीक मार्ग उपलब्ध असतात.

6) लक्ष देणे — एखादी नवीन गोष्ट शिकताना नीट लक्ष दिले तर दीर्घकालीन स्मृती निर्माण होण्यास मदत होते. अनावश्यक घटनांमध्ये फार लक्ष घालू नये.

आजच्या माहितीच्या महापुरात `आपल्याला काय हवे आहे’ यावी स्पष्ट कल्पना असणे गरजेचे आहे. नपेक्षा अनावश्यक माहिती लुडबुड करणारी ठरते. मान्य आहे की आपल्या मेंदूची क्षमता अमर्याद आहे, पण म्हणून उगाचच मानसिक तणाव निर्माण करणे शहाणपणाचे नाही.

— रविंद्रनाथ गांगल 

Reference: ‘How the mind forgets and remembers’ by Daniel Schacter, Harward University.

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 32 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

2 Comments on स्मृती-विस्मृती

  1. अतिशय सुंदर लेख. नेटकी आणि मुद्देसूद मांडणी.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..