नवीन लेखन...

सितारा

ठरल्याप्रमाणे मी आणि ठाकूर, आम्ही बलसाडला पोहोचलो. प्रथम दर्शनी हे छोटेसे टुमदार, निसर्ग सौंदर्याने भरपूर नटलेले गाव माझ्या नजरेत भरले. परन्तु जिथे नजर फिरवा तिथे भारतीय रेल्वेचे कसले ना कसले ऑफिस, कॉलनी, तालीमशळा, रेल्वेफोर्स. मी ठाकुरना विचारले” हा काय प्रकार आहे?” ते म्हणाले, अर्ध्यापेक्षा जास्त गावाच्या भागात रेल्वेचेच अस्तित्व आहे.” आम्ही प्रथम शाळेतच पोहोचलो. मुख्याध्यापकांची भेट घेतली. चहापाणी झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व शाळा दाखविली. शाळा व तिचे आवार अतिशय स्वच्छ व सुंदर होते. शाळेतील मुलेदेखील व्यवस्थित व शिस्तबद्ध होती. नंतर त्यांनी हळूहळू एक-एक शिक्षकाची ओळख करून द्यायला सुरवात केली.

मी त्यांना सुचवले, “असे एक एक व्यक्तीला बोलवत बसण्यापेक्षा तुम्ही उद्या स्टाफरूम मध्येच एक मिटिंग बोलवा. त्यामध्ये प्रत्येकाबद्दल थोडी थोडी माहिती द्या. परन्तु त्यांना आम्ही कशासाठी इथे आलो आहोत ह्याची मात्र कल्पना देऊ नका. असे सांगण्यामागचा माझा हेतू इतकाच होता की साधारणपणे स्टाफ बरोबरच समोरासमोर आला की त्यांच्या आपापसातील वागण्यावरून थोडासा तर्क बांधता येतो की कोणाची चूक असावी? कोणाच्या बोलण्यात किती तथ्य आहे? साधारणपणे दोषी व्यक्ती चारचौघात वर मान करून बोलत नाही असा आजपर्यंतच्या अनुभवावरून काढलेला एक निष्कर्ष आहे. आणि अशा गोष्टीमागचा सूत्रधार शोधून काढण्यास मदत होते. ह्या वरती आमच्या सगळ्यांचे एकमत झाले. त्या रात्री इनामदारांच्या घरीच जेवणासाठी गेलो होतो. तेंव्हा त्यांनी आम्हाला जी कहाणी सांगितली ती थोडीशी मन विचलित करणारी होती.

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांचा जवळजवळ ७०% शिक्षक वर्ग हा २५-३० वर्षे नौकरीचा अनुभव असलेला होता. अर्थात ही सगळी मंडळी वयाने देखील मोठीच होती. वाढत्या वयामुळे त्यांचे पुढचे प्रमोशन वगैरे गोष्टीसाठी त्यांच्याकडे मर्यादित काळ शिल्लक होता. त्यामुळे ईर्षा, स्पर्धा, भेदभाव सारख्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात निर्माण झालेल्या होत्या. वयोमानाप्रमाणे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली होती. शिवाय गेल्या ८-१० वर्षात तांत्रिक क्षेत्रात जी काही प्रगती झाली होती, त्या प्रगतीबरोबर त्यांनी स्वतःला सक्षम करून घेतले नव्हते. त्याचा परिणाम स्वरूप त्यांची शिक्षण पद्धती जुनीच राहिली होती. अर्थात ह्याला एकदोन अपवाद होते. परन्तु ह्या सर्व गोष्टींमुळे नवीन कार्यक्षम व्यक्तीला यशाच्या शिडीवर चढताना पाहणे त्यांना सहजासहजी शक्य होत नव्हते.

ते सांगत होते, अलीकडे विद्यार्थी देखील इतके हुशार झाले आहेत की त्यांना ह्या नवीन तंत्रज्ञानाची आमच्यापेक्षा अधिक माहिती असते. कुठलीही माहिती ते ‘गुगल’ वरून शोधतात. त्यामुळे शिक्षकांना ह्या आधुनिक तांत्रिक क्षेत्रातील बदलांबरोबर धावत रहाणे अत्यावश्यक झाले आहे. आणि हे जुन्या पठडीतील शिक्षक स्वतःला बदलण्यास तयार नाहीत. नवा शिक्षक वर्ग आहे तो ह्या आधुनिकतेला स्वीकारून चालला आहे. त्यांचे शिक्षण देखील नवीन बदललेल्या पाठ्यक्रमातून झालेले आहे. आणि ते वयाने लहान आहेत. नवीनच नोकरीत लागल्यामुळे त्यांच्यात कष्ट करण्याची क्षमता देखील जास्त आहे. एक जिद्द असते त्यांच्यात. आणि विद्यार्थ्यांना देखील काळाप्रमाणे चालणारे शिक्षक जास्त आवडतात. थोडक्यात दोन पिढ्यांमद्धे जे अंतर निर्माण होते ते या शाळेतील शिक्षक वर्गात झाले होते.

त्या नवीन शिक्षकांमधील ही एक ‘सितारा मिर्झा’ नावाची शिक्षिका होती. इनामदार सांगत होते, ती M.Sc M Ed. झालेली होती. गेल्या तीन वर्षापासून ह्या शाळेत शिक्षिका म्हणून नौकरी करत होती. त्यांच्या माहितीनुसार तिने स्वतःला ह्या पेशात झोकून दिले होते. वरच्या वर्गांना ती गणित व शास्त्र शिकवीत होती. शाळेत नोकरीला लागल्यापासून शाळेतील मुलांना खूप मार्क्स मिळावेत म्हणून ती पराकाष्ठा करत होती. ह्या ग्रामीण भागात मुलांना tuition class वगैरेची सोय नसल्यामुळे ती शाळेच्या वेळेपूर्वी यायची व शाळेच्या वेळेनंतर थांबायची आणि शाळेच्या corridor मध्येच मुलांना विनामूल्य शिकवत होती. ह्याच्या परिणामस्वरूप मागील दोन वर्षाचा शाळेचा निकाल बोर्डाच्या परीक्षेत खूपच उत्तम लागला होता. विनामूल्य शिक्षण मिळत असल्यामुळे सर्व मुलांना त्याचा फायदा होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही शिक्षिका खूपच प्रिय झाली होती. मुख्याध्यापक इनामदारांनी हे सर्व लक्षात घेऊन तिला यंदा एकच सवलत जास्त दिली होती; की हे विनामूल्य वर्ग घेण्यासाठी तिला एका वर्गाची सोय करून दिली. तिथे लाईट व पंखे ह्यांची सोय होईल आणि एक चपरासी थोडा उशिरापर्यंत थांबून तो वर्ग व लाईट बंद करेल. बस ह्यामुळेच हा सगळा बखेडा तांडव निर्माण झाला होता. ‘एका शिक्षिकेला ह्या सवलती का दिल्या? ती परधर्मीय असल्यामुळे तिला favor करण्यांत येत आहे’ वगैरे.

तिच्या शिकविण्यामुळे मुलांचा फायदा होत होता, ह्या कारणाने इनामदारांनी त्यांच्या ह्या तक्रारींकडे काना डोळा केला होता. शाळा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे मुलांना शाळेतच लवकर येणे किंवा उशिरापर्यंत थांबणे सोयीस्कर होत होते. काही शिक्षकांनी ह्यावरून तिला बराच मानसिक त्रासही दिला. दुपारी मधल्या सुट्टीत teacher’s room मध्ये सर्वांसमोर तिला घालून पाडून बोलणे, तिची निंदा करणे असले उद्योग देखील केले. नंतर काय तर म्हणे ही मुलांकडून गुपचूप फी घेते आणि विनामूल्य शिकवीत असल्याचा उगाचच डांगोरा पिटते, अशी अफवाही उठविली होती. ह्या त्यांच्या वर्तणुकीकडे मुख्याध्यापकांनी लक्षही दिले नाही व तिनेही लक्ष दिले नव्हते. ती आपले काम गुपचूप करत होती. तेंव्हा ह्या तिच्या विरोधी लोकांनी शेवटी नवीन गोष्ट उठवली होती; की हिची वर्तणूक चांगली नाही, गावातील कोणीपण शिक्षिकेला भेटण्याचा बहाणा करून, नको असलेली वाईट मंडळी शाळेत येतात. शाळेतील मुलांच्या मनावर ह्याचा वाईट परिणाम होतो वगैरे. कसे असते, तरणी ताठी मुलगी दिसली की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे सोपे असते. कहर तर हा होता की तिच्या विरोधकांनी अशा आशयाचा लेखी अर्ज केला होता. आणि त्यामुळे काहीतरी तपास करणे अनिवार्य होऊन बसले होते.

इनामदारांना खात्री होती की ही शिक्षिका अशी नाही. ती अतिशय सज्जन आणि कर्तव्यदक्ष आहे. त्यांनी तसे त्या अर्जदारांना बोलावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते काही मानायला तयार नव्हते. त्यांचे एकच पालुपद होते ह्या मुलीविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. हिला बडतर्फ करा. खरे तर त्यांना तिचा होणारा उत्कर्ष बघवत नव्हता. सर्व पालक या विद्यार्थी तिच्याशी अतिशय आदराने वागत होते हे त्यांना सहन होत नव्हते हे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले होते. परंतु त्यांचेही हात कायद्यानि बांधले होते. त्यांनी ह्याचा शहानिशा करण्याचे ठरविले . कोणाच्या चारित्र्यावर असे खोटे आरोप करणे त्यांना पटत नव्हते. त्यामुळे कदाचित तिच्या पुढील आयुष्यात तिची पिछेहाट होण्याची शक्यता होती. ह्या शिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यात गंभिर प्रश्न उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तिचे असे नुकसान होऊ नये असा विचार करून त्यांनी आम्हाला inquiry साठी बोलावून घेतले होते. ह्या सर्व प्रकारानंतर मात्र तिने मुलांना जास्तीचे शिकवणे बंद केले होते असेही त्यांनी आम्हाला सांगितले.

किती विचित्र प्रकार होता की शिक्षक जो नवीन पिढीला मार्गदर्शन करतो. सत्याचे धडे देतो, अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रेरित करतो त्या शिक्षकानेच स्वतःच्या स्वार्थासाठी असत्याच्या मार्गावर चालायचे? दुसऱ्यावर अन्याय करायचा? हे शिक्षक मुलांना काय शिकविणार? शिक्षकाने इतक्या नीचस्तरावर जाणे हे संपूर्ण शिक्षक जातीला लांछन लावणारे होते.हे सगळे ऐकून मन क्रोधित झाले होते. असे कुटाळ कारस्थान रचणाऱ्या माणसांना ताबडतोब बडतर्फ करावे असे वाटत होते परंतु हे ताबडतोब करणे शक्य नव्हते. त्यामुळे चौकशी ही करायला लागणारच होती. आणि सत्य शोधून काढल्यानंतरच पुढे जाता येणार होते.
अतिशय संयमाने पुढील कार्यवाही करण्याचे आम्ही ठरवले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..