नवीन लेखन...

सर एडमंड हिलरी

सर एडमंड हिलरी यांचा जन्म २० जुलै १९१९ न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात झाला.

सर एडमंड हिलरी हे निग्रही वृत्तीचे मूर्तिमंत रूप होते. या वृत्तीमुळेच ते त्रिखंडामध्ये कीर्ती मिळेल असा पराक्रम करू शकले. एडमंड हिलरींचे कुटुंब मूळचे इंग्लंडच्या यॉर्कशायर परगण्यातील. एडमंड यांचे आजोबा न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झाले. तिथेच एडमंड यांचा जन्म झाला. शाळा घरापासून लांब होती आणि त्यामुळे बसनेच जायला लागत असे. या काळात बरोबरच्या मुलांशी गप्पा माराव्यात, शाळेतल्या गमती सांगाव्यात, थोड्या खोड्या काढाव्यात असे करणे एडमंड यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. एकट्यानेच राहून स्वप्नरंजनात रमणा-या एडमंड यांचे कल्पनाविश्व त्यावेळीही धाडसी घटनांनी भरलेले होते. भविष्यात हे स्वप्नरंजन प्रत्यक्षात उतरणार आहे, हे एडमंड यांनाही वाटले नसेल. परंतु शालेय जीवनातच त्याची झलक दिसू लागली होती. त्याच काळात त्यांनी पहिल्यांदा बर्फाने आच्छादलेला पर्वत पाहिला आणि ते त्याकडे आकर्षिले गेले. लांबून अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसणारे निसर्गाचे रूप प्रत्यक्षामध्ये विलक्षण उग्र असते, याची त्यांना जाणीव नव्हती. परंतु ‘जे भव्य ते बघुनिया मज वेड लागे। गाणे स्वयेचि मग मनात होय जागे’ असेच त्यांच्याबाबत घडले. त्या हिमाच्छादित पर्वतशिखरांनी घातलेली साद त्यांच्या अंतर्मनाला जाऊन भिडली. त्यांचे पर्वतारोहणाचे वेड वाढत गेले. त्यामुळेच त्यांनी आल्प्समधील माऊंट ऑलव्हरवर जाण्यात यश मिळविले. दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांनी हवाई दलात काम केले. परंतु युद्ध संपताच ते पुन्हा गिर्यारोहणातच रमले आणि १९४७ मध्येच माऊंट कूक पर्वतशिखर त्यांनी सर केले. पुढे ते एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये दाखल झाले.

हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. हिलरी यांच्यापूर्वी असे लोक होतेच. त्यांनीही हिमालयाला धडका दिल्या होत्या. परंतु तिथली हिमवादळे, फसवा निसर्ग, डोळे फिरविणार्‍या दर्‍या आणि दमछाक करायला लावणारे चढ यांनी त्यांना पराभूत केले. हा सारा इतिहास माहीत असतानाही हिलरी एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये सामील झाले आणि शेर्पा तेनझिंग नोर्गेसह एव्हरेस्टवर पाऊल ठेवून त्यांनी एक नवीन पर्व सुरू केले. शिखरावर ते पंधराच मिनिटे थांबले होते. पण त्या काळात त्यांनी साक्षात आकाशदेवतेची आणि विश्वदेवतेची भेट घेतली. ती घेताना त्यांनी मनोनिग्रहाच्या बळावर काय करता येते, हे दाखवून दिले.

असे यश मिळविण्यासाठी अफाट शारीरिक क्षमतेला मनाच्या चिवटपणाची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि विलक्षण दृढ निश्चयाची जोड असावी लागते, हेच त्यांनी अधोरेखित केले. हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये या सा-याच गोष्टींचा सुंदर मिलाफ झालेला होता. असे अद्भुत रसायन असलेली माणसे कधीही स्वस्थ बसून राहत नाहीत. हिलरीसुद्धा असे गप्प राहिले नाहीत.

एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यावर त्यांना सर ही पदवी मिळाली. कौतुकाचा वर्षाव झाला. उदंड कीर्ती मिळाली. पण त्यांच्यावर निसर्गाने केलेले गारुड जराही ओसरले नाही. उलट पुन: पुन्हा ते निसर्गाच्या विविध आविष्कारांचा वेध घेतच राहिले. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील हिमही त्यांना साद घालत होते आणि त्याला प्रतिसाद देण्याइतकी तरलता एडमंड हिलरी नावाच्या हिमपुत्राकडे होती. त्यामुळे दोनही ध्रुवांवर ते गेले. गंगा नदीच्या मुखापासून ते उगमापर्यंतचा प्रवासही त्यांनी केला. या सा-या विविधांगी प्रवासात त्यांना निसर्गाच्या घडलेल्या विराट दर्शनाने त्यांच्या मनाची ऋजुता कायम ठेवण्यासच मदत केली. त्यामुळेच त्यांनी शेर्पांसाठी शाळा काढल्या. हॉस्पिटले काढली. हिमालयाच्या आधाराने जगणाऱ्या या लोकांना हिमपुत्रांनी अखेरपर्यंत साथ दिली.

सर एडमंड हिलरी यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2458 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..