श्रीदेवी, पद्मश्री आणि तिरंगा..

श्रीदेवीचा दुबईत अपघाती मृत्यू झाला आणि ती बातमी आपल्या रिकामटेकड्या लोकांच्या देशात एकदम महत्वाची झाली. क्षणात आपल्या सर्व वैयक्तिक आणि राष्ट्रीय समस्या शुल्लक झाल्या आणि तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असावं, याची चर्चा करणं राष्ट्रीय महत्वाचं झालं. टिव्हीवाले Barking News म्हणून जोरजोरात भुंकू लागले आणि आपण खुळे त्या अर्धवट समालोचकाचं कोणतही आगापिछा नसलेलं म्हणणं ऐकून आपापली लाॅजिक लढवत बसलो. दुबई पोलिसांचा अहवाल यायची वाटही कुणी पाहिली नाही.

यथावकाश श्रीदेवीच्या मृत्यूचा अहवाल दुबई पोलीसांनी दिला आणि त्यात अपघाती मृत्यू हे कारण दिलं. पुढे तीचं कलेवर मुंबईत आणलं आणि श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. आणि आता चर्चा सुरु झाली, की तिला तिरंग्यात लपेटून का नेलं याची..

श्रीदेवीला ‘पद्मश्री’ पुरस्काराने सम्मानीत केल आणि तिरंग्यात लपेटून शव नेणं आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं हा सन्मान त्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचा किंवा पदवीचा होता, श्रीदेवीचा नाही, हे माझ्यासहीत आपण सारे विसरतोय. असं असलं तरीही विरगती प्राप्त झालेला वास्तवातला सैनिक आणि पडद्यावरचं खोटं जीवन जगणारी श्रीदेवी एकाच प्रकारे सरणावर जातात, तेव्हा ते मलाही बघवत नाही हे खरंय..इथं खरा प्रश्न, श्रीदेवी किंवा तत्सम सिनेकलाकारांना पद्म किंवा कोणत्याही नागरी पुरस्काराने सन्मानित करणं कितपत योग्य आहे, हा पडला पाहिजे..

आपल्याकडे कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रिडा, चिकित्सा, समाज सेवा आणि सार्वजनिक जीवनात भरीव काम केलेल्यांना पुरस्कार द्यावेत असा संकेत आहे. श्रीदेवीपुरतं बोलायचं झालं, तर श्रीदेवी ‘कला’ या क्षेत्रात मोडते. पुढे प्रश्न उभा राहातो, की मग तीने कला क्षेत्रात कोणतं भरीव योगदान दिलं हा आणि तीच्या योगदानामुळे कला क्षेत्राला अशी कोणती कलाटणी मिळाली हा.

श्रीदेवी इतर कोणत्याही अभिनेता-अभिनेत्रीप्रमाणे चित्रपटांमधे काम करत होती. प्रत्येकजण आपल्या पोटासाठी काम करताना आपापल्या कुवतीनुसार कामाचं क्षेत्र निवडतो. श्रीदेवीने चित्रपट क्षेत्र निवडून त्यात काम करण्याचा निर्णय घेतला. पैसे घेऊन स्वत:साठीच काम करणं हे मला तरी पुरस्कार मिळवण्याइतपत मोठं काम वाटत नाही. त्यामुळे देश फार पुढे गेला किंवा समाज घडला असंही म्हणता येत नाही. श्रीदेवीचे सर्वच चित्रपट काही मी पाहिलेले नाहीत, परंतू तिने तिच्या चित्रपटातून काही सामाजिक संदेश दिला, तिचे चित्रपट पाहून समाजाच्या विचारात अमुलाग्र आणि चांगला बदल घडला किंवा समाजासमोर एक आदर्श ठेवला असंही कुठे ऐकीवात नाही. तिने स्वत:साठी चित्रपटात कामं केली, स्वत:साठी पैसा कमावला, त्यातून तिने काही लोकांना मदतही केली असेल, तरीही तिला पुरस्कार का मिळावा, हा प्रश्न उरतोच..
आपणं सामान्य माणसंही स्वत:साठी काम करुन पैसे मिळवत असतो, आपणंही समाजाला यथाशक्ती मदत करत असतो. काम आणि त्यासाठी मिळणारा मोबदला याचं प्रमाण सोडलं तर आपल्यात आणि श्रीदेवीत काहीच फरक नाही. या निकषांवर तर देशातला प्रत्येक माणूस पुरस्कारासाठी पात्र ठरतो..उलट आपण सारे जास्त पात्र ठरतो, कारण आपण आपल्या वाटेला आलेलं कायदेशीर काम इमाने इतबारे करुन आपला देश पुढे नेण्यास हातभार लावत असतो..
श्रीदेवी हे एक उदाहरण म्हणून घ्यावं. ढोबळ मानानं बोलायचं, तर चित्रपटात काम करणारांना पद्म वा तत्सम सरकारी नागरी पुरस्कार मिळणं हे मला माझ्या तर्काच्या कसोटीवर पटत नाही. चित्रपटात काम करणं, लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यासाठी करोडो रुपयांचं मानधन, नव्हे, मोबदला घेणं ही नागरी पुरस्कारासाठीची कसोटी कशी काय होऊ शकते, हा मला पडलेला प्रश्न.

चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज असतीलही, की ज्यांनी देशाचं नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं असेल. त्यांचं उभं आयुष्य त्यांनी चित्रपट कलेसाठी वेचलं असेल. आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश दिला असेल, चित्रपटांच्या माध्यमातून देशातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्यास हातभार लावला असेल अशांना एकवेळ पद्मपुरस्कार मिळणं समजू शकतं..पण जे कलाकार केवळ पोटासाठी बाजारू चित्रपटांतून काम करतात त्यांनाही हा पुरस्कार मिळणं, त्या पुरस्काराचा सन्मान म्हणून त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामात पार पाडणं हे मला तरी समजण्याच्या पलिकडे आहे..अर्थात यात अनेकांची अनेक मतं असू शकतात आणि तशी असायलाही हवीत. मी माझं मत(कुणीही न विचारता) मांडलं. इतरांच्या मताचंही स्वागत आहे.

खरं तर देशात समाजोन्नतीसाठी तळागाळात काम करणारे कितीतरी लोक सापडतील. असे लोक कोणत्याही प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. प्रसंगी स्वत:च्या खिशाला खार लावून कामं करत असतात. प्रत्येक क्षेत्रात असं काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. नागरी पुरस्कार अशा व्यक्तींना दिले जावेत. असे पुरस्कार अशा व्यक्तींना दिल्यास त्यांचं कार्य इतरांना उदाहरण म्हणून किंवा इतरांना तशाच प्रकारचं काम करण्यास स्फुर्ती मिळावी म्हणून समाजासमोर आणल्यासारखं होईल.
पण असं होणार नाही. कारण हल्ली सरकारी असोत वा गैरसरकारी, पुरस्कार कसे मॅनेज केले जातात हे सर्वांनाच माहित आहे. म्हणून तर अलीकडे पद्म पुरस्कार आणि ते दिलेल्या व्यक्तींच्या पात्रतेविषयी असलेले मतभेद त्या दरम्यान समोर येतात. हे मतभेद सर्वच क्षेत्रातील पुरस्कारासाठी असतात हे विशेष आणि यामागचं कारण हे पुरस्कार कुणास कसे मिळवून द्यावेत किंवा कुणास कसे मिळू देऊ नयेत, यासाठी प्रत्येक क्षेत्रात चालत असलेलं लाॅबीईंग. हे आपल्याकडेच घडतं असं नाही, तर जगभरातल्या नोबेल, पुलित्झर किंवा बुकरसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांसाठीही लाॅबीईंग होत असतं. या पार्श्वभुमीवर भ्रष्टाचारात बराच वरचा क्रमांक असलेल्या आपल्या देशात काय काय घडामोडी घडत असतील किंवा घडवून आणल्या जात असतील याची कल्पना करुन बघा. मग असे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या पात्रतेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहायला नको खरं तर..समाजासाठी खऱ्या अर्थाने खस्ता खाणाऱ्या लोकांसाठी कोण लाॅबीईंग करणार, त्यांच्याकडे ना चेहेरा ना पैसा..
परवा श्रीदेवीच्या पार्थीवावर लपटलेला तिरंगा मला तरी असे पुरस्कार देण्यामागचं गुपीत झाकणारा वाटला..तिरंग्याआड लपवलेल्या पद्म पुरस्काराच्या त्या उघड गुपीताला सरकारी कडक सलामीही दिली गेलेली पाहीली आणि वाईट तिथेच वाटलं..

-©️नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 315 लेख
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…