नवीन लेखन...

श्री हनुमान जन्मकथा

श्री हनुमान जन्मकथा

वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया
न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १
रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता
अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २
शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा
भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३
शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत
शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४
हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता
चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५
अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी
रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६
प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला
लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७
भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार
असेल नर अथवा वानर कुणासही पावत असे ८
अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती
आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९
अंजनी होती वानरी इच्छा ती करी
तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १०
शिवाचे मोठेपण वाटते भोळेपण
परी भक्तास जाई शरण हिच शक्ती भक्तिची ११
तपांत असते शक्ती तेथे पाहीजे अंतरीक भक्ति
सामान्यास जाणिव न येती खऱ्या भक्तीची १२
भक्तीची शक्ती प्रभूला खेचती
हीच त्याची महती समजोन घ्यावी १३
प्रल्हाद नि ध्रुव बालक वाकवितीं विश्वचालक
तैसे अंजनी वानरी एक मिळवी तपशक्ती १४
जेव्हां भक्त घाली सांकडे उपाय नसतो प्रभुकडे
कसे टिकेल भक्तापूढें प्रत्यक्ष परमेश्वर १५
दुजा मार्ग नसे इच्छा भक्ताची असे
संतुष्टकरावे कसे काळजी ह्याची प्रभुला १६
हनुमंत म्हणून तुझ्या उदरीं येईन
राम सेवा करीन शिव बोले १७

अयोध्येचा राजा दशरथ राहता विना अपत्य
दुःख त्यासी होत संततीसाठी १८
उपदेश वशिष्ठ ऋषींचा पुत्र कामेष्ठी यक्ज्ञाचा
प्रसाद मिळेल पुत्राचा यज्ञदेवते कडून १९
यज्ञ केला महान जमवून ऋषीगण
द्रव्याचे केले हवन यज्ञामध्ये २०
पाहून दशरथ भक्ति यज्ञदेवता संतुष्टती
पवित्र पायस देती दशरथासी २१
प्रसादाचे भाग करावे राण्यास वाटून द्यावे
पुत्रवती व्हावे यज्ञदेवता आशिर्वादली २२
समभाग करीत असतां अघटीत घटना घडता
आकाशातूनी घार येता एक भाग उचलून नेई २३
धरुन एका भाग घार उडाली आकाशी
झेप घेता नभाशीं भाग निसटला चोंचीतूनी २४
अंजीनी वानरी बसली पर्वत शिखरीं
प्रभूचे भजन करी दोन्ही हात पसरोनी २५
बघत होती वायुदेवता प्रसन्न अंजनीवर होता
प्रसाद तिच्या पडण्या हाता मदत करी २६
प्रसादाचा भाग पडला अंजनीचे हाती मिळाला
आनंदे स्विकारी त्याला प्रभूचा प्रसाद समजोनी २७
वायुपुत्र संबोधती वायुची चपळता मिळती
मुर्तिमंत असे ती शक्ति पवन पुत्र हनुमान २८
चैत्रशुद्ध पोर्णिमेला हनुमंताचा जन्म झाला
शिव ह्या जगती अवतरला अंजनीचे उदरीं २९
बजरंगबली मारुती सगुणरुप हीच शक्ती
ह्या विश्वात अवतरती अंजनी पुत्र बनोनी ३०
सूर्वोदयाचे समयीं मारुतीचा जन्म होई
बाळ सुर्याकडे पाही आश्चर्याने ३१
उगवत्या सुर्याची लाली फळा प्रमाणी भासली
भूक हनुमानास लागली झेप घेई सुर्याकडे ३२
मारुती म्हणजे शक्ति शिवाचे रुप असती
झलक त्याची दिसती जन्माताक्षणीं ३३
असून लहान मुर्ती प्रचंड त्याची शक्ति
सुर्याकडे झेपावती मिलण्या त्यासी ३४
इंद्र गेला घाबरुनी हनुमानाची झेप पाहूनी
संकटात सुर्यासी बघूनी काळजी पडली विश्वाची ३५

इंद्राची सत्ता देवांवरी राज्य त्याचे विश्वावरी
देवांची तो काळजी करी विश्व चालणेसाठी ३६
राहू केतू शनी यम वरुण अग्नि
टाकीले सर्वासी हरवूनी हनुमंतानी ३७
बघूनी हनुमंताची झेप इंद्रस होई कोप
रागाने आला संताप वज्र टाकिले मारुतीवर ३८
इंद्रवज्र कठीण शक्ति त्याची महान
नष्ट होई तो लागून इंद्र फेकता ज्याचेवरी ३९
दोन शक्तींची टक्कर मात करी एकमेकांवर
वज्रघात होतां हनूवटीवर मुच्छित झाला मारुती. ४०
मारुतीस मूर्च्छित बघोनी वायु आला धाऊनी
प्राण शक्ति त्यास देऊनी सावध केले ४१
इंद्रास प्रश्न पडला बघून अपूर्व बालशक्तीला
काय असावी प्रभू लीला कळेना कुणा ४२
ब्रह्मा प्रकट होऊनी सर्व देवासंगे जमूनी
सांगू लागले समजावूनी हनुमंताविषयी ४३
हनुमंत आहे रुप प्रभूचे शिवाचे शिवशक्तीचे
करील कार्य सेवेचे श्रीरामाच्या ४४
देवांनी आशिर्वाद दिले सर्वामध्ये श्रेष्ठ ठरविले
शक्ति बुद्धीची देवता संबोधीले मारुतीस ४५
प्रभूरामाची करावी सेवा मनामध्यें भक्तीचा ठेवा
प्रभूचरणी लीन व्हावा हेच दाखविले जगांते ४६
प्रत्येक गांवाच्या वेशीवर मारुतीचे असते मंदीर
आनंदी गांव असणार हनुमंताचे कृपे ४७
पूजन करावे मारुतीचे भजन स्तोत्र म्हणूनी त्याचे
वाहूनी पुष्प पत्र रुईचे तेल अर्पण करावे ४८
प्रत्येक शनिवारीं जावे प्रभूचे मंदीरी
जमल्यास रोज करी दर्शन मारुतीचे ४९
जेवढी कराल प्रभूभक्ती मिळेल बुद्धी नि शक्ती
यश तुम्हां प्राप्त होती मारुतीच्या आशिर्वादें ५०

// शुभं भवतु //

डॉ. भगवान नागापूरकर
६- ०३११८३

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..