नवीन लेखन...

श्रीगंगाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. ते ज्येष्ठ शु. दशमी (गंगा दशहरा दशमी) या दिवशी वाचण्याची पद्धत असून त्यामुळे पूर्वीच्या दहा जन्मातील दहा प्रकारची पापे (तीन कायिक,चार वाचिक व तीन मानसिक) नष्ट होतात असा भाविकांमध्ये विश्वास आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे.

हे स्तोत्र वाचताना जगन्नाथ पंडिताच्या ‘गंगालहरी’ या काव्याची प्रकर्षाने आठवण होते. तथापि त्या काव्यात भक्तिरसाबरोबरच कवीच्या मनात दाटलेल्या नैराश्याचीही पदोपदी जाणीव होते.

या अष्टकात मालिनी (न न म य य), शार्दूलविक्रीडित (म स ज स त त ग), स्रग्धरा (म र भ न य य य), शिखरिणी (य म न स भा ल ग) अशा विविध वृत्तांचा वापर केला आहे.


भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं
विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि ।
सकलकलुषभंगे स्वर्गसोपानगंगे
तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद ॥ १॥

मराठी- हे देवी केवळ (तुझे) पाणी पिऊन ज्याच्या भौतिक इच्छांची लालसा नाहीशी झाली आहे असा मी तुझ्या काठावर श्रीकृष्णाची आराधना करत बसलो आहे. सर्व पापांचा नाश करणार्‍या  आणि स्वर्गाची शिडी असणाऱ्या, जिच्या लाटा खूप पसरतात अशा गंगे माझ्यावर कृपा कर.

बसुन तव तटी मी फक्त पाणी पिऊनी
हरि भजन करीतो लालसा त्या त्यजूनी  ।  
पसरत बहु लाटा नाशिती दुष्कृतींना
अमरपुर  शिडी  तू,  दे  कृपालोभ दाना ॥ १  


भगवति भवलीलामौलिमाले तवाम्भः
कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति ।
अमरनगरनारीचामरग्राहिणीनां
विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ॥ २॥

मराठी- भगवान शंकराच्या शिरावर माळेप्रमाणे शोभणार्‍या हे देवी, जे जीव तुझ्या पाण्याच्या कणालाही स्पर्श करतात, त्यांची कलियुगातील पातकांची भीती नष्ट होऊन ते हाती चामर घेतलेल्या स्वर्गीय स्त्रियांच्या (अप्सरांच्या) मांडीवर लोळतात.

सर जणु हर माथा, ओघ हा शोभताहे
कणभर जळ स्पर्शे भीतिही संपताहे ।
कलियुग अघ संपे, संग स्वर्गीय नारी
धरून चवर हाती, जीव संतुष्ट भारी ॥ २


ब्रह्माण्डं खंडयन्ती हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ती
स्वर्लोकादापतन्ती कनकगिरिगुहागण्डशैलात्स्खलन्ती ।
क्षोणीपृष्ठे  लुठन्ती दुरितचयचमूनिंर्भरं भर्त्सयन्ती
पाथोधिं पूरयन्ती सुरनगरसरित्पावनी नः पुनातु ॥ ३॥

मराठी- या विश्वरूपी सृष्टीला जी भेदते, शंकराच्या मस्तकावरील जटारूपी वेलीला जी प्रफुल्लित करते, स्वर्गातून (पृथ्वीवर) येऊन पडते, सुवर्ण मेरू पर्वताच्या गुहा पठारांवरून घरंगळते, पृथ्वीच्या अंगावर लोळते, अडचणीच्या (वाईट) गोष्टींच्या राशी पूर्णतः दूर सारते, समुद्रात भर घालते अशी ही देवांच्या नगरीतील पवित्र नदी आम्हाला पावन करो.

ब्रह्मांडा भेदिते जी, फुलवित जटावेल शंभूशिरीची
स्वर्गीची आदळे ती, कनक गिरि पठारी गुहेतून साची ।
लोळे अंगी धरेच्या, सकल अडचणी दूर सारी बळें ती
दर्याला नीर देई निखळ सुरनदी, पुण्य देवो अम्हा ती ॥ ३


टीप- येथे भर्तृहरीच्या नीतिशतकातील श्लोकाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, जेथे त्याने गंगेच्या पृथ्वीवर अवतरणास ‘विवेक भ्रष्टांचा शेकडो मार्गांनी होणारा अधःपात’ म्हटले आहे. दोघांच्या विचारात किती भिन्नता आहे !

मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमदिरामोदमत्तालिजालं
स्नानैः सिद्धाङ्गनानां कुचयुगविगलत् कुंकुमासङ्गपिङ्गम् ।
सायंप्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैः छन्नतीरस्थनीरं
पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरं हस्तरङ्गम् ॥ ४॥

मराठी- ज्या जलात (नदीवर डुंबायला आलेल्या) हत्तींच्या गंडस्थलातून ठिपकणारी मदरूपी मदिरा पिऊन धुंद झालेले भुंगे डुबक्या मारतात, सिद्ध स्त्रियांच्या स्नानाने त्यांच्या स्तनांवरील कुंकू मिसळून जे लालसर झाले आहे, सकाळ संध्याकाळ मुनीच्या दर्भ आणि फुलांच्या काठावरील राशींनी जे झाकून गेले आहे, हत्तींच्या बछड्यांनी दंगा करून जोर जोरात उसळवलेले ते गंगेचे जल आमचे रक्षण करो.

झिंगोनी भृंग माला पिउन मद गजांचा जली डुंबती ज्या
देवींचे वक्ष-कुंकू  अवतरुन जला रक्तवर्णी करी ज्या ।
संध्याकाळी सकाळी मुनि रचति फुले दर्भ तीरी ढिगाने
राखो अम्हास पाणी उसळवत जया हत्तिबच्चे बळाने ॥ ४

टीप- सिद्ध ही देवयोनीतील यक्ष, गंधर्व, नाग यासारख्या जमातीपैकी एक असून त्या स्त्रिया स्वर्गंगेतही स्नान करू शकत. तथापि त्या स्त्रिया भूतलावरील गंगेत स्नाने करण्यासाठी आवर्जून येतात असा भाव.


आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं
पश्चात् पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् ।
भूयः शंभुजटाविभूषणमणिः जह्नोर्महर्षेरियं
कन्या कल्मषनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते ॥ ५॥

मराठी-  सर्वांचे आजोबा ब्रह्मा यांनी या जगताच्या प्रारंभी नियमांनुसार व्यवहार करण्यासाठी भांड्यात जे जल वापरले, नंतर जे शेषावर पहुडलेल्या भगवान श्रीविष्णूंच्या पायाचे पवित्र जल झाले, पुनः शंकराच्या जटांचे जे भूषण ठरले, ती ही महर्षी जन्हूंची पापांचा नाश करणारी तनया, देवी भागीरथी (येथे) दिसत आहे.

आजोबा करण्यास कार्य नियमें पात्रा, जला  वापरी
धारा विष्णुपदाहुनी निघतसे पुण्यप्रदा नंतरी ।
वाटे शंभु शिरी जटांस  सजवी भागीरथी साजिरी
जन्हूची दुहिता समोर दिसते पापां करी ती दुरी ॥ ५

टीप- येथे ‘आदिपितामह’ हा शब्द ब्रह्मदेवाला उद्देशून वापरला आहे. त्याच्या उजव्या बाजूतून स्वायंभुव मनु (पुरुष) तर डाव्या बाजूतून शतरूपा (स्त्री) ची निर्मिती झाली व त्यांनी मानवांची निर्मिती केली. ब्रह्माचा नातू कश्यप याने इतर सर्व सृष्टीची निर्मिती केली.


शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी
पारावारविहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी ।
शेषाहेरनुकारिणी हरशिरोवल्लिदलाकारिणी
काशीप्रान्तविहारिणी विजयते गंगा मनोहारिणी ॥ ६॥

मराठी- नगाधिराज हिमालयातून जी (पृथ्वीवर) खाली उतरते,  आपल्या पाण्यात डुबकी मारणार्‍यांचा उद्धार करते, खळाळत समुद्राला मिळते आणि जगाच्या भयाला दूर ढकलून देते, शेष नागाचे अनुकरण करत शंभूच्या मस्तकावरील (जटांमध्ये) वेलीच्या तुकड्याचा आकार धारण करते, काशीनगरी आणि आसमंतात वाहते, अशी मनाला मोहून टाकणारी गंगा विजयी होते.

खाली ये नगराज सोडुन, डुबी घेता जनां उद्धरी
खेळे सागरसंगती जगभया रेटून सारी दुरी ।
शेषासदृश मस्तकी बिलगते आकार वेलीपरी
गंगेचा रमणीय ओघ विजयी मैदान काशीपुरी ॥ ६     

टीप- ‘पारावार’ चा अर्थ नदीचे दोन किनारे तसेच समुद्र असाही होतो. त्यानुसार गंगेचे पाणी आपल्या दोन तीरांमध्ये खेळत समुद्राच्या पाण्याला दूर लोटते, तद्वत भवाब्धीच्या राशींनाही दूर लोटते असे रूपक आचार्यांनी योजले आहे. गंगा नदी जेथे समुद्राला मिळते तेथे तिचा प्रवाह समुद्राच्या पाण्याला दूरवर लोटून तेथील पाणी गोड होते या परिस्थितीचा संदर्भ येथे आहे.


कुतो वीचिर्वीचिस्तव यदि गता लोचनपथं
त्वमापीता पीतांबरपुरनिवासं वितरसि ।
त्वदुत्संगे गंगे पतति यदि कायस्तनुभृतां
तदा मातः शातक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः ॥ ७॥

मराठी- हे गंगे, तुझी लाट जर दृष्टीस पडली तर (भवाब्धीची) लाट (माझ्याकडे) कुठून येणार ? तुझे जल प्राशन केल्यानंतर तू वैकुंठच प्रदान करतेस. जर तुझ्या मांडीवर (कवेत) मनुष्याचा देह पडला (मृत्यू आला) तर, हे आई, (त्यापुढे) इंद्राचे पद मिळणेही फारच लहान !

भवाब्धीच्या लाटा कुठुन, दिसता लाट तव गे
जळ प्राशी त्यासी हरि-सदन देसी त्रिपथगे ।       (हरिसदन – वैकुण्ठ, त्रिपथगा- गंगा)
तनू अंकी ठेवी मनुज तव त्या लाभच भला 
बहु छोटे वाटे अमरपतिचे स्थान मजला ॥ ७      (अमरपती- इन्द्र)


गंगे त्रैलोक्यसारे सकलसुरवधूधौतविस्तीर्णतोये
पूर्णब्रह्मस्वरूपे हरिचरणरजोहारिणि स्वर्गमार्गे ।
प्रायश्चितं यदि स्यात् तव जलकाणिका ब्रह्महत्यादिपापे
कस्त्वां स्तोतुं समर्थः त्रिजगदघहरे देवि गंगे प्रसीद ॥ ८॥

मराठी- तिन्ही लोकांचे सारसर्वस्व असणार्‍या, जिच्या लांब रुंद पात्रातील जलात सर्व देवतांच्या बायका स्नान करतात, पूर्णब्रह्म स्वरूप असणार्‍या, जी स्वर्गातून वहात येताना श्रीविष्णूंच्या पायाची धूळ साफ करते, ब्रह्महत्येसारख्या पातकांना जर काही प्रायश्चित्त असेल तर ते तुझ्या जलाचा एक थेंबच आहे. तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे ? तिन्ही जगतांच्या पापाचा नाश करणार्‍या देवी गंगे मजवर कृपा कर.

गाभा तीन्ही जगांचा, बहुत जल करी देवता जेथ स्नाने
पूर्ण ब्रह्म स्वभावे, हरिपद-कण जे क्षाळिसी तू  जलाने ।
पापे जैं ब्रह्महत्या, कणभर जल आहे तुझे शुद्धि कारी
कोणी का पात्र गाण्या स्तवन, कर कृपा विश्व पापास हारी ॥ ८     


मातर्जाह्नवि शंभुसंगमिलिते मौलौ निधायाञ्जलिं
त्वत्तीरे वपुषोऽवसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयम् ।
सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे
भूयात् भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती ॥ ९॥

मराठी- हे गंगामाई, शंकराचा सहवास मिळालेल्या तुझ्या काठावर, माझ्या देहाच्या शेवटच्या क्षणी मस्तकावर दोन्ही हात जोडून आनंदाने विष्णूच्या पावलांचे स्मरण करणार्‍या माझ्या प्राणोत्क्रमणाच्या उत्सवात हरि-हर एकात्मतेची भक्ती शाश्वत राहो.

जोडोनी कर मस्तकी तव तटी शंभू जयां लाभला
प्राणत्याग महोत्सवात स्मरता मी विष्णुच्या पावलां ।
आनंदे, मग जान्हवी, नित घडो भक्तीत एकात्मता
शंभू विष्णु सदैव ऐक्य असु दे भक्तीत ना भिन्नता ॥ ९


गंगाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतो नरः ।
सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति ॥ १०॥

मराठी-  हे पुण्यप्रद गंगाष्टक जो मनुज प्रयत्नपूर्वक गाईल, तो सर्व पातकांपासून मुक्त होऊन वैकुण्ठाला जाईल.
पुण्यप्रद अष्टका जो प्रयत्ने नित गातसे ।

सर्व पापे हरूनीया विष्णुलोकास जातसे ॥१०

॥ श्रीमद् शंकराचार्यकृत गंगाष्टक संपूर्ण ॥

*******************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्रीगंगाष्टकम् – मराठी अर्थासह

  1. फार छान आहे.मी गंगालहरी पाठ केले आहे.अर्थही समजलात.आपला अनुवाद व पद्य चांगलेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..