नवीन लेखन...

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे ।।
इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे ।।

मागील भागामधून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती, स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजांनी स्वतःस (राजा या भूमिकेतून ) केंद्र स्थानी ठेऊन, अष्टप्रधान मंडळाची रचना तशीच चालू ठेवली होती. स्वराज्याची महसूल व्यवस्था प्रांत रचना, न्याय व्यवस्था, मुलकी कारभाराच्या व्यवस्था, देशमुख-देशकुलकर्णी यांचे अधिकार आदी बाबी तश्याच पुढे चालू ठेवल्या होत्या. इंग्रज-पोर्तुगीज-डच आदी व्यापारी मंडळींसोबत असणारे करार-मदार देखील तसेच पुढे चालू ठेवले होते.

संभाजीराजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंशी झुंज देत, स्वराज्याचे रक्षण केले आणि विस्तारही केला हे सर्वश्रुत आहेच. परंतु कल्याणकारी राजांचा पुत्र असणारा हा दुसरा कल्याणकारी राजा प्रजावत्सल होता यात शंका नाही. संभाजीराजांची  स्वराज्य साधना ही जनतेला स्वाभिमानाने जीवन व्यतीत करता यावे यासाठीच होती. उदाहरण द्यायचे झाले तर  कारवार भागात हिंदी माणसांची गुलाम म्हणून होणारी विक्री जबरदस्त कर-जकात लावून अखेरीस संभाजीराजांनी बंद पाडली होती हे एक उदाहरण देता येईल. संभाजी राजांच्या प्रजादक्ष कारभाराबद्दल सांगताना, डॉ. सौ कमल गोखले लिहितात,

संभाजीमहाराजांना अंतर्गत आणि परसत्ताक प्रश्न सोडवण्यात बरीच शक्ती खर्च करावी लागली होती. त्यांना अनेक आणीबाणीच्या प्रसंगांना  तोंड द्यावे लागत होते. स्वराज्याला चारी बाजूने शत्रूने वेढले होते. अश्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी प्रजेकडे दुर्लक्ष केलेले दिसत नाही. शत्रूने मुलुख लुटला तर तेथील रयतेला सवलती देण्यात येत असत. कॊणी काही कारणाने परागंदा झाले तर त्यांना प्रोत्साहन देऊन पुनर्वसन करण्यासाठी सूट दिली जाई ओसाड पडलेल्या जमिनीत लोकांनी पुन्हा शेती करावी म्हणून जास्तीत जास्त सवलती देण्यात येत असत. संभाजी महाराज आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडून अभयपत्र, कौलनाम दिला जात असे. काही लोक बाकी थकली म्हणजे धास्तीने गाव सोडून जात. अशा प्रसंगी त्यांनी आपापल्या गावी येऊन राहावे म्हणून अधिकारी त्यांना पत्रे देऊन अभय देत. कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जात असे. लोकांना हरप्रकारे दिलासा देऊन राज्यात स्थिरस्थावर राहून कारभार नीता चालावा म्हणून काळजी घेण्यात येई.

संभाजीराजांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांचे धार्मिक धोरण. मोहिमा, चकमकी लढाया यांच्यादरम्यान जर कोणी हिंदू मनुष्य, पोर्तुगीज किंवा मुसलमानांच्या कैदेत  पडला तर त्याला धर्मांतर किंवा मृत्यू हे दोनच पर्याय शिल्लक राहत.  संभाजीमहाराजांनी; जबरदस्तीने किंवा भयाने मुसलमान, ख्रिश्चन झालेल्या हिंदूंना शुद्धीकरणाद्वारे हिंदुधर्मात परत आणले. एवढेच नव्हे तर गोव्याच्या विजयानंतर, ” आता येथे हिंदूंचे राज्य जाहले आहे ” अशी द्वाही फिरवत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन करण्याचे धोरण ठेवले.

साधुसंताना, विद्वानांना, देवस्थानांना, मठांना सहकार्य करणे हे देखील तत्कालीन राज्यव्यवस्थेचे एक अंगचं होते त्यामुळे, वेदमूर्ती भट आणि ब्राम्हण मंडळी, ईश्वरनिष्ठ गोसावी मंडळी, चिंचवडचे देव, मोरेश्वर गोसावी तसेच चाफळची रामदासी मंडळी आणि देवस्थान, सज्जनगड देवस्थान आणि अन्य मंडळी आदी धार्मिक विभूती, संस्था आणि देवस्थानांना वर्षासने, जमीन, रक्कम, धान्य तसेच नैवेद्य, अन्नछत्रसाठीची सर्वप्रकारची व्यवस्था चोख ठेवणे आदी धर्मकार्य देखील संभाजीराजांनी आपल्या कारकिर्दीत पार पाडली होती. संभाजी महाराजांचे एकंदरीत धार्मिक धोरण पाहता त्यांना ‘ *धर्मवीर* ‘ ही उपाधी सार्थ ठरते.

राजकारण, धर्मकारण,प्रजापालन, राज्यरक्षण  या व्यतिरिक्त संभाजीराजे हे संस्कृत आणि हिंदी काव्य रचना करणारे विद्वान तथा प्रतिभावंत होते. त्यांनी संस्कृत मध्ये ” बुधभूषण ” या ग्रंथाची तर हिंदी भाषेमध्ये नायिका भेद, नखशिखा, सात सतक आदी काव्यांची रचना केली आहे.

नायिका भेद आणि नखशिखा यातील काव्य रस हा जरी शृंगाराकडे जाणारा असला तरी त्या काव्यांना पौराणिक कथांचेच संदर्भ आहेत. “सात सतक” हे आध्यत्मिक काव्य संतांच्या हितासाठी लिहिलेले असून त्यातील पहिल्या काही चरणांमध्ये राम-सीता यांची स्तुती आहे.

बुधभूषण ग्रंथामध्येही पुराणग्रंथांचेच संदर्भ,श्लोक आदी देण्यात आलेले आहेत. संभाजीराजांची एकंदरीत काव्य रचना आणि त्यातील संदर्भ पाहता त्यांची वृत्ती हि धार्मिकतेकडे झुकणारीच वाटते.

संभाजी महाराज, युद्ध मोहिमांवर अधिक गुंतले असताना, मुलकी कारभारावर आवश्यक ते नियंत्रण करण्यासाठी, त्यांनी आपली पत्नी येसूबाई यांच्याकडे अधिकार दिले होते. औरंगजेबाच्या आगमनानंतर उद्भवलेल्या धामधुमीच्या काळात, महाराणी येसूबाई यांनीच मुलकी कारभार पहिला होता. तश्या आशयाची पत्रे देखील संशोधकांना उपलब्ध झाली आहेत.

महाराणी येसूबाईंनी अधिकाऱ्यांना, कारभाऱ्यांना,देशमुखांना  ” राजाज्ञा ” असा शब्दप्रयोग करून पत्रे पाठवलेली आढळतात. आपल्या पत्नीला राज्यकारभारात स्वतंत्र आणि मोलाचे स्थान देणारे संभाजीराजे हे एक अलौकिक उदाहरण आहे असेच मला वाटते.

छ. संभाजीराजांचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग होते की; युवराज असल्यापासून सैनिकांमध्ये, सरदारांमध्ये ते सगळ्यांचेच लाडके आणि प्रियतम होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मूळचे कन्नोजी असणारे छंदोगामात्य कवी कलश संभाजी महाराजांसोबत आपले प्राण अर्पण करायला तयार झाले.

कर्तव्यनिष्ठ, प्रजादक्ष, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छ. संभाजी राजांचा औरंगजेबाच्या छळछावणीत दुर्दैवी अंत होत असताना साक्षात मृत्यू देखील ओशाळला असेल यात शंकाच नाही. मारीता-मारिता मरेतो झुंजेन ह्या उक्तीप्रमाणे महाबलाढ्य शत्रूंशी लढा देत असतानाच, अखेर फाल्गुन अमावास्येच्या दिवशी औरंगजेबाच्या छावणीत तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली.

संभाजीराजांची ऐन तारुण्यात जीवित तृणवत मानून बलिदान देण्याची वृत्ती, हि आजच्या तरुणाईने आदर्शवत मनाली पाहिजे. आपला धर्म, संस्कृती, स्वराज्य, स्वराष्ट्र यांना असणाऱ्या उच्चतम परंपरांचे जतन केले पाहिजे.

संभाजीराजांचे चरित्र अभ्यासताना, तुळापूर येथील त्यांचे अंत्यस्थळ, वढू-बुद्रुक येथील समाधी, पाहताना त्यांचा “ज्वल-जहाल” आदर्श समोर उभा राहतो आणि मन-मंदिराच्या गाभाऱ्यात धर्मकार्यासाठी साद घालणारी एक धगधगती तेज:पुंज प्रतिमा प्रगटते आणि नकळत लोकमान्य टिळकांच्या ओळी ओठांवर येतात,

स्वधर्मे निधनं श्रेयो, गीतावचनं उज्ज्वलम ।
शिवसुतोश्च्य हौतात्म्यम धर्म राष्ट्रकृत्वे खलु ते ।।

—  संकलन-लेखन : श्रीपाद श्रीकांत रामदासी

टिप : सदर लेखासाठी, वा. सी. बेंद्रे लिखित श्री. छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. सौ. कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी, या ग्रंथांतुन संदर्भ घेतले आहेत.

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 12 Articles
मी, श्रीपाद श्रीकांत रामदासी [ मेथवडेकर ], मूळचा सोलापूर येथील असून; इ. स. २००५ पासून, पुणे येथे वास्तव्यास आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. गेली काही वर्षे सोलापूर, संभाजी नगर, पुणे, आदी जिल्ह्यातून, छ. शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, हिंदुत्व या विषयांवर व्याख्याने, भाषणे दिली आहेत; देत आहे. मराठीसृष्टी, प्रगतिपर्व अश्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन देखील करत असतो. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत, विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे लेख सोशल मीडियावर, ब्लॉग वर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न सुरु आहे. माझे आत्तापर्यंत ५५ हुन अधिक लेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले असून ही संख्या १०१ पर्यंत नेण्याचा मानस आहे. व्याख्याने, लेखमाला, याकरिता आपण मला इ-मेल द्वारे संपर्क करू शकता. इ-मेल : shripad.ramdasi [ at ] outlook [ डॉट ] [ कॉम ] आमचे लेख, कविता याबद्दल आपला अभिप्राय अवश्य कळवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..