‘शिवाजी’ हे नाव आयुष्यभर सन्मानपूर्वक धारण करणारा अभिनेता शिवाजी गणेशन्

मी असेल तेव्हा ९ व्या वर्गात. आमच्याकडे मामाचा मुलगा शिकायला होता. त्याने एकदा जत्रेला जायची टूम काढली आणि आम्ही दोघे नांदेड पासून जवळ असलेल्या बासर या गावी जत्रेला गेलो. जत्रेत बरीच मौजस्ती करून परत निघायची वेळ झाली तसा तो मामेभाऊ म्हणाला- ‘आपण आदिलाबादला जाऊया. तिथे मस्त पिक्चर बघू मग परत जाऊ.’ चित्रपट म्हणताच मी तात्काळ हो म्हणालो. आम्ही जेव्हा आदिलाबादला पोहचलो तेव्हा संध्याकाळ उलटून गेलेली. मग जवळच्या कुठल्यातरी टॉकीजमध्ये गेलो आणि घाईघाईने तिकीट काढले. आत गेलो तर तिथे सर्व जमिनीवर लोक बसलेले. सिनेमा सुरू झाला होता. मी पहिल्यांदाच जमिनीवर बसून सिनेमा बघत होतो. थोड्या वेळाने लक्षात आले की चित्रपट तेलुगू आहे. मग काय..समोर काय बोलताहेत ते कळेना…सगळे हासले की आम्ही पण हसायचो..सगळ्यानी टाळ्या वाजविल्या की आम्ही पण वाजवायचो. मध्यातंरात एकाला विचारले की यातल्या हिरोचे नाव काय तर तो एकदम कुत्सीत हसला…हिरो नाम मालूम नयी क्या? त्याने सांगितले सिवाजी गणेसन…..मी पहिल्यांदा तेव्हा हे नाव ऐकले. चित्रपट कथा तशी समजणारी होती फक्त संवाद कळत नव्हते. नांदेडला जाणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी असल्यामुळे रात्री पुन्हा दुसरा शो ‘मेहरबान’ नावाचा चित्रपट बघितला आणि दुसऱ्या दिवशी परत आलो. त्या तेलुगू सिनेमातले एक गाणे नंतर मी बरेच दिवस गुणगूणत होतो….अर्थात फक्त चाल…

नंतर १० वी पास होई पर्यंत शिवाजी गणेशन हे नाव चांगलेच परीचयाचे झाले. १९७० मध्ये राजेंद्रकूमार-वहिदा रेहमान यांचा धरती नावाचा चित्रपट आला होता त्यात शिवाजी गणेशन अतिथी कलावंत होते. दक्षिण भारतात प्रसाद प्रॉडक्शन, एव्हीएम आणि जेमिनी पिक्चर्स या अत्यंत नावालेल्या चित्रपट संस्था तेव्हा होत्या. त्याकाळी अभिनेत्यापेक्षा या संस्था अधिक प्रसिद्ध होत्या. त्या संस्थेचा ट्रेड मार्क बघून लोक चित्रपट बघत असत. कृष्णन-पंजू, एल.व्ही.प्रसाद, टी. प्रकाशराव, ए.भिमसिंग, श्रीधर हे दिग्दर्शक खूप प्रसिद्ध होते. यातील ए.भिमसिंग यांनी तमीळ, तेलुगू, कन्नडा व हिंदी मध्ये अनेक चित्रपट तयार केले. संजीवकुमारचा “नया दिन नयी रात” हा मूळ शिवाजी गणेशनच्या “नवरात्री” या तमीळ चित्रपटाचा रिमेक होता. आणि शिवाजी गणेशन यातील भूमिका अत्यंत प्रभावीपणे केल्या असे स्वत: संजीवकुमारही म्हणत असत. शिवाजी गणेशन यांचा चित्रपट प्रवास मात्र खरोखरच अद्भूत असाच आहे. मी जे काही अत्यंत कमी त्यांच्यावर वाचले त्यावरून या माणसाचा आवाका प्रचंड होता यात वादच नाही.

विल्लुपूरम चिनय्या गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत “श” ऐवजी “स” चा वापर होतो म्हणजे सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटूंबात त्यांचा जन्म झाला. पूर्वी नाटकाच्या फिरत्या टुरींग टॉकिज असत. त्यातच सामील व्हायचे असे त्यांनी लहानपणीच पक्के ठरवले होते. त्यामुळे सात वर्षाचे असतानाच ते त्यात सामील झाले. वयाच्या दहाव्या वर्षी ते त्रिचुरापल्ली जवळच्या संगिलियान्दापूरम येथील एका नाटक मंडळीत सामील झाले आणि रंगभूमीवर काम करायला सुरूवात केली. याच ठिकाणी त्यांनी अभिनय व नृत्याचे पहिले धडे गिरवले. नंतर भरतनाट्यम्, कथ्थक आणि मणिपूरी या तिनही नृत्यात ते पारंगत झाले.त्यांच्यातला सर्वात मोठा गूण म्हणजे नाटकातले मोठमोठे व लांबलचक संवाद ते सहज पाठ करत आणि पक्के लक्षात ठेवत. या वैशिष्ठ्याचा फायदा चित्रपटात खूप झाला. कारण अनेकदा संवाद तोंडपाठ नसले की खूपदा रिटेक होत. त्यांच्या जबरदस्त पाठातंरामुळे नाटकात त्यांना लवकर मूख्य भूमिका मिळत गेल्या. एकदा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेल्या नाटकात त्यानां मूख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते “शिवाजी कंदा हिंदू राज्यम्” यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनकि सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी त्यांचा “सिवाजी” असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्याचा’ शिवाजी गणेशन झाला तर मराठी ‘शिवाजी गायकवाडचा’ तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले.

१९४०-५० दरम्यान तामीळ सिनेमातले बहूतेक अभिनेते हे तेलुगू होते. त्यामुळे तमीळ संवाद म्हणताना त्यांच्या लिप्स मोमेन्ट मॅच होत नसत. त्यामुळे सिवाजी गणेशन यांचा चित्रपट प्रवेश सुकर झाला. सुरूवातीला त्यांनी तेलुगू अभिनेत्याना आपला आवाज दिला.त्याच काळात द्रविड चळवळ जोरात सूरू होती. सी.एन. अन्नादुराई व एम. करूणानिधी हे त्यांचे अग्रणी नेते होते. तमीळ भाषेतील पटकथेत या दोघांचाही मोठा सहभाग होता नंतर ते सक्रिय राजकारणात आले. १९५२ मध्ये आलेल्या ‘परासख्ती’(देवता) या चित्रपटाने शिवाजी गणेशन यानां ब्रेक मिळाला. कृष्णन् पंजू हे त्याचे दिग्दर्शक होते.(आर.कृष्णन् आणि एस.पंजू अशी जोडी होती)या चित्रपटाती भूमिकेसाठी समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी निर्मात्याकडे आग्रहधरला होता.या चित्रपटाची पटकथा तमीळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांनी लिहीली होती. दाक्षिणात्य राजकारणात चित्रपटसृष्टीतील कलावंताचा सहभाग हा किती जुना आहे हे आपल्या लक्षात येते. शिवाजी गणेशन नृत्यात पारंगंत असल्यामुळे त्याच्यां चेहऱ्यावर नवरसाचे अविर्भाव ते सहज उमटवू शकत. त्यात नाटकाच्या प्रभावामुळे त्यांच्या आवाजातही एक वेगळेपण होतेच. या सर्वाचा मेळ त्यांनी आपल्या चित्रपटातील भूमिका करताना योग्य प्रमाणे बसवला. विशेष म्हणजे नंतर दोन वर्षांनी प्रदर्शीत झालेल्या ‘अंधा नाल’ या चित्रपटातुन त्यांनी मूख्य व्हिलनही साकारला. हे एक धाडसच होते जेव्हा की ते प्रसिद्ध नायक साकारत होते. नायकाने खलनायक साकार करण्याचा मान त्यांच्याच नावावर आहे.

१९६० मध्ये आलेल्या “विरप्पनदिया कटाबोम्मन” या चित्रपटातल्या भूमिकेने त्यानां कैरो येथील Afro-Asian Film Festival मध्ये पुरस्कार मिळवून दिला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले तामीळ अभिनेते होत. इतकेच नाही तर देशा बाहेर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेतेही ठरले. त्याकाळच्या दक्षिणेतील सर्वच अभिनेत्री आणि अभिनेत्या सोबत त्यांनी भूमिका केल्या. १९६४ मध्ये नवरात्री या चित्रपटात ९ प्रकारच्या भूमिका करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले तर १९६५ मध्ये आलेल्या “थिरूविलयादल” या पौराणिक चित्रपटातील त्यांची महादेवाची भूमिका अत्यंत गाजली. शिवाजी गणेशन यांचे ही एक विशेषत: होती त्यांनी एकाचवेळी पौराणिक, व्यावसायिक व समातंर आर्ट चित्रपटातील भूमिकां करताना समतोल साधला होता. हिंदी चित्रपटात असे क्वचितच बघायला मिळते. त्यांनी अत्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकार केल्या. “कप्पालोत्तिया तमिझहन” या तमिळ चित्रपटात त्यांनी ‘चिदंबरम पिल्लाई’ ही व्यक्तीरेखा साकार केली. चिदंबरम पिल्लाई हे पहिले भारतीय होते ज्यांनी पहिली स्वदेशी शिपिंग कंपनी स्थापन केली. या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. यात त्यांच्या सोबत तमीळनाडूचे आणखी एक महान कलावंत जेमिनी गणेशन यांनीही भूमिका केली होती. रहस्यमय, विनोदी, थ्रीलर, रोमँटीक यातल्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेचा ठसा उमटविला.

१९६९ मध्ये त्यांची मूख्य भूमिका असलेल्या ‘सिवंधामन्न’ या चित्रपटाचा १९७० मध्ये ‘धरती’ या नावाने रिमेक आला होता. राजेंद्र कूमारने यात मूख्य भूमिका केली होती. यात शिवाजी गणेशन अतिथी कलाकार होते. १९७० ते १९७९ या कालावधित जसा हिंदीत राजेशखन्ना सुपस्टार होता त्यावेळी दक्षिणेत शिवाजी गणेशन सुपरस्टार होते. या काळातले त्यांचे अनेक चित्रपट श्रीलंकेतील सिंहली भाषेत रिमेक करण्यात आले. स्वत: त्यानी यात श्रीलकंन कलावंता सोबत भूमिका केल्या. १९७९ मधील “थिरीसुलम” हा त्यांचा ऑलटाईम ब्लॉकबस्टर चित्रपट होय.शिवाजी गणेशन यांना ‘द्रविड मुनेत्र कझघम’ या पक्षा बद्दल सहानुभूती होती. हा पक्ष निरीश्वर वादाला मानणारा असल्यामुळ जेव्हा शिवाजी गणेशन तिरूपती मंदीरात दर्शनला गेले तेव्हा त्यांच्यावर पक्षातल्या अनेकांनी कठोर टिका केली. यामुळे ते खूप व्यथीत झाले आणि १९६१ नंतर काँग्रेस पक्षाला जवळ केले. कामराज यांचा ते आदर करीत असत त्यामुळे लवकरच त्यानां पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी राज्यसभेचे मेंबर केले १९८७ नंतर त्यांनी स्वत:चाच पक्ष काढला. मात्र चित्रपटा इतके यश त्यानां राजकारणात नाही मिळू शकले. १९५२ मध्ये त्यांनी कमला यांच्याशी विवाह केला. त्यांच्या चार मुलांपैकी प्रभू हा तामीळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

ईजिप्तचे राष्ट्रपती जमाल अब्दूल नासेर एकदा भारतात आले होते त्यावेळी शिवाजी गणेशन हे ऐकमेव व्यक्ती होते ज्यानां त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जमाल अब्दूल नासेर यानां दिलेल्या भोजपार्टीत खास आमंत्रण दिले होते. १९६२ मध्ये अमेरिकेला भेट देणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. येथील होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तेव्हाचे अमेरिकीचे राष्ट्रपती जॉन.एफ. केनेडी यांनी त्याना विशेष आमंत्रित केले होते. १९९५ मध्ये ते जेव्हा दुसऱ्यांदा अमेरिकेतील कोलंबस, ओहियो येथे गेले तेव्हा तेथील मेयर ग्रेग लशुत्का यांनी त्यानां विशेष डिनरपार्टी दिली शिवाय ऑनररी सिटीझनशिप प्रदान केली. त्यांच्या प्रसिद्धीच्या काळात ते अफाट लोकप्रिय होते. त्यांच्या नावाचे जवळपास ३० हजार नोंदणीकृत फॅन क्लबस् होते.१९९२ मध्ये कमल हासन निर्मित व त्यांचीच कथा असलेला “थेवर मगन” या तामीळ चित्रपटाने शिवाजी गणेशन् यानां स्पेशल राष्ट्रीय ज्युरी पुरस्कार मिळवून दिला.या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. नंतर हिंदीत “विरासत” नावाने प्रियदर्शन यांनी याचा रिमेक केला. शिवाजी गणेशन् यांना १२ वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८४ मध्ये पद्मभूषण तर १९९५ मध्ये फ्रान्सने त्यानां National Order of the Legion of Honour of France या पुरस्काराने गौरविले. पाँडेचरी राज्यात सर्वप्रथम त्यांचा पुतळा उभारण्यात आला नंतर चेन्नईत पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येतो. लॉस एंजिल्स येथून प्रकाशीत होणाऱ्या एका दैनिकात ‘भारताचा मर्लोन ब्रँडो’ म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. भारतातील चित्रपट क्षेत्रातील देण्यात येणारा सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यानां १९९६ मध्ये प्रदान करण्यात आला.

मला व्यक्तीश: दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनय अधिक लाऊड वाटतो. विशेषत: ६० च्या दशकातील. दक्षिणेत तंबुतील नाटकांची परंपंरा खूप जुनी आहे. मी स्वत: एका हैद्रबाद जवळच्या खेड्यात हे नाटक १९८५ च्या काळात बघितलेले आहे. प्रेक्षका पर्यंत आपला आवाज आणि अभिनय पोहचावा म्हणून शारीरीक हालचाली व आवाज यातुन एक अभिनय शैली निर्माण झाली व त्याचा पगडा चित्रपटसृष्टीतही पडला. मेलोड्रामा दक्षिणेतल्या प्रेक्षकानां भयंकर आवडतो. त्यामानाने आपल्याकडे तो कमी प्रमाणातच बघायला मिळतो…तर अशा बहूपेडी अभिनेत्यांची कारकिर्द वयाच्या सातव्या वर्षी पासून सुरू झाली. आणि खूप खूपच प्रदीर्घ काळ टिकून राहिली. चित्रपट रसिकांच्या हृदयावर कायम राज्य करीत आलेल्या या अभिनेत्याला मात्र शेवटच्या १० वर्षात हृदयाच्या आजाराने त्रास दिला. श्वसनाच्या अडथळ्यामुळे त्यानां २१ जुलै २००१ रोजी चेन्नईच्या अपोला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याच ठिकाणी त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

(मी स्वत: शिवाजी गणेशन यांचे चित्रपट जरी बघितलेले नसले तरी अगदी शाळकरी वया पासून हे नाव माझ्या भोवती पिंगा घालत असे. या लेखातील सर्व माहिती नेट वरून घेण्यात आली आहे.)

-दासू भगत (२१ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…