नवीन लेखन...

शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.  


सुवक्षोजकुम्भां सुधापूर्णकुम्भां
प्रसादावलम्बां प्रपुण्यावलम्बाम् ।
सदास्येन्दुबिम्बां सदानोष्ठबिम्बां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ १ ॥

मराठी- जिचे उरोज घटांसारखे सुडौल असून अमृताने परिपूर्ण घडेच आहेत, ज्यात लालित्य आणि मांगल्य पूर्णतः वास करतात, जिच्या चेहेर्‍यावर नेहेमी चंद्रबिंबाचे सौंदर्य झळकते, जिचे ओठ बिंबफलाप्रमाणे आहेत, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

उरी अमृताचे घडे पूर्ण साचे
दया पूर्ण लालित्य मांगल्य ज्यांचे ।
मुखी लाल ओठांसवे चंद्र आभा
अनादी सदा पूजितो शारदांबा ॥ १


कटाक्षे दयार्द्रां करे ज्ञानमुद्रां
कलाभिर्विनिद्रां कलापैः सुभद्राम् ।
पुरस्त्रीं विनिद्रां पुरस्तुङ्गभद्रां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ २ ॥

मराठी- जिचा दृष्टिक्षेप करुणेने ओथंबलेला आहे, जिने हाताने (तर्जनी व अंगठा जोडून) ज्ञानमुद्रा केली आहे, आपल्या कलांनी जी टवटवीत असते, आपल्या अलंकारांनी जी शुभदायी दिसते, जी नित्य जागृत नागर देवता तुंग नदीकाठच्या (शृंगेरी) नगरीसाठी कल्याणकारी ठरली आहे, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

करी ज्ञानमुद्रा नि दृष्टी दयेची
अलंकार शोभे झळाळी कलांची I
असे देवता तुंगतीरी हितैषी
सदा वंदितो शारदा माय ऐशी ॥ २


ललामाङ्कफालां लसद्गानलोलां
स्वभक्तैकपालां यशःश्रीकपोलाम् ।
करे त्वक्षमालां कनत्प्रत्नलोलां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ३ ॥

मराठी- जिच्या कपाळावर एक सुरेख वक्र चिन्ह रंगवलं आहे, जी सुरेल गाण्यात रंगून झुलत आहे, जी तिच्या भक्तांची एकमेव आश्रयस्थान आहे, जिच्या गालांवर यशाचे तेज आहे, हातातील रुद्राक्षांची माळ मंद हेलकावे खात आहे, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

टिळा वक्र भाळी दिसे तेज गाली
जना आसरा, दंग गाण्यात झाली ।
करी संथ रुद्राक्ष माळेस झोका
सदा वंदितो मी अशी शारदाक्का ॥ ३


सुसीमन्तवेणीं दृशा निर्जितेणीं
रमत्कीरवाणीं नमद्वज्रपाणीम् ।
सुधामन्थरास्यां मुदा चिन्त्यवेणीं
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ४ ॥

मराठी- जिची वेणी मध्ये भांग पाडून नीटनेटकी बांधली आहे, जी आपल्या नजरेने हरिणांना जिंकते, जिचा स्वर शुकासारखा रमणीय आहे, जिला वज्र हाती घेणारा (इंद्र) नमन करतो, जी मनात साठवून ठेवण्याचा एक अमृताचा आनंदाचा प्रवाह आहे, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

शिरी भांग वेणी, मृगां नेत्र जिंके
स्वरी रम्य रावा, पदी इंद्र वाके ।
धरी हर्षदा धार चित्ती सुधेची
करी साधना माँ महा शारदेची ॥ ४


सुशान्तां सुदेहां दृगन्ते कचान्तां
लसत्सल्लताङ्गीमनन्तामचिन्त्याम् ।
स्मृतां तापसैः सर्गपूर्वस्थितां तां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ५ ॥

मराठी- जिचे स्वरूप अत्यंत शांत आहे, शरीर अत्यंत डौलदार आहे, केस जेथपर्यंत नजर पोहोचेल तितके लांबसडक आहेत, अंगयष्टी झळकणार्‍या वेली समान आहे, जिला शेवट नाही, जिची कल्पनाही करता येत नाही, जिचे स्वरूप हे जगाच्या आधीपासून आस्तित्त्वात आहे असे योगी साधक जाणतात, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

पुरे दृष्टि ना लांब केसांस, नाही
जिला अंत ना तर्क, योग्यांस ठावी ।
तनू नेटकी, शांत, तेजस्वि वेली
सदा शारदा मॉं मला पूज्य झाली ॥ ५


कुरङ्गे तुरङ्गे मृगेन्द्रे खगेन्द्रे
मराले मदेभे महोक्षेऽधिरूढाम् ।
महत्यां नवम्यां सदा सामरूपां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ६ ॥

मराठी- जी हरीण, घोडा, सिंह, गरूड, हंस, माजलेला हत्ती, दांडगा बैल (नंदी) यांवर स्वार होते, जी (नवरात्राच्या दिवसात) नऊ सर्वश्रेष्ठ रूपात असते, (पण) नेहेमी शांत स्वरूपी असते, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

मृगा अश्व सिंहा वृषा वैनतेया
मदोन्मत हत्ती नि हंसा बसाया ।
नऊ श्रेष्ठ रुपे, सदा शांतरूपा
सदा पूजितो शारदेच्या स्वरूपा ॥ ६

टीप- येथे काही अभ्यासकांनी दुसर्‍या ओळीतील ‘महोक्षा’ चा अर्थ ‘महान आस-अक्ष लावलेल्या रथावर आरूढ होणारी’ असा लावलेला दिसतो.

‘महत्यां नवम्यां’ यात आदिशक्तीची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा,चामुंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी नऊ रूपे आभिप्रेत असावीत.


ज्वलत्कान्तिवह्निं जगन्मोहनाङ्गीं
भजे मानसाम्भोजसुभ्रान्तभृङ्गीम् ।
निजस्तोत्रसङ्गीतनृत्यप्रभाङ्गीम्
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ७ ॥

मराठी- धगधगत्या आगीप्रमाणे जिची कांती आहे, सर्व जगाला जी आपल्या स्वरूपाने मोहित करते, जी मानस सरोवरातील कमळांवर भ्रमण करणारी भृंगी आहे तिचे मी ध्यान करतो. आपल्या (या) स्तोत्रावर आधारित गायन आणि नाच यांच्या प्रभावाने जी रंगली आहे, अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

तनू तीव्र अग्नी जशी, विश्व मोही,
सरोजी अली मानसी दंग होई  ।     (अली- भुंगा,मधुमक्षिका)
स्तुती गीत संगीत रंगून जाई
सदा शारदा मन्मनी पूज्य आई ॥ ७


टीप- येथे दुसर्‍या ओळीत  ‘भजन्मानसाम्भोजसुभ्रान्तभृंगीम्’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘भजन करणार्‍यांच्या मनरूपी कमळावर आकर्षित होऊन भ्रमण करणारी’ असा अर्थ होईल.

भवाम्भोजनेत्राजसम्पूज्यमानां
लसन्मन्दहासप्रभावक्त्रचिह्नाम् ।
चलच्चञ्चलाचारूताटङ्ककर्णाम्
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥ ८ ॥

मराठी- शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांना पूजनीय असलेली, जिच्या चेहेर्‍यावर फुललेल्या मंद हास्याच्या प्रभेने सुचिन्हे दिसत आहेत, हलणार्‍या सुंदर कुंडलांमुळे जिचे कान शोभिवंत दिसत आहेत अशा माझ्या चिरंतन शारदामातेची मी उपासना करतो.

हरी शंभु ब्रह्मा जिला पूजिताती
हसूं मंद दावी सुचिन्हे मुखी ती ।
हले डूल कानी दिसे दिव्य शोभा
सदा पूजितो माय मी शारदाम्बा ॥ ८

टीप- काही अभ्यासकांनी पहिल्या ओळीचा अर्थ ‘जिचे पूजनीय नेत्र या भवरूपी जलाशयात उमललेल्या अमर कमळासारखे आहेत’ असा लावलेला आढळतो.


इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छङ्करभगवतः कृतौ
शारदाभुजङ्गप्रयाताष्टक सम्पूर्णम् ॥

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

  1. सर मी तुमचा चाहता आहे.मला खंडोबाची यथासांग संपुर्ण पूजाविधी व श्रीगणेश स्थापना व उत्तर पुजा संपुर्ण विधी माहीती द्याल का??कृपया दिलीत तर मला आपल्याकडून खुप मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..