नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म ४ जुलै १९४३ रोजी म्हापसा गोवा येथे झाला.

पं.प्रभाकर कारेकर यांनी चार दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. त्यांनी गायलेली ‘हा नाद सोड सोड’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राम होऊनि राम गा रे….’ अशी अनेक गीते लोकप्रिय आहेत.पं.प्रभाकर कारेकर हे मुळचे गोव्याचे. म्हापसा हे कारेकर कुटुंबियांचे मूळ गाव. पण कारेकर कुटुंबीय मडगाव येथे स्थायिक झाल्याने प्रभाकर कारेकर यांचे शालेय शिक्षण मडगावच्या नोवेरा हायस्कूल येथे झाले. कारेकर यांच्या घराण्यात गाणे नव्हते किंवा गाण्याचा पिढीजात वारसाही त्यांना लाभला नाही. पण प्रभाकर कारेकर यांचे वडील जनार्दन कारेकर यांना गाण्याची हौस व आवड होती. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. गावातील मंडळीही त्यात सहभागी असायची. भजनाच्या त्या कार्यक्रमात पं. कारेकरही सहभागी होत असत. पण पुढे गाणे हाच आपला श्वास व ध्यास होणार आहे याची त्यांना स्वत:लाही कल्पना नव्हती.

एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात गाणी म्हणण्याची वेळ आली. तेव्हा त्यांनी पं. सुरेश हळदणकर यांनी गायलेली दोन नाटय़पदे तयार केली. व ती गायली. मडगावातील काही प्रतिष्ठित मान्यवरही या स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या वडिलांना हा खूप छान गातो, त्याला गाणे शिकवा, असे सांगितले. स्नेहसंमेलनातील त्यांच्या त्या गाण्यांमुळे त्यांना गोव्यात होणाऱ्या विविध उत्सवातून भजने गाण्यासाठी लोक बोलवायला लागले. हा गाणे चांगले गातो तर त्याला मुंबईला पाठवा, असेही काही परिचितांनी वडिलांना सांगितले. प्रभाकर कारेकर आणि त्यांचा मोठा भाऊ नारायण या दोघांना मुंबईला पाठवायचा प्लॅन वडिलांनी तयार केला. गोव्यात तेव्हा पोर्तुगीजांची राजवट होती. त्यामुळे गोव्याची हद्द ओलांडून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करणे मोठे कठीण होते. पण वडिलांनी नियोजनानुसार सर्व सुरळीत पार पाडले आणि वडिलांसह ते बेळगावमार्गे मुंबईत पोहोचलो. प्रभाकर कारेकर यांच्या वडिलांचे एक मित्र माहिमला राहात होते. राहण्याची सोय तिथे झाली. जरा स्थिरस्थावर झाल्यानंतर वडील प्रभाकर कारेकर यांना पं. सुरेश हळदणकर यांच्याकडे घेऊन गेले. माझ्या मुलाला तुम्ही शिकवावे, अशी विनंती वडिलांनी हळदणकर यांना केली. त्यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि मी याला शिकवेन, असे त्यांनी वडिलांना सांगितले. अशा प्रकारे पं. सुरेश हळदणकर यांच्याकडे गाण्याचे शिक्षण सुरु झाले. एके दिवशी मी कुठे राहतो?, असे त्यांनी विचारल्यावर माहीमला असे उत्तर दिले. त्यावर उद्यापासून आमच्या घरी राहायला यायचे, असा प्रेमळ आदेशच त्यांनी दिला. दहा वर्षे त्यांच्याकडे राहून ते गाणे शिकले. या काळात त्यांना शास्त्रीय गायन ऐकायला व शिकायला मिळाले. पं. सुरेश हळदणकर हे नाटकातूनही काम करत असत. शास्त्रीय संगीताच्या मैफलीही व्हायच्या. त्यांच्या मैफलीत तंबोरा धरायचीही संधी त्यांना मिळाली. त्यानंतर पं.जितेंद्र अभिषेकी यांच्याकडेही प्रभाकर कारेकर यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. पं. अभिषेकी बुवांकडे ते नऊ वर्षे शिकत होते. त्यानंतर पं. सी. आर. व्यास यांच्याकडेही काही वर्षे गाणे शिकले. त्यांची गायन शैली वेगळी होती. त्यांना पं. सी. आर. व्यास यांच्याकडेही भरपूर राग, ठुमरी, भजने शिकायला मिळाली. पं. हळदणकर व पं. अभिषेकी या दोघांचीही गाण्याची शैली भिन्न होती. अभिषेकी बुवांचे गाणे गंभीर, शांत तर हळदणकर बुवांचे गायन तडफदार होते. पं. हळदणकर, पं. अभिषेकी, पं. व्यास या तीनही गुरुंकडून जे घेतले, शिकलो त्याला प्रचंड रियाजाची जोड देत त्यांनी अभ्यास सुरु ठेवला व आपली वेगळी शैली निर्माण केली. कारेकर यांचे गाण्याचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी छोटे-मोठे गाण्याचे कार्यक्रम, मैफली करायला सुरुवात केली होती. गणेशोत्सवातही कार्यक्रम व्हायला लागले. त्यांची पहिली जाहीर मैफल ठाण्याला झाली होती. त्या कार्यक्रमाची बिदागी होती अवघे शंभर रुपये. ते कार्यक्रम, मैफली करत होतो. लोकांना प्रभाकर कारेकर हे नाव माहिती झाले पण म्हणावी अशी खास अशी संधी अजूनही त्यांना मिळाली नव्हती. पण ती संधी तबला वादक लालजी देसाई आणि पु. ल. देशपांडे यांच्यामुळे प्रभाकर कारेकर यांना मिळाली. पु.ल. यांनी ‘शाकुंतल ते सौभद्र’ असा एक कार्यक्रम बसवला होता. पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे आणि अन्य काही दिग्गज गायक या कार्यक्रमात गाणार होते. लालजीनी पुलंना प्रभाकर कारेकर यांचे नाव सुचविले आणि प्रभाकरलाही या कार्यक्रमात संधी द्यावी, अशी विनंती पुलंना केली. पुलंनी भेटायला बोलावले व काही गाऊ न दाखवायला सांगितले. पुलंना माझे गाणे आवडले आणि तुला या कार्यक्रमात घेतले, असे सांगितले. ‘प्रिये पाहा’ व ‘नच सुंदरी करु कोपा’ अशी दोन नाटय़पदे त्यांना म्हणायची होती. स्वत: पुलंनी ती गाणी प्रभाकर कारेकर यांचे कडूनच बसवून घेतली. रवींद्र नाटय़ मंदिरात कार्यक्रम होता. गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रभाकर कारेकर यांचे गाणे सगळयात शेवटी ठेवले होते. प्रभाकर कारेकर यांनी ‘प्रिये पाहा’ या नाटय़पदाला एक तान घेतली आणि टाळ्यांचा जो काही कडकडाट झाला त्यातच त्यांना गाण्याची पावती मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर यांनी खूप छान गायलास, असे सांगून कौतुक केले. त्यानंतर हे मूळचा गोव्याचे आहेत हे त्यांना कळल्यानंतर पुढे पं. प्रभाकर कारेकर व भाऊसाहेब बांदोडकर यांचा स्नेह अधिकच वृद्धींगत झाला.

एका मुलाखतीत आपण अभिनेते होता होता कसे राहून गेलो याविषयी बोलताना पं. प्रभाकर कारेकर म्हणतात, शास्त्रीय गायन, नाटय़संगीत आणि मैफलींमुळे नाव झाल्यानंतर मला ही संधी चालून आली होती. विद्याधर गोखले लिखित ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मी ही हो म्हटले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. पण त्याच वेळी केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मला मिळाली. केंद्र शासनाची ती शिष्यवृत्ती मानाची समजली जाते. शिष्यवृत्ती की नाटक यापैकी एकाची निवड मला करायची होती आणि मी शिष्यवृत्ती स्वीकारायचे ठरवले. गोखले अण्णांना तसे सांगितले. सुरुवातीला ते रागावले. मग तुम्हीच सांगा मी काय करू?, असा प्रश्न त्यांना केल्यानंतर मी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनीही स्वागत केले. त्यानंतर संगीत नाटक आणि अभिनय सुटला तो सुटला. पुन्हा काही त्याकडे वळलो नाही. पुढे शास्त्रीय व नाटय़ संगीत गायन यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि माझ्याकडून उत्तमात्तील उत्तम असे गाणे रसिक श्रोत्यांना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात गाणे सादर करायला मिळणे हा मोठा बहुमान असतो. एका वर्षी प्रभाकर कारेकर यांना ती संधी मिळाली. रात्री अकरा वाजता गाणे होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी काही राग तयार केले. पण पहाटेचे दोन वाजले तरी त्यांचा नंबर काही लागला नाही. पहाटे चार वाजता आता तुम्हाला बसायचे आहे, असा निरोप त्यांना दिला गेला आणि त्यांनी पूर्ण तयारीनीशी राग ‘अहिर भैरव’ गायला सुरुवात केली. आप्पा जळगावकर (संवादिनी) व चंद्रकांत कामत (तबला) हे त्यांना संगीतसाथ करत होते. राग गायनानंतर आप्पांनी कारेकर यांना एखादे नाटय़पद म्हणायला सांगितले. कारेकर यांनी ‘प्रिये पाहा..’ म्हणायला सुरुवात केली आणि ते ही गाणे रंगले. रसिकांनी छान प्रतिसाद दिला. सवाई गंधर्व महोत्सवातील या संधीने त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली.

‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत. पं. हळदणकर, पं. अभिषेकी व पं. सी आर व्यास असे तीन गुरु पं. प्रभाकर कारेकर यांना लाभले. त्या सर्वाचे पं. प्रभाकर कारेकर यांच्या आयुष्यात महत्वपूर्ण स्थान आहे. या तीनही गुरुंच्या प्रती आदर आणि कृतज्ञता म्हणून ते दरवर्षी शास्त्रीय गायन आणि वादनाचा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम करतात. ‘स्वरांजली’ ही स्वरांचा उत्सव आहे. या महोत्सवाला २००२ मध्ये सुरुवात झाली. पं. प्रभाकर कारेकर यांनी स्थापन केलेल्या ‘स्वरप्रभा विश्वस्त न्यास’तर्फे गेली अनेक वर्षे हा सांगितिक आदरांजलीचा कार्यक्रम होत आहे. अनेक दिग्गज गायक व वादकांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावली आहे. संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्थेने स्वतःला वाहून घेतले आहे. संस्था युवाकलाकारांना व्यासपीठ मिळवून देते आणि होतकरू कलाकारांना मदत करते. पं. प्रभाकर कारेकर यांना मध्य प्रदेश शासनाचा मिळालेला ‘तानसेन’ पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या ७६ व्या वर्षांत असलेल्या पं. प्रभाकर कारेकर यांनी आता वयोपरत्वे कार्यक्रम व मैफली कमी केल्या आहेत. तरुण पिढीला आणि लहान मुलांना शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन ते करतात. घरी शिकवणी वर्गही घेतात. शास्त्रीय संगीतात रियाजाला खूप महत्व आहे. तो प्रचंड करा आणि तुमच्या गुरुंवर श्रद्धा ठेवा, असा सल्ला ते या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला देतात.

पं.प्रभाकर कारेकर यांचे गायन व नाट्यसंगीत

https://www.youtube.com/watch?v=nQdCS3rGzJY

https://www.youtube.com/watch?v=-0MKfZcWjLo&index=4&list=RDpZ616zQvR8I

https://www.youtube.com/watch?v=mJ_puwogMks

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..