नवीन लेखन...

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे

ज्येष्ठ इतिहास संशोधक, दुर्ग अभ्यासक, शिव चरित्र व्याख्याते पांडुरंगजी बलकवडे यांचा जन्म २० जून १९६० रोजी झाला.

पांडुरंगजींचे लहानपण पुण्यामध्ये शनिवारवाडा, लाल महाल आणि कसबा गणपती परिसरातील वडिलार्जित घरामध्ये गेले. ते १४ भावंडांपैकी सर्वात लहान. पांडुरंगजी हे हिंदवी स्वराज्याचे सरदार पदाती सप्तसहस्त्री सिंहगड विजेते नावजी बलकवडे यांचे वंशज आहेत. तानाजी मालुसरेंनी जिंकलेला सिंहगड किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. अशावेळी तानाजींसारखाच पराक्रम करून सरदार नावजी बलकवडे यांनी १ जुलै, १६९३ साली तो पुन्हा स्वराज्यात आणला. वेगवेगळे ३७ किल्ले जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

इयत्ता सातवीत असताना पांडुरंगजींच्या आयुष्यात एक कलाटणी देणारी घटना घडली. त्यांचे वडील त्यांना भारत इतिहास संशोधक मंडळात घेऊन गेले होते. तेव्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना पूर्वज नावजी बलकवडे यांची माहिती सांगितली. नावजींचा पराक्रम ऐकून चमत्कार घडला. त्यातूनच एक नवा इतिहासकार साकारायला लागला.
पांडुरंगजींना सैन्यदलात जाऊन आपल्या पूर्वजांसारखा देशासाठी पराक्रम गाजवावा, अशी तीव्र इच्छा होती. शारीरिक व्याधींमुळे ते सैन्यात भरती होऊ शकले नाहीत. परंतु, नियतीचा योगायोग असा की, भारतीय सेनेच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयात त्यांना योगायोगाने नोकरी लागली. गेली ४० वर्षे तिथे सेवा करीत असताना प्रत्यक्ष सैन्यदलाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातच उत्कृष्ट सेवेबद्दल आर्मी कमांडर ॲ‍वॉर्ड मिळाले.

१९७५ साली वडिलांनी भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांची ज्येष्ठ संशोधक ग. ह. खरेंची भेट करून दिली, ग्रंथालय दाखविले. मग पांडुरंगजी मंडळात जाऊन वाचन करू लागले. इतिहासाच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ते मोडी लिपी शिकले. नोकरीच्या वेळेनंतर पेशवे दफ्तरातील मोडी कागदपत्रांचे वाचन आणि सायंकाळी भारत इतिहास संशोधक मंडळात ग्रंथांचे वाचन असा दिनक्रम असायचा. पांडुरंगजींचे सातत्य आणि चिकाटी पाहून ग. ह. खरे, निनादराव बेडेकर, य. न. केळकर, रमाकांत पाळंदे, गजाननराव मेहेंदळे, डॉ. रवींद्र लोणकर, डॉ. सदाशिव शिवदे या त्यांच्या गुरुंनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आत्मविश्वास आला. नंतर ते मंडळात निबंधवाचन करू लागले.

पांडुरंगजींनी आजवर महाराष्ट्रातील आणि बाहेरचे मिळून सुमारे ४०० किल्ले पाहिले आहेत. जवळजवळ पाच हजार पुस्तकांचा संग्रह केला आहे. संशोधन कार्यातून वेळ काढून किल्ले पाहणे आणि पुस्तक संग्रह करण्यासाठी पैसे जमविताना प्रारंभी फार कसरत करायला लागायची. इतिहासाचे आणि विशेषत: मोडी कागदपत्रांचे संशोधन यामध्येही खूप वेळ जाऊ लागला. लग्न झाल्यानंतर घरखर्चासाठी पैसे पुरेनात. तेव्हा पर्याय म्हणून काहीतरी जोडधंदा करणे आवश्यक वाटले. मग ते रात्री ८.३० ते रात्री १ वाजेपर्यंत रिक्षा चालवत असत. सकाळी ७.३० ते २.३० नोकरी, दुपारी २.३० ते ५.३० पेशवे दफ्तर, सायं. ६ ते ८.३० भारत इतिहास संशोधक मंडळातील संशोधन आणि रात्री ८.३० ते १ जोडधंदा म्हणून रिक्षा चालविल्यानंतर केवळ रात्री १ ते सकाळी ६ इतक्या विश्रांतीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. डोक्यात जो इतिहासपुरुष शिरला होता, तो हे सगळे करण्याची जिद्द देत होता. किल्ल्यांची भ्रमंती करीत असताना त्यांनी त्या आधारे किल्ल्यावरच्या वस्त्या, वास्तू, अधिकार्यांाची आणि सैनिकांची नावे, व्यवस्थापन, जमाखर्च ही माहिती व्याख्यानांमधून देत गेल्यामुळे प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आजवर महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवराय, संभाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर त्यांनी सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. राजाराम महाराजांच्या समाधीचा इतिहास, तसेच ढमढेरे घराण्याचा इतिहास यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव, महाराष्ट्र सरकारच्या शालेय पुस्तक निर्मिती आणि संशोधन केंद्र म्हणजेच ‘बालभारती’ यावर इतिहास मार्गदर्शक सदस्य, महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले आणि सागरी दुर्ग संवर्धन आणि विकास या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ते काम करीत आहेत.

लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे. मंडळाने त्यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून पेशवे दफ्तरातील मोडी कागदपत्रे मिळवून त्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर वेगवेगळे खंड संपादन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या निर्मितीमध्ये एक तज्ज्ञमार्गदर्शक, किल्ले रायगड प्राधिकरणात सल्लागार सदस्य, पानिपत स्मारक समिती, पुणे विद्यापीठाची शैक्षणिक परिषद, लाल महाल उत्सव समिती, लोणावळ्याजवळील वडगाव मावळ येथील युद्ध विजय दिन समिती, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिवादन यात्रेच्या अभिवादन समितीचा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. स्वा. सावरकर यांना अज्ञात असलेला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास शोधण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी पुणे अस्तित्वात असून एक प्रगत मानवी संस्कृती येथे नांदत होती, हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. ७०० वर्षांपूर्वीच्या यादवांच्या काळात पुण्यात असलेल्या नारायणेश्वर आणि पुण्येश्वर मंदिरांचा मुस्लीम आक्रमकांनी विध्वंस केला. २४ वर्षांपूर्वी महानगरपालिकेचे त्या परिसरात खोदकाम चालू असताना प्राचीन मंदिरांचे अवशेष मिळाले. ते पांडुरंगजींनी जमा करून भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवले आहेत आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाने त्याची नोंदणी केलेली आहे. त्यांनी या मंदिरांचे अवशेष लोकांसमोर आणून त्यांचा इतिहास नव्याने उलगडून सांगितला. मराठ्यांच्या वसई मोहिमेत बलकवडेंचे पूर्वज सरदार होनाजी बलकवडे यांनी एका दिवसात ठाणे मुक्त केले. त्यानिमित्त पांडुरंगजींनी दरवर्षी २७ मार्च रोजी ‘ठाणेमुक्ती दिन’ साजरा करण्यास प्रारंभ केला.

गेली ४० वर्षे पेशवे दफ्तरातल्या अप्रसिद्ध कागदपत्रांचा शोध घेत असताना त्यांना मराठशाहीतील योद्धे आणि ऐतिहासिक घराणी यांची माहिती मिळत गेली. भारतीय सैन्यदलातील अनेक अधिकार्यां शी त्यांचा चांगला संपर्क असून त्यांच्या ज्ञानाचे, अनुभवाचे आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शन लाभावे व त्यापासून युवकांना देशकार्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने त्यांचे सन्मान करण्यासाठी पांडुरंगजी प्रयत्नशील असतात.

महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून दौरे करीत असताना, त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने असंख्य कुटुंबे जोडली आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून पांडुरंगजी त्याला त्याच्या पूर्वजांची माहिती सांगतात. प्रवासामध्ये स्वतःच्या व्यवस्थांचा बडेजाव न करता, कुठेही सहज सामावून जातात. स्थानिक कार्यकर्त्यांना सतत नवनवीन उपक्रम सुचवितात. स्वतःच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील कोणालाही काही अडचण, समस्या आल्यास पांडुरंगजी त्याला मदत करण्यासाठी झोकून देतात. राज्यभरातून संदर्भ विचारण्यासाठी अनेक मंडळी त्यांच्या घरी येतात किंवा फोन करतात. त्या प्रत्येकाला ते सविस्तर माहिती देतात आणि त्याचे समाधान करतात. त्यांच्या घरी आलेल्या सर्वांचा पत्नी कमल यादेखील हसतमुखाने पाहुणचार करतात. मागील वर्षी त्यांची कन्या सई हिच्या विवाहाला समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पांडुरंगजी सेनेच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयातून निवृत्त झाले आहेत. गेल्या ४५ वर्षांच्या त्यांच्या संशोधनातून मिळालेल्या ज्ञानातून त्यांना मराठ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष आणि १८व्या शतकात साम्राज्य निर्माण करीत असताना केलेला संघर्ष जगासमोर आणायचा आहे. मराठ्यांनी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, बंगाल, उत्तर प्रदेश, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब इथे राज्य निर्माण केले. हे राज्य निर्माण करीत असताना तिथे हिंदू संस्कृतीचे आणि समाजाचे रक्षण केले. परंतु, भारतामध्ये ब्रिटिशांनी आणि साम्यवादी इतिहासकारांनी मराठ्यांना तुच्छ आणि लुटारू ठरविण्याचा प्रयत्न केला आणि चुकीचा इतिहास मांडला. पांडुरंगजींच्या पुढाकाराने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित छत्रपती शिवाजी अध्यासनाच्या माध्यमातून मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासावर अनेक खंड प्रकाशित करण्याचा प्रकल्प सध्या सुरू आहे. मराठ्यांचे राष्ट्र, संस्कृती आणि समाजप्रेम हे ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडणे याच दृष्टिकोनातून ते आपला अभ्यास आणि लेखन करीत आहेत.

— सुधीर थोरात.

संकलन: संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..