नवीन लेखन...

ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत पेंटर

ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत पेंटर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.

बाबूराव आणि आनंदराव पेंटर या चित्रकार आणि शिल्पकार बंधूंनी कोल्हापुरात ७७ वर्षांपूर्वी चित्रपट व्यवसायासाठी कॅमेरा तयार केला, त्यापैकी आनंदराव पेंटर यांचे वसंत पेंटर हे चिरंजीव. बाबूराव पेंटरांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली. याच दरम्यान वसंत पेंटर यांनी इंग्रजी चौथीत असतानाच शाळा सोडली आणि ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. कंपनीत सेट उभे करणे, तालीम घेणे यासारख्या सगळ्या कामांचे निरीक्षण त्यांनी तेथे केले. यातूनच चित्रपटाविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. त्यांना कॅमेराची ओढ होती. रंग आणि ब्रश लहानपणापासून ओळखीचे होते, म्हणून त्यांनी सीन पेंटिंगला उमेदवारीही केली, तसेच प्रयोगशाळेमध्येही कामही केले. पुढे चित्रपटाची पोस्टर्स आणि बॅनर्स तयार करण्याचे काम करत असतानाच कलाकारांच्या चेहर्यातवरचे हावभाव निरखत, त्यांची अभिनयाची जाण तयार होत गेली. वसंतरावांच्या समोर बाबूराव पेंटरांचा आदर्श होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना दिग्दर्शक व्हावे असे वाटायचे. चित्रकार उत्तम दिग्दर्शक होऊ शकतो, अशी त्या काळी ठाम समजूत होती आणि त्या उक्तीचे खरे उदाहरण म्हणून आपल्याला वसंत पेंटर यांच्याकडे पाहता येते. पुढे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद पडल्यावर वसंत पेंटर प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाले. प्रभात कंपनीत स्क्रीन पेंटिंग आणि पोस्टर्स-बॅनर्स विभागात रंगकाम करू लागले आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या नवनवीन तंत्रांचा अभ्यासही त्यांनी केला. दरम्यान चित्रपटाला ध्वनीची जोड मिळाली आणि पेंटरांनी याही तंत्राची माहिती घेतली. स्टिल फोटोग्राफी करत असतानाच त्यांनी एका मद्रासी कंपनीच्या तमिळ चित्रपटाचे छायाचित्रकार म्हणून काम केले. याच दरम्यान दुसऱ्या एका तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांना प्रभात सोडावी लागली. त्यानंतर वसंत पेंटर ‘हंस पिक्चर्स’मध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम करू लागले. पण प्रभातमधून बाहेर पडलेल्या धायबरांनी आपल्या नंदकुमार पिक्चर्ससाठी कलादिग्दर्शक म्हणून वसंत पेंटरांना पुण्याला बोलावून घेतले. आनंदराव व बाबूराव पेंटर यांचे शिष्य कलादिग्दर्शक एस. फत्तेलाल यांची पहिल्यापासूनच वसंतरावांवर मायेची आणि कौतुकाची नजर होती. वसंतरावांना आपले काम सांभाळून प्रभातमध्ये सगळीकडे वावर करण्याची मुभा होती. ‘रामशास्त्री’चे चित्रीकरण पाहताना त्यांनी एक दोन दृश्ये फत्तेलाल यांना सुचवली. फत्तेलाल यांनी दिग्दर्शक विश्राम बेडेकरांना ते सांगितले, त्यांनाही ती कल्पना आवडली. तेव्हा वसंत यांना दिग्दर्शनाची समज आहे, हे फत्तेलालांच्या लक्षात आले. त्यांना पुढे वाव मिळावा म्हणून स्टोरी डिपार्टमेंटमध्ये त्यांना चर्चा करायला बसायला सांगितले. डी.टी. कश्यप यांच्या ‘नई कहानी’सारख्या हिंदी चित्रपटाच्या कथालेखनाच्या वेळीही ते बसले होते. कलेसाठी वेडे होणाऱ्या, चित्रपटनिर्मितीच्या सर्व विभागांची माहिती असणाऱ्यात, दिग्दर्शनाचीही समज असणाऱ्या या तरुणाला दिग्दर्शनाची संधी मिळाल्यास तो त्याचे चीज करील, असे फत्तेलालांना वाटत होते आणि तो योग लवकरच आला. वसंतराव पेंटरांवर प्रभातच्या ‘गोकुळ’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम सोपवले. त्यात सप्रू, अनंत मराठे, कमला कोटणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुधीर फडकेंचे संगीत होते. त्या काळात प्रभातमध्ये यशवंत पेठकर, डी.टी. कश्यप, पी.एल. संतोषी असे नामांकित दिग्दर्शक होते. तरीही पुढे त्यांच्या मुकाबल्यात वसंतरावांना ‘सीधा रास्ता’ हा चित्रपट दिग्दर्शनाला मिळाला. यानंतर वसंतरावांनी कमला कोटणीस यांचा ‘आहिल्योद्वार’ हा आणखी एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. कमला कोटणीस, सप्रू आणि उल्हास यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. स्नेहल भाटकर या चित्रपटाद्वारे प्रथमच संगीत दिग्दर्शक म्हणून पुढे आले. याच काळात वसंतराव प्रभात सोडून मुंबईला आले. नर्गिस यांनी प्रभातमध्ये काम केले होते. त्या वेळी त्यांच्या कानावर वसंतराव पेंटरांचे नाव गेले होते. त्यांनी वसंतरावांना बोलावून आपल्या ‘भीष्मप्रतिज्ञा’ या हिंदी पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन सोपवले. त्यात नर्गिस आणि कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामुळे प्रभातचा दिग्दर्शक म्हणून वसंतरावांच्या नावाचा मुंबईत दबदबा निर्माण झाला होता. ‘भीष्मप्रतिज्ञा’च्या यशामुळे वसंतरावांना बाबूराव पैंच्या फेमस पिक्चर्सच्या ‘मुरलीवाला’ या कृष्णाच्या जीवनावरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मिळाले. त्यानंतर ‘कच देवयानी’ हा आणखी एक पौराणिक चित्रपट त्यांनी केला. पौराणिक चित्रपट करून कंटाळलेल्या वसंतरावांनी ना. ह. आपटे यांच्या कथेवरून ‘सजनी’ हा सामाजिक आशय व्यक्त करणारा चित्रपट काढला. या चित्रपटामुळे सुलोचनाबाईंना हिंदीत वाव मिळाला, हा चित्रपट गाजला. असे असूनही वसंतरावांना ‘गोकुल का चोर’ हा पौराणिक चित्रपट दिग्दर्शित करावाच लागला. ‘प्यार की जीत’ हा अजंठा लेण्यावरील प्रेमकथेचा चित्रपटही त्यांनी केला. क्षेत्र छोटे असले तरी मोकळेपणाने काम करायला मिळावे, म्हणून मराठी चित्रपट करण्यासाठी वसंतराव आपल्या गावी कोल्हापूरला परतले आणि त्यांची एक नवी कारकिर्द सुरू झाली. तो जमाना तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. तमाशाला रहस्याची झालर देणारा ‘१२ वर्षे ६ महिने ३ दिवस’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ना.ग. करमकर त्याचे लेखक होते. उमा, सूर्यकांत, राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

वाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला. तर पुढे देवदत्त पाटील या प्रसिद्ध कादंबरीकाराने लिहिलेला ‘हे दान कुंकवाचे’ आणि ‘जखमी वाघीण’ हे ग्रामीण चित्रपट केले. पुढे ‘थांब…थांब… जाऊ नको लांब’ हा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या लोकप्रिय जोडीला घेऊन पुन्हा एक विनोदी चित्रपट काढला. वसंतरावांनी ‘सडा हळदी-कुंकवाचा’ हा ग्रामीण रहस्यमय कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केला.

‘वारणेचा वाघ’ला १९७०-७१ मध्ये महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, ‘सुगंधी कट्टा’साठी १९७४-७५चे महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, तसेच उत्कृष्ट पटकथा लेखनाचे पारितोषिक लाभलेले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ‘चित्रभूषण पुरस्कार’ १९९६, महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार-२००० असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत.

वसंत पेंटर यांचे ३१ मे २००६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..