नवीन लेखन...

सवयींचे व्याकरण !

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही.

चित्रपट /नाटक अशा कलाप्रकारांमध्ये पात्रांना विविध सवयी दाखविल्या असतात. उदा. “वाजे पाऊल अपुले ” या नाटकात विश्राम बेडेकरांनी मुख्य पात्र सतत भेदरलेले आणि संशय घेणारे दाखविले आहे. “पार्टनर ” या कादंबरीत वपु दोन मुलांच्या आईला सतत दोघांमध्ये तुलना करण्याची सवय दाखवितात आणि एक दुसऱ्यापेक्षा कसा वरचढ आहे या प्रयत्नांमधून दोघांमधील नाते खच्ची करणारी आई चित्रित करतात. ” वक्त- रेस अगेंस्ट टाइम ” चित्रपटातील बोम्मन इराणीला इतरांपेक्षा मी आणि माझे कुटुंब कसे श्रेष्ठ आहे याची बढाई मारण्याची सवय दाखविली आहे. तुलना करण्याची सवय नकारार्थी असते तर बढाईखोर असलेल्या व्यक्तीला टाळण्याची अथवा त्याची टांग खेचण्याची प्रवृत्ती साहजिकच इतरांमध्ये असते. काहीवेळा अशा लकबी (केसांचा कोंबडा उडविणे, एकाच वाक्यांशाची पुनरावृत्ती करणे) मुद्दाम पात्रांमध्ये खोवलेल्या असतात ज्यायोगे ते पात्र डोळ्यांत भरते आणि प्रेक्षक त्याच्याशी समरस होतात. प्रशांत दामले ला ” अरे, आहे काय आणि नाही काय ” अशी स्टाईल दिल्याने ते पात्र प्रसिद्ध झाले आहे.

आपल्या सवयी आपली ओळख बनतात. सवयी सुटता सुटत नाहीत. एकदा व्यसनाची सवय लागली की ती खूप काळ साथ देते. काही सवयी नकळत लागतात आणि कोणीतरी ते ध्यानी आणून दिल्याशिवाय सहजी लक्षात येत नाही. उदाहरणार्थ सतत टीव्ही बघणे, भ्रमणध्वनीमध्ये तासनतास डोके घालून बसणे!

सवयी खड्या पहाऱ्यात कां असाव्यात?

१) तुम्ही पालक/ शिक्षक/ वरिष्ठ असाल तर तुमच्या वागण्याची इतरजण लगेच नक्कल करतात -तुम्ही कसे बोलता, कसे उठता-बसता यांचे तुमच्याही नकळत निरीक्षण होत असते.

२) तुम्ही रोज व्यायाम करीत असाल, नियमित वाचन करीत असाल तर त्याची नोंद घरातील लहान मुले घेत असतात.

३) कार्यालयात वरिष्ठांच्या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांशी (सहकारी, कनिष्ठ, ग्राहक, पुरवठादार) कसे वागता, कसे निर्णय घेता हे बाकीच्यांच्या नजरेतून सुटत नाही.

४) तुमच्या सवयी इतरांच्या मनातील तुमचे स्थान ठरवितात.

५) आपोआप तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून सगळे चालायला लागतात.

निर्णय घेताना इतर घटकांबरोबरच आपण काय बरोबर आणि काय चूक हे आतल्या आवाजाला विचारून पाहतो. सदसद्विवेकबुद्धीतून आपले विश्वास, श्रद्धा जन्म घेतात. परिस्थितीनुसार त्यामध्ये अपरिहार्यपणे बदल घडत असतात. ज्ञान मिळाले की परिपक्व माणसे त्यांच्या श्रद्धास्थानांची झाडाझडती घेतात आणि आवश्यकता भासल्यास त्यांत बदलही घडवून आणतात. ही साखळी आणि त्यामधील घटकांचे परस्पर संबंध असे-

विश्वास (श्रद्धा) यातून विचार, विचारांमधून वर्तन, वर्तनाचे हळूहळू सवयींमध्ये रूपांतर, सवयी चारित्र्याकडे अंगुलीनिर्देश करतात, आणि अंतिमतः चारित्र्य यशापर्यंत नेऊन पोहोचविते. जाण जितकी कमी,विश्वास तितका अधिक ! विश्वास आणि माहिती यात मूळ फरक इतकाच- विश्वासामध्ये आपण जे ऐकतो, वाचतो, पाहतो ते स्वीकारायचे की नाही याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपणाकडे असते. माहितीमध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपणास ज्ञान असते, पंचेंद्रियांमधून घेतलेला एखादा अनुभव असतो, किंवा आपल्या कर्तृत्वाची पोचपावती असते. मात्र माहिती/ज्ञानाची पहिली आवश्यक पायरी म्हणजे विश्वास!

निवडीचे स्वातंत्र्य –

सवयींचे अध्ययन करताना निवड आणि स्वातंत्र्य हे आपल्या हातातील दोन घटक महत्वाचे ठरतात आणि त्यांचा नीरक्षीरविवेक बुद्धीने वापर करावा लागतो. टीव्ही बघायचा की पुस्तक वाचायचे हे आपल्याला ठरवावे लागते. किती वेळासाठी यातील एकाबरोबर आपण असू, हाही निर्णय आपलाच! निरर्थक गप्पा मारत बसायच्या की काही सर्जनात्मक करण्यात वेळ घालवायचा, सकाळी उठल्यावर प्रार्थना करायची की व्हाट्सअप वरील व्हिडीओ /संदेश वाचत त्यांना उत्तर द्यायचे, एखाद्या गोष्टीवर निव्वळ विचार करीत राहायचे की काही कृती करायची, छोट्या रकमांपासून बचतीची सवय लावायची की लाखो रुपयांची लॉटरी लागायची वाट बघत बसायचे, जीवनात सतत तक्रार करीत बसायचे की मिळालेल्या संधीचे सोने करायचे हे सगळे निवडीचे संभाव्य पर्याय आहेत. आता बदलासाठी सज्ज व्हायचे की आहे ते जगत बसायचे हे ठरविणे सर्वस्वी आपल्या हाती असते. याचप्रकाराचे निवडीचे स्वातंत्र्य सवयींचा बाबतीत असते. आहे त्या सवयी सुरु ठेवायच्या की त्याजागी अधिक साजेशा सवयी आणायच्या हे प्रत्येकाचे हाती असते.

आपल्या काही सवयी बदलायच्या असतील (विशेषतः ज्या आपल्या ध्येयपूर्तीच्या आड येत असतील) तर ते सोपे असते, सहज शक्य असते, त्याला फारसे कष्ट पडत नाहीत फक्त इच्छाशक्तीची गरज असते. आणि हो, त्या जोडीला शिस्त आणि नियोजन या जोडगोळीची कुमक असावी लागते. तरच ते सातत्य टिकू शकते. कधीकधी मनोनिग्रह लागतो. नवं वर्षाच्या सुरुवातीला अनेक प्रकारचे संकल्प केले जातात – पहाटे लवकर उठणे, सकाळी चालणे/ व्यायाम करणे, चहा किंवा कॉफी सोडणे, वजन घटविणे, सिगारेट आणि इतर व्यसन सोडणे वगैरे वगैरे ! हे संकल्प दुरून अत्याकर्षक असतात पण एक-दोन दिवसात आपण चालढकल केल्याने मार्गी लागत नाहीत. गंमत म्हणजे न करण्याचे/ टाळण्याचे असंख्य बहाणे आपल्यापाशी असतात. काल रात्री उशिरा झोपलो, मग आज सकाळी वेळेवर जाग आली नाही म्हणून व्यायाम चुकला वगैरे! येथे मनोनिग्रहाची आवश्यकता असते. परगांवचे प्राध्यापक जर महाविद्यालयात उशिरा आले आणि पहिला तास हुकण्याचे कारण त्यांनी बस चुकली/ पंक्चर झाली/उशिरा आली असे दिले तर माझे प्राचार्य म्हणायचे – ” एक बस लवकर निघायचे होते मग! ”

नव्या आणि मदतनीस ठरू शकतील अशा सवयी सापडल्या की – लगेच अंमलबजावणीला सुरुवात करावी, कशाची प्रतीक्षा करू नये, परिपूर्ण अथवा बिनचूक अवस्था यावी म्हणून सुरुवातच करायची नाही असे करू नये आणि मुख्य म्हणजे बदलासाठी थोडे लवचिक असावे. एका व्यक्तीला जेव्हा डॉक्टरांनी रोज चालण्याचा व्यायाम सांगितला तेव्हा आधीच बजावले- ” रोज सकाळीच चालायला हवे असे नाही, संध्याकाळी/रात्री झोपण्यापूर्वी चालायला हरकत नाही, मैदान, जॉगिंग ट्रॅक अशी अट नको, रस्त्यावर किंवा अगदी टेरेसवर चालला तरी चालेल. कपड्यांची अट नाही, घरातल्या कपड्यांवर हिंडू शकता, फक्त रोज न चुकता ४०-४५ मिनिटे चालायचा वसा हाती घ्या, घेतला वसा टाकू नका.”

आधी सवयी विकसित कराव्यात मग आयुष्य सवयीचे होते. मात्र नव्या सवयींचा पाया जुन्या श्रद्धा /विश्वास असू शकत नाहीत हेही लक्षात ठेवावे. एक सोपा मार्ग म्हणजे अशा सवयी असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे. म्हणजे शरीरयष्टी सुधारायची असेल तर रोज नेमाने न चुकता व्यायामशाळेत जाणाऱ्यांची संगत धरावी. अभ्यासात मन लागत नसेल तर वर्गात पहिला येणाऱ्या मित्राच्या सोबत अभ्यास करावा इतके सोपे हे व्याकरण आहे.

अगदी वंचित, दुर्बल, अन्यायग्रस्त पार्श्वभूमी असली तरीही तो भूतकाळ ठरविले तर बदलता येतो. जगात आणि आपल्याकडे अशा कितीतरी महनीय व्यक्तींची उदाहरणे आहेत ज्यांनी सगळं सोसून, सहन करून स्वतःचे उन्नयन करून घेतले. “हे मला मान्य नाही, मी यावर मात करणारच  ” या जिद्दीपोटी, प्रखर परिश्रमांनी आणि प्रबळ इच्छाशक्तीचा वापर करून आजही केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त ती व्यक्ती तयार असायला हवी. आपल्याकडे म्हण आहे- “विद्यार्थी तयार असला तर शिक्षक आपोआप अवतरतो.” सवय शिकता येते, अंगी बाणवता येते , बदलताही येते. आपले ९० टक्के वर्तन आपल्या सवयींचे बाह्यरूप असते. काही वैश्विक सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न तर करू या –

१) प्रश्न विचारण्याची सवय – या सवयीचे लहानपणापासून आपली शिक्षण व्यवस्था पद्धतशीरपणे खच्चीकरण करीत असते. सतत “हाताची घडी आणि तोंडावर बोट ” एवढीच परंपरा आपण पुढे नेतो. आत डांबलेल्या प्रश्नांनी मग घुसमट होते. प्रश्न विचारायचे कोणाला, कोठे समर्पक उत्तरे मिळतील याचाही शोध मंदावतो आणि आपण पुढे येईल ते निमूटपणे स्वीकारतो. प्रश्न कधीच चूक नसतात, उत्तरे चुकीची, दिशाभूल करणारी असू शकतात. लहानपणापासून प्रश्न विचारण्याच्या सवयीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

२) निर्णय क्षमतेची हातोटी – आयुष्यात रोज छोटे-मोठे अनेक निर्णय घ्यावे लागतात – कधी एकट्याने कधी इतरांबरोबर, त्यांच्या साहाय्याने ! प्रत्येक निर्णयाचे काही ना काही बरे-वाईट परिणाम असतातच. प्रत्येक निर्णयात जोखीम अध्याहृत असते. निर्णयच न घेणे, अप्रिय निर्णय घेताना टाळाटाळ करणे, निर्णयांची जबाबदारी टाळणे, निर्णय प्रक्रिया इतरांवर सोयीस्कररीत्या ढकलून स्वतः नामानिराळे राहणे अशा प्रवृत्तीची माणसे आपण कायम बघत असतो. त्या पार्श्वभूमीवर पूर्ण विचारांती निर्णय घेणे, या प्रक्रियेत हृदयाऐवजी मेंदू वापरणे आणि परिणामांच्या बऱ्या-वाईटाचे उत्तरदायित्व स्वीकारणे ही अत्यावश्यक सवय आहे.

३) दैनंदिन वाचनाची सवय – “दिसामाजी काहीतरी लिहीत जावे ” या वचनाइतकेच रोज काहीतरी वाचण्याची सवय जोपासायला हवी. शास्त्रीय दृष्टिकोनातून मेंदूला खाद्य पुरविण्यासाठी रोज किमान सहा मिनिटे वाचन करावे असे मानतात. त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा अबाधित राहतो आणि कार्यक्षमता वाढते. स्मृतिभ्रंशापासून सुटका होते.

४) व्यायाम, ध्यान, संगीत श्रवण – या गोष्टी दिनक्रमात बसवायलाच हव्यात, इथे टाळाटाळ महागात (आरोग्य दृष्ट्या) महाग पडू शकते. किमान ५००० पावले रोज टाकायलाच हवीत.

५) बचतीची सवय– भविष्याकरिता आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा अवश्यमेव बाजूला काढून ठेवायलाच हवा. वाढत्या वयात उत्पन्नाचे स्रोत घटतात आणि खर्चाचे वाढतात. त्यांच्यात मेळ घालून स्वतःच्या आर्थिक निर्भरतेसाठी आणि ताठ मानेने जगण्यासाठी ही सवय आवश्यक आहे. अचानक येणाऱ्या घटनांना तोंड देण्याची तरतूद आधीच करायला हवी.

६) ध्येय निश्चितीची सवय – ध्येय आपल्या आयुष्याला दिशा देते आणि आपला वेळ, संसाधने, श्रम सगळ्यांची बचत करते. भविष्यकाळात आपला काय बनण्याचा इरादा आहे, हे आधीच ठरविलेले बरे म्हणजे त्यानुसार नियोजन करता येते. अन्यथा प्रवाहपतित होण्याची पाळी येते. २०२० सालाने आपणा सर्वांसाठी एक ध्येय तर अधोरेखित करून ठेवलंय – “आरोग्य संवर्धन, धडधाकट पणाला प्राधान्य देणे.”

७) दृढसंकल्पांची सवय – छोटी -छोटी , मध्यम कालीन ध्येयसाधना अवश्य असावी पण एखादा पूर्ण आयुष्याला पुरून उरणारा, अर्थ देणारा संकल्प करण्याची सवय असावी. उदा. आयुष्यात किमान पन्नासवेळा रक्तदान करणे! असे संकल्प आपला प्रवास अधिक तीक्ष्ण, अधिक धारदार बनवितात. दृढसंकल्प एकापेक्षा अधिक असतील तर उत्तमच पण किमान एक असावा. आणि त्यावर श्रद्धा असावी.

८) कल्पनादृश्यांची सवय– ही मोठी विलक्षण देणगी ठरू शकते. आपले भवितव्य कल्पनेने अंतःचक्षूंसमोर आणणे! शांत,थंड मनाने आपली स्वप्ने, ध्येये साकार झाल्यावर कशी दिसतील, त्यानुरूप आयुष्य किती देखणेपणाने बदलेल असे रंजन करावे. त्यातून सकारात्मकता हाती लागते आणि किरकोळ पराभूत करू शकणारे प्रसंग शक्तिहीन होतात.

९) देण्याची सवय– हातांनी यथाशक्ती देण्याची सवय आपणास विनम्र आणि कृतज्ञ बनविते. पैसा, वेळ,ज्ञान जे जे शक्य असेल ते द्यावे. किती देतोय त्याचे मोजमाप ठेवू नये. “देणाऱ्याचे हात घ्यावे ” असे करंदीकरांनी सुचविले आहेच.

१०) शांतपणे स्व-स्वीकार आणि त्याबाबत कृतज्ञ असणे – यातून नकाराची वाटचाल स्वीकाराकडे होते. मग आनंद,समाधान, भरभराट आणि स्वतःचा विकास हाती लागण्याचा मार्ग दिसायला लागतो. इतरांना माफ करायला लागलो की जखमा भरून यायला मदत होते. चालढकल करण्याऐवजी “आत्ता, इथे ” ही भावना विकसित केली तर अपेक्षित यश अशा छोट्या पावलांनी साध्य होते.

यादी अजून वाढविता येईल, पण सवय-निवडीचे स्वातंत्र्य स्वतःकडे हवे आणि त्याच्या चाव्याही! एकच शेवटचा मुद्दा- हितकारक सवयींचा हात सोडू नये, अहितकारक सवयी टप्प्याटप्प्याने सोडाव्यात आणि नव्या अहितकारक सवयी जडू नयेत म्हणून दक्ष राहावे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 132 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..