नवीन लेखन...

सौदा (कथा)

गी द मोपासा ( Guy de Maupassant ) च्या The Donkey या कथेचा मुक्त मुक्त अनुवाद.

गी द मोपासा ( Guy de Maupassant ) च्या The Donkey या कथेचा मुक्त मुक्त अनुवाद. 


वारा नव्हता. धुकं नदीच्या पाण्यावर ‘बुढ्ढीके बाल’ कापसाचा जाडसर थर तरंगत असावा तसं दिसत होतं. दोन्ही नदीकाठ मलमली धुक्याच्या पडद्यामागं दडलेले होते. सूर्य अजून क्षितिजाच्या खालीच होता. त्यानं डोकं वर काढायला अजून वेळ होता त्यामुळं झुंजुमुंजूच्या अंधारात टेकडी अस्पष्टशी दिसत होती. काठावरच्या झोपड्या चौकोनी ठोकळे मांडून ठेवल्यासारख्या दिसत होता. आणि कोंबडे आळोखे पिळोखे दिल्यासारखं करून आरवायची तयारी करत होते.नदीच्या ऐलतीरावरचं गाव पिएददे, तिथं धुकं दाट होतं. मधनंच कसलेबसले होणारे आवाज त्या शांत पहाटेला हलवत होते. आवाज तरी कसले?, पाण्यावरल्या लाटांची चुळुकबुळूक, नाहीतर हलकेच तीरावर येऊ घातलेले मचवे, होडकी यांच्या वल्ह्यांच्या थापा, नाहीतर काही तरी पाण्यात पडल्याचा आवाज, कधी एखादी कुजबुज – लांबून येणारी किंवा जवळपासचीच –, झुंजूमुंजू होताना गवतातली झोप संपवून हवेत झेप घेणाऱ्या पक्ष्याची फडफड आणि काठावरच्या गवतात अजून झोपत असलेल्या बांधवांना उठवण्यासाठी घातलेली शीळ त्या दाट धुक्याचा भेद करून यायची. हेच. बाकी सुशेगाद !

नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.)

पावलूनं उत्तर दिलं, “बरें. घेवन येतां. तूं हांगांच राव. हांव येतांच.” (बरं. घेऊन येतो. तू इथंच थांब. मी येतोच.) आणि आणलेले मासे ठेवायसाठी घराकडं गेला.

मचव्यात बसून राहिलेल्या माणसानं सदऱ्याच्या खिशातून विडी बंडल काढलं, एक विडी काढून सुलगावली आणि दोन झुरके मारले. त्याचं नाव होतं आंतोनिओ पण त्याला हाक मारली जायची आंतोन अशी. तो आणि पॉवेल उर्फ पाव्लू दोघं भागीदार होते धंद्यातले. धंदा कसला? कचरापट्टी धुंडाळणे, छोट्यामोठ्या चोऱ्या करणे आणि लोकांना उल्लू बनवून पैसे उकळणे हा.तसे ते नावापुरते नावाडी होते. मोसमात ऐल ते पैल नाव हाकून भाडं मिळवायचे, पण एरवी त्यांचे उपजीविकेचे उद्योग म्हणजे उकिरडे धुंडाळून काही ‘मौल्यवान’ कचरा मिळतो का ते बघणे, काठाकाठाने मचवा वल्ह्वून तरंगणाऱ्या वस्तू, बाटल्या, कपडे गोळा करणे, मासेमारी, निर्बंधित जागेत जाऊन ससे, हरणं, कोल्ही अशी बेकायदेशीर शिकार करणे वगैरे. कधी कोणी बुडून मेलेला माणूस मिळाला तर तरंगणाऱ्या प्रेताचे खिसे तपासून काही मिळतंय का बघणे हाही धंद्यातला भाग असायचा. तशी एकंदरीत प्राप्ती पोटापुरती सहजपणे व्हायची.कधीकधी दुपारी दोघं पायी भटकत असताना दिसायचे. कुठल्यातरी टपरीवजा खानावळीत जेवायचे आणि पुन्हा भटकंती चालू करायचे. दोनतीन दिवस गायब असायचे आणि पुन्हा अचानक त्यांचा मचवा – ज्याला ते ‘बोट’ म्हणायचे – वल्हवत असताना दिसायचे.त्या दोन दिवसांत गोल्टीचा नाही तर नावेलीचा कुणीतरी नावाडी त्याची हरवलेली बोट शोधत असायचा आणि पैलतिरी वीस पंचवीस मैलावर वेल्ह्याचा कुणी दुकानदार कशी दोन नडलेल्या अनोळखी माणसांकडून घासाघीस करून एकदम स्वस्तात, फक्त ‘दोन्शेम्’ रुपयात एक बोट खरेदी केली या विचारात स्वत:चीच पाठ खुशीनं थोपटत गाणं गुणगुणत असायचा.

पावलू त्याची लक्तरांत गुंडाळलेली बंदूक घेऊन आला. पावलू वयानं साधारण चाळीस पंचेचाळीसचा असावा. उंच, किडकिडीत, सदैव कुठल्या ना कुठल्या लफड्यात अडकल्यामुळं भिरभिरत्या किलकिल्या डोळ्यांचा, बटनं नसलेल्या बंडीतून केसाळ छाती दिसायची. पण तोंडावर मात्र टूथब्रशसारख्या मिशा आणि हनुवटीवर राठ पण तुरळक दाढी एव्हढेच केस. मोठ्ठं कपाळ आणि कळकट टोपीच्या खाली पिसं उपसून सोललेल्या कोंबडीसारखं दिसणारं डोकं!याच्या उलट आंतोन, ढब्ब्या, बुटका, केसाळ. कायम एक डोळा बंद असायचा, बंदुकीचा नेम धरत असल्यासारखा. लोक जेव्हा मस्करीनं त्याला तो डोळा उघडायला सांगायचे तेव्हा त्याचं उत्तर असायचं, “कित्या खातीर? हांगां पयली आसा कोण चली पळोवपाक? मागीर कित्याक उगडूं हो दोळो?” (कशासाठी? इथं कोण पोरगी आहे बघायला? मग कशासाठी उघडू हा डोळा?)

पावलूनं ‘बोटीवर’ पाय ठेवल्यावर आंतोननं वल्हवायला सुरुवात केली आणि बोट पांढऱ्या शुभ्र धुक्यात दिसेनाशी झाली.“पावलू, कितले फार हाडल्यात?” (पावलू, कोणती काडतुसं आणलीस?)

“णव नंबर.” (नऊ नंबर) पावलू उत्तरला.

“बरें. णव नंबर बरे आसा सोश्यां खातीर.” (बरं. नऊ नंबर ठीक असतात सश्यांसाठी.)

आंतोननं जमेल तितका कमी आवाज करत मचवा पैलतीरावर आणला. ह्या तीरावर रायबंदरमधलं जंगल खात्याचं अभयारण्य होतं. शिकारीला अटकाव होता इथं. मोठ्ठ्या मोठ्ठ्या झाडांच्या मुळांशी सशांची अगणित बिळं होती. सकाळचा उजेड पडायला सुरुवात होताच हे ससे बिळांतून बाहेर येऊन इथून तिथे, तिथून इथे पळायचे.पावलू मचव्यात पालथा पडून निरिक्षण करत होता. बंदूक हाताशी होती. एका बिळाशी हालचाल दिसताच पावलूनं बंदूक उचलून नेम धरला आणि बार काढला. क्षण दोन क्षण तिथल्या नीरव शांततेत त्याचा आवाज घुमला. आंतोननं दोन तीन वल्ही मारली आणि मचवा काठावर आणला. पावलू उडी मारून उतरला आणि पळत जाऊन बार लागूनही अजून जिवंत असलेला, छाती धपापत असलेला छोटा भुऱ्या रंगाचा ससा उचलून घेऊन आला.मग पुन्हा मचवा धुक्यात गडप झाला. वनरक्षकांनी शोध घ्यायच्या आत दुसऱ्या तीराच्या दिशेला लागला. पावलूनं गन मचव्याच्या तळात लपवली आणि ससा पाटलोणीच्या खिशात. पंधरा वीस मिनिटांनंतर आंतोननं विचारलं, “पावलू, आनी एकदां मेळटा काय पळोवया?” (पावलू, आजून एकादा मिळतोय का बघायचं काय?)पावलू म्हणाला, “या तर, पळोवया.” (चल की, बघुया)

आंतोननं मचवा वळवला आणि पुन्हा पहिल्या जागेपासून बऱ्याच अंतरावर नेऊन काठावर लावला. दहा पंधरा मिनिटांतच पावलूनं दुसरा ससा मारला. मग त्यांनी मचवा नदीच्या उतारावर रायबंदर फॉरेस्टच्या दिशेनं वल्हवला. थोड्या वेळानं अंदाजानं जवळ आल्यावर काठावर आणला आणि त्याचा दोर एका झाडाला बांधून दोघेही मचव्यातच झोपले.

आंतोन मधून मधून उठून क्षितिजाकडं बघे. पहाटेचं धुकं आता विरघळलं आणि भगवं लाल सूर्यबिंब निळ्या आकाशात डोकावायला लागलं. दूरवर पसरलेल्या झाडाझुडपांमध्ये एक टेकडी आणि तिच्या शिखरावर एकच एक झोपडी उठून दिसायला लागली. सारं अजूनही शांत होतं.

टेकडीकडून खाली येणाऱ्या पायवाटेवर काही तरी हालचाल जाणवली. एक म्हातारी बाई मरतुकड्या गाढवाला ओढत घेऊन येत होती. गाढवाची नाखुशी होती की आडमुठेपणा तेच जाणे. त्याला ओढत आणताना म्हातारी मेटाकुटीला आली असावी. त्या दोघांचीही चाल त्यामुळं इतकी हळू होत होती की त्यांना जिथं कुठं जायचंय होतं तिथं केव्हा पोचतील याचा अंदाज कुणीच करू शकलं नसतं. कमरेत वाकलेली म्हातारी अडेलतट्टू गाढवाला फरफटत ओढताना मधून मधून मागं वळून हाताल्या फोकानं त्याला रट्टे मारायची.

हे दृश्य बघून आंतोनच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळला. त्यानं हाक मारली, “आरे पावलू !” (पावलू !)

पावलूनं डोळे चोळत उत्तर दिलं, “कितें रे ?” (काय रे ?)

“मजा करुया मरे मात्शी?” (मजा करायची का जरा?)

“कसली मजा? चल तर करुया.” (कसली मजा? करू चल.)“

चल तर. बेगीन वचपाक जाय.” (तर मग चल. लवकर जायला पाहिजे.)

दोघं बोटीतनं उतरून लगबगीनं चालत म्हातारीजवळ गेले. आंतोननं हाक मारली, “आज्जे, एक मिनिट, राव.” (आज्जे, एक मिनिट, थांब)

म्हातारी थांबली आणि तिनं या दोघांकडं पाहिलं. पावलूनं विचारलं, “आज्जे, खंय वता?” (आज्जे, कुठं चाल्लीस?)

आज्जी म्हणाली, “चल्ली ह्या मर्तमड्या गाडवाक विकूंक खाटकागेर” (चाल्ली ह्या मरतुकड्या गाढवाला विकायला खाटकाकडं.)

“खाटिक कितले रुपया दितलो?” (खाटिक किती रुपय देतोय?)

“तीस दिता म्हणून सांगलां म्हाका.” (तीस देतो म्हटलाय मला.)“

हांव पन्नास दितां, म्हाका दी हो घोडो.” (मी पन्नास देतो. मला दे हे तुझं घोडं.)

म्हातारीचा विश्वास बसेना. पण जास्त विचार करत बसायला नको म्हणून पटकन म्हणाली, “घी.” (घे)

आंतोननं गाढवाची दोरी हातात घेतली. मग म्हातारीला पन्नास रुपये काढून दिले आणि तिथून जायला सांगितलं. पण ती तिथंच बसली ते दोघं काय करतायत ते बघायला.

पावलूनं विचारलं, “आंतोन, कितें करपाचें आसा तुज्या मनांत?” (आंतोन, काय करायचं मनात आहे तुझ्या?)

आंतोननं नेहमी मिटलेला डोळा उघडला आणि हंसत उत्तर दिलं, “हुस्को करूं नाका. आसा म्हज्या मनांत कितेंतरी.” (काळजी नको करू. आहे माझ्या मनात कायतरी.)

आंतोननं बंदूक घेतली आणि पावलूसमोर केली. म्हणाला, “पावलू, आमी आळये पाळयेन एकेक फार मारूया. चड लागीं वचूं नाका. नाजाल्यार मारून उडोवशी एकदम. मजा कसो फार, हळू हळू मारपाचो.” (पावलू, आपण पाळीपाळीन एकेक बार काढायचा. जास्त जवळ जाऊ नको. नायतर मारून टाकशील एकदम. मज्जा कशी बैजवार, हळूहळू घ्यायची.) त्यानं गाढवाची दोरी सोडली आणि पावलूला गाढवापासून चाळीस पावलांवर उभं रहायला सांगितलं. गाढवाला वाटलं आपण सुटलो, ते जरा बाजूला जाऊन गवतात काही खायला मिळतंय का बघायच्या प्रयत्नाला लागलं. पण अंगात त्राण नसल्यामुळं फक्त फेंगडे पाय करून कसंतरी उभं राहिलं.पावलूनं नेम धरला आणि म्हणाला, “एक फार कानार.” (एक बार कानावर) आणि त्यानं बार काढला. काडतूस गाढवाच्या लांब कानाला चाटून गेलं. पण त्याला झालं काहीच नाही, डास चावला असं वाटलं असावं. झटकल्यासारखा कान हलवला त्यानं.

आंतोन नि पावलू, दोघंही हसत सुटले. म्हातारीला मात्र आपल्या गाढवाचे असे हाल चाललेले बघवेनात. ती उठली, दोघांजवळ गेली आणि मला गाढव विकायचं नाही. पैसे परत देते असं सांगायला लागली. पण आंतोननं दम दिला तिला. ‘मुकाट्यानं निघून जा नाहीतर तुलाच गोळी घालीन, आम्ही पैसे मोजलेत आणि तू ते घेतलेत, आता आम्ही काय वाट्टेल ते करुं या गाढवाचं,’ अशी धमकी दिली. म्हातारी पोलिसांना बोलावते म्हणून तणतणत निघून गेली.

पावलूनं बंदूक आंतोनला दिली आणि म्हणाला, “आतां तुजी पाळी, आंतोन.” (आता तुझी पाळी आंतोन.)

आंतोननं नेम धरून बार काढला. यावेळी काडतूस गाढवाच्या फऱ्यात लागलं. आताही बार लांबून मारला असल्यानं गाढवाला जाणवला नसावा. माशी असेल असं समजून शेपटीनं वारायचा प्रयत्न केला त्यानं.

आंतोनला हसू अनावर होऊन त्यानं बसकण घेतली. आता बंदूक पावलूनं हातात घेतली आणि जरा जवळ जाऊन आंतोननं मारला तिथंच नेम धरून बार काढला. यावेळी मात्र गाढवाला वेदना जाणवली असावी. त्यानं मागं वळून बघितलं. फऱ्यातून रक्त यायला लागलं होतं, वेदना असह्य झाली असणार. त्यानं दुगाणी झाडून दुडक्या चाळीत पळायचा प्रयत्न केला. दोघंही गाढवाच्या मागं पळाले. पावलू बंदूक टाकून वेगानं पळाला तर आंतोन धापा टाकत हळूं. गाढवानं मागं वळून त्या दोघा मारेकऱ्याना येताना बघितलं. ते एकदा दोनदा जीवाच्या आकांतानं हॉआँ हॉआँ असं रेकलं आणि मग दमून थांबलं.

आंतोननं बंदूक उचलली आणि चालत चालत गाढवाच्या जवळ गेला. गाढव डोळे विस्फारून त्याच्याकडं बघत राहिलं. आंतोननं पावलूला गाढवाची दोरी पकडायला सांगितली आणि म्हणाला, “पावलू, आतां एक कार्रेगाद डोस.” (पावलू, आता एक जालीम डोस द्यायचा याला.)

पावलूनं गाढवाचा जबडा दोन्ही हातांनी उघडून धरला जसं काही खरंच त्याच्या नरड्यात औषधाचा डोस ओतायचाय असा, तेव्हढ्यात आंतोननं त्यात बंदुकीची नळी खुपसून एक बार काढला. दुसरा बार काढला. गाढव खाली बसलं, डोळ्यांची उघडझाप केली, दोनतीन वेळा पाय झाडले आणि मरून पडलं.

दोन निष्ठुर हैवानांना हसून हसून दम लागला. पण मजा फारच लवकर संपली होती. पन्नास रुपये वसूल झाले असं काही वाटेना. आंतोन म्हणाला, “पावलू, हो तर गेलो मरे.” (पावलू, अरे हे मेलं की !)

पावलूनं विचारलं, “आतां रे कितें करूया?” (आता रे काय करायचं?”)

आंतोन म्हणाला, “पावलू, हे मडें घाल बोटीन. आनी मागीर मजा पळय सांजे.” (पावलू, हे मढं चढव बोटीवर. आणि मग मजा बघ संध्याकाळी.)

दोघांनी मिळून ते गाढवाचं मढं उचलून मचव्यात ठेवलं. खूपशा गवतानं ते झाकलं आणि मग दोघं बोटीतच गप्पा मारत पडून राहिले ते दुपारच्या सुमाराला भूक लागली म्हणून उठले. ‘बोटी’त नेहमीच लपवून ठेवलेली फेणीची बाटली काढून प्रत्येकानं दोन दोन घोट घेतले आणि बरोबर आणलेला पाव, भजी हे नेहमीचं दुपारचं जेवण जेवले. जेवण झाल्यानंतर गाढवाच्या अंगावर पसरलेल्या गवतावर दोघंही झोपले ते दिवेलागणीचा सुमार होई पर्यंत. अंधार पडायला लागला तसा आंतोन उठला आणि घोरत असलेल्या पावलूला हालवून उठवत म्हणाला, “रे पावलू, चल मरे.” (पावलू, चल रे)

आता पावलूची पाळी होती बोट वल्हवायची. सावकाश करून बोट वल्हवत ते नदीकाठावरच असलेल्या मेलबोर्न हॉटेल अँड बार या त्यांच्या नेहमीच्या ठिय्याच्या दिशेनं निघाले. रायबंदर फॉरेस्टचा शेवट जवळ येत चालला तशी आंतोननं पावलूला आपल्या मनात काय आहे ते सांगितलं. काठाजवळ कमळवेलींचं जाळं पसरलेलं होतं. ताठ मानेनं उभ्या किती तरी कमळाना झुकायला लावून त्यांच्या डोक्यांवरून पावलूनं बोट काठाला आणून लावली. बोट अंगावरून गेल्यानंतर ती कमळ पुन्हा खडी सलामी देत असल्यासारखी उभी झाली. दोघंही बोटीतून उतरले. गाढवाच्या मुडद्यावर पसरलेलं गवत काढून पाण्यात फेकलं आणि तो मुडदा ओढत आणून एका दाट झुडपाच्या आड आणून ठेवला. पुन्हा बोटीत चढले आणि ती मेलबोर्न हॉटेल अँड बारजवळ काठावर चढवली.

आता रात्रीचा अंधार झाला होता. दोघंही बारमध्ये पोचले. त्याना येताना बघून म्हातारा बार मालक सायमन कार्वालो – शिमोन पुढं आला. ‘वेल्कोम’ म्हणत त्या दोघाना कोपऱ्यातल्या टेबलाशी घेऊन गेला. इकडच्या, तिकडच्या गप्पा मारता मारता आकरा वाजले. बारमधलं शेवटचं गिऱ्हाईक निघून गेल्यावर शिमोननं आंतोनकडं बघून डोळे मिचकावले आणि विचारलं, “मागीर? आसा कितें तुजे लागीं?” (मग? काही आहे का तुझ्याजवळ?”)

आंतोननं मुंडी हालवली आणि उत्तर दिलं, “आसत वा नासतूय बी.” (असेलही आणि नसेलही.)

शिमोननं आशा सोडली नाही. “रानवटी सोशे तरी?” (जंगली ससे तरी?)

आंतोननं खिशातून दोन ससे कानाना धरून बाहेर काढले. “पन्नास एकाचे.” (पन्नासला एक.)

आणि मग घासाघीस सुरु झाली. पंचवीस, तीस करत करत सत्तरला दोन असा व्यवहार ठरला. पैशांची आणि सश्यांची देवाणघेवाण झाल्यावर आंतोन आणि पावलू जायला उठले तेव्हा शिमोननं डोळे बारीक करून पुन्हा विचारलं, “आनी कितें आसा?” (आणखी काय आहे?)

आंतोननं मान तिरकी केली आणि म्हणाला, “आसा, पूण तुका परवडचे नात. तूं सामको चामटो” (आहे, पण तुला परवडणार नाही. तू चिंगूस आहेस.)

शिमोननं आशा सोडली नाही. “मोठ्ठें आसा? तशें आसा जाल्यार वाटाघाटी करुया.” (मोठ्ठं आहे? तसं असेल तर सौदा करू की.)

आंतोननं गोंधळात पडल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला आणि पावलूकडं नजर टाकून म्हणाला, “हें पळे, कोणाच कडेन उलोवं नाका. आमी रायबंदराच्या रानांत आशिल्ले, कितें तरी म्हऱ्यांतसून गेले झुडपांनी दावे वटेनच्यान. तर ह्या पावलूनं फार माल्लो आनी तें पडलें. पूण कितें ते आमी पळोंवक ना. राखणदार आवाज आयकून येत म्हणून आमी रोखडेच थंयसून पसार जाले. आतां जें कितें आशिल्लें तें मात मोठ्ठें आशिल्लें इतलेंच आमी सांगूक शकतात. कितें आशिल्लें तें आमी सांगूक शकनात कारण आमी पळोंवकूच ना न्हय!” (हे बघ, कुणाला बोलू नकोस. आम्ही रायबंदर फॉरेस्टमध्ये होतो. कायतरी जवळनं गेलं झाडीत, असं डाव्या अंगानं. तर या पावलूनं बार काढला आणि ते पडलं. पण काय ते आम्ही बघितलं नाही. रखवालदार येईल आवाज ऐकून म्हणून आम्ही लगेच तिथनं पसार झालो. आता जे होतं ते मोठ्ठं होतं एव्हढंच सांगू शकतो. काय होतं ते नाय सांगू शकत. कारण आम्ही बघितलंच नाय ना!)

शिमोननं उत्सुकता दाखवत म्हटलं, “हरण आसत?” (हरीण असेल?)

आंतोन म्हणाला, “आसतूय. पूण ना. हरणा परस मोठें आशिल्लें.” (असेलही. पण नाही. हरणापेक्षा मोठं होतं.)

“तर सांबर आसत.” (म काळवीट असेल.)

आंतोननं हात हालवला आणि म्हणाला, “कितें तरीच ! पूण ना, सांबर नासतलें. सांबर आसल्यार शिंगां दिसतली आसलीं न्ही?” (काय की ! पण नाही, काळवीट नसणार. काळवीट असता तर शिंगं दिसली असती ना?)“

हाडलें काय ना तुमी बराबर?” (आणलं का नाही तुम्ही बरोबर?) शिमोननं हताश झाल्यासारखा प्रश्न केला.

“कारण आमी आजसावन ‘जंय आसा थंय’ ह्या अटीचेर कास विकतले. घेवन आयल्यार त्रासांत पडपाक नाका आमकां. पळे, विकतें घेवपी खूब आसात.” (कारण आम्ही आजपासून ‘जिथं असेल तिथं’ या अटीवर शिकार विकणार. घेऊन यायची रिस्क नाय पायजे आम्हाला. बघ. खरेदी करणारे खूप आहेत) आंतोननं बजावलं.

काही झालं तरी शिकार हातची जाऊ द्यायची नाही असा विचार करून शिमोननं बारमधल्या पोऱ्याला फेणीचे दोन ग्लास आणायला सांगितले. आंतोनच्या आणि पावलूच्या समोर ठेवून विचारलं, “ते थंय नासलें जाल्यार?” (ते तिथं नसलं तर?)

“शंबर टक्के आसा. न्हंयेचे देगेर रानाची वंय सुरु जाता थंय रोखडेंच दाव्या वटेनच्यान तिसरें झुडूप. थंयच आसा. परत सांगतां, कितें आसा तें खबर ना. हरण न्हय, पूण आसा तें ताच्याकूय मोठ्ठें आसा. तुका खबर आसा हांव फट उलयना. तूं थंय वच आनी घे. काड तीनशें रुपया.” (शंभर टक्के आहे. नदीकाठावर फॉरेस्टचं कुंपण सुरु झालं की लगेच डाव्या बाजूचं तिसरं झुडूप. तिथंच आहे. परत सांगतो, काय आहे माहीत नाही. हरीण नाही, पण आहे ते त्याहून मोठ्ठं आहे. तुला माहीत आहे, मी खोटं बोलत नाही. तू तिथं जा आणि घे. काढ तीनशे रुपये.)

शिमोननं चिकाटी सोडली नाही. परत म्हणाला, “घेवन यो न्ही हांगां” (घेऊन या की इथं)

आंतोन उठला. डाव्या हाताची तर्जनी आणि आंगठ्याची रिंग करत शिमोनच्या तोंडासमोर नाचवली आणि बजावून म्हणाला, “तुका घेवपाचें आसा जाल्यार घे. नाजाल्यार हांव चल्लों, दुसरो कोणूय खोशयेन घेत.” (तुला घ्यायचं तर घे. नाही तर आम्ही चाललो. दुसरा कुणीपण हासत घील.)

सौदा हातचा जाऊ द्यायचा नव्हता शिमोनला. तरी अंगातली घासाघीस करायची सवय स्वस्थ बसू देत नव्हती. “दोनशें दितां.” (दोनशे देतो)

आंतोननं विचार करत असल्यासारखं करत कानशील खाजवलं जरा वेळ आणि मग म्हणाला, “रे शिमोन, कसां रे तू? बरं ! तुका म्हणून, अडेचशाच्या सकल ना. चल, काड पैशे.” (शिमोन, असा कसा रे तू? बरं ! तुला म्हणून, अडीचशेच्या खाली नाही. चल काढ पैशे.)

शिमोननं गल्ल्यातून पन्नास पन्नास च्या पाच नोटा काढून आंतोनच्या हातावर ठेवल्या. आंतोननं त्या खिशात घातल्या आपला ग्लास रिकामा केला आणि पावलूलाही त्याचा संपवायला लावून दोघं जायला निघाले. बारबाहेरच्या अंधारात गेल्यानंतर मागं वळून आंतोननं ओरडून सांगितलं, “रे शिमोन, हांव वैतां म रे. परत सांगतां, सांबर न्हय. पूण कितें आसा तें खबर ना. आनी जें आसा तें थंयच आसा. तुका थंय मेळ्ळें ना जाल्यार तुजे पैशे परत दितलों.” (शिमोन, चलतो रे. आणि परत सांगतो, काळवीट नाही पण काय आहे ते माहीत नाही. आणि जे आहे ते तिथंच आहे. सकाळी तुला ते तिथं नाही भेटलं तर पैशे माघारी देईन तुझे.)

अंधारात मचव्यात पाय ठेवता ठेवता पावलूनं आंतोनच्या पाठीवर खुशीची थाप दिली.
***

कथेतील मूक प्राण्यावरील निर्घृण अत्याचाराचे वर्णन मी केवळ त्रयस्थपणे आणि खेदपूर्वक अनुवादित केले आहे. त्यांत अशा अत्याचारांचे समर्थन करण्याचा माझा हेतु नाही हे विदित व्हावे.

मुकुंद कर्णिक, दुबई
karnik.mukund@gmail.com
+९७१५०५९७३८१०

गी द मोपासा ( Guy de Maupassant ) च्या The Donkey या कथेचा मुक्त मुक्त अनुवाद.

या अनुवादातील संभाषणाना कोंकणी स्वरूप मा. प्रा. पुंडलिक खंवटे यांनी दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

3 Comments on सौदा (कथा)

  1. या अनुवादातील संभाषणाना कोंकणी स्वरूप मा. प्रा. पुंडलिक खंवटे यांनी दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! ही नोंद कथेच्या तळाशी करायचे राहून गेले याबद्दल क्षमस्व पुंडलिकजी !
    -मुकुंद कर्णिक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..