नवीन लेखन...

सरोजिनीबाई…

३ ऑगस्ट २००७ ची दुपार. १२.३० वाजलेले. ठाण्याच्या जोशी–बेडेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाचा युवा महोत्सव सुरू होता. आम्ही काही जण जेवायला कँटीनमध्ये आलो होतो. तेवढयात प्रा. अनिल भाबड धावत आला – “नीतिन कळलं का ? बाई गेल्या …… ” तो सांगत होता डॉ.सरोजिनी वैद्य यांच्या निधनाबद्दल! बातमी अपेक्षित होती. बाई दुर्धर रोगाने काही वर्षे आजारी होत्या. मे महिन्यामध्ये त्यांना वाग्विलासिनी पुरस्कार मिळाला. नंतर काही दिवसांतच त्यां कोमात गेल्या आणि आज …………

१९७६-७७ सालचा डिसेंबर महिना असेल. आमच्या कर्जतच्या श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाने जिल्हा साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अध्यक्ष होत्या डॉ.सरोजिनी वैद्य, उद्घाटक होते म.वि.फाटक, व.पु.काळे. आम्ही दहा वर्षांची मुलं उत्सुकतेने हे सारं पहायला अभिनव ज्ञान मंदिराच्या पटांगणावर जमलो होतो. व्यासपीठावर मध्यभागी खुर्चीवर बाई बसल्या होत्या. गौर – सावळा रंग, काळे केस व्यवस्थित विंचरून त्यांचा छोटासा अंबाडा, कोणीतरी दिलेलं सोनचाफ्याचं फूल त्यात माळलेलं, काळा, चौकोनी काडयांचा चष्मा, थोडी मान कलती करून बसलेल्या, चेह–यावर प्रसन्न भाव, चॉकलेटी रांगाची सुती साडी नीटसपणे नेसलेली. पातळ नाजूक जिवणी, उजवा ओठ थोडासा कानाच्या दिशेने खेचून बोलण्याची सवय आणि बोलताना गालावर पडणारा छोटासा खळगा. आम्ही मुलं, आम्हाला तिथे आणणारे पालक, शिक्षक वगैरे सर्वच जण त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून गेलेलो. बाईंनी अध्यक्षीय भाषण सुरू केलं. ते संपल. मला फारसं काही कळलं नाही. लक्षात राहिली ती त्यांची पोडामवर आडवा हात ठेवून, ठासून प्रत्येक शब्द उच्चारण्याची शैली, ‘श’ आणि ‘ष’ यांच्यातील फरक अधोरेखित करणारं उच्चारण, कानाला गुंगवून टाकणारा नाद आणि प्रामाणिकपणे स्वत:चे विचार स्पष्ट करण्याची धाटणी. भाषण संपल्यावर, कार्यक्रम संपल्यावर मी आईला म्हणालो,“तुझ्यासारखंच बोलतात त्या.” त्यांची सही घ्यायला धावलो. व.पुं.नी सही छापलेलं लेटरहेड दिलं. बाईंना त्या को–या कागदावर जांभळया पेनानं तिरपी सही केली – ‘ सरोजिनी वैद्य ’. खट्टू झालेले चेहरे फुलले.
मी टी.वाय्.बी.ए. ला ‘ मराठी ’ घ्यायचं ठरवलं. माझी आत्या सरोज पोतदार, मुंबई विद्यापीठात सहाय्यक ग्रंथपाल. ती म्हणाली “विद्यापिठात ये”. २८ एप्रिल १९८६. मी विद्यापीठात. आत्याने वाचनालयातल्या एक टेबलापाशी नेलं. उभं केलं. म्हणाली

“सरोजिनीबाई, हा माझा भाचा. याला टी.वाय्.ला मराठी घ्यायचं आहे. ”

बाईंना पुस्तकातून नजर वर उचलला. एक ओठ कानाकडे थोडासा खेचून हसल्या. प्रसन्नपणे म्हणाल्या – “छान ! काय वाचतोस? कुठे राहतोस?” मी काय ते उत्तर दिलं.

बाई- “चांगलं वाचत राहणं हे बरं असतं, बरं का ! तू चांगलंच वाचतोस. पण मराठीचा जर विशेष अभ्यास करायचा असेल तर तुला तो शिस्तबद्धपणे केल पाहिजे. तुला हरिभाऊ वाचले पाहिजेत. लोकहितवादींची काँट्रीब्यूशन समजून घेतली पाहिजे. इंग्रजांना नावं ठेवून उपयोग नाही. त्यांनी आणलेल्या सुधारणा समजून घ्यायला हव्या आहेत. बरं का. जोतिबा फुल्यांचे लिखाण अभिनिवेश न बाळगता वाचायला हवं……… ”

बाई, असं खूप काही सांगत होत्या. अकरा वर्षांपूर्वी छोट्याशा डोळयांनी पाहिलेलं व्यक्तिमत्त्व मला आज राजाबाई टॉवरपेक्षा ही उंच आणि भव्य दिसायला लागलं. बाईंनी पुस्तकांची एक यादी दिली. मी निघतांना बाईंना नमस्कार केला “अरे, अरे” करत बाईंनी डोक्यावर हात ठेवला, म्हणाल्या – “मोठा हो ”

२८ जुलै १९८७ टी.वाय्. चा रिझल्ट लागलेला. मी मुंबई विद्यापीठात प्रवेश घ्यायला गेलेलो. माझी गुणपत्रिका पाहून माणिकबाई जोशींनी थांबायला सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘मराठी विभाग प्रमुखांना भेटा’. मी घाबरलेलो. दबकत दबकत गेलो. तर समोर बाईच! मला हायसं वाटलं. बाई म्हणाल्या – “तू सरोजचा भाचा ना ! अरे वा, तू गुणवत्ता यादीत नंबर मिळवलास. बस !”

मी – “बाई, तुम्ही मला मार्ग दाखवलत. बाकी सारं होत गेलं.” बाई हसल्या.

त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात एकेक दिग्गज माणसं होती. उंच, शांत दीपमाळेसारख्या पांढरी शुभ्र निळ्या काठाची सुती साडी अंगभर नेसणा–या मायाळू डॉ.उषा माधव देशमुख, व्यक्तिमत्त्वाचे आर्जवी पण ठाम विचार मांडणारे ज्ञानसागर म्हणता यावेत असे प्रा. गंगाधर पाटील, नुकतेच विभागात प्रध्यापक म्हणून नियुक्त झालेले शांत, गंभीर दिसणारे आणि जाड चष्माच्या आतल्या मिश्किल डोळ्यांचे डॉ. वसंत पाटणकर अशा दिग्गजांची साथ. जोडीला सहयोगी अध्यापक म्हणून येणा–या डॉ.विजया राजाध्यक्ष, प्रा.पुष्पा भावे, डॉ.सुधा जोशी, डॉ.रा.भा. पाटणकर, प्रा. प्रतिभा कणेकर, प्रा. अरूण कांबळे, प्रा.केशव मेश्राम, प्रा.कृ.रा. सावंत, डॉ.सदा क–हाडे, डॉ. मिलिंद मालशे, डॉ. रमेशचंद्र पाटकर, डॉ. सुभाष सोमण असे मराठी साहित्यातलं प्रत्येक मोठं व्यक्तिमत्त्व त्यांनी विभागाशी जोडलं होतं. त्यांना सांभाळलं होतं. विद्यार्थ्यांची व त्यांची भेट घडवली होती. विविध प्रकारच्या विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात असा त्यांचा आग्रह होता. प्रत्येकाच्या शक्तिस्थळानुसार बाईंना विषयवाटप केलं होतं.

एम्.ए.चे तास आठवडयातून चार दिवस भरत. बाईंनी एक जादा दिवस त्यात जोडला. त्या तासाला त्यांनी नाव दिलं–‘साहित्यसंवाद’. या तासाला एम्.ए. भाग एक व भाग दोनचे विद्यार्थी एकत्र येत व बाई स्वत: तो तास घेत. दर सोमवारी सुमारे सव्वा तीन विद्यार्थी त्या तासाला जमत. वर्गात माईक नव्हते, स्पीकर नव्हते. पण बाईंचा खणखणीत, नादमय आवाज सर्वदूर पोहोचे. विद्यार्थ्यांना या तासाची उत्सुकता असे. सुमारे वीस सोमवार बाईंनी आम्हाला तंजावरच्या नाटकांपासून ते वा.ब.पटवर्धनांपर्यंत अनेक लपलेल्या जागा समजावून दिल्या. (बाईंचं हे चिंतन पुढे राज्य मराठी विकास संस्थेमार्फत त्यांनी विविध तज्ञांकडून लिहवून घेतलेल्या अनेक पुस्तकांतून व्यक्त झालं.) मुलांची क्षितिजं विस्तारत गेली. बाईंनी विद्यार्थ्यांना तयार ‘अन्न’ भरवलं नाही. विद्यार्थ्यांनी धान्य कोठून मिळवायचं, ते निवडायचं कसं, जेवायचं कसं आणि खाऊन पचवायचं कसं याची दिशा दिली. पहिल्याच सोमवारी त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या खजिन्याची माहिती दिली व तो खजिना कसा उघडायचा त्याची गुरूकिल्ली दिली.

बाईंचं विद्यार्थ्यांवर अलोट प्रेम. गुणी विद्यार्थ्यांना संधी कशी मिळेल, त्यांना प्रोत्साहन कसं मिळेलयाची त्यांना चिंता असायची. मी गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवल म्हणून माझा सत्कार आमच्या खोपोलीच्या के.एम्.सी. कॉलेजनं सरोजिनीबाईंच्या हस्ते केला. डॉ.माधव पोतदार, डॉ.विजया भंडारी त्या प्रसंतगी बोलले. बाई म्हणाल्या– “तो आता आमचा आहे. पण त्यानं व्यवस्थित ज्ञान मिळवलं, परिश्रम केले, तरच तो आमचा आहे हे सिद्ध होईल.” माझ्या मनात जिद्द निर्माण झाली.

आम्ही विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. ते घेऊन बाईंकडे गेल्यावर लगेच त्या परवानगी देत आणि त्या त्या उपक्रमाचं नियोजन कसं करायचं याचं मार्गदर्शन करत. आग्रह असे की या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनीच करायच्या, त्यातून नेतृत्वगुण निर्माण होतात. आम्ही भित्तिपत्रक सुरू केलं. मंथन. बाईंनी लगेच सुचवलं – “डॉ. रमेश पाटकरांची मदत घ्या. ते चित्रकार आहेत आणि मर्मदृष्टी असलेले समीक्षक आहेत”. ‘मंथन’ ला दिशा आणि रूप मिळालं.
आमच्यासोबत निशा आजगांवकर नावाची अप्रतिम आवाज असणारी गायिका होती. (आता कुठे आहे कुणास ठाऊक?) ती तेव्हा गायनाचे कार्यक्रम करायची. आमच्या अंतर्गत चाचणी परीक्षा नियमितपणे व्हायच्या. त्याला ४० गुण होते. एका अंतर्गत चाचणीच्या वेळी निशाला इंग्लंड दौ–यावर जायचे होते. परीक्षाही देणे भाग होते. मी निशाला घेऊन बाईंकडे गेलो. बाईंनी अडचण समजून घेतली. निशासाठी स्वतंत्र अंतर्गत चाचणी ती परतल्यावर घेण्याचा निर्णय त्वरीत दिला. (पुढे तिचा दौरा व्हिसा न मिळाल्यामुळे रद्द झाला आणि तिनं नियमित परीक्षा दिली.) फोर्टच्या विद्यार्थ्यांना रेल्वे सवलतीसाठी कालिनाच्या मराठी विभागाच्या मुख्य कार्यालयात जावं लागे. ते त्यांना त्रासदायक होई. बाईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ.अलका मटकर (तेव्हाची शिवलकर) व माणिक जोशीना ठराविक दिवस सवलतीचे अर्ज देण्यासाठी सकाळी १० वाजता बोलवलं. त्या येत. मुलांच्या अर्जावर सह्या होईपर्यंत बाई स्वत: थांबत.

तेव्हा मराठी विभागाची फोर्ट कँपस आणि कालिना कँपस अशी दोन स्वतंत्र संस्थानं होती. मी, आनंद थत्ते, प्रतिभा पितळे, राजाराम जाधव, अनिल भाबड, वंदना कदम, नारायण गिरप, किशोर देसाई, नेहा सावंत अशा मित्रांनी बाईंना विनंती केली की आम्ही दोन्ही कँपसचे लोक एकत्र येतील असं काहीतरी करू या. पुढच्या क्षणी देशमुखबाई, पाटील सर, पाटणकर सर यांना बोलवणं जाऊन आम्ही एकत्र बसून एक स्नेहसंमेलनाचा आराखडा ठरवला. त्यावेळच्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष ‘शांताराम ’ – प्रा.के.ज.पुरोहित,यांना बोलावणं धाडलं आणि चारहून विद्यार्थ्यांना एकत्र आणणारे मराठी विभागाचे पहिले स्नेहसंमेलन सहा तास साजरं झालं. मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट त्या लगेच अंमलात आणायच्या.

आम्हाला लेखकाभ्यासासाठी विंदा कंरदीकर नेमलेले होते. मृद्गंध, जातक हे कवितासंग्रह होते. विद्यार्थ्यांना ते नीटपणे कळले नव्हते. आम्ही बाईंकडे गेलो. बाईंनी सांगितलं स्नेहसंमेलनाच्या “दुस–या दिवसापासून पुढे तीन दिवस मी शिकवेन. जर तुम्ही आलात तर! ” ३ एप्रिल १९८९. कालिना कँपसच्या मोठया लेक्चर हॉल मध्ये २५० विद्यार्थी आणि प्रा.ज्योतिका ओझरकर यांच्यासारखे किती तरी प्राध्यापक गोळा झाले. बाईंनी दुपारी दोन वाजता बोलायला सुरूवात केली आणि सहा वाजता त्या थांबल्या. मध्ये १५ मिनिटांची विश्रांती. पण तीसुद्धा सर्वांना १५ तासांसारखी वाटलेली. सलग तीन दिवस तो रोज चार तास हे ज्ञानसत्र सुरू होत. करंदीकरांच्या कवितांची आशयसूत्रे, प्रेरणा, त्यांच्या कवितांमधील, रचनेमधील वैविध्य, मराठी कवितेतील आणि जागतिक कवितेतील स्थान या विषयी केवळ ज्ञानगंभीरच नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन जाणारं असं ते ज्ञानसत्र होतं. ठराविक पैशांसाठी, ठराविक तास अशी त्यांची वृत्तीच नव्हती. वेळेचं अचूक नियोजन, विषयाचा गाभा समजून घेण्याची व समजावून देण्याची वृत्ती हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्टय होतं.

बाईंच्यामुळे आम्ही श्री.ना.पेंडसे, श्री.पु. भागवत, वसंत बापट, शंकर वैद्य, लक्ष्मण माने, दया पवार, गुरूनाथ धुरी यांना भेटू शकलो. त्यांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व समजून घेऊ कलो.

बाई खेळकर होत्या. मिकिल होत्या. स्वत:वरची टीका मजेत स्वीकारायच्या. आम्ही ठणठणपाळी विनोद वाचल्यावर सरोजिनीबाईंना विचारलं – “राग नाही येत”. त्यांनी हसून उत्तर दिलं–“विनोद आहे. मजेत घ्यायचा”. आमच्या स्नेहसंमेलनात आम्ही फिशपाँडस् दिले. त्यांना दिलेले फिशपाँडस् त्यांनी स्टेजवर येऊन हसत स्वीकारले आणि नंतर त्यावर आम्ही विनंती केली म्हणून सही करून परतही दिले.

मी उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयात व्याख्यातापदासाठी अर्ज केला. बाईंनी स्वहस्ताक्षरात सुंदरसं शिफारसपत्र दिलं. व्याख्याता म्हणून निवड झाल्यावर “माती आणि मूर्ती” भेट दिलं. त्याच वर्षी त्यांनी ज्ञानेवरी सप्तशताब्दीनिमित्त मुंबई विद्यापिठात चर्चासत्र भरवले. विविध क्षेत्रांमधील, विषयांमधील तज्ञ मंडळींना त्यात बोलण्यासाठी निमंत्रण दिलं. प्रा.स्मिता चिटणीस यांच्या सारख्या विचारशील प्राध्यापिकेला त्यांनी यावेळी संधी दिली. (नाही तर चिटणीस बाई स्वभावानुसार संकोची व मागे मागे राहणा–या). सरोजिनीबाईंनी विविध प्रकारची, विविध विषयांवरची चर्चासत्रे भरवली. त्यावरची पुस्तके प्रकाशित केली.

बाई निवृत्त झाल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विनंतीनुसार राज्य मराठी विकास संस्था निर्माण करायला घेतली. बाई त्यांच्या संस्थापक संचालक होत्या. मराठी भाषेचा विकास व्हावा, ती कालानुरूप सक्षम बनावी हा बाईंचा ध्यास होता. ज्ञानपिपासेबरोबरच संस्थात्मक जीवनही सक्षम व्हावे असा त्यांचा आग्रह होता. विद्यापीठं बळकट व्हावीत, साहित्याशी संबंधित असलेल्या संस्था बळकट व्हाव्यात, या सा–यांनी एकत्र येऊन संस्थात्मक जीवनास आकार द्यावा ही त्यांची तळमळ होती. मराठी भाषेला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून त्या कार्यरत होत्या. कायदा, अभियांत्रिकी, वैद्यकिय क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर कसा करता येईल या विषयी त्या विविध क्षेत्रांतील विविध चर्चा करत होत्या. कार्यशाळा चर्चासत्र चर्चा सत्रे होत होत्या. पुण्याच्या राजेंद्र बनहट्टींच्या अध्यक्षतेखालील अ.भा.मराठी साहित्य संमेलनात आय्.टी.– मराठी वादानिमित्ताने आम्ही धरणं धरून बसलो होतो. तेव्हा बाई आमच्या सोबत येऊन बसलेल्या. हुतात्मा चौकातल्या आंदोलनात बाई अग्रस्थानी होत्या.

आमच्या चांदीबाई महाविद्यालयात प्रा.ज्योतिका ओझरकर यांनी “ मराठी भाषा आणि साहित्य अध्यापनातील नवी आव्हाने ” या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र भरवले होते. त्यांच्या समारोपप्रसंगी एका वृत्तपत्राच्या संपादकांनी काही वादग्रस्त विधाने केली. सरोजिनी बाईंनी चर्चासत्र संपल्यानंतर त्यांच्याजवळ तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यावेळचं त्यांचं ते रूप विलक्षण होतं.

बाईंनी मोजकीच पुस्तकं लिहीली ‘माती आणि मूर्ती, गोपाळराव हरि, काशीबाई कानिटकर चरित्र, समग्र दिवाकर, लंडनच्या आजीबाई इ. काही संकल्पित पुस्तक पूर्ण केली ती प्रसिद्ध व्हायची आहेत. पण त्यातलं प्रत्येक पुस्तक हे रसिकांच्या मनात रूजलेलं आहे. प्रत्येक पुस्तक वेगळ्या विषयावरचं साहित्यगुणांनी भरलेलं. समीक्षेत कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नसलेला. सर्वसमावेशक भूमिका त्या घेत. तीव्र स्मरणक्ती अचूक निरीक्षण, नेमक्या समीक्षापद्धतीचा अवलंब, योग्य ती शब्दयोजना, वाचकाच्या रसिकतेला साद देणारी शैली.

बाई २००४ च्या सुमारास गंभीररित्या आजारी झाल्या. दुर्धर रोगानं त्यांची साथ धरली. त्यांनी कोणालाही काहीही न सांगता हळू हळू सर्व संस्थामधून स्वत:ला मोकळं केलं. सरोज (आत्या) पोतदारला बोलावून घेतलं आणि मना निश्चित केलेले लेखन प्रकल्प पूर्ण करायला घेतले. ठराविक कार्यक्रमांनाच त्या जायच्या. एका कार्यक्रमांत त्यांची भेट झाली. वरकरणी बाई स्वस्थ दिसत होत्या. माझ्या विभागप्रमुखांना प्रा.ज्योतिका ओझरकरांना म्हणाल्या – “ ज्योती, एकेक संकल्प पूर्ण करायला घेतले आहेत. ते पूर्ण करता यावेत एवढीच इच्छा आहे ”. मी चूप राहून ऐकत होतो. बाईंनी पाठीवर हात फिरवला आणि तेथून निघाल्या.

त्या आजारपणाविषयी कधीच बोलत नसत. सरही त्यांची खूप काळजी घेत. प्रा. शंकर वैद्य आणि डॉ.सरोजिनी वैद्य हे एक अफलातून समजूत असणारं जोडपं होतं. परस्परांना समजून घेत, परस्परांचं मोठेपण जाणून घेत ते जगत होते. एकाच कार्यक्रमात सर आणि बाई एकत्र असायचे. आम्ही नवेनवे विद्यार्थी मोठया उत्सुकतेने दोघांच्या चे–याकडे बघायचो.ते एकमेकांना कसा प्रतिसाद देतात ते धायचो. दोघांचेही चेहरे शांत असायचे. पण डोळयांच्या कोप–यात उत्सुकतेची चमक (निदान आम्हाला तरी) जाणवायची. सुखी, समाधानी आयुष्याचं गुलबकावलीचं फूल त्यांना गवसल्यासारखं वाटायचं.

एकदा दुपारच्या वेळी चारच्या सुमारास मी बाईंना फोन केला होता. बाई म्हणाल्या – “मी तुला नंतर फोन करेन. आता मी लिखाण करतेय. सरोज आलीय.” दोन महिने उलटले अचानक बाईंचा संध्याकाळी सहाच्या सुमारास मोबाईलवर फोन आला. “हां बोल. आता थोड्या वेळापूर्वी मी मनात बाळगलेला एक संकल्प पूर्ण केला. वा.ब.पटवर्धनांवरचं पुस्तक पूर्ण केलं. तुला फोन करेन कबूल केलं होतं. तुझ्या पीएच्.डी.चं काय झालं…… लवकर पूर्ण कर…… ते बरं असतं, बरं का आपल्या अभ्यासाकरता आणि नोकरीकरताही! मी माझ्याजवळ वा.लं.च्या एका इंग्रजीमधील निबंधाची, त्यांच्या स्वत:च्या अक्षरात सुधारणा केलेली टाईप्ड प्रत आहे ती सरोजवळ दिलीय. तिच्याकडून ती घे. लवकर पीएच.डी. पूर्ण कर.” मी गुळमुळीत उत्तरं देत होतो. बाईंच्या स्वभावातली आस्था शब्दा शब्दांतून व्यक्त होत होती. बाईंच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला, त्यांच्या संबंधित प्रत्येक व्यक्तीला बाई जे बोलत आहेत, त्यांचं जे नातं ते केवळ आपल्याच आहे असं वाटत असे. मलाही वाटायचं – “सरोजिनीबाई, फक्त आमच्याच आहेत!”

बाई गेल्या आणि वर्तमानपत्रातल्या प्रत्येक बातमीनं, प्रत्येक प्रतिक्रियेनं, प्रत्येक लेखानं सांगितलं – सरोजिनीबाई, फक्त आमच्या आहेत !
हो बाई, तुम्ही फक्त आमच्या आणि आमच्यातल्या प्रत्येकाच्या आहात.

– नीतिन द. आरेकर

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..