सरस्वती सेकंडरी स्कूल – नवकांती पालवली विद्याभवनी !

सरस्वती मंदिरची नियोजित इमारत

सरस्वती विद्या संकुलाच्या नूतन उभारणीची मुहूर्तमेढ ५ मे २०१८ रोजी  झाली. त्या अगोदर गेली पन्नास वर्षे दिमाखाने उभी असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग कार्यरत असलेल्या शाळेच्या जुन्या इमारतीने, मावळत्या सूर्याच्या साक्षीने शेवटचा श्वास घेतला. नवीन उभारताना जुन्याला वाट करून द्यावे लागते. निसर्गाचा हा अभिजात न्याय आहे. शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक हितचिंतक यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या शाळेच्या इमारतीला शेवटचा निरोप दिला होता.

तीन वर्षापूर्वी इंग्रजी शाळेची घोषणा झाल्यापासून याविषयी वर्तमानपत्रातून आणि इतर सामाजिक माध्यमातून या विषयी उलट सुलट चर्चा सुरु झाली. सरस्वती मंदिर ट्रस्ट, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करते याचा अर्थ ठाण्यातील मराठी शाळा बंद होण्याच्या शोकांतिकेची  सुरवात झाली. मराठी शाळांना शेवटची घरघर लागली अशा भावना या लेखातून व्यक्त झाल्या होत्या. अर्थात लिहिणाऱ्यानी मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम या पोटीच हे लेख लिहिले होते, यात शंका नाही.

वरील सर्व शंका, कुशंका आणि आरोपांना उत्तर आमच्या विद्यार्थ्यांनी दिले आहे. गेल्या वीस वर्षात संस्थेच्या शाळांचा शैक्षणिक यशाचा आलेख हा वरती जाणाराच आहे.  गेल्या दोन तीन वर्षात यावर कळस चढविला गेला आहे. संस्थेच्या भविष्याच्या दृष्टीने आणि विशेषत: मराठी माध्यामाच्या शाळांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि सुखकारक वाटणारी घटना म्हणजे पूर्व प्राथमिक विभागाचा झालेला ‘राष्ट्रीय पातळीवरचा गौरव’. २०१६ साली भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेत बाल गटात, विभागाच्या प्रमुख सौ. रती भोसेकर आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाने निवडले जाण्याचा मान मिळाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण पालकांचा या उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभाग. या राष्ट्रीय पुरस्कारा बरोबर,गेल्या महिन्यात ताराबाई मोडक हा बहुमनाचा राज्य स्तरीय पुरस्कार सुद्धा संस्थेच्या पूर्व माध्यमिक आणि प्राथमिक विभागाला मिळाला. बाल शिक्षणात वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

शाळेचा शालांन्त परीक्षेचा निकाल दरवर्षी ९९% च्या वर असतो यात आता नवल राहिले नाही. २०१६ च्या परीक्षेत ४२ मुलांनी ९०% टक्केच्यावर गुण मिळवले होते तर २०१७ साली ४४ विद्यार्थ्यांनी ९०% ची सीमा ओलांडली होती. विशेष कौतुक म्हणजे यातील १८ विद्यार्थ्यांनी राज्य अथवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त केले होते. क्रीडा संकुलाच्या पाठबळामुळे सरस्वती सेकंडरी स्कूलने स्थानिक पातळीवर विविध खेळांचे अजिंक्यपद मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाचा ‘ ठाणे महापौर चषक’ पटकावण्याचा मान मिळवला आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडा खेळाडूंना दिला जाणारे शिवछत्रपती पुरस्कार यावर्षी महाराष्ट्र शासनाने जाहीर केले. या जाहीर झालेल्या पुरस्कारात सरस्वती मंदिर ट्रस्टने चौकार मारला आहे. जलतरण-सौरभ सांगवेकर, टेबल टेनिस – पूजा सहस्त्रबुद्धे, बॅडमिंटन -अक्षय देवळेकर, मनीषा दंगे- बास्केटबॉल यांचा समावेश आहे. त्या अगोदर अस्मिता चितळे आणि मानसी जोशी यांना हा पुरस्कार अगोदर मिळाला आहे. हे दोन पुरस्कार धरून चौकाराचे रुपांतर षटकारात झाले आहे. याच महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा पाटील हिने ज्युडोमध्ये सुवर्ण पदक मिळवले. तिच्या बरोबरच संकुलातील जिम्नॅस्टिक खेळाडू पूर्वा किर्वे, सोहा नाईक आणि गरिमा या सर्व खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. मणिपूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुमार खो खो स्पर्धेत शाळेचा माजी विद्यार्थी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याला मानाचा वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला. हे सर्व खेळाडू गेल्या वीस वर्षात तयार झालेले आहेत. १९९८ साली संस्थेचे क्रीडा संकुल संस्थापक श्रीमती विमलाताई कर्वे यांच्या दुरदृष्टीतून उभारले गेले. गेल्या वीस वर्षात संस्थेच्या शाळांत क्रीडा संस्कृती केवळ रुजली नाही तर ती फुलली आणि आज त्या यशाची मधुर फळे आपल्याला दिसत आहेत. शाळेची सांस्कृतिक क्षेत्रात मोठी  परंपरा आहे. हि परंपरा आज हि चालू आहे. नुकत्याच झालेल्या मराठी चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात शाळेच्या प्राथमिक विभागात चौथीत असलेल्या मैथली प्रवर्धनला सर्वोत्कृष्ठ बाल कलाकाराचा पुरस्काराने गौरविले गेले.

हि केवळ कागदावरची नामावली अथवा आकडेवारी नाही आहे. सरस्वती सेकंडरी स्कूलचे यश हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना टक्कर देऊन मिळवलेले यश आहे आणि म्हणूनच याचे मोल आणि महत्व मोठे आहे. हे यश हे ठाण्यातील मराठी शाळांचे यश आहे. पुढील दहा वर्षात मराठी शाळा बंद होतील या निराशावादी सूरांना दिलेले हे चोख उत्तर आहे. व्यवस्थापन, शिक्षक, पालक यामध्ये सुसंवाद असेल तर या सर्वांचे केंद्र बिंदू असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता फुलते, हे सरस्वती मंदिर ट्रस्टने आणि संस्थेच्या सर्व घटकांनी दाखवून दिले आहे.

सरस्वती मंदिर ट्रस्टचा नूतन विद्या संकुल प्रकल्प, या पाश्वर्भूमीवर आकाराला येणार आहे. शनिवार दि. ५ मे रोजी संपन्न झालेला भूमीपूजन समारंभ आणि नूतन वास्तु उभारणीचा शुभारंभ हा केवळ ठाण्यातील नाही तर समस्त मराठी माध्यमाच्या शाळांना नव्याने उमेद आणि उत्साह देणारी घटना ठरणार आहे. मराठी शाळांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी पथ मार्गदर्शिका म्हणून या घटनेचा भविष्यात उल्लेख केला जाईल असा मला विश्वास वाटतो.

संपूर्ण विद्या संकुलाचा प्रोजेक्ट पूर्ण होण्याचा कालावधी तीन वर्षाचा आहे व खर्च अंदाजे २५ कोटी आहे. यामध्ये जवळ जवळ ५२ हजार चौरस फुटाचे बांधकाम हे मराठी शाळेसाठी असणार आहे. पुढील दोन वर्षात पूर्ण होणाऱ्या पहिल्या टप्प्यात, सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग आणि सरस्वती सेकंडरी स्कूल यांचा त्यात समावेश आहे. सहा मजली, षटकोनी आकाराच्या इमारतीत आधुनिक शैक्षणिक सोयीयुक्त वर्गखोल्या आणि सुसज्ज प्रयोगशाळा, प्रत्येक विभागाचे वेगळे ग्रंथालय, चित्रकला व इतर कला कौशल्यकृती वर्ग, सभागृह यांचा यात समावेश असेल. मराठी शाळा उभारणीचा एकूण अंदाजे खर्च हा १५ कोटी आहे. दुसऱ्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि कला कौशल्य विकास केंद्र विकसित करण्याचा संस्थेचा विचार आहे. मराठी शाळेबरोबर, क्रीडा संकुलाच विस्तार आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे बांधकाम पूर्ण होईल. क्रीडा संकुलाच्या पाचव्या मजल्यावर आधुनिक उपकरणांसहित जिम्नॅस्टिकस व इतर खेळांसाठी क्रीडागृह उपलब्ध असणार आहे.

या संपूर्ण विद्या संकुलाचे स्वरूप हे शैक्षणिकच ठेवण्याचा संस्थेचा निर्धार आहे. नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे.

सुरेंद्र दिघे
ज्येष्ठ विश्वस्त,
सरस्वती मंदिर ट्रस्ट
surendradighe@gmail.com

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 10 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…