संथ वाहते कृष्णामाई

जलसंपदा खात्यामार्फत जलजागृती सप्ताह सुरू झाला आहे. याच विषयावर आधारित एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट 1967 साली निर्माण झाला.

सहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता.

Starring Chandrakant, Kamini Kadam, Arun Sirnaik, Jaymala Kale, Raja Paranjpe, Vinay Kale, Gulab Mokashi,Vasant Latkar & Rajaram Shinde.
Wriyer/Story : G. D. Madgulkar
Music Director : Datta Davjekar
Director : Madhukar Pathak

सशक्त कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन सर्वकाही ग.दी. माडगूळकर यांचे होते तर चित्रपटास सुरेल संगीताने सजवले होते दत्ता डावजेकर यांनी. सुधीर फडके, आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांनी पार्श्वगायन केले होते. चित्रपटाची पूर्ण कथा ही सांगली आणि त्याच्या आसपासच्या कृष्णेच्या काठावर वसलेल्या हरिपूर, उदगाव, अंकली या ठिकाणची आहे. बहुतांश चित्रीकरण याच गावातील आहे. गावातील प्रतिष्ठित देशमुख म्हणजे चंद्रकांत मांढरे हे स्वतः च्या स्वार्थासाठी प्रसंगी गाव देखील गहाण ठेवण्यास मागे पाहणार नाहीत या नियतीचे असतात. त्या गावात अरुण सरनाईक हा होतकरू तरुण शेतकी पदवी घेऊन येतो. आपल्याला मिळालेली विदेश संधी देखील तो गावासाठी सोडून देतो. गाव दुष्काळात होरपळत असतो. समोर कृष्णामाईचे दुथडी भरून वाहणारे पात्र असूनही देशमुखांच्या अरेरावी आणि धाकामुळे सर्व गाव तहानलेलेच रहाते.

या गावात पूर्वी एक स्थापत्य अभियंता राजा परांजपे येतात व ते कृष्णेवर बांध घालून त्याचे पाणी गावातील शेतीसाठी वापरता येईल अशी योजना तयार करतात. पण आपल्या स्वार्थाने अंध झालेले देशमुख त्या अभियंत्यास वेडे ठरवतात आणि तो गावभर बडबड करत फिरत राहतो. पण एके दिवशी तो म्हणत असलेले अर्थपूर्ण गाणे अरुण सरनाईक ऐकतात आणि त्या गाण्याचा अर्थ ऐकून ते थक्क होतात पण तो वेडा त्यांनाही हाकलून देतो. शेवटी अरुण सरनाईक त्याची ही योजना अंमलात आणतात आणि गावातल्या पुढाऱ्यांच्या विरोधास न जुमानता ही योजना सफल होते आणि गंगा अंगणी येते.

आजही परिस्थिती काही फार वेगळी नाही. काही स्वार्थी, आणि नतद्रष्ट लोकांमुळे अनेक योजना धूळ खात पडून आहेत. आपण या समाजाचे काही देणे लागतो, त्याचे आपल्यावर ऋण आहे आणि त्यातून उतराई होण्यासाठी काहीतरी केले पाहिजे ही कल्पनाच आज लोक विसरले आहेत. असो.

या चित्रपटातील एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गीत म्हणजे शीर्षक गीत,” संथ वाहते कृष्णामाई,…..”

सुधीर फडके यांच्या मुलायम पण धीर गंभीर आवाजात हे गाणे ऐकले म्हणजे हृदयात कालवाकालव होते आणि डोळ्यात पाणी येते. आम्ही आज कुठे आहोत आणि आमच्या देशासाठी काय करत आहोत हा प्रश्न पडतो.

गदिमांचे हे अतिशय सुंदर काव्य आहे ज्यास संगीतकार दत्ता डावजेकर यांनी राग शिवरंजनी मध्ये गुंफले आहे.

अतिशय श्रवणीय असा हा राग काफी थाटातून निर्माण होतो. या मध्ये मध्यम आणि निषाद दोन्ही वर्ज्य आहेत.त्यामुळे औढव- औढव जातीचा हा राग गांधार मात्र कोमल घेतो. सहसा याचे गायन रात्रीच्या समयी होते.

आरोह सा रे ग’ प ध सां तर अवरोह सां ध प ग’ रे सा असे येतात

सुधीर फडके यांचे सूर आणि चित्रण राजा परांजपे यांचेवर झाले आहे. हरिपूर या कृष्णाकाठच्या गावी याचे चित्रीकरण झाले आहे. ई. बारगिर यांचे अत्यंत सुंदर छायाचित्रण या चित्रपटास लाभले आहे.

सांगली जिल्ह्यास सुजलाम सुफलाम करणाऱ्या कृष्णामाई बद्दल गदिमा म्हणतात, चित्रपटातील वेडे ठरवले गेलेले अभियंता राजा परांजपे म्हणतात, ही कृष्णामाई संथ पणे वाहते, हिला हिच्या काठावर काय सुखदुःख आहेत याची जाणीव देखील नाही.

ते पुढे म्हणतात, ही नदी नाही, ही तर निसर्गाने घालून दिलेली नीती आहे, जी आपल्या आत्मगतीने वाहत असते.त्यामुळे कुणाला लाभ झाला किंवा
कुणाला हानी पोंचली याची लवमात्र कल्पनाही तिला नाही.( ” नदी नव्हे ही निसर्ग नीती,…..” )

पुढे ते म्हणतात, कुणी नदीला माता म्हणतात, तर कुणी पूज्य देवता म्हणतात तर काही पाषाणाची मूर्ती स्थापून पुजत राहतात.( ” कुणी नदीला म्हणती माता,….” )

आपल्या मनातील शल्य हा अभियंता शेवटच्या ओळीत प्रकट करतो, तो म्हणतो, ह्या कृष्णामाईच्या उदरात उदंड पाणी आहे, जे वाहून जात आहे, पण कुणाच्याही डोक्यात हा विचार आला नाही की हे पाणी अडवून शेतीसाठी वळवून न्यावे. पण असे होईल तरी कसे, कारण सगळे स्वार्थी आणि आळशी. आणि आळश्याना गंगा कधीच फलदायी ठरत नाही.( ” सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून नेई रानी, आळश्यास ही व्हावी कैसी गंगा फलदायी”)
एका अभियंत्यांच्या मनातील शल्य इतके सुरेख पणे अधोरेखित करणारे कदाचित हे पहिले गीत असेल.त्यात बाबूजींचा सुंदर, दृढगंभीर स्वर, स्पष्ट शब्दोच्चार, मंद लयीतील कहेरवा ताल, आणि गाण्यास पोषक मोजकी वाद्ये आणि सुंदर चित्रीकरण त्यामुळे गीत पाहताना व ऐकताना माणूस अंतर्मुख होतो.

आज जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आपणही हे गीत लक्ष देऊन पहा व ऐका राग शिवरंजनी वर आधारित हे गीत.

चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई
गीत: ग. दि. माडगुळकर
संगीत: दत्ता डावजेकर
गायक: सुधीर फडके

https://www.youtube.com/watch?v=D-3kMbeNu6k

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…