नवीन लेखन...

संत महिपती महाराज – परिचय

समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित ‘भक्ती विजय’ व ‘संतलीला मृत’ या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. मराठी भाषेतील रसाळ व काव्यमय चरीत्राची निर्मिती करणारा थोर संत महिपती महाराज यांचा जन्म 1715 रोजी राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे झाला. मुगल काळातील गावाचे कुलकर्णी पद सांभाळताना महाराजांनी दरवर्षी पायी पंढरपुर यात्रा चुकवली नाही. संतांचा संग, तुकारामांचा आशीर्वाद व प्राकृत मराठी भाषेची गोडी या संगमातुन महाराजांनी महाराष्ट्रा बाहेरील 116 व महाराष्ट्रातील 168 संतांची चरित्रे लिहुन प्राचीन मराठीचे भांडार समृद्ध केले आहे.

“संतांची चरित्रे संपूर्ण! एकदाची ना कळती जाण!!
तेव्हा जी झाली आठवण! ती चरित्रे लिहून ठेविली!!”

या ओवीतूनच महाराजांची संत चरित्र शब्द बध्द करण्यामागची भुमिका स्पष्ट होते. तुकाराम महाराजांच्या समकालीन महिपती बुवांना तुकाराम यानांच गुरू मानले होते. संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती सर्व सामान्यांच्या बोली भाषेत गंगेच्या रुपाने आणण्याचे पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यांचेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या बरोबरीने महिपती बुवांनी चालविले. अठराव्या शतकात ग्रामीण भागातील जनतेत ईश्वर भक्ती जागृत करण्याकरीता संत चरित्र व्याख्यान व काव्य रुपाने साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत रचले गेले. संत कथा व्याख्यानात महाराष्ट्र रंगू लागला. दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले. दादोबाच्या याच मुलाने दुष्काळात आपले घर दामाजी पंता प्रमाणे गोर गरीबांकडून लुटवून घेतले. अल्प मिळकतीत आपल्याकडे जे आहे ते गरजुसांठी दान करणे या मागे समाजहिताची फार मोठी व्यापक दृष्टी लागते. संतांची वैशिष्टये हेच सांगतात की ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’

हाच उपक्रम त्यानी पुढील तीन दुष्काळात आरंभिला. वारकरी संप्रदायातील नम्र भाषा प्रभु उदारवादी व पांडुरंग भक्त महिपती महाराज पेशवाईत लोकप्रिय न झाले असते तरच नवल होते.श्रीमंत बाजीराव पेशवे व त्या नंतर मल्हारराव होळकर यांनी महिपती महाराज यांच्या वंशाकरीता जमीन व मान पत्र केल्याची नोंद आहे.

संतसाहित्याचे अभ्यासक श्री.रा.चि.ढेरे म्हणतात “महिपती महाराजांच्या ग्रंथांनी सतत दीडशे दोनशे वर्षे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकमानस सात्विक संस्कारांनी भारुन टाकले होते. काल परवा पर्यत ग्रंथांचीच प्रतिष्ठा सार्वत्रिक होती. हा प्रभाव दुर्लक्षण्याजोगा नाही. संत प्रितीतुन प्रकट झाले आहे. या महान कार्यासाठी महाराष्ट्राने महिपतीचे ऋण प्राजळपणे मान्य करावयास हवे.”

दरवर्षी पंढरपुर आळंदी यात्रा करुन महाराजांनी संपूर्ण भारत यात्रा केली होती. उत्तर भारतातील मीरा, कबीर, सुरदास, नरसी मेहता यांच्या बरोबर नामदेव, तुकाराम, रामदास या महाराष्ट्रातील संतांचे चरित्र मोठया मेहनतीने एकत्र करुन मराठीत आणले आहे त्यांच्या या प्राचीन साहित्याचा अभ्यास श्री.वि.वा.राजवाडे, श्री.रा.चि.ढेरे, श्री.भा.ग.सुर्वे, श्री.प्र.रा.भांडारकर, श्री.वि.ल.भावे, सौ.उषाताई देशमुख, श्री.सुरेश जोशी या मान्यवरांनी केला आहे. महाराष्ट्रात सन 1885 ते 1910 काळात ‘ज्ञानोदय’ या ख्रिश्चन धर्म पत्रिकेचे संपादक रे.जस्टीन एडवर्डस अँबट यांनी महिपती महाराजांच्या ‘भक्त विजय’ ‘भक्त लीलामृत’ व ‘संत विजय’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले आहे. महिपती बुवाच्या या संत चरित्रांचा परिचय रे.अँबट यांनी अमेरीकन विद्वानांना करुन दिला. ख्रिश्चन धर्म प्रचारक असुन सुध्दा त्यांनी मराठी संतांचा गाढा अभ्यास केला होता. रे.अँबट यांचे इंग्रजी भाषांतर महाराष्ट्र कवी संत माला (The poet saints of Maharashtra series) या नावांने सुप्रसिद्ध आहे. ‘भक्त विजय’ ग्रंथाचा अनुवाद करताना त्यांनी डिक्टाफोनचा वापर केला होता. या डिक्टाफोनवर शब्द बद्ध केलेले त्यांचे भाषांतर नंतर कागदावर उतरवले गेले. शनिशिंगणापुराचे नाव भारतात सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. महिपती महाराजांनी ‘शनी महात्म्य’ ग्रंथाची निर्मिती केलेली आहे.

मराठी साहित्याचा प्रवाह संत चरित्रातून त्यानी प्रवाहित केला. त्याच महिपतीच्या जन्मगावी आज मोठे प्रशस्त भव्य मंदिर उभे आहे. संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रावसाहेब साबळे पाटील दरवर्षी निष्ठेने ताहराबाद ते पंढरपुर पायी पालखी काढतात. या पालखीमध्ये राहुरी, श्रीरामपुर, संगमनेर, पारनेर, व अहमदनगर येथील हजारो विठ्ठल भक्त सामिल होतात. या ट्रस्टमधे महिपती महाराजांच्या वंशातील श्री.अविनाश मुरलीधर कांबळे, ह.भ.प.पांडुरंग जनार्धन कांबळे व श्री.संजय तुकाराम कांबळे यांचा समावेश आहे.

महिपती महाराजांचे अनेक ग्रंथ अद्याप अप्रकाशित आहेत. काही हस्तलिखिते महाराजांच्या वंशजांकडे भक्तिभावाने सांभाळून ठेवली आहेत. महिपती यांचे हस्ताक्षर सुंन्दर आहे. महाराजांच्या अनेक पोथ्या पुणे, मुंबई येथील संशोधकानी हस्तगत केल्या आहेत. कांबळे घराण्यातील बहुतेक कुटुंबे पोटा पाण्यासाठी व्यवसायानिमित महाराष्ट्रात, कर्नाटकात व मध्य प्रदेशात पांगले आहेत.

श्रीक्षेत्र ताहराबाद येथील उत्सव आषाढ शुध्द १० पासुन अमावस्ये पर्यंत असतो. त्रेयोदशीला काला, चतुर्दशीस तळीत पहाटे पाऊलघडीची पुजा झाली की उत्सव संपतो. पाऊलघडी म्हणजे महिपती महाराजांच्या पाऊलांचे लाल ठसे धवल वस्त्रावर प्रकटतात अशी ग्रामस्थांची श्रद्दा आहे. या श्रद्देला आधार काय असु शकतो याचा विचार केला की वाटते महिपती बुवांनी पंढरीची पायवारी कधी चुकवली नाही. विठ्ठालाच्या दर्शनाला जाताना महाराजांच्या पायात काटे रुतत असावेत व रक्ताळलेल्या पावलांनी ती वारी संपन्न होत असावी. त्याचीच आठवण येथील सश्रद्द भाविक पाऊलघडी कार्यक्रमा द्वारे व्यक्त करीत असावेत.

मी एका उत्सवाला गेलो होतो. तेथील ग्रामस्थांनी रचलेले सोंगे पाहुन चकित झालो. दिवसभर शेतात राबणारे अडाणी शेतकरी सोंगे आणताना असा काही अभिनय करतात की राजस्थानी राजपुताचे घोड्यावर स्वार होत केलेले सोंग मी कोणत्याच नाटकात, चित्रपटात पाहिलेले नाही. महिपती बुवांना मराठी भाषे व्यतिरीक्त गुजराती, हिंदी व कानडी भाषा अवगत होती. संपूर्ण भारत भ्रमंतीतुन त्यांनी त्याकाळी विविध भागातील लोक कलेचा संस्कार आपल्या ताहराबादला आणला होता.

या उत्सवात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनाकार एकत्र जमतात. वारकरी संप्रदयालील संतांचे उदार धोरण व हिंदु धर्मातील कर्मकांडाला त्यांनी केलेला तीव्र विरोध प्रकर्षाने भावतो.नाम स्मरण व सदाचार हिच ईश्वर सेवा ते मानतात. सुख सुविधे मुळे आज आपण बंगला, गाडी, पैसा, नोकरी, व्यवसाय,सत्ता, राजकारण यालाच देव मानु लागलो आहोत.कदाचित तुम्ही नास्तिक असाल परंतु मानवता, बंधुता व प्रेम या मानवी मुल्यांच्या मुर्तीचा विध्वंस करुन स्वत:चे मोठेपण सिध्द करु शकणार नाहीत.संतांचे हे मोठेपण आपण कधीच खुजे करु शकणार नाही. भारतीय संस्कृतीचे मुल्य अबाधित ठेवण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. अशा सर्व संतांचा परिचय आपल्याला करुन देणारे संत चरित्रकार महिपती बुवांचे उपकार कोणालाच विसरता येणार नाहीत. ताहराबाद येथील संत महिपती देवस्थान ट्रस्टचा कारभार वाढला आहे. दरवर्षी ताहराबाद येथुन पंढरपुरला भव्य पालखी व पायी वारी निघते. याचे सुंदर नियोजन होत आहे.

ताहराबाद येथील देवस्थानात त्यांच्या जीवन चरित्रावर आधारीत चित्रमय गँलरी उभी राहावी व तेथे एका दुर्लक्षीत संत महिपती बुवांचे गांव हे धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे हीच सदिच्छा व संत महिपती बुवांच्या चरणी शतश: वंदन.

— विजय प्रभाकर नगरकर
अहमदनगर, महाराष्ट्र
vpnagarkar@gmail.com

विजय प्रभाकर नगरकर
About विजय प्रभाकर नगरकर 27 Articles
मी बीएसएनएल मधील सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी आहे. राजभाषा विभागामध्ये कार्यरत होतो. अनुवादित कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

1 Comment on संत महिपती महाराज – परिचय

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..