नवीन लेखन...

साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा

समाजातील जातीभेद,  अस्पृश्यता  यासारख्या  अनिष्ट  रूढी  आणि परंपरांना  साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. त्यांनी दिलेल्या अनेक  लढ्यांपैकी एक महत्त्वाचा लढा  म्हणजेच “पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा“

साने गुरुजी  उत्तम दर्जाचे  कवी,  प्रतिभावंत  लेखक, श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक,  समाज सुधारक  तसेच  क्रांती सेनानी होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात  त्यांच मोलाचं योगदान होतं, मात्र त्या पलीकडे जाऊन  त्यांनी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि  दलितांसाठी केलेल्या  योगदानास  अधिक महत्त्व आहे. आई यशोदाबाई  यांच्या   शिकवणुकीचा, फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.

पंढरपूर म्हणजे  महाराष्ट्राचे हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची ही किल्ली. पंढरपूरची कळ दाबली  तर महाराष्ट्रभर प्रकाश पडतो.  पांडुरंग, विठुराया म्हणजे रंग, जाती, पंथ, धर्म यांना, कोणतेही स्थान न देणारा ‘देव.  पंढरपूर अशा मानवतेच्या दैवतांच्या, विठ्ठल- रखुमाई यांच्या अस्तित्वाने पावन झालेले स्थान.

पंढरपूरचे हे  प्राचीन  पवित्र मंदिर   देवाच्या सर्व लेकरांना  मोकळे व्हावे  म्हणून साने गुरुजींनी उपवास केला होता “ संत एकनाथ म्हणतात,” काया  हे पंढरी,आत्मा हा विठ्ठल “ शेवटी स्वतःच्या जीवनात  सारे आणायचे असते. संतांनी  वाळवंटात  सर्वांना जवळ घेतले  आपण ही मंदिरात  सर्वांना घेऊन या  “  असं  साने गुरुजींनी म्हटले आहे

समाजातील जातीभेद,  अस्पृश्यता  यासारख्या  अनिष्ट  रूढी  आणि परंपरांना  त्यांनी नेहमी विरोध केला. त्यांनी दिलेल्या अनेक  लढ्यांपैकी एक महत्त्वाचा लढा  म्हणजेच “ पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा “ विठोबा हा  कष्टकऱ्यांचा देव,  १८ पगड  जाती जमातींच्या लोकांचा देव, राबणाऱ्यांचा पाठीराखा. मात्र कित्येक शतके  या मंदिरात  अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना  प्रवेश नव्हता.  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात  हरिजनांना प्रवेश मिळावा  यासाठी जनजागृती करण्यासाठी जानेवारी  १९४७ ते एप्रिल  १९४७ असा  महाराष्ट्राचा  झंजावती दौरा, साने गुरुजींनी केला . ऊन,वारा आणि पाऊस कशाची तमा बाळगली नाही.  एकट्या पश्चिम महाराष्ट्रात   ४०० पेक्षा अधिक सभा घेतल्या  आणि त्याचा परिणाम  म्हणजे  गावोगावी तीनशे मंदिरे  खुली झाली. परंतु पंढरपूरच्या बडव्यांनी  जराही  दाद दिली नाही. खुद्द चोखोबानाही  मंदिराच्या आत  येऊ दिलं नाही.

ह्या लढ्यासाठी महात्मा गांधीजींचा  पाठिंबा मिळवण्यासाठी  साने गुरुजींनी खूप प्रयत्न केले,  पण शेवटपर्यंत  महात्माजींचा पाठिंबा मिळाला नाही त्यामुळे  त्यांनी  उपोषणाचा मार्ग स्वीकारला. साने गुरुजी म्हणतात, ” गेल्या काही महिन्यात  मी जो प्रचार केला,  त्यात अस्पृश्यतेविषयी  सांगत असे.  सरकार आता कायदाही करीत आहे, असं समजतं. परंतु  मनोबुद्धीतच जी क्रांती झाली पाहिजे ती अद्याप झाली नाही. पंढरपूर मंदिर मोकळे व्हावे,  पांडुरंगाच्या पायी  हरिजनांना  डोके  ठेवता यावे  यासाठी  आज  मी  एकादशी पासून  उपवास करीत आहे  मंदिराच्या व्यवस्थापकांना  माझी विनंती आहे की  त्यांनी देवाजवळ  सर्व  लेकरांस येऊ द्यावे, तशी घोषणा करावी  आणि तोपर्यंत  माझा उपवास चालूच असेल.“

अखेर  एक मे १९४७  हा दिवस  उजाडला., साने गुरुजींनी एकादशीच्या मुहूर्तावर  आपले उपोषण  सुरू केले. स्वातंत्र्याच्या तोंडावर  हा कसला अपशकुन ? म्हणून  उपोषणाच्या विरोधात  देशभरातून  सनातनी मंडळी  पंढरपूरला  गोळा झाली . दलितांना मंदिर खुले करू नये  असे वाटणाऱ्या बडव्यांनी   ”  जावो साने भीमा पार, नहीं खुलेगा  विठ्ठल द्वार “ अशा घोषणा देऊन , गुरुजींना  त्यांनी   काळे  झेंडे  दाखविले.

तसंच  उपोषणाच्या जागेबद्दल, राज्यात  मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठिंबा मिळाला .मात्र पंढरपुरात  उपोषणाला जागाच मिळू नये, अशी  तजवीज  विरोधकांनी  करून ठेवली होती. परंतु  गाडगेबाबांच्या विचारांची दिशा घेऊन  काम करणारे,  कुशाबा महाराज तनपुरे  यांनी आपल्या मठात  उपोषणास जागा उपलब्ध करून दिली. हा लढा  आज जरी सोपा वाटत असला,  तरी   ७५  वर्षांपूर्वी  तो सोपा नव्हता.

एक मे १९४७ रोजी  चंद्रभागेत स्नान करून  साने गुरुजीनी  उपोषणास सुरुवात केली होती. उपोषणाचा  एक एक दिवस  पुढे पुढे  सरकू लागला. अनेकांनी  आवाहन केले, मात्र  उपोषण  लांबतंच  चालले होते.  जनतेला चिंता वाटू लागली. तसेच  वर्तमानपत्रात  रकानेच्या रकाने भरून  माहिती येत होती. राज्यकर्त्यांनाही  चिंता सतावू  लागली. वाढता दवाब लक्षात घेऊन, विठ्ठल मंदिर पंच कमिटीने  सर्वांना प्रवेश देण्याची  तयारी दर्शविली. या उपोषणाच्या वेळी  सेनापती बापट, संत तुकडोजी महाराज, आचार्य अत्रे,  हरिभाऊ फाटक,  अच्युतराव पटवर्धन  हे  गुरुजींच्या सोबत  होते.

साने गुरुजींच्या  उपोषणाच्या काळात  म्हणजेच  नऊ मे १९४७ रोजी रात्री  आचार्य अत्रे यांनी  पंढरपूर येथील सभेत  भाषण केले.  ते म्हणाले “  आज पहिल्यांदाच  मी पंढरपूरला आलो आहे. मी आज आलो आहे  तो, देवळातल्या  तुमच्या  पांडुरंगाच्या दर्शनाला नाही  तर, देवळाबाहेर  मरणाच्या  दारी  बसलेल्या, आमच्या एका  पांडुरंगाच्या  भेटीसाठी   आलो आहे. दुपारी तनपुरे महाराजांच्या मठात जाऊन  मी साने गुरुजींना पाहिलं. नऊ दिवसांच्या उपोषणानंतर, त्यांचं शरीर थकून गेलं आहे.   जीवनशक्ती अगदी  क्षीण होत चालली आहे. क्षणाक्षणाला  त्यांची प्राणज्योत मंद होत चालली आहे. त्याला तुम्ही वाचवणार आहात  की नाही ? साने गुरुजींची करुणमूर्ती पाहून, दुसरा कोणताच विचार  माझ्या मनात येत नाही. दुसऱ्याला हसवणारा मी, पण आज मलाच रडू कोसळत आहे. आपल्या हरिजन बंधूंना  विठोबाच्या मंदिरात प्रवेश नाही  याचे दुःख  इतरांपेक्षा  त्यांना अधिक झालं आहे.

साने गुरुजींच्या बद्दल  आचार्य अत्रे यांना  नितांत प्रेम आणि आदर असल्यामुळे  त्यांनी “ श्यामची आई”  याच  नावाचा मराठीत  चित्रपट काढला. त्या चित्रपटास  १९५३  साली  राष्ट्रपती  सुवर्णपदक  तसेच  १९५४ मध्ये  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला  सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त झाला.

एक मे १९४७ ते   ११ मे १९४७ पर्यंत, असे अकरा दिवस  उपोषण चालले.   मध्यवर्ती कायदे मंडळाचे अध्यक्ष  तसेच लोकसभेचे सभापती  दादासाहेब मावळकर  यांनी आणि इतरांनी  गांधीजींचा गैरसमज दूर केला  आणि बडव्यानाही  परोपरीने समजाविले. साने गुरुजींच्या  दहा दिवसांच्या उपोषणानंतर, तसेच  सामाजिक दबाव  वाढल्यानंतर , दहा मे १९४७रोजी  अस्पृश्यांच्या  मंदिर  प्रवेशास मान्यता मिळाली  व लढा यशस्वी झाला.  “ एका पांडुरंगाने  दुसऱ्या पांडुरंगाला  खऱ्या अर्थाने मुक्त केले “ अस  त्यावेळी  कौतुकाने म्हटलं जायचं. ध्येयवादाच्या बळावर  शतकानुशतके चालत आलेल्या रुढी  आणि परंपरा  मोडीत  काढता येतात  याची प्रचिती आली.

“ खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे “ या साने गुरुजींच्या  काव्य  व प्रेरणा मंत्रामुळे  स्पृश्य अस्पृश्यात विभागलेला समाज एक झाला. पंढरपूर मंदिरात, सर्व जाती धर्मांना प्रवेश मिळाल्यामुळे  वारकरी संप्रदायाला सुद्धा गती मिळाली. मंदिराच्या पायरीपासून, माऊलीच्या चरणांपर्यंत  अस्पृश्य समाजाला  तिथपर्यंत नेण्याचे  महत्त्वाचे काम साने गुरुजींनी केले.  त्यामुळे  पंढरपूर मंदिर मुक्तीचा हा लढा अविस्मरणीय  आहे.

आता उठवू सारे रान , आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला  प्राण
आता उठवू सारे रान ,आता पेटवू सारे रान,

अशा स्फूर्तीदायक   गीतांनी  महाराष्ट्राच्या  मनातून जातीय विषमता  दूर करण्याचा  प्रयत्न केला  गेला. कारण गुरुजी  मानवतेचे पुजारी  तसेच  शब्दांचे पूजक होते  हेच  खरं.

— वासंती गोखले
vasantigokhale@gmail.com

1 Comment on साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा

  1. अप्रतिम लेखन वासंतीताई? वाचताना अंगावर रोमांच उभे रहातात. त्यावेळच्या परिस्थितीची कल्पनाही करता येत नाही. आता इतक सहज सर्वांना देवदर्शन मिळते की अशा महान आत्म्यांना खरं तर पहिले वंदन करून मगच मंदिर प्रवेश दिला पाहीजे.

    प्रसंग डोळ्यांसमोर उभा करण्यात तुमचा हातखंडा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..