नवीन लेखन...

संधीचं सोनं

 

विधात्याने सृष्टी निर्माण करताना भर दिला तो विविधतेवर. जगात कोणत्याही दोन गोष्टी समान नसतात. माणसामाणसाचं रुप वेगळं असतं, राहणीमान वेगळं असतं. प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती वेगळी असते. वनस्पतींचे आकार वेगळे असतात, प्रकार वेगळे असतात. संपूर्ण जगात कोणत्याही दोन ठिकाणी कोणासाठीही समान अशी एखादी गोष्ट असते का? सृष्टीतील विविधतेने भारावून गेल्याने आपल्या मनात या प्रश्नाचं प्रथम नकारात्मक उत्तर उमटतं. जगात सर्वांसाठी समान अशी कोणतीही गोष्ट नसते यावर आपण ठाम राहतो. मात्र थोडा विचार केल्यानंतर ही आपली ठाम समजूत चूकीची असल्याचं आपल्या ध्यानात येतं. संपूर्ण जगात सर्वांसाठी निदान एक गोष्ट तरी समान असते. ती गोष्ट म्हणजे वेळ. दिवसाचे चोवीस तास सर्वांसाठी समान असतात. या एकाच बाबतीत संपूर्ण सृष्टीत कोठेही विविधता आढळत नाही, बदल संभवत नाही.

विधात्याने जन्मलेल्या प्रत्येकासाठी दररोज ठराविक चोवीस तासांचाच कालावधी मुक्रर केला आहे. निदान याबाबतीत तरी आपण कुणाला दोष देऊ शकत नाही.

माझी आर्थिक स्थिती खालावलेली आहे म्हणून माझ्या पदरी दिवसाचे कमी तास पडतात असा दोष आपण विधात्याला देऊ शकत नाही. तुम्ही अमेरिकेत राहणारे असा नाहीतर ग्रामीण भागात, तुमच्या परिसराचं हवामान पावसाळी असो वा कोरडं, या कशाचाही एका गोष्टीवर काहीच परिणाम होत नाही. ती गोष्ट म्हणजे दिवसाचे चोवीस तास. निदान याबाबतीत विधात्याची सर्वांवर सारखीच कृपा राहिली आहे. या चोवीस तासांच्या संधीचं आपण सोनं करतो की माती हा कळीचा मुद्दा आहे.

पदरी पडलेले चोवीस तास आपण कशाप्रकारे घालवतो याचा अंतर्मुख होऊन विचार करणं खरं गरजेचं. चोवीस तासातले खरे आठएक तास आपण झोपेतच घालवतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यातले एक तृतीयांश आयुष्य आपण झोपेतच घालवतो! उरलेल्या सोळा तासांतले आणखी आठएक तास चरितार्थ भागविण्यासाठीच जातात. या आठ तासात नोकरीधंदा करावा लागतो, पोटापाण्याची सोय भागवावी लागते. म्हणजेच आणखी एक तृतीयांश आयुष्यावर आपला अधिकार नसतो. उरले केवळ दिवसाचे आठएक तास. या हक्काच्या आठ तासांत आपण काय करतो याचा शोध घेणं उद्बोधक ठरतं.

दिवसाच्या मोकळया आठ तासांवरही आपला म्हंटलं तर संपूर्ण अधिकार नसतो. या आठ तासांवर आपल्या कुटुंबियांचा हक्क असतो, नातेवाईकांचा हक्क असतो, समाजाचा हक्क असतो. या आठ तासांत आपल्याला कुटुंबियांबरोबर मौजमजेसाठी बाहेर जावं लागतं, नातेवाईकांच्या लग्नादी मंगल कार्यात सहभागी व्हावं लागतं आणि सामाजिक कार्यासाठीही थोडाफार वेळ द्यावा लागतो. थोडक्यात हाती येणाऱ्या मोकळ्या वेळेतही वाटेकरी अनेक असतात. या सर्व वाटेकऱ्यांचं देणं देता देता आपण थकून जातो. आपल्याला केवळ आपल्यासाठी वेळ देता येत नाही याची आपल्याला खंत लागून राहते. याचाच परिणाम म्हणून आपण कायम कुढत कुढत आयुष्य जगतो, हताश होऊन येणाऱ्या दिवसांना सामोरे जातो आणि केवळ जगायचं म्हणून श्वास घेत जगतो.

या दुष्टचक्रातून बाहेर पडणं शक्य आहे का? प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे. त्यासाठी कास धरावी लागते ती वेळेच्या नियोजनाची. दिवसातले चोवीस तास आपण कसे घालवणार आहोत, पुढील संपूर्ण आठवडयात आपण काय करणार आहोत, महिन्याच्या अखेरीस आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि संपूर्ण वर्षासाठी आपलं ध्येय काय राहणार आहे याचं नियोजन म्हणजेच वेळेचं नियोजन. हे साध्य करता आलं की अनेक गोष्टी साध्य करता येतात, अनेक संकल्प पूर्णत्वास नेता येतात.

वेळेच्या नियोजनाची पहिली पायरी म्हणजे दररोज झोपण्याआधी अथवा सकाळी उठल्याबरोबर आपण आधीचा दिवस कसा घालवला याचा सारांश मांडणं.

साधारणतः महिनाभर असा सारांश लिहिल्यानंतर एकत्रितरित्या या सारांशांचा आढावा घेणे. महिना सुरु होण्याआधी आपण ठरवलं होतं काय आणि प्रत्यक्षात घडलं काय याचं चित्र यातून स्पष्ट होतं. आपल्या दैनंदिन दिनचर्येचा आरसा या सारांशातून आपल्यापुढे येतो. या वास्तवातून मग आपल्याला आपण काय करायका नको होतं याचा शोध घेता येतो. हाती आलेल्या वेळेचा कशामुळे अपव्यय झाला याचा तपशील यातून बाहेर येतो. आपण मित्रांशी किती वेळ गप्पा मारल्या, किती वेळ नुसतेच लोळत पडलो, किती वेळ टिव्हीसमोर बसलो हे स्पष्ट झाल्याने आपण उगाचच दिवसातला किती वेळ फुकट घालवला याची आपल्याला कल्पना येते. या सर्व गोष्टी आवश्यकही असतात.

या गोष्टी पूर्णतः टाळायचं ठरवलं तर आपलं आयुष्य तसं निरस होऊन जाईल. मात्र या गोष्टींसाठी आपण जेवढा वेळ दिला तो देणं खरोखरच आवश्यक होतं का? या प्रश्नाचं बहुतेकदा नकारार्थीच उत्तर येतं.

वेळेच्या नियोजनाचा आणखी एक नियम म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करणे. साधं उदाहरण द्यायचं तर आपण कामावर असताना घरच्या गोष्टींचा विचार करीत राहतो आणि घरी आल्यावर कामावरल्या कटकटींचा! कामावर असताना घरच्या समस्यांचा विचार करीत राहिल्याने कामात त्रुटी राहतात आणि घरी आल्यावर कामावरचा विचार करीत राहिल्याने कुटुंबस्वास्थ बिघडतं. यावर सोपा उपाय म्हणजे घरी परतल्यानंतर पादत्राणे काढतानाच बाहेरचे सर्व व्यापही बाहेरच ठेवून प्रसन्न मनाने घरी प्रवेश करणे. या गोष्टी म्हटलं तर अवघड असतात. इथे कळतं पण वळत नाही याचाच प्रत्यंतर आपल्याला येतो. मात्र सरावाने व वारंवार मनाला बजावत राहिल्याने हेही साध्य करता येतं.

माझा एक मित्र रविवारच्या सुटीबद्दल स्वतःचा छान अनुभव सांगतो. बहुतेक सर्वजण रविवारी अथवा सुटीच्या दिवशी आरामात उठतात. सुटी म्हणजे लोळत पडणं असाच बहुतेकाचा अलिखित नियम असतो. माझा मित्र मात्र सुटीच्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर उठतो! त्याचं म्हणणं सुटीचा दिवस जास्तच जास्त उपभोगावयाचा असल्याने लोळत कशासाठी पडायचं? लवकर उठून तो कधी वाचन करतो, कधी कॉलनीत फेरफटका मारुन येतो तर कधी टीव्हीवरची भजनं ऐकण्यात रंगून जातो. त्याचं म्हणणं असं की एरव्ही या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सवड नसते. रोज सकाळी उठलं की धावपळ सुरु होते. मग मनात रुंजी घालणाऱ्या या गोष्टी करायच्या तरी कधी?

माझ्या मित्राचं म्हणणं अगदी खरं आहे. अनेक गोष्टी करण्याचे मनसुबे आपण रचतो मात्र ते प्रत्यक्षात उतरवणं राहूनच जातं. याला मुख्य कारण म्हणजे अर्थातच वेळच पुरत नाही हे. हा वेळ आणायचा तरी कुठून? घटका गेली, पळे गेली, काळ करी ठणाणा हे संतवचन आपल्या परिचयाचं आहे. हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग केला नाही की करावयाच्या अनेक गोष्टी राहून जातात आणि मनाला चुटपूट लागून राहते. न केलेल्या गोष्टींचं ओझं मनात साचतं. यावर उपाय म्हणजे हाती आलेल्या वेळेचा सेकंद नि सेकंद सत्कारणी लावणं. वेळेचा सदुपयोग करण्याची सवय जडली की अनेक गोष्टी साध्य होतात आणि मनाला नवी उभारी मिळून जाते. हाती आलेल्या संधीचं सोनं करणं प्रत्येकाला शक्य असतं मात्र त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावयाचे असतात हे नक्की.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..