नवीन लेखन...

संधीचं सोन! – Part 1

गोविंदरावांनी तायडीच्या साखरपुड्याच्या कामांच्या यादीवरून अखेरची दृष्टी फिरवली. पायात चपला सरकावल्या आणि आत राधाक्कांना म्हणजे त्यांच्या पत्नीला आवाज दिला,

‘बरं का हो, मी जाऊन येतो बाहेर.’

‘सगळं नीट लक्षात ठेवा. ती यादी घ्या बरोबर. ‘राधाक्कांनी बजावले. आज तायडीचा म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा. मोठी म्हणजे मुलीत मोठी. दोन मुली, त्यात तायडी मोठी. बबडी छोटी. दोन मोठे भाऊ – राहुल आणि केदार. दोघांचीही लग्न होऊन ते परदेशी. तायडीचं लग्न तसं उशिराच जमलं. हुषार, सुंदर, गोरीगोमटी मुलगी पण मंगळ कडक. लोक कितीही सुधारले तरी हे मंगळ, राहू, केतु मात्र अजूनही बोडक्यावर बसतात. त्यामुळे बबडीचं पण लग्न लांबणीवर पडत होतं. तिला मंगळ फिंगळ काही नव्हता, दिसायलाही तायडीपेक्षा अंमळ जास्तच सुंदर, काही स्थळांकडून आडून आडून विचारणाही झाली होती पण आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं!’ असा बबडीचा बाणा होता. शेवटी तायडीला पत्करणारं एक बेणं मिळालं. म्हणजे बेण्यांच्या शरदने तिला पसंत केलं. त्याचा मंगळ म्हणजे तायडीच्या मंगळापेक्षाही भारी होता! राधाक्का बेण्यांना म्हणाल्या, ‘ते मंगळ फिंगळ तुमचं काय ते पहा, आम्ही पत्रिका पहात नाही.’

असो. तर सांगायचा मुद्दा तायडीच्या साखरपुड्याची सगळी तयारी करणे गोविंदराव आणि राधाक्कांच्या अंगावर पडले. त्यात गोविंदराव पडले हार्ट पेशंट, थोडी दगदग झाली की लागले धापा टाकायला. बेणे मंडळी तशी चांगली होती; पण साखरपुडा, लग्न धूमधडाक्यात हवं होतं त्यांना. गोविंदराव, राधाक्कांचीही खूप इच्छा होती पण करायचं कुणी? काय करणार? करणं तर भाग होतं. गोविंदरावांना बाहेर पिटाळून राधाक्का घरातल्या कामांकडे वळल्या. आजच त्यांची कामवाली दांडीयात्रेला गेली होती.

गोविंदरावांनी दरवाजा उघडला आणि ते पहातच राहिले. दारात दहाबारा जणांचे एक टोळकं उभं होतं. पांढरेशुभ्र कडक इस्त्रीचे कपडे, गळ्यात रंगीबेरंगी पंचेवजा उपरण्याचे पायघोळ पट्टे, तोंडावर छापातल्या गणपतीसारखे हसू! साखरपुड्याच्या कामाच्या नादात ते इतके बुडाले होते की क्षणभर पहातच राहिले.

‘काय भोळेसाहेब? येऊ का आत?’ त्यांच्यातला एकजण हात जोडून नम्रतेने म्हणाला. तेव्हा गोविंदरावांच्या डोक्यात उजेड पडला. अरेच्या! आज निवडणुकीचा दिवस नाही का? ही कुठल्यातरी पक्षाची मंडळी दिसतात. मनात ही ब्याद आत्ताच कशी आली? असा विचार आला त्यांच्या. उघडपणे मात्र ते म्हणाले,

‘या, या ना आत.’ एवढे म्हणण्याचाच अवकाश. ती टोळधाड आतच घुसली. त्यांचा म्होरक्या एक पोरसवदा, रुबाबदार तरुण होता. त्याने सोफ्यावर बैठक जमवली. त्याच्या उजव्या डाव्या बाजूला त्याचे डावे उजवे हात शोभतील असे दोन टगे बसले. बाकीची सगळी मंडळी सोफ्याच्या मागे त्यांच्या पाठीशी रांगेत उभी राहिली. आता ही सर्व गणवेशधारी टोळी मागेपुढे, डावी-उजवीकडे झुकत घाशीराम कोतवाल टाईप नाच सुरु करणार की काय असे गोविंदरावांना वाटले. त्यांना लवकर कटवावे म्हणून त्यांनी एकदम विषयालाच हात घातला.

‘काय साहेब? कसं येणं केलंत? काय सेवा करु आपली?’

‘छे, छे, अहो आपण कसली सेवा करताय! आपण मतदार राजे. आपण हुकूम करायचा, सेवा आम्ही करायची?

‘साहेब, हा आपला मोठेपणा झाला. बरं आपला कोणता पक्ष? हे कोणत्या पक्षाचे पट्टे म्हणायचे?’

‘काका, अहो पट्टे काय? ते काय कुत्र्याच्या गळ्यातले पट्टे आहेत काय? ते आमच्या पक्षाच्या झेंड्याचे रंग आहेत.’

‘असं का? आपल्याला कोणत्या पक्षानं पाळलंय म्हणायचं?

‘काका, तुमचा विनोद आवडला. तुम्ही म्हणता ते खरं आहे. अहो आजपर्यंत तुम्ही इतक्या पाळीव उमेद्वारांना मतं दिली पण निवडून आल्यावर कोणी एकाने तरी कधी तुमच्या प्रश्नांवर तंगडी वर केली का? नाही ना? म्हणून तर आमचा हा नवा पक्षी, नवी विटी, नवा दांडू! न.वि.न. दां! म्हणजेच नवीन दांडू पक्ष.”

‘अच्छा म्हणजे निवडून आलात तर तुम्ही आमच्या प्रश्नांवर तंगडी वर करणार तर?’

“काका, तुमच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते.’ तरुण नेत्यांचा उजवा हात बोलला. “काका, आमच्या पक्षाचे हे तरुण, तडफदार, सळसळते नेतृत्व, कुमारसाहेब. तुम्ही त्यांना एक संधी द्या, मग बघा ते संधीचं कसं सोनं करुन दाखवतात ते!’

‘म्हणजे यांच्या आजोबांनी पन्नास वर्षापूर्वी अशी संधी मागून त्यांच्या आणि त्यांच्या टोळीच्या घराघरातून सोनं भरुन दाखवलं तसं आपणही आपल्या घराघरांवर सोन्याची कौलं चढवून दाखवणार वाटते?” तेवढ्यात आतून पदराला हात पुसत राधाक्का येतात. गोविंदरावत्या टोळक्याशी बोलताना पाहून त्या म्हणतात.

‘अहो, कोण ही मंडळी? आणि तुम्ही अजून इथेच?’
‘नमस्कार आई.’तरण्या कुमारने त्यांना नमस्कार केला.

‘आई, मी कुमार कारभारी. नवी विटी, नवा दांडू पक्षाचा अध्यक्ष. या निवडणुकीत आमचा पक्ष प्रथमच उतरतो आहे म्हणून आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आम्हाला एक संधी द्या. बघा कसं संधीचं सोनं करून दाखवू आम्ही!

‘कराल रे बाबांनो कराल! अरे बाबा गेली चाळीस पन्नास वर्षे हेच ऐकून ऐकून आमच्या केसांची चांदी झाली. आता आम्हाला सोनापुरात पोहोचवून आमच्या देहाचं सोनं करायचं काम तुम्ही करा बाबांनो. तुमचे पत्रक द्या आणि या आता. आज माझ्या मुलीचा तायडीचा साखरपुडा आहे. तुमच्याशी बोलायला वेळ नाही आम्हाला, नमस्कार, या आता.’

‘अरे वा! आई, अहो तुमच्या मुलीचा साखरपुडा म्हणजे आमच्या ताईचाच की! आई, आता तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही मत द्या किंवा नका देऊ, ताईचा साखरपुडा आम्ही दणक्यात करु. बरं असं सांगा, तुमची किती मतं आहेत?’

‘आहेत चाळीस-पन्नास!’

‘काय? चाळीस पन्नास? अग काय वाट्टेल ते काय सांगतेस? आपण फक्त चौघेच तर आहोत. दोन मुलं आणखी, पण परदेशी. मग हे चाळीस पन्नास कुठून काढलेसं?

‘अहो, असं काय करताय? आपण घरचे चार, माझ्या भजनी मंडळाच्या तीस बायका,
सुना, आपले शेजारी, देशपांडे, बापट, कुलकर्णी असे आपण सगळे मिळून नाही का जात नेहमी मतदानाला?

‘काय सांगता?’ कुमारसाहेब आश्चर्याने ओरडतात. आपल्या उजव्या हाताला इशारा करतात. दोघे बाहेर जातात. बाहेर गेल्यावर कुमारसाहेब सदाला म्हणजे त्यांच्या उजव्या हाताला म्हणतात, ‘अरे सदा, एकदम पन्नास-साठ मतांचा लॉट दिसतोय. असं कर, आपल्या बाळ्याला यांच्या ड्युटीवर लाव. सांग साखरपुड्याला काय लागेल ती मदत कर. एक बस करून या सगळ्यांना मतदानाला घेऊन जा आणि मग साईदर्शनाला वर्तकनगरला जा घेऊन त्यांना. दहा पंधरा घरांवर लक्ष ठेवण्यापेक्षा हे एकच घर पकड’ ‘कुमारसाहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. एकदा बाळ्याला सांगितलं की काम फत्ते!’ तो बाळाला बोलावून तशा सूचना देतो. दोघे पुन्हा आत जातात.

“आई, हा आमचा ‘बाळा. ताईच्या साखरपुड्यासाठी तुम्हाला काय लागेल ती मदत करील. त्याला सगळं सांगून ठेवलं आहे. दणक्यात करा साखरपुडा. येतो आम्ही. तेवढं आमच्या संधीचं मात्र लक्षात ठेवा.” कुमारसाहेब आणि त्यांची टोळी जाते.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..