नवीन लेखन...

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक

सुदर्शन पटनायक यांचा जन्म १५ एप्रिल १९७७ रोजी जगन्नाथपुरी येथे झाला.

सुदर्शन पटनायक हे नाव वर्तमानपत्रं वाचणाऱ्यांसाठी नवं मुळीच नाही. वालुकाशिल्पाचा एखादा ऑफबिट फोटो एखाद्या दिवशी जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांमध्ये झळकतो, आणि सोबत झळकतं ‘सुदर्शन पटनायक’ हे नाव. वालुकाशिल्प बनवणाऱ्या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किनाऱ्यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकारचा किताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युट देखील स्थापन केले आहे. मात्र जेव्हा सुदर्शनने वालुकाशिल्प बनवायला घेतली तेव्हा त्याला शिकवणारं कुणीच नव्हतं.
सुदर्शन पटनायकचा एका मध्यमवर्गीय, धार्मिक घरामध्ये जन्म झाला. कुटुंबातले लोक जगन्नाथाचे भक्त. म्हणुन मुलाचं नाव ठेवलं सुदर्शन. घरात तीन भावंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापेक्षा जास्त फारसं काही शिकता आलं नाही. मात्र घरापासून तीन किलोमिटरवर असलेला पुरिचा समुद्रकिनारा मात्र नेहमी खुणावत असे. सात वर्षाचा असल्यापासून रेतीवरती चित्रे रेखाटण्याचा छंद सुदर्शनला जडला. बारा वर्षाचा झाला, आणि शाळा सुटली ती कायमचीच. मग काय? समुद्रकिनाराच शिक्षक बनला. सकाळी चार वाजता उठून समुद्रावर जायचं, आणि तांबडं फुटायच्या आत काहीतरी शिल्प बनवून गायब व्हायचं. मग दुपारच्या वेळी वाळुचं शिल्प पाहून येणारेजाणारे लोक काय बोलतात याचं रिपोर्टींग घेण्यासाठी आपल्या भावंडाबरोबर किनाऱ्यावर फिरायचं हा त्याचा दिनक्रम बनला. चार वर्ष अशीच गेली. जेवढी घट्ट धरण्याचा प्रयत्न कराल तेवढीच हातातून सुटून जाणाऱ्या या वाळूवर सुदर्शनच्या हातांची पकड मात्र चपखल बसायला लागली. त्याचा हात लागल्यावर रेतीचा ढिगारा काही तासांतच ताजमहाल बनायचा आणि काही तासांतच भगवान जगन्नाथाचा रथ! बलरामदास या संतकवीने चौदाव्या शतकात असेच वाळूचे रथ बनवले होते, तेव्हा भगवान जगन्नाथ स्वतः आपला रथ सोडून त्यात स्थानापन्न झाले होते अशी आख्यायिका आहे. जगन्नाथाच्या कृपेने या सोनेरी वाळूलादेखील आकार घेण्याचं वरदान आहे. मात्र बलरामदासांनर गेल्या सातशे वर्षापासुन या वरदानाचा लाभ घेणारा कुणी प्रेषित मात्र या किनाऱ्याला लाभला नव्हता. सुदर्शनच्या रूपाने ती कमतरता भरून निघाली. मात्र सुदर्शनमधील कमतरतांचं काय?

शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडल्यामुळे निट लिहता वाचता देखील येत नव्हतं, तीथे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांशी संवाद काय साधणार? प्रसिद्धी मिळू लागली होती, नाव व्हायला सुरूवातही झाली होती, पण बोलायचं काय? ते कळतच नव्हतं. सुदर्शनने मग विचार केला. गुरूशिवाय आपण वालुकाशिल्प बनवण्याची कला आत्मसात करू शकतो, तर भाषा का नाही? मग अभ्यास सुरू झाला. ओरीया या आपल्या मातृभाषेबरोबरच बंगाली, हिंदी आणि ईंग्रजींमध्येही त्याने प्राविण्य प्राप्त केलं. आता बी.बी.सी पासुन ते सीएनएन पर्यंत सगळ्या चॅनल्सला तो मुलाखत देतो, जगभर प्रवास करतो, आणि सातासमुद्राच्या किनाऱ्यांवर आपल्या कलेचा आविष्कार घडवून आणतो. सुदर्शनचं वालुकाशिल्प विद्यालय या कामात त्याला मदत करतं.

१९९५ साली, उणेपुरे अठरा वर्षाचा असतांना आकाशाच्या छपराखाली आणि समुद्रकिनाऱ्याच्या गालीचावर बसुन दोन विद्यार्थ्यांसह सुरू केलेलं हे विद्यालय. आजही या विद्यालयाला भिंती, दरवाजे किंवा साधं कुंपणदेखील नाही. गुरूकुल पद्धतीने चालणाऱ्या या विद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या आहे पासष्टच्या वर! जगभरातून विद्यार्थी, पर्यटक येत असतात आणि काहीतरी नवीन कल्पना सुदर्शनला देत असतात. या नव्या कल्पनेला सुदर्शन टच मिळाला की तयार होते ती अप्रतीम कलाकृती. लोक कॅमेरा घेऊन धावतच येतात. कारण खरं पाहता वालुकाशिल्प ही क्षणभंगुर कला आहे. काही तास, काही दिवस, किंवा काही महिन्यांच्या वर वालुकाशिल्प टिकत नाही. कलेकडे भक्ती आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टीने पहात असतांनाच ऐतीहासिक दृष्टीनेही सुदर्शनने पुष्क़ळ अभ्यास केलेला आहे. कॅनडा, अमेरिका आणि इतर युरोपियन देशांबरोबरच रशियामध्ये देखील वालुकाशिल्प ही कला आज लोकप्रिय आहे. मात्र सुदर्शनच्या मते याचा उदय आणि विकास भारतात, पुरिच्याच सोनेरी समुद्रकिनाऱ्यावर झालेला आहे. जगन्नाथपुरीच्या वाळवंटात रुजलेली आणि वाढलेली ही वालुकाशिल्पाची कला त्याता आता जगभर पोचवायची आहे.

यासाठी जागतीक महत्त्वाचे अनेक विषय तो आपल्या शिल्पांच्या माध्यमातुन हाताळत असतो. ग्लोबल वॉर्मींग, सेव्ह टायगर, सेव्ह गर्लचाईल्ड, एड्स जनजागृती यांसारखे सामाजीक विषय असोत किंवा ओसामा बीन लादेन ची हत्या, मायकल जॅक्सनचा अकस्मात मृत्यु यांसारख्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी असोत, सुदर्शन आपल्या सहकाऱ्यांसह वालुकाशिल्पांच्या माध्यमातुन हे विषय कल्पकतेने मांडतो आणि मग आपोआपच जागतीक स्तरावर त्याला प्रसिद्धी मिळते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही शेकडो पुरस्कार त्याला मिळाले आहेत. बर्लिनपाठोपाठ रशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बनवलेल्या त्याच्या कलाकृतीला ‘पिपल्स चॉईस’ पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करणाऱ्या या कलाकाराला पुरीला ‘सॅण्ड पार्क’ तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी किनाऱ्या वरील थोडी जागा तो विकत किंवा लिजवर घ्यायला तयार आहे. मात्र राज्यसरकारने अजुन ते देखील केलेलं नाही.

सॅण्डईंडिया डॉट क़ॉम या वेबसाईटमुळे जगभरातील कलारसिक त्याच्याशी जुळत आहेत. गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंड सागरसाधना करत असलेल्या या अवलीयाचं पाऊल वाळूत असं काही उमटलंय की सातासमुद्राच्या लाटांनाही त्याची खुण मिटवावीशी वाटणार नाही. २०१९ मध्ये सुदर्शन पटनायक यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या वाळू शिल्प महोत्सवात “पीपल्स चॉइस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

— गौरांग प्रभु.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..