नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – संस्थेची माहिती करून घेणे

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका

“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


मी एकदा महानगरपालिकेत फोन केला, अमुक एक विभागाचा वॉर्ड ऑफीसर कोण आहे हे विचारण्यासाठी. टेलीफोन ऑपरेटरला वॉर्डचे नाव

माहीत नव्हते. मी चौकशी करून सांगा असे म्हणताच त्याने मला दहा मिनिटे फोनवर ताटकळत ठेवले. टेलीफोन ऑपरेटर जवळ एखादी

सर्वांच्या नावाची / विभागांची यादी असती तर हे काम झटकन झाले असते.

तीच गोष्ट विद्यापीठाची. विद्यापीठाला उन्हाळ्याची सुट्टी केव्हा होणार आहे ही माहिती संबंधित विभागातील एकाच व्यक्तीला होती. ती व्यक्ती फोनवर भेटेपर्यंत मला दोन दिवस थांबावे लागले. आपल्या विभागाच्या सर्व घडामोडींची, कार्याची माहिती त्या विभागातील सर्वांना हवी परंतु काही विभागप्रमुखच अशी माहिती एकमेकांना द्यायची नाही व माहिती असूनही ती माहीत नाही असे सांगायचे, संबंधित व्यक्तीनेच त्याविषयी सांगायला हवे असा आग्रह धरतात. माहितीची खुलेपणाने देवघेव होत असेल तरच कोणाचेही काम केवळ माहितीअभावी ताटकळून राहणार नाही.

संस्थेची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय कर्मचारी संस्थेतील अंतर्गत दळणवळण नीट हाताळू शकणार नाहीत. शिवाय कुरियर असो वा पोस्टमन, ग्राहक असो वा मालपुरवठादार, सर्वांना योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील.

अमेरिकन लायब्ररी, मुंबई येथील अनुभव

मुंबईतील अमेरिकन ग्रंथालयाचे सभासद होणे ही एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे. फोनवरून कोणतीही माहिती पुस्तक आहे की नाही, केव्हा उपल्ब्ध होऊ शकेल, अमुक एका पुस्तकाचं प्रकाशन वर्ष अथवा प्रकाशक कोण आहे हे फोन घेणारी कोणतीही व्यक्ती सांगू शकते. मला माहीत नाही, नंतर फोन करा, पत्र किंवा इ-मेल पाठवा अशी उत्तरे मिळत नाहीत. फोनवरून एखादे पुस्तक मागविले तरी ताबडतोब पाठवले जाते. पुस्तक दुसर्‍या वाचकाकडे गेले असेल तर ते आपल्यासाठी आरक्षित केले जाते. ग्रंथालयातील इतर शाखांमध्ये आपल्याला हवे असलेले पुस्तक असेल तर तेथूनही ते मिळवून आपल्याला ते पाठवले जाते. तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करत असाल आणि त्यासंबंधी काही संदर्भ हवे असतील तर तेही मिळवून त्याच्या छायाप्रती तुम्हाला पाठवल्या जातात.

अमेरिकन लायब्ररीत काम करणारे हे सर्व भारतीयच आहेत हे विशेष. पण ते अमेरिकन कार्यसंस्कृतीत घडवलेले कर्मचारी आहेत. अमेरिकेतील छोट्या गावांमधील ग्रंथालयांमधेही आपल्याला असा सुखद अनुभव येतो.

माहिती आणि दळणवळण :

वर सांगितल्याप्रमाणे संदेश दळणवळण नीट होण्यासाठी विभागांची, त्यात काम करणार्‍या व्यक्तींची योग्य माहिती असणे महत्वाचे आहे.

दळणवळण बिनचुक, स्पष्ट आणि नेमके असायला हवे. शब्दांचा फापटपसारा न मांडता, अर्थवाही आणि बिनचुक लिहिणे हे सवयीतून येते.

कर्मचार्‍यांना कार्यशाळा घेऊनच अशा लिखाणाचे धडे देणे आवश्यक आहे. एका विभागातून दुसर्‍या विभागात माहिती पाठवणे, प्रकल्पाची योजना मांडणे, अभ्यासाचे निष्कर्ष सादर करणे, स्मरणपत्र पाठवणे, ग्राहकांच्या पत्राला उत्तर देणे, बैठकीचा वृत्तांत लिहिणे अशा तर्‍हेतर्‍हेच्या कामांसाठी लेखनकला आवश्यक आहे. पण कित्येक अभियंत्यांनी तसेच विज्ञानाच्या पदवीधरांनी केवळ गणित व विज्ञान विषयांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून भाषेला कमी लेखल्यामुळे त्यांना आपले विचार लिखित स्वरूपात मांडणं जमत नाही. अशांना भाषेचे वेगळे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

कोणत्याही दळणवळणात, दुसर्‍या व्यक्तीला समजून घेणे आवश्यक असते. आपण त्यांच्या जागी असतो तर, एवढा एकच विचार प्रत्येकाने मनात जागता ठेवला तर प्रत्येकाचे वागणे बोलणे आपोआप सुधारेल. आपल्याला दुसर्‍याची गुर्मी खपत नाही ना, तर आपणही दुसर्‍याशी नम्रपणे वागायला हवे. आपल्याला दुसर्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आवडत नाहीत तर आपणही दुसर्‍याला तशी उत्तरे देता कामा नयेत. सौजन्य, सहवेदना, पडेल ते काम प्रामाणिकपणे व वेळेवर करणे ही सर्व आचरणाची साधी तत्वे आहेत. सर्व भाषांतील संत वाङमयात ती आढळून येतात.

ती प्रत्येकाने अंगी बाणवली तर सर्वांचेच जीवन केवळ सुसह्यच नव्हे तर आनंददायीही होईल.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

## सामाजिक शिष्टाचार
## Part 4

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..