नवीन लेखन...

सल्ला – दान आणि व्यसन

सल्ला / उपदेश दोन प्रकारात मोडतो – एक मोबदला घेऊन दिलेला आणि दुसरा विना-मोबदला दिलेला. ज्यांचा सल्ला मोबदला घेऊन घेतला जातो तो समाजातील श्रेष्ठ / तज्ज्ञ वर्ग – जसे डॉक्टर , अर्थ /शास्त्र/ राजकीय/ तांत्रिक सल्लागार वगैरे मंडळी. हा (सल्ला देण्याचा) अधिकार त्यांना त्यांचे संबंधित विषयांचे ज्ञान, प्रभुत्व, नैपुण्य आणि अनुभवसिद्धतेमुळे मिळतो आणि त्यांना मिळणारा मोबदलाही त्याचीच पावती असते.  पण अशा, मोबदला घेऊन दिलेल्या, सल्ल्याचे प्रमाण विना मोबदला सल्ल्यांच्या तुलनेत फार कमी म्हणजे नगण्यच. प्रस्तुत लेखात आपण विना मोबदला, अनाहूत सल्ल्यांच्याच वाट्याला जाणार आहोत. हा लेख प्रपंचही अशाच उपदेश प्रवृत्तीचे एक catharsis म्हणावे.

समाजात व्यसने अनेक आहेत जी दोन प्रकारात मोडतात – उपद्रवी आणि निरुपद्रवी. दारू, सिगरेट, अंमली पदार्थ सेवन वगैरे पहिल्या वर्गात मोडतात. व्यायाम, फिटनेस, काम-व्यग्रता वगैरे ही दुसऱ्या प्रकारात मोडतात. सल्ला / उपदेश हे व्यसन म्हणावे की दान ? खरे तर हा एक प्रश्नच आहे. व्यसन आणि दान या दोन्ही गोष्टी एकत्र म्हणजे जरा विचित्रच मिश्रण आहे, हे खरे. परंतु ते तसेच आहे हेही खरेच. सतत सल्ला / उपदेश देणे हे एक व्यसन आणि दान दोन्ही प्रकारात मोडणारे आहे. व्यसन अशासाठी की त्याच्या पूर्ततेशिवाय माणसाला चैन ,पडत नाही; कारण ते थेट त्याच्या डीएनए पर्यन्त झिरपलेले असते. रक्त, अवयव, श्रम, धन – ही सारी श्रेष्ठ दानं, हे सर्वथैव, शत प्रतिशत सत्य. परंतु  ९५ टक्के (वा त्याहूनही अधिक) लोकांना मनातून वाटत असते की या सर्वात ‘ शिरोमणी’ दान जर कोणते असेल तर ते ‘सल्ला’ दान. जगात असा मनुष्य प्राणी अजून जन्माला यायचा आहे ज्याने आयुष्यात कुणालाही या श्रेष्ठ दानापासून वंचित ठेवले असेल. सल्ल्याला ‘दान’ या प्रकारात समाविष्ट करणे म्हणजे सल्ला देणाऱ्याला (दात्याला) एका वरच्या (दानी माणसाच्या) पातळीवर नेऊन ठेवणे आणि हे त्याला (त्याच्या ‘अहं’ला) प्रचंड सुखावणारे आहे. सल्ला देणाऱ्याचा अविर्भावही दान देणाऱ्याचाच असतो. सल्ला / उपदेश देण्यास जाती, धर्म, लिंग, स्थळ, काळ, परिस्थिती असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तो कुणी , कुणाला, कसा, कधी, कुठल्या (या ‘क’ च्या बाराखडीतील साऱ्या) परिस्थितीत द्यावा यावरही निर्बंध नाहीत. हा अधिकार अखिल मनुष्य-मात्राला जन्मसिद्ध, वरदान स्वरूप मिळालेला आहे. ज्याला स्वतःच्या चड्डीची नाडीही धड बांधता येत नाही तो जागतिक परिषदेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याने देशाची अब्रू कशी सांभाळली पाहिजे, ज्याने आयुष्यात कधीही वाहत्या पाण्याला स्पर्शही केला नाही त्याने कसे पोहावे, माता-पित्यांनी मुलांशी कसे वागावे, टीव्ही समोर बसून क्रिकेटची मॅच पाहताना सचिनने हा बॉल कसा सोडायला हवा होता, गान-गुरूंनी गाणे शिकविताना काय करू नये, मोदीजींनी केलेली नोटबंदी देशाला कशी महाग पडते आहे, ही आणि अशी अनेक उपदेशांची  उदाहरणे आपण ऊठसूट पाहतो. आणि गंमत म्हणजे आपल्याला त्यात काहीही गैर वाटत नाही. सल्ल्यांसाठी सर्वात लोकप्रिय असणारे प्रांत म्हणजे राजकारण, अर्थकारण, क्रीडाकारण, व्यक्तिगत, अभ्यास, करियर-निवड, लेखन, समाजकारण, शिक्षण, छंद-कारण, कौटुंबिक कलह, नाते संबंध (ही यादी संपेचना ) थोडक्यात, आकाशाखालील सारे काही. उपदेशासाठी कोणताच विषय वर्ज्य नाही. सल्ला ज्या क्षेत्रात द्यायचा त्या क्षेत्रातील जाणकारी उपदेश-कर्त्याकडे असावी असेही गरजेचे नसते. आणि असली तरी  who  cares.

अशाच एका (आयुष्यावरील) सल्ला-बेजार व्यक्तीचे हे मासलेवाईक व्यथात्मक मनोगत पहा,

 

सन्माननीय (उपदेश दाता) महाशय,

सप्रेम प्रणिपात,

आपल्याला नम्रपणे मी खालील बाबी सांगू इच्छितो:

. माझे आयुष्य हे माझे स्वतःचे आहे आणि मला ते कसे जगायचे हे नीट समजते.

. आपण केवळ एक (माझ्याबद्दल चुकीची व वा तुटपुंजी माहिती असणारे) बाह्य निरीक्षक आहात.

. तुम्हाला तुमचे आणि मला माझे स्वतःचे असे एक आयुष्य आहे, जे मला पूर्णत्वाने, मुख्य म्हणजे मला जसे वाटेल तसे, जगायचे आहे.

. आवश्यक वाटेल तेव्हा सल्ला घेण्यासाठी मी आपल्याकडे स्वतः हुन येईन.

म्हणून एक कळकळीची विनंती,

वरील चतुःसूत्रीचे पालन करा आणि फुटा !!

धन्यवाद.

खरे पाहता उपदेश देण्याची एक वेळ असते. ‘ भेटला कोणी की पाज डोस ‘ असे करून दुरावाच वाढतो. वर आणि ‘ मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय’  हा अविर्भाव हाच (उपदेश) दात्याचा दंभ. तुमचं आयुष्य तुम्ही असं काही घडवलंय की एखादा आयुष्यभर त्याच वाटेवर चालायला आपण काही पूज्य बाबा आमटे किंवा डॉ. अब्दुल कलाम यांचे अवतार नाही.

शेवटी फुकटचा सल्ला / उपदेश म्हणजे

घेत्यासाठी

> एक कचरा पेटी, कोरी पाटी, इकडून तिकडे गेले वारे, तोंडची वाफ

> शून्य स्वीकारार्हता असणारा

> प्रसंगी दात्याच्या बाळबोध विचारांचे द्योतक

> अवांछित

> क्वचित प्रसंगी अपमानजनक, स्वायत्ततेस आव्हान देणारे वगैरे, वगैरेच.

भले तो दात्यासाठी

<अभिमानास्पद

< आनंद दायक

< उपयोगी पडल्याचे समाधान देणारा

< दात्याला पुलंच्या ‘परोपकारी गंपू’ पदी नेणारा

< ’अहं’ ला गोंजारणारा वगैरे वगैरे असला तरी

सल्ल्यावरील प्रक्रिया: ही मुख्यत्वे तीन टप्प्यात होते – सहन, वहन आणि दहन. सल्ला योग्य वाटल्यास सहन केला जातो ; स्वीकारार्ह, अंमलात आणण्या-जोगा अ(वाट)सल्यास वहन केला जातो आणि यापैकी काहीही नसल्यास दहन केला जातो.  उपदेश घेणाऱ्याने ज्या उपदेश कर्त्याचा सल्ल्यांच्या परिणामाशी

दूरान्वयानेही संबंध नाही त्या सल्ल्यांचा विचार तरी का करावा हाही एक मुद्दा आहेच. सरतेशेवटी ‘ऐकावे जनाचे’ हेच खरे.

सल्ला/उपदेश देण्यामागील दात्याची मानसिकता

१. दात्याला ‘कायम मदतीस तत्पर’ हे बिरुद मिरवायचे असते

२. आपल्याला वाटते तेच योग्य आहे आणि तसेच घेत्याने करावे अशी तीव्रेच्छा

३. दात्याची ‘मी कधी एकदा उपदेश देतो आणि परम आनंदाचा धनी होतो’ अशी उन्मनी अवस्था. थोडक्यात उर्मी–विमोचन, जी डीएनए पर्यन्त झिरपलेली दात्याचीच गरज असते .

या साऱ्यामुळे दात्याला ते दान वाटते आणि पर्यायाने मोठे समाधान मिळते.

अर्थात मीही तेच करीत आहे – सल्ला देऊ नये हाही एक सल्लाच, उपदेश देऊ नये हाही एक उपदेशच, नाही का ? परंतु, मी ‘महाजनो येन गत: स पंथ:’ च्या चाली वर लेखना-द्वारे, ट्रेनिंग, चित्रकला वगैरे द्वारे, महाजनांनीच दर्शविलेल्या मार्गाने,  अनाहूत उपदेश वाटप करतो आणि पर्यायाने दानाच्या व्यसनाची (की व्यसनाच्या दानाची) – उर्मी विमोचनाची – पूर्तता साधतो. असो.

आपला समाज आणि कुटुंब पद्धती उपदेश-कर्त्याच्या कर्तृत्वापेक्षा वयालाच झुकते माप देते. म्हणून सल्ला दात्याची पात्रता, कर्तृत्व असो वा नसो, वय त्याच्या बाजूला ठामपणे उभे राहते आणि त्याला उपदेशाचा अनायासे हक्क मिळतो. खरे तर ही हक्काची बाबच नव्हे. आणि जो सल्ला दिला जातो तो दाता स्वतःच्या बाबतीत कितपत पाळतो, हा एक प्रश्नच आहे.

गोस्वामी तुलसीदासजींच्या शब्दात सांगायचे तर,

पर उपदेश कुशल बहुतेरे |

जे आचरही ते नर न घनेरे II

(दुसऱ्याला उपदेश देणे खूप सोपे आहे. पण स्वतः ते अंमलात आणणे फार कठीण. वर्तमान स्थितीत उपदेशकर्ते अधिक आहेत पण अंमलकर्ते नाहीत)

वरील साऱ्याचा अर्थ असा बिलकूल नाही की सारेच सल्ले आणि उपदेश निरुपयोगी असतात. गीतोपदेशापासून ते रॉबर्ट कियोसाकीच्या ‘रिच डॅड’ पर्यन्त, संत निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिलेल्या उपदेशापासून ते जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना दिलेल्या उपदेशांपर्यंत, सारेच पृथ्वी मोलाचे आणि मानव जातीवर अनंत उपकार करणारे आहेत. सल्ल्यांचे मोल हे जसे सल्लागारावर अवलंबून आहे तितकेच ते सल्ला स्वीकारणाऱ्याच्या विवेक, श्रम आणि तैल-बुद्धीवरही अवलंबून आहे. उत्तम सल्ला, अचूक वेळी समर्थ व्यक्तीला दिल्यावर कसा लहानगा शिवबा, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि छोटा चंद्रगुप्त, चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्तामध्ये परिवर्तीत होतो- त्यांचे metamorphosis होते, यास इतिहास साक्षी आहे.

दुसरे असे की, सल्ला वा उपदेश कर्ता हा भगवान श्रीकृष्ण, गुरु द्रोण वा विष्णुगुप्त चाणक्य यांच्या ताकदीचा असणे अशक्यच. त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या मर्यादेत राहावे आणि उगीचच कुणाला  (अगदी स्वतःच्या, ठराविक वयानंतरच्या संततीलाही) अनाहूतपणे उपदेश देण्याच्या फंदात पडू नये. तसेच कुणीही उगीचच अनाहूत सल्ला देणाऱ्याचा उपमर्द करणेही टाळावे – कारण हीच आपली संस्कृती आहे.

लेखक – राजेश कुलकर्णी

राजेश कुलकर्णी
About राजेश कुलकर्णी 5 Articles
मी एक निवृत्त मेकॅनिकल इंजिनीयर आणि सेफ्टी इंजिनीयर असून काही कंपन्यांचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. लिखाण, संगीत, लोगो डीजाईन, पेंटिंग वगैरे मध्ये मला रूची आहे. क्वालिटी, आरोग्य, औद्योगिक सुरक्षितता व पर्यावरण या क्षेत्रातील एक जाणकार अभ्यासक, विश्लेषक आणि कंपनी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. (संपर्क भ्रमण ध्वनि – ९९६९३७९५६८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..