नवीन लेखन...

।। सद्गुरु श्री राऊळ महाराज ||

गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन जगत साधे उपदेश देत प्रत्येक जीव आनंदी कसा होईल या साठी प्रयत्न करीत असतात. गुरुतत्त्व हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. जे एकाच वेळी वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र कार्यरत असते. मुख्य ईश्वराकडे जाणारे चार मार्ग व त्याचे उप मार्ग या सर्व मार्गाचे जे प्रमुख आहेत ते गुरुतत्त्वाचेच अवतार असतात. ज्या प्रकारे हे विश्व विविध प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी व्याप्त आहे. त्याच प्रकारे गुरुतत्त्व सुद्धा तितक्या मार्गाने कार्यरत आहे. प्रत्येक जीव हा साधना करीत शिवाशी एकरूप व्हावा. यासाठीच हे गुरुतत्त्व पंचमहाभूतांचे शरीर धारण करून मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून कधीही संत, महात्मे, अवतारी पुरुष याच्यावर टीका टिप्पणी करू नये. त्यानी केलेल्या मार्गदर्शनाचे चिंतन केले तर त्याच्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळून येईल. गुरुतत्त्व मासिका तर्फे दर महिन्याला एक एका संतांची माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. संतांनि जन्म घेऊन कश्या प्रकारे साधना केली आणि गुरु पदापर्यंत पोहोचून समाजाला कसे मार्गदर्शन केले याविषयी माहिती देतो. तेवढी जरी माहिती आपण वाचली तरी त्यांचे कार्य लक्षात येईल. पुढे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी व गुरूतत्त्व सगळ्यांना कळावे हाच उद्देश आहे.

दिनांक ३१ जानेवारी २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्हयातीलपिंगुळी ता. कुडाळ येथे सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या समाधीला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे ३९ वे पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.

करा करा हो जयजयकार राऊळबाबांचा जयजय कार पिंगुळीचा ब्रह्मयांगी हा दत्तांचा अवतार या वरील ओळी शब्दश: सार्थ करणाऱ्या आहेत. सद्गुरुंचा जन्म १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सौ सावित्रीबाई आणि अप्पाजी राऊळ यांच्या पोटी झाला. पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण” असले तरी पुढे ते “कृष्णाजी” आणि “आबा” या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले व पुढे श्री राऊळ महाराज याच नावाने त्यांची प्रसिद्धी झाली. पिंगुळी गावचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ याचे मानकरी असलेले राऊळ कुटुंब हे अतिशय गरीब शेतकरी कुटूंब. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आणि अशा गरीब परंतु ईश्वर भक्तीपरायण कुटूंबात साऱ्या विश्वाचा उद्धार करण्याची क्षमता असलेला हा द्वारकाधीश “कृष्ण” च जणू अवतरला. त्यांचा लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा होता. त्यांच शिक्षण तिसरी इयत्तेपर्यंत झालं होते. पण चार भिंतीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाच्या खुल्या विद्यापीठात ते शिकले. कारण त्यांच्या जीवनाचे लक्ष्य “अध्यात्म” हेच होतं. देवाच्या नामस्मरणात ते रंगून जात असत. त्यांना ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचे अभंग तोंडपाठ होते. ज्ञानेश्वरीही त्यांना मुखोग्दत होती. लहानपणी गुरे राखताना ते भजनात दंग व्हायचे, तसेच मोठे झाल्यावरही ते खड्या आवाजात अभंग म्हणत असत. अखंड हरिनाम हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायी त्यांनी मुंबईतील आपल्या नोकरीलाही रामराम ठोकला. सौ. राधाबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतरही ते संसारात कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. संसारातील भवताप पचवताना स्थितप्रज्ञ राहिले.

सद्गुरु राऊळ महाराज म्हणजे प्रखर योगी पुरुष. त्यांनी त्यांनी १९४५ ते १९७२ अशी २७ वर्षे कठोर ध्यानसाधना केली. त्यासाठी ते कुठे हिमालयात किंवा रानावनात गेले नाहीत. तर स्वत:च्या आईच्या दुकानाला लागून असलेल्या लहानशा खोलीत ते ध्यानाला बसत. ध्यान करताना खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद करीत. जवळजवळ ६ महिने हे ध्यान सुरु असताना ते हळूहळू खाणे-पिणे कमी करत व नंतर तर काहीच घेत नसत. एवढी प्रखर ध्यानसाधना केलेल्या या योग्याची योग्यता त्यांचे गुरु प. पू.

बाळकृष्ण महाराजांनी अचूक ओळखली व त्यांनी प पू. राऊळ महाराजांना स्वत:ची अध्यात्मिक गादी चालविण्याची विनंती केली. परंतु जीवनात कशाचीच आसक्ती नसलेल्या श्री राऊळबाबांनी ती नम्रमणे नाकाराली. महाराज हे जरी जन्मत:च संत असले तरी ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अनेक संतांप्रमाणे त्यांच्याही वाट्याला अनेक दुःख, अवहेलना, जननिंदा आली. पण शेवटी बाबांचीच किर्ती अजरामर झाली. कारण राऊळबाबांसारख्या सत्पुरूषाचा जन्म हा स्वतःपुरता नसून सर्व समाजाच्या उद्धारासाठी होता. त्यांनी आपले समग्र जीवन भाविक भक्तजनांच्या कल्याणासाठी आजन्म व्यतीत केले. त्यांच वागण, बोलण अगम्य व अतर्क्य होतं. सर्वाविषयी त्यांना कळवळा होता. त्यांनी पेट्रोलशिवाय गाडी चालवली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या आईला तिच्या मृत्युनंतर ९ तासांनी जिवंत करून तिला रात्रभर ज्ञानेश्वरी ऐकवून मग तिची मोक्षाकडे वाटचाल सुरु करून दिली. हे सर्व करताना ‘चमत्कार करावा” अशी त्यांची धारणा नव्हती. तर सामान्य मनुष्य जीव या योगे सन्मार्गी लागावा, ही तळमळ त्यामागे असे.

सद्गुरु राऊळबाबांनी अनेक लोकांना उपदेश, ज्ञानबोध दिला. परंतु त्यांच्याकडून खरा “गुरुप्रबोध” कोणीच संपादन करू शकला नाही. कोणी त्यांची अखंड सेवा करू शकला. सद्गुरु राऊळ महाराजांसारख्या प्रखर अवलिया व जमदग्नीचा अवतार असलेल्या सत्पुरुषांची प्रत्यक्ष सेवा करणे सोपही नव्हतं. हे शिवधनुष्य पेललं प. पू. विनायक अण्णा महाराजांनी. विनायक अण्णा महाराज हे प. पू. राऊळबाबांचे रूढ अर्थाने पुतणे व आध्यात्मिक वारसदार. असं म्हणण्याचं कारण म्हणजे अण्णा महाराज हे गेली ६० वर्षे अखंडपणे आपले गुरू श्रीराऊळ महाराज यांच्या सेवेत आहेत. पहिली २५ वर्षे प्रत्यक्ष गुरुसेवा आणि १९८५ साली प. पू. बाबांनी देह ठेवल्यानंतरची ३५ वर्षे जनसेवेच्या माध्यमातून गुरुसेवा करीत आहेत.

सद्गुरु राऊळबाबांनी माघ शु. दशमी ३१ जानेवारी १९८५ या दिवशी देह ठेवला. त्यांनतर गेल्या ३५ वर्षामध्ये श्री अण्णांनी रात्रंदिवस अवरित कष्टांनी पिंगुळी या प. पू. राऊळबाबांच्या जन्मभूमी, तपोभूमी आणि कर्मभूमीचे रुपांतर जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रमध्ये केले. परमपुज्य राऊळबाबांनी “कृष्ण” रूपाने श्री अण्णांकडून ही सुदाम्याची नगरी आज निर्माण करून घेतली आहे. प. पू. बाबांच्याच आज्ञेने श्री अण्णा महाराज पिंगुळी क्षेत्री आजतागायत अन्नदान करत आहेत. समाधी मंदिर परिसर, पिंगुळी गांव व भाविकांच्या मनावरची जळमटे काढणारे श्री अण्णा महाराज स्वत:चे “झाडुवाला” हे बिरूद सार्थ ठरवत आहेत सद्गुरु राऊळबाबांनी पिंगुळी येथे लावलेले औदुंबराचे लहानसे रोप आज भव्य कल्पवृक्ष बनले आहे. प. पू. बाबांची लाडकी माऊली ही आज मोठ्या मंदिरामध्ये दिमाखात विराजमान झाली आहे. आणि पिंगुळीक्षेत्री असलेली प. पू. राऊळ महाराजांची संजीवन समाधी आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे. अण्णांनी आपल्या सद्गुरु राऊळबाबांची दिव्य स्पंदने समस्त भक्तांसाठी जणू काही या समाधीमध्ये जतन करून ठेवली आहेत. सद्गुरु राऊळबाबा आजही या समाधीमध्ये, पिंगुळीमध्ये व प्रत्येक भक्ताच्या हृदयात चैतन्याने वास करून आहेत. सद्गुरु राऊळ महाराजांचे जीवनचरीत्र आपल्याला नक्कीच अवडेल यात शंका नाही.

गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे गुरुतत्त्वसेवा साधना आनंदकुटी, नेरळ कर्जत येथे गेल्या दत्त जयंती पासून अखंड अग्नी प्रज्वलीत आहे. त्यात गेल्या वर्षभरात अनेक मोठी यज्ञ सामुदाईकरीत्या झालेली आहेत व होत आहेत. यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.

।। जय गुरुदेव ।।

-– श्री. संतोष शामराव जोशी

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ४ थे, अंक ०३ रा, (अंक ३९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..