नवीन लेखन...

|| सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर ।।

गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत आहे. गुरुतत्त्वाचे हे ३४ वे पुष्प नानांच्या चरणी समर्पीत करीत आहे.

मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदराया गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात नानांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. गुरुचरित्राचे सप्ताह लहानपणीच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले. या मार्तंडाची दत्तप्रभुंवर मोठी निष्ठा होती.

“हा मार्तंडनामे पुन्हा । श्रीएकनाथांचा अवतार म्हणा । हृदयी रमता दत्तराणा । आवडीने
जयाचिया।” असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते.

सन १९१४ मध्ये इंदूरचे शंकरराव डाकवाले यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु संसार नीटपणे झाला नाही. पत्नीचे निधन झाल्यावर तराणेकर यांनी काशीची यात्रा केली. मथुरा, शेगाव इत्यादी तीर्थयात्रा केल्या. ते बद्रिकेदारलाही गेले होते. अनेक योगी लोकांची, सत्पुरुषांची नानांनी दर्शने घेतली. त्यांच्यावर गुळवणी महाराजांचा प्रभाव मोठा होता. नानांनी अनेक ठिकाणी यज्ञ केले. वास्तव्य उत्तरार्धात इंदूर येथे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परीवाराची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ आणि जप यांचे विकसित रूप आहे. नानांच्या परिवाराने या मार्गांची जोपासना केली आहे. प्रासादिकमंत्र, स्तोत्र व प्रार्थना यांना महत्त्व आहे.

परमपूज्य नाना महाराज यांच्या घराण्यात दत्तभक्तीची परंपरा उत्कटधारा तशी पिढ्यान
पिढ्यापासून होती. असे म्हणतात की सद्गुरु भूमीवर अवतरण्यासाठी ८० पिढ्यांचे दत्त भक्तीचे पुण्य हवे. हे पुण्य परम सद्गुरुच्या पुनर्जन्माच्या माध्यमातून प्रगत होत असते.

बालवयातच प. पू. नानांना दत्तसाधनेची इच्छा व ओढ वाटू लागली. घराजवळच श्रीदत्तप्रभूंचे मंदिर असल्यामुळे श्रीदत्तप्रभूंच श्रीगुरु म्हणून मिळावेत ही तळमळ हृदयामध्ये ठेवून जप तप व श्रीदत्तप्रभूंचे स्मरण नित्य अविरत होऊ लागले. एवढ्या बालवयातच श्रीदत्तप्रभुंच्या भेटी साठी काहीही करण्याची प. पू. नानांची साधना परिश्रम पाहून घरामधील वडिलधारी मंडळी आश्चर्यचकित होत असत. प. पु. नानांचे अतीव श्रीदत्तप्रभू प्रेम सगळ्यांना भारावून टाकत असे. प. पू. नानांमहाराजानी जे अनुभवलेले ते अद्भुत होते. राम लक्ष्मण यांच्या मूर्तीतून दोन तेजस्वी दिव्यमूर्ती बाहेर आल्या व दोघे ब्रज भाषेत संवाद करत खेळ खेळू लागले.

प. पू. नाना महाराजांना गिरनारी श्री अवधूत नाथ दर्शन, मथुरेत श्रीकृष्ण दर्शन व अनेक देवातांचे दिव्य दर्शन होऊन त्यानी श्रीगुरुंची प्रीती अनुभवली. शेवटी श्रीगुरुभक्तीसाठी मनोनिग्रह हेच प्रमुख साधन आहे व अध्यात्मिक वाटचालीत श्रीगुरुंची करुणात्रिपदी व श्रीगुरूंचा जप हेच नित्य आचरणात असले पाहिजे, तीच मुख्य साधना पद्धती आहे. हा प.
पू. नानामहाराजांचा आग्रह आहे! स्थूलदेह जरी नसला तरी सुक्ष्म देहामध्ये आज प. पू. नानामहाराज भक्तासाठी कार्यरत आहेत, नाना महाराजानी स्थूलदेह धारण करण्या अगोदर सुध्दा ते गुरुतत्त्व स्वरूपात होतेच स्थूल देह धारण केल्यावर सगुण स्वरूपात गुरुतत्त्व कार्य केले व आज त्यानी जरी देह त्याग केला असला तरी ते गुरुतत्त्व स्वरूपात आहेतच, या तत्वाचा कधीच लय होत नाही. दत्त भक्तांना साधनेसाठी आपले मार्गदर्शन देण्यासाठी अधीर आहेत. या कलियुगात श्रीगुरुंमुळेच दत्तभक्त तारून जाणार आहेत.

शेवटी एवढेच, श्रीदत्तमहाराजांची आवडीची ओळ गुणगुणाविशी वाटते, “भजा भजा हो
श्रीगुरूंसी.” मध्यप्रदेशातील “इंदौर” चे महान योगी सद्गुरु श्री नानामहाराज तराणेकर यांच्या साधकावस्थेतील ही कथा नाना महाराज तराणेकर. श्री नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना करून “परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीं” कडून गुरुमंत्राची दिक्षा मिळवली. त्यानंतर अखंड गुरुमंत्राच्या जपाने ते तेज:पुंज बनले. श्री टेंबे स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमण आरंभले. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नागराज हिमालयात जाण्याचे ठरवले. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले. त्यातीलच हा एक अनुभव.

नानामहाराज हिमालयात भ्रमंती करत असतांना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा या हेतुने ते गुहेजवळ गेले. परंतू जवळ जाताच गुहेच्या मुखाशी त्यांना दोन वाघ दिसले. वाघ नानामहाराजांना पहाताच गुरगुरू लागले. परंतू त्याच गुहेत आत मध्ये एक सात – आठ फुट उंच, गोरेपान, तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना, नानामहाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. तसे ते वाघ एकदम शांत झाले. योग्याने नानामहाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले (म्हणजे त्या योग्याचे) पाय पकडून डोळे घट्ट मिटून घेण्यास सांगितले. “मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मध्येच पर्वतांमध्ये पडशील” असे सांगितले. त्याप्रमाणे श्री नाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले, त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृष्य झाले होते.

श्री समर्थ नाना महाराज सांगतात की आजही नागराज हिमालयात असे अनेक योगी महात्मे हजारो वर्षापासून समाधी अवस्थेत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे आस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. म्हणून ते नाहीतच असे म्हणणे कितपत योग्य? राग, प्रेम, अहंकार या भावनादेखील प्रयोगशाळेत सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व आपण नाकारतो का? या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा.

प. पू. नाना महाराज सांगतात, भक्ती कशी करावी? तुमची भक्ती ही ज्ञान युक्त असावी. ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो. भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करतांना त्यात असणारे शब्द व वाक्य याचा अर्थ समजून, जाणून भक्ती करावी फक्त ज्ञानयुक्त भक्तीने शिष्य गुरुंची योग्यता समजू शकतो.

मनुष्य देवाची भक्ती करतो पण देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. भक्ति मनापासून करतो पण मागत असतो. देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर ही मागणी देवाजवळ करतो. काही वेळेला देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर देवाचे करणे सोडून देतो. त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अशी मनुष्याची मानसिकता आहे. देवाची भक्ती करीत असतांना मनुष्याच्या वासना निघून गेल्या पाहिजेत. कारण मनुष्याचे दु:खाचे मूळ कारण म्हणजे वासना आहेत. मनाचे सतत लाड पूरविणे व त्यासाठी कोणाचाही घात करायला मागे पढे न पाहणे. त्या वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ति करायची असते. पण भक्ती करून मनुष्य काही वेळेला देवांवर विश्वास ठेवत नाही. त्याचा त्याच्यावरच विश्वास नसतो. मग देवांवर विश्वास कसा ठेवेल. प्रथम देवाजवळ काहीही मागू नये. कारण तुम्ही जे काही मागाल ते देव पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या भक्तीची पुण्याई कमी होते. तर भक्ती ही निष्काम भावनेचीच पाहिजे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजी घेतो व पैसे देतो. त्यातच आपला व्यवहार पूर्ण होतो. मग आपल्याजवळ त्या माणसाचे काहीही घेणे उरत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने भक्ती करीत असतांना देवा जवळ काही मागितले की देव त्याला सर्व देतो पण स्वत: देव त्याच्या जवळ राहत नाही. तर देवाला मिळविण्यासाठी त्याच्या कडून काहीही मागू नका. प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवा की तू मला संकटात मदत करणार. म्हणजेच प्रत्येक संकटात मला धैर्य देणार. मला संकट जिंकायला मदत करणार. म्हणजे मला जिद्द आत्मविश्वास देणार ह्यावर विश्वास ठेवावा. देव स्वत: तुम्हाला कधीही भेटणार नाही. पण तुम्हाला जगण्यासाठी बल, कौशल्य, आत्मविश्वास, जिंकण्याची जिद्द मात्र देइल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे कर्म त्याला अर्पण करा. त्याच्या जवळ काहिही न मागता “देवा, तुझे नाम सतत माझ्या मुखात राहू दे हे मागा.” कारण जेव्हा आपण देवा तुझे नाम मुखात राहू दे अस मागतो.

तेव्हा आपण देवाच्या हृदयाला मागतो त्याचे अस्तित्व मागतो. मग का नाही आपल्या भक्तिला भुलून तो आपल्याला मदत करणार. त्यासाठी निष्काम भावनेची भक्ति करा. त्याला प्रेम द्या, मग पहा, तुम्ही त्याला सोडले तरी तो तुम्हाला सोडणार नाही व मनात एकच भावना ठेवा की देवा तुझे अस्तित्व आहे. मला तू प्रत्येक संकटात मदत करणारच अशी भावना ठेवा.

मनुष्याने नुसती भक्ती केली व काहिही काम केले नाही व मनात एकच आशा ठेवली की देव सर्व करेल माझे व प्रयत्न केले नाही तर त्या वेळेस देव मदतीला येणार नाही. देवाच्या नामाची भक्ति करा व कष्ट करा. स्वतःवर व देवांवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही रुपात भेटेल. आपल्या प्रारब्धाचे भोग तो कमी करेल. जीवनात आनंद देईल पण त्यासाठी फक्त विश्वास हा तिहेरी शब्द मनात पाहिजे. कारण विश्वास ह्या शब्दात त्याच्या विषयी प्रेम व त्याचे अस्तित्व आहे.

परमपूज्य श्री नानामहाराज यांच्यावर आधारीत असलेला अंक आपल्याला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

संपर्क: श्री समर्थ नाना महाराज प्रासादिक संस्थान पारमार्थिक ट्रस्ट,
इंदोर. त्रिपदी परिवार, नानासाहेब तराणेकर,
मार्ग ८१/१, स्नेहलता गंज,
इंदोर ४५२००३
दुरध्वनी: ०७३१-२५४५०२४

-– श्री संतोष शामराव जोशी

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १० वा, (अंक ३४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..