नवीन लेखन...

सालं माणसाचं असंच असतं

लहान असताना लहानपण नको असतं
मज्जा असते पण शिस्त नको असतं
म्हणून पटापट मोठ्ठं व्हायचं असतं
सालं…..माणसाचं असंच असतं

आजोळी गावाला जायचं नसतं
चुलीतल्या निखार्‍यांवर काजू भाजत
कोपरापर्यंत रस गळणारा रायवळ
बदाक् कन परसात पडलेला फणस
त्यातले पिवळेजर्द गोडूस गरे
दुपारी खळात वाळवलेली आंबापोळी
कच्च्या फणसाचे तळलेले गरे
हे सगळं हवं पण गाव नको असतं
सालं…..माणसाचं असंच असतं

खडखड वाजत जाणारी एस.टी.
गुरवाचो बाबलो कंडक्टर
आन् पाटलाचो रमेश डायव्हर
गंगाधर तात्यांचो झिल म्हनान् वळखतो
म्हयनाभर हडे गावांक र्‍हावन् उंडारतां
नांक सुर्र व्हईस्तं आंबं वरपता
चिवडाक् चपाती न्हाय् म्हनान् रडता
आन् फटकीचो , ५ किलो वजन वाढवतां
शहराक् श्येजारच्या घराक् मयत जाली
ह्येकां WhatsApp वर गावकरी कळवतां
तरी पण खड्डे अडलेल्या शहराक् येवा र्‍हावान्
म्हनाक् त्वांडां उजाळतां शिंच्यांची
कुणालाच कुणाचं सोयर सुतक नसतं
तरी पण गांव नको शहर हवं असतं
सालं…..माणसाचं असंच असतं

गावचं शेत — घर — जमीन नको होते
पोरं जवळ हवीत म्हणून आजी तयार होते
सगळं विकून आजी आजोबा शहरी येतात
टिचभर खोलीत जीव गुदमरत मरून जातात
कधीतरी पैलतीर यालाही दिसू लागतो
दादरावर एस टी सुटताना
रडक्या तोंडांची आजी आठवते
धुळीच्या लोटात उंचावलेला हात दिसतो
आणि मग याचा बांध फुटतो
तो गावाला जाऊन घर विकत घेतो
पण आता याची पोरं परदेशी असतात
त्यांना त्यांचं क्षितिज खुणावत असतं
डोळ्यात पाणी आणून ब्येणं सांगत असतं
आपलं गांव हेच आपलं न्यूयाॅर्क असतं!
आपण किती माती खाल्ली!
हे ह्याच्या डोळ्यांत दिसत असतं
वय होऊन कधीतरी हा आणि बायको
गांवालाच डोळे मिटतात ,
गांवकरी पोरांना बोल लावत ,
यांना मसणात नेतात ,
WA वर पोरांना कळवतात
लगेच GPAY ने पैसे जमा होतात
पोराभोवती चिल्ली पिल्ली जमा होतात
Hey Dad What Happened?
हे येडं डोळ्यात आसू घेत कसनुसं हसतं
काही वर्षांनी आनंद साजरा करताना
….. ते आई बाबांचं आनंदी तोंड नसतं
आता याला मायदेशी परतायचं असतं
पण याच्या मुलांना भारतात नको असतं
बायकोला पण पोरांना सोडायचं नसतं
मग हे येडं एकटंच मायदेशी येतं
राजापुरात एक घर विकत घेतं
विकतची झुणका भाकर खातं
आता डोळ्यांत आजोळ दाटलेलं असतं
पण आजोळ माय बाप …… संपलेलं असतं
हा स्वानुभव सगळ्यांना सांगत सुटतो
ऐकणार्‍या सगळ्यांना ते कळत असतं
पण कळलं तरी वळत कुठे असतं ?
पलिकडचं शेत — घर विकलं जात असतं
हे येडं विव्हल होत टिपं गाळीत असतं
इतिहास फक्त पाठ करायलाच शिकलो
बोध नाही घेतला —हे कळलेलं असतं
पण….. तोवर कुणाचं कुटुंब शहराकडे
खूप मोठ्ठी स्वप्नं आणि पालक घेऊन
गावकर्‍यांना जातो! म्हणून निघालेलं असतं
रहाट गाडगं परत तसंच फिरणार असतं…..
सालं…..माणसाचं असंच असतं

-उदय गंगाधर सप्रे

म—ठाणे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..