नवीन लेखन...

‘रिव्हर्सिंग फॉल्स’ची किमया

‘रिव्हर्सिंग फॉल्स’ (उलटा धबधबा) – याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी बघा !! 

 


उलट्या दिशेने वाहत असलेला पाण्याचा प्रवाह कोणी पाहिलाय ? त्याचे उत्तर कदाचित नाही, असेच असेल. परंतु मी मात्र त्याचे उत्तर ‘हो’ असेच देईन. उंच भागाकडून सखल प्रदेशाकडे वाहत जाणे हा पाण्याचा गुणधर्म ! मग माझे उत्तर ‘हो’ कसे ? असा प्रश्न सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे. मी एका मित्राला असे सांगितल्यानंतर त्याने मला वेड्यात काढले. त्यावर त्याचा विश्वासही बसला नाही, कुणाचाही बसणार नाही, पण हे सत्य आहे.  कारण मी असा प्रवाह कॅनडात पाहिला आहे. सेंटजॉन शहराजवळच सेंटजॉन नदीत हा चमत्कार पहायला मिळतो.

हा प्रकार पाहिल्यानंतर कोण्या जादुगाराने केलेला नजरबंदीचा; खेळ वाटावा; परंतु तसे कांही नाही, तर ती निसर्गाची किमया आहे. कॅनडामध्ये याला ‘रिव्हर्सिंग फॉल्स’ (उलटा धबधबा) म्हणतात. खर तर हा धबधबा नाहीच, तर तो विरुद्ध दिशेने वाहणारा पाण्याचा प्रवाह आहे. तो पाहिल्यानंतर एखाद्याला जादूचाच प्रकार वाटावा ! निसर्ग नावाच्या जादूगाराने केलेली ही किमयाच म्हणा फार तर ! मग हे घडतेच कसे ? मलाही सुरवातीला हाच प्रश्न पडला होता ……  पुढे मला त्याचे उत्तर गवसले.

आमचे एक सर म्हणायचे,

‘निसर्गाचे कांही नियम असतात, त्यानुसारच सर्व कांही घडते. निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला वैज्ञानिक कारण असते.’

मला त्याचे स्मरण झाले. प्रथम दर्शनी ‘रिव्हर्सिंग फॉल्स’चे नेमके कारण मला समजू शकले नाही. परंतु सरांनी सांगितल्या प्रमाणे त्याच्या कारणाचा माझे मन शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले.

***

सेंटजॉन नदीवरील एका पूलाशेजारी आमची कार थांबली. इथेच हा ‘रिव्हर्सिंग फॉल्स’चा प्रकार आहे. नदीच्या काठावरील पायऱ्या उतरून आम्ही निरिक्षण स्थळी गेलो. पूलाखालून पाण्याचा प्रवाह संथ गतीने वाहत, फंडीच्या उपसागराच्या दिशेने चालला होता. माझी नजर ‘रिव्हर्सिंग फॉल्स’चा शोध घेऊ लागली, परंतु कुठेच कांही दिसेना. पाच-दहा मिनिटे सभोवतालचे  निसर्गाचे रमणीय दृश्य पहाण्यात निघून गेली, एवढ्यात तो चमत्कार नजरे समोर आला, नाही घडला. नदीतून समुद्राकडे वाहणाऱ्या पाण्याला रेटत उलट्या दिशेने…..  नदीच्या पात्रात दुसरा एक पाण्याचा प्रवाह येत असल्याचे दिसले नि आम्ही आश्चर्याने पहातच राहिलो. एक भला मोठा पाण्याचा प्रवाह  उलट दिशेने वाहत नदीच्या पात्रात येत होता. त्यामुळे नदी पात्रातील पाणी दोन्ही बजूने दोन भागात विभागले गेले नि नदी पात्रात एक नयन मनोहारी दृश्य निर्माण झाले. नदीच्या पात्राच्या उलट दिशेने वाहणारे पाणी नि त्याच्या दोन्ही बाजूने आपल्या नित्याच्या दिशेने वाहत जाणारे पाणी… परस्पर विरुध्द दिशेने जाणारे पाण्याचे तीन प्रवाह !  तासनतास पहातच रहावे असे विलोभनिय दृश्य !

पुढे पुलाच्या खाली रिंगन घालावे त्याप्रमाणे पाणी गोलाकार फिरू लागले नि डोळ्यांचे पारणे फीटले. 15 मिनिटे निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार आम्ही पहातच राहीलो. कांही वेळानंतर उलट दिशेने वाहत येणारा पाण्याचा प्रवाह मागे-मागे हटताना दिसू लागला. कांही वेळाने हे दृश्य अदृश्य झाले.

मी विचारात पडलो. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत येणारा दुसरा पाण्याचा प्रवाह….. गोंधळात टाकणारीच घटना होती. असे कसे घडले ? याला कांही शास्त्रीय कारण ? माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. रात्री घरी या विषयावर सर्वांशी चर्चा केली. शेवटी अतुलनी (जावईबापू) त्याचं समर्पक उत्तर दिलं नि माझं अस्वस्थ मन शांत झालं.

सेंटजॉन नदी, शहराजवळच फंडीच्या उपसागराला येऊन मिळते. समुद्राला सातत्याने भरती-ओहोटी येते. जगातली सर्वाधिक भरती (हाय टाईड) फंडी उपसागरात येते. भरतीच्या काळात समुद्रातील पाणी नदीच्या पात्रात उलट दिशेने वाहत जाते नि ‘रिव्हर्सिंग फॉल्स’ तयार होतो. निसर्गाचा हा चमत्कार दाखविणारं ठिकाण सेंटजॉनमधील एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात नि निसर्गाच्या या चमत्काराचा आनंद लुटतात.

— मनोहर (बी. बी. देसाई)

 

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

1 Comment on ‘रिव्हर्सिंग फॉल्स’ची किमया

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..