नवीन लेखन...

रिटायरमेंट – हिसाब अपना अपना

मागच्या म्हणजे २०२३च्या ऑक्टोबर महिन्यात हेमामालिनी ७५ वर्षांची झाली… फिल्म इंडस्ट्रीत अतिशय यशस्वी कारकीर्द – नुसतीच यशस्वी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना ह्या ” ड्रीमगर्ल ” चा उल्लेख सिनेमा जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असा करावाच लागेल… दोनेक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी अफाट लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री… गेली दोन दशकं देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत ही खासदार म्हणून उपस्थिती…

थोडक्यात वयाच्या १६ व्या वर्षांपासून पंचाहत्तरी गाठेपर्यंत सतत कार्यशील अशा ह्या ” स्वप्न सुंदरी “ला आता पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली आहे… चांगली भूमिका मिळाली तर माझी आई पुन्हा चित्रपटात काम करेल असं तिच्या मुलीने जाहीर केले आहे… हेमामालिनी ज्या पक्षाची खासदार आहे त्या पक्षात निवडणूक लढविण्यासाठी ७५ वर्षे वयाची अट असल्याने, पुढच्या वेळी निवडणूकीचे तिकीट मिळणार नसल्याने हेमामालिनी हिने हा निर्णय घेतला असावा कदाचित…

थोडक्यात हेमाजी यांना रिटायरमेंट घ्यायची नाही…

धर्मेंद्र – आता ८७ वर्षांचे झाले आहेत.. १९६० पासून ते आजपर्यंत त्यांनी ३०६ चित्रपटात काम केलं आहे असं असूनही त्यांना अजून काम करायचे आहे..‌ ह्याच वर्षी त्यांनी – राॅकी और रानी की प्रेमकहाणी – हा करण जोहर चित्रपट केला तर दुसरीकडे – ताज – नावाची एक वेब सिरीज ही केली… आता त्यांच्या दोन्ही मुलांच्या करियरने पुन्हा गती पकडली आहे असं दिसतं… तेव्हा बापलेकांचा ‘ अपने -३ ‘ हा चित्रपट आला तर आश्चर्य वाटायला नको… अनुपम खेर हा बहुगुणी अभिनेता आज ६८ वर्षांचा आहे… ते अधूनमधून लिहीत असतात… सांगत असतात की मला सिनेमात काम करायचे आहे पण हल्ली काम मिळत नाही.. अनुपम खेर -” कुछ भी हो सकता हैं ” – हा आपला टिव्ही शो ही चालवतात… मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्यांच्या शो मध्ये हजेरी लावली आहे… अनुपम खेर ह्या वयात ही व्यस्त राहू इच्छितात…
मला आठवतंय की – ” कौन बनेगा करोडपती (KBC) ” – मध्ये एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण सामिल झाले होते तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना म्हणाले होते – ” यार आपकी सिंघम फ्रेंचायझी में हमें भी काम दे दो..”
वयाच्या ऐंशी पार केलेल्या, टिव्हीच्या दर ५ व्या किंवा ६ व्या जाहिरातीत दिसणाऱ्या ह्या वयोवृद्ध सुपरस्टारला अजून काम पाहिजे..

अतिशय बिझी शेड्युल असताना देखील हा सुपरस्टार आपल्या मुलाच्या वयाच्या दिग्दर्शकाला म्हणतोय की माझ्यासाठी ही काही काम आहे का ते बघ… ८१ वर्षे वयाचा नसिरुद्दीन शहा हल्ली आपल्याला काम मिळत नाही , लोक विचारत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये गेला आहे असं त्याचे विरोधक म्हणत असतात – बाकी खरं खोटं नसिरुद्दीन शहा जाणे !!…
सत्तरीच्या आसपास पोहोचलेले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, मामुटी आणि मोहनलाल ही मंडळी तरुण कलाकारांशी टक्कर देत अजून ही धडाक्यात सिनेमे करत आहेत… ही मंडळी घरी बसायला तयार नाहीत…
दर आठवड्याला कुठला न कुठला चित्रपट साईन केला अशी बातमी येते…

परवा इंडिया टुडे वाहिनीच्या – ” साहित्य तक ” – कार्यक्रमात ७५ वर्षे वयाचे जगद्गुरू रामभद्राचार्य आले होते…
मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या शेवटी ते प्रेक्षकांना म्हणाले – ” तुम्ही सगळ्यांनी मी शंभरी गाठावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करावी कारण मला अजून बरेच काम करायचे आहे, प्रभूंचे सेवाकार्य करायचे आहे.. काही नवीन ग्रंथ लिहायचे आहेत.. काही अपुर्ण असलेले पुर्ण करायचे आहेत…”

१९८३ ची घटना असेल… तेलगू देसमचे एन टी रामाराव हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय २ वर्षे कमी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी फार मोठा जनक्षोभ उसळला होता… काही लोकांनी आत्महत्या ही केल्या होत्या… लोकांना वेळेच्या अगोदर रिटायरमेंट नको होती… महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यासाठी याचिका दाखल केली होती ती कोर्टाने फेटाळली.. हे असे आहे…

तिकडे फ्रान्स मध्ये रिटायरमेंटचे वय ६५ च्या आसपास आहे.. युरोपियन देशांत रिटायरमेंट साठीच्या नंतरच आहे…
फ्रान्स सरकार कर्मचारी लोकांचं रिटायरमेंट वय वाढविण्याचा विचार करतं आहे आणि कर्मचारी विरोध करत आहेत…
रिटायरमेंटचे वय वाढवू नका म्हणून पब्लिक सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे… जाळपोळ करत आहे…

आमचा एक मित्र – आमच्याच वयाचा पण बिचाऱ्याला ४-५ अगोदरच रिटायर व्हावं लागलं.. आम्ही विचारलं तर तो म्हणाला ही सगळी शाळेतल्या गुरुजींची कृपा… आम्हाला अर्थबोध होईना तेव्हा उकल करत तो म्हणाला – ” अरे बाबा, शाळेत दाखल करताना गुरुजींनी आमची उंची, तब्येत वगैरे बघीतली अन् हजेरीपटावर आमचा जन्म जगात आम्ही येण्याअगोदरच झाला… ४ वर्षे मोठा केला गुरुजींनी आम्हाला आणि त्याचा परिणाम म्हणून अस्मादिकांना लवकर रिटायर व्हावं लागलं… एकीकडे हे असं … तर तिकडे उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते आझमखान यांनी आपल्या पोराचं वय कोर्टात शपथपत्र देऊन वाढवून घेतलं कारण पोराला आमदार / खासदार करायचं होतं… केलं ही…

कारण…

पाॅलिटिक्स में आदमी की रिटायरमेंट की आयुसीमा होती ही नहीं… आदमी रिटायर होता नहीं – किया जाता है…
असो..

आझमखानचं पितळ उघडं पडलं आणि मग आई , बाप आणि मुलगा तिघे ही ऑक्टोबर २३ ला जेल मध्ये गेले…
एकीकडे जुन्या पिढीतील लोकांना वाटते की आपण ५८-६० ला रिटायर झालो नसतो तर बरं झालं असतं अजून काही दिवस आपण काम करू शकतो की !!… दुसरीकडे तरूण पिढी म्हणते – बाॅस, अपना तो प्लॅन हैं… झटपट खुप पैसा कमवायचा आणि वयाच्या ४० व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची… उर्वरित आयुष्य एकदम रिलॅक्स !!…
शेवटी हिसाब अपना अपना !!….

-शरणप्पा नागठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..