नवीन लेखन...

सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर

गो. नी . दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यानंतर गोपाळबुवा जोशी ह्या नावाने कीर्तन करण्यात त्यांनी काही काळ घालवला . श्रीधरशास्त्री पाठक यांच्याकडे त्यांनी वेदांताचा अभ्यास केला. ‘ सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी ‘ असे गोनीदां म्हणत असत. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली.

त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. विवाहानंतर औध येथील पंडित सातवळेकर यांचा ‘ पुरुषार्थ ‘ मासिकाचे सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले. १९५० नंतर ते पुण्याजवळ तळेगाव येथे रहात होते.

मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे.
गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गड व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला होता.

गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने गोनीदा यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘ सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी ‘, तसेच ‘ श्री रामायण ‘, ‘ भक्तिमार्गदीप ‘, ‘ कर्णायन ‘, ‘ कृष्णायन ‘, ‘ दास डोंगरी राहतो ‘, ‘ तुका आकाशाएवढा ‘ ही पुस्तके लिहिली.

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’ गोनीदांची दुर्गचित्रे ’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’ ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. ‘किल्ले’ हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. ‘ पवनाकाठचा धोंडी ‘, ‘ जैत रे जैत ‘, ‘ रानभुली ‘, ‘ त्या तिथे रुखातळी ‘, ‘ वाघरू ‘, आणि ‘ माचीवरला बुधा ‘ या त्यांच्या कादंबर्‍यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही बनवले गेले.

गो . नी . दांडेकर यांचा कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.

गो. नी . दांडेकर १९८१ साली अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘स्मरणगाथा’ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘ महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने ‘ नगरभूषण ‘, तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘ साहित्य वाचस्पती ‘ म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा ‘ नानासाहेब नारळकर ‘ पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा ‘ दुर्गप्रेमी ‘ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. ‘ मोगरा फुलला ‘च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. महाराष्ट्राच्या परंपरा , संस्कृती यांचा शोध त्यांनी आयुष्यभर घेतला आणि तो ठेवा आपल्या व्याख्यानांमधून , लेखांमधून महाराष्ट्राला दिला. अशा थोर लेखकाचे १ जून १९९८ रोजी पुणे येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 353 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..