नवीन लेखन...

रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा

• *‘देवदास’ कवितेतील सुरुवातीचा भाग वाचून आठवला गुरुदत्तचा ‘प्यासा’; आणि अर्थात्, गुरुदत्तचें व्यक्तिगत जीवनही.
*त्याच कवितेतील ‘तू ना अरत्र आहेस ना परत्र, ना भूलोकी आहेस ना अन्यत्र’ या शब्दांनी आठवली विश्वामित्र व त्रिशंकू यांची कथा, आणि त्या कथेत सांगितल्याप्रमाणे पृथ्वी व स्वर्ग यांच्यामधे लोबकळणारा त्रिशंकू.
*त्याच कवितेतील अखेरच्या, अर्ध्या पेल्यासंबंधी ओळी वाचून आठवली ‘Half glass empty or half glass full’ या अर्थाची इंग्रजी म्हण ; आणि मंगेश पाडगावकर यांची एक कविताही –
. . . . ‘पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणतां येतं
पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणतां येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं,
तुम्हीच ठरवा.

कसं जगायचं, तुम्हीच ठरवा ;
कण्हत कण्हत, की गाणं म्हणत,
तुम्हीच ठरवा’.

*‘देवदास’ ही कविता पारो-चंद्रमुखीचा संदर्भ देऊन, देवदास या कादंबरीची आठवण करून देतेच देते, पण त्याव्यतिरिक्त, जाने-अनजाने में, ती अन्य संदर्भांचीही आठवण जागवते, हा एक ऍडिशनल आनंद तिच्यामुळे प्राप्त होतो.

• त्याचप्रमाणे, ‘असंच जीवन जगायचं असतं’ मधील, ‘निंदकाला हितैषी मानायचं असतं’ या ओळीनें एक तर आठवले ‘निंदकाचें घर असावे शेजारी’ म्हणणारे संत तुकाराम महाराज, व दुसरे आठवले, ‘निंदक नियरे राखिये आंगन कुटी छबाय । बिन पानी साबन बिना निर्मल करे सुहाय।’ असे म्हणणारे संत कबीर. संतांच्या मांदियाळीचा उघड उल्लेख नसूनही, तिची आठवण जागी व्हावी, हा कवितेचा गुण.

• त्रुटी ? असतीलही, आहेतही, असणारच. ( अहो, काढायच्याच म्हटल्या तर, वाल्मीकी व व्यासांच्याही त्रुटी काढता येतील की). पण, मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी समीक्षक नव्हे तर केवळ एक रसिक वाचक आहे. त्यामुळे काव्यसंग्रह वाचतांना, आलोचना-टीका हा माझा हेतू नसून, काव्यातील बलस्थानांचा, सौंदर्यस्थळांचा आनंद घेणें , हा होता ; आणि तो आनंद मला मिळाला .

• ‘आर्यमा’चें मुखपृष्ठ : शीर्षक व चित्र :
काव्यसंग्रहाचें नांव ‘आर्यमा’ हें, एक वेगळे नांव असल्याकारणानें, नजरेत भरते, मनात ठसतें, लक्षात रहाते.
• आर्यमाचा अर्थ काय ? संस्कृतमधे, किंवा मराठीतही, ‘आर्यमा’ असा शब्द सहसा दिसून येत नाहीं. तेव्हां आपल्याला विचार करून त्याचा अर्थ शोधायला हवा.

• शब्दकोशात ‘आर्य’ हा शब्द आहे. अनेकांचा असा समज आहे की आर्य हें वंशनाम आहे. पण तसें नाहीं. आज अनेक इंडोलॉजिस्टही हेंच सांगतात की, आर्य हे वंशनाम नाहीं. व्ही. एस्. आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी सांगते की ‘आर्य’ हें एक विशेषण आहे, व त्याचे त्या शब्दकोशामधे दिलेले कांहीं अर्थ असे आहेत : ‘Worthy, Respectable, Honourable, Noble, Fine, Excellent, A respectable or honourable man, Honorific adjective & a respected mode of address, Revered or honoured Sir, A man who is faithful to the religion & laws of his country’.

• संस्कृतमध्ये ‘अर्यमन्’ असा शब्द आहे. त्या शब्दापासून ‘आर्यमा’ शब्द बनला असेल काय ? त्याविषयीची चर्चा थोडेसें-पुढें केलेली आहे. प्रस्तुतच्या ठिकाणीं फक्त त्याचा उल्लेख करून ठेवला आहे.

• शब्दकोशात आणखी एक शब्द आहे : ‘आर्यक’. त्याचा अर्थ आहे – ‘An honourable or respectable man’.
म्हणजे, ‘आर्य’ हें एक विशेषण व ‘आर्यक’ हें एक नाम असलें, तरी , शब्दाला ‘क’ हा प्रत्यय लागूनही, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे . तसेच काहींसें ‘म’ प्रत्ययाचें असावें काय, असा विचार मनात येतो.

• संस्कृतमधे, ‘म’ प्रत्यय लागूनही अर्थामधे बदल होत नाहीं, असे बरेच शब्द पाहता येतात. उदा.
आदि – आदिम ; अंत – अंतिम ; कर्द – कर्दम (चिखल) . असेच अन्य शब्द : मध्य – मध्यम ;
पंचन् – पंचम . ( संगीतात, मध्यम, पंचम हे शब्द आपल्याला परिचित आहेत. ) आणखी एक उदाहरण : ‘महिमन्’ म्हणजे, ‘High Rank, Exalted Rank or position, Dignity’ . म्हणजेच, महा व महिम यांचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे. यावरून बनलेला शब्द ‘महामहिम’ हें एक विशेषण आहे, व हल्ली राजकारण्यांच्या मुखात हिंदी बोलतांना, राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे VIPs यांचा उल्लेख करतांना हे विशेषण नेहमी येते. फारसीतही, व पर्यायानें उर्दूत, असे ‘म’ प्रत्यय जोडलेले, व अर्थबदल न होणारे, शब्द आहेत. उदा. मर्द – मर्दुम (दोन्हीही म्हणजे, मनुष्य) .

• थोडक्यात काय, तर मूळ शब्दाला ‘म’ प्रत्यय लागूनही अर्थ साधारणपणें तोच रहातो, राहू शकतो. यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की ‘आर्यम’ व ‘आर्य’ हे समानार्थी शब्द असू शकतात. अर्थात, ‘आर्यम’ हा शब्द, शब्दकोशातला नाहीं; तर मग, हा ‘कॉइन’ केलेला, बनवलेला, निर्माण केलेला, शब्द असूं शकेल काय ?

• शब्द बनवण्याचें व अस्तित्वात असलेले शब्द वेगळ्या तर्‍हेनें वापरण्याचें पूर्ण स्वातंत्र्य साहित्यिकांना असते, ती त्यांची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलताच, असते.
*एक उदाहरण : मंगेश पाडगांवकर यांच्या ‘शुक्रतारा’ या गीतातील ही ओळ : ‘आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा’. ‘मिसळुनी डोळे पहा’, असा शब्दप्रयोग कुणी कधी पाहिला आहे काय? आपण विविध गोष्टी मिसळतो, पण डोळे नव्हे. पण, ‘मिसळणें’ या शब्दाचा पाडगावकरांनी वेगळा व किती सुंदर उपयोग केलेला आहे ! नजरेची भेटाभेट होणें याला पाडगावकरांनी डोळे मिसळणें म्हटलें आहे ! वा ! हीच तर कवीची खासियत !!
*आणखी एक उदाहरण : सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी, मुंबई-कोंकण या ‘रूट’वर प्रवास करणारी
‘संत तुकाराम’ ही बोट वादळामुळे बुडाली, त्या घटनेवर एका प्रसिद्ध कवीने बोटीचेंच नाव शीर्षक म्हणून दिलेली एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेत, तुफान-पावसाचे वर्णन करतांना ‘द्रप्स येती..’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. या शब्दाबद्दल एका समीक्षेत अशा अर्थाची टिप्पणी केलेली होती की, ‘‘द्रप्स हा शब्द मराठीमधील नाहीं, तर, drops या इंग्रजी शब्दावरून कवीनें तो बनवलेला आहे; आणि तसें करायची काहीं आवश्यकता नव्हती ; द्रप्सऐवजी ‘थेंब’ शब्द वापरला असता तरी चाललें असतें; लयही बिघडली नसती’’. द्रप्स हा शब्द कवीने तयार केलेला आहे, हे स्पष्टच आहे; पण ज़रासा विचार केल्यावर, हा शब्द किती योग्य आहे, तें लक्षात येते. तुफानात पावसाची जोरदार झड वेगात रपरपा फटके मारत होती, हे सर्व चित्र ‘द्रप्स’ या शब्दातून ध्वनित होते. (तसें, ‘थेंब’ या श्दानें झालें नसतें ). असा चित्रमय शब्द कवीने coin केला, हेंच त्याचें कवी म्हणून मोठेंपण.

• तसाच, कवयित्रीनें कदाचित ‘आर्यमा’ हा शब्द विचारपूर्वक कॉइन केलेला असू शकेल, असें मला वाटतें. आपण ‘आर्यम’ या कॉइन्ड शब्दाचा काय अर्थ असावा, हें पाहिलें. मग आर्यमा म्हणजे काय असावे ? जर आर्यमा हा शब्द कॉइन केलेला असेल, तर असा एक शब्द कॉइन करून कवयित्रीनें, ‘गागर में सागर’ म्हणतात तसा, त्यात किती अर्थ भरलेला आहे !

• संस्कृतमधे ‘आर्य’ चें स्त्रीलिंग ‘आर्या’ होतें. तसेंच ‘आर्यम’ चें ‘आर्यमा’ हें स्त्रीलिंग होईल. ही ‘आर्या’ अथवा ‘आर्यमा’ म्हणजे, Worthy, Respectable, Honourable, Noble, Fine, Excellent, Faithful to the religion & laws of the country, अशी स्त्री. अशी स्त्री कोण बरें असावी ?

• एक शक्यता अशी की, अशी ‘आर्यमा’ स्त्री म्हणजे, स्वत: कवयित्रीच. त्यामुळे, या शीर्षकातून असा अर्थ ध्वनित होऊ शकतो की : कवयित्री ही अशा प्रकारची म्हणजे respectable, honourable स्त्री आहे , म्हणून , तिची ही रचना वाचकांनी सीरियसली, गंभीरतेनें, घ्यावी, त्यातील मुद्द्यांवर मनन-चिंतन करावे ; आणि, ऍज अ कॉनसिक्वेन्स, समाजातील ज्या गैर गोष्टी कवयित्रीनें आपल्या काव्यात एक्स्प्रेस केलेल्या आहेत, त्या काढून टाकण्यासाठी वाचकानें यत्न करावे.

• किंवा, असाही अर्थ ध्वनित होऊ शकतो, की per se ‘स्त्री’, म्हणजेच प्रत्येक स्त्री, ही आर्यमाच आहे, Noble, Respectable, Honourable आहे. असा अर्थ घेऊन जर या संग्रहातील काव्य वाचलें, तर : एका बाजूस हा, अगदी योग्य असूनही, ‘युटोपियन’ समाजामधेच अमलात आणला जाईल असा, विचार ; आणि दुसर्‍या बाजूस समाजातील प्रत्यक्ष विषम परिस्थिती, (जिथें स्त्रीला तिची ईक्वल पोझिशन, समान स्थान, मिळत नाहींये) , या दोहोंमधील विरोधाभास उठून दिसतो.

• मराठी व्याकरणाप्रमाणें, तत्सम/तद्भव मानून , ‘आर्यम’ या शब्दाचें ‘आर्यमा’ हें संबोधन होईल.
जसें आदिम – आदिमा ; अंतिम – अंतिमा .( ‘हे आदिमा हे अंतिमा’ हे गीत प्रसिद्धच आहे ). तेव्हां,
‘आर्यमा’ म्हणजे ‘हे आर्यमा’ , म्हणजेच, हे आर्य माणसा, हे माननीय माणसा, हे आदरणीय माणसा,
हे धर्म (समाजधर्म) व देशाचा कायदा (सामाजिक न्याय) यांच्यावर निष्ठा असणार्‍या माणसा. ‘आर्यमा’ या शब्दातून असाही अर्थ ध्वनित होऊं शकतो.

• आपण संग्रहातील कविता वाचल्यावर ध्यानात येते की, समाजाभिमुख कविता त्यात आहेत, तसेंच स्त्रीजातीच्या आक्रोशाशी संबंधित विद्रोही भावना एक्सप्रेस करणार्या कविताही आहेत. भारतीय संविधानानें, पुरुष व स्त्री यांना ईक्वॅलिटी, समानता, बहाल केलेली आहे. पण वास्तव काय आहे ?
स्त्री ही अजूनही एक्स्प्लॉइट केली जात आहे. म्हणून कवयित्री आपल्या काव्यसंग्रहाला ‘आर्यमा’ हें नांव देऊन, जणूंकांहीं ‘आर्य’ पुरुषांना उद्देशून करून हें दाखवते आहे, की : ‘‘हे ‘आर्य’ पुरुषांनो, तुम्ही स्वत:ला माननीय म्हणवता ना, आदरणीय म्हणवता ना, समाजधर्म व सामाजिक न्याय यावर निष्ठा असणारे म्हणवता ना, मग हें काटेरी वास्तव पहा ! ; आणि ही अयोग्य, निंदनीय परिस्थिती बदला”.

• पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहूनही वरील स्पष्टीकरण योग्य आहे, हें प्रतीत होतें. कवयित्रीनें चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी, तिला स्वत:ला अभिप्रेत, शीर्षकापाठील अर्थ समजावून सांगितला होता काय, याची कल्पना नाहीं. पण, तसें नसेल, तर चित्रकारानें योग्य तो अर्थ लावला आहे असे समजायला हवे.

• भारतीय इतिहासातील, ‘आर्य’ हें संबोधन ज्या व्यक्तीच्या नावाला नेहमी जोडतात, अशी व्यक्ती म्हणजे विष्णुगुप्त चाणक्य. आणि, मुखपृष्ठावरील चित्र नक्कीच आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य (खरें तर, ‘कौटल्य’) याची आठवण करून देते. कौटिल्यानें त्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात, सुयोग्य राज्यव्यवहार कसा असावा, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, चित्र शीर्षकाला पूरकच आहे. शीर्षकाबरोबरच, चित्र पाहिल्यावर असे प्रतीत होतें की, कवयित्री चाणक्याला उद्देशून म्हणते आहे की : ‘हे आर्य चाणक्या, पहा तुझ्या भारतात कशा तर्‍हेचा राज्यव्यवहार व समाजव्यवहार चाललेला आहे !!’

• आर्यमा म्हणजे ‘सूर्याचें उगमस्थान’, असे प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात.
(‘सूर्याचें उगमस्थान’ म्हणजे, ‘पूर्वदिशा’, असा अर्थ सबनीसांना अभिप्रेत आहे काय, नकळे.)

• शब्दकोशात मात्र मला सबनिसांनी सांगितलेला अर्थ सापडला नाहीं. आपटे यांचा
आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी कोश, ‘आर्य’, ‘आर्यम’ अथवा ‘आर्यमा’ यांच्याशी साधर्म्य असलेला एक शब्द दाखवतो. तो आहे ‘अर्यमन्’. हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा एक अर्थ हा शब्दकोश असा देतो : ‘The Sun’. (हा अर्थ, सबनीसांनी दिलेल्या अर्थाशी कांहीं संबंध दर्शवतो, हें खरें).

एक गोष्ट अशी की, संस्कृतमध्ये ‘न्’ अंत्याक्षर असलेले पुल्लिंगी शब्द, हे केवळ-तीनच रेफरन्स-शब्दांप्रमाणेंच ‘चालतात’, व ते तीन शब्द आहेत, ‘तस्थिवान्’ , ‘भगवान्’ आणि ‘आत्मन्’. (रामो हरि: करी भूभृत् भानु: कर्ता च चंद्रमा । तस्थिवान् भगवान् आत्मा दशैते पुंसि नायका: ।). त्याप्रमाणें पाहिलें तर, अर्यमन् पासून ‘अर्यमा’ हा शब्द बनेल (जसें, आत्मन् चें आत्मा , महिमन् चें महिमा); ‘आर्यमा’ बनणार नाहीं. अमरकोशातून कांहीं बोध होतो काय, तेंही पाहू या. ( अमरकोश हा एक हजाराहून अधिक वर्षें जुना ‘संस्कृत धिसॉरस’ आहे ). सूर्यासाठी
जी नांवें अमरकोशात दिली आहेत , त्यातील प्रस्तुत विवेचनाच्या दृष्टीनें उपयुक्त भाग असा :
‘–सूर्यार्यमाऽऽदित्य-’ . याची फोड अशी होईल : ‘सूर्य-अर्यमा-आदित्य’. आचार्य रामचंद्र वर्मा यांचा ‘बृहत् प्रामाणिक हिंदी कोश’सुद्धा हेंच दाखवतो. तो कोश सांगतो की, ‘अर्यमा’ हा संस्कृत शब्द आहे, त्याचें मूळ आहे ‘अर्यमन्’ व त्याचा अर्थ आहे, ‘सूर्य’. म्हणजेच, सूर्य या अर्थानें या पुस्तकात हा संस्कृत शब्द वापरलेला असेल तर, तो ‘अर्यमा’ असा असायला हवा, ‘आर्यमा’ नव्हे.

• पण, हा ‘आर्यमा’ शब्द जर मराठी ‘तद्भव’ शब्द असेल तर ? मराठीच्या संदर्भात एक शक्यता ध्यानात घ्यायला हवी. ती म्हणजे, संस्कृत शब्द मराठीत येतात तेव्हां त्यांच्यातील कांहींमध्ये झालेला बदल.
संस्कृतमध्ये र्‍हस्व असलेलें अक्षर, खास करून इकार अथवा उकार असलेलें अंतिम अक्षर, मराठीत अनेकदा दीर्घ होतें, हें आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतें. उदा. कवि – कवी ,
रुचि – रुची, उपाधि – उपाधी, (प्रत्यय) ‘हि’ – ही, बंधु – बंधू, तंतु – तंतू. पण कांहीं वेळा असा बदल, इकार किंवा उकार नसलेल्या व अंतिमही नसलेल्या अक्षरातसुद्धा होतो. उदा. अंध – आंधळा, पंगु – पांगळा, चंडाल – चांडाळ. येथें ‘अ’चा ‘आ’ झालेला आहे.
तोच ‘न्याय’ आपण ‘अर्यमा’ या संस्कृत शब्दाला लावला तर, त्याचें रूपांतरण मराठीत ‘आर्यमा’ होणें शक्य आहे.

अशा प्रकारेंही आपण ‘आर्यमा’ हा शब्द मराठी वापरासाठी डिराइव्ह करूं शकतो.
कवयित्रीनें तसें केलें असेल काय ? आणि, तसें असल्यासही, हा शब्द तिनें विचारपूर्वकच निवडलेला आहे, यात शंका नाहीं.

• { या शब्दाचा उगम शोधतांना, मी विचार केलेल्या आणखी एका गोष्टीचा जातां जातां उल्लेख करतो. ती म्हणजे, ‘आर्यमा’ हा शब्द फारसीमधून आला असेल काय ? कदाचित् ही शक्यता अवास्तव वाटेलही; पण आपण हें ध्यानात घ्यायला हवें की वैदिक संस्कृत आणि जुनी, पुरातन अवेस्तन फारसी भाषा यांच्या शब्दकळेत बरेच साम्य आहे. संस्कृत व पुरातन-फारसी या सामुहिक भाषावंशाला ‘इंडो-इरानियन’ असें म्हटलें जातें. त्यातून, मध्ययुगात फारसी ही भारतातल्या अनेक राज्यांची राज्यभाषा होती, जसें की मुघल व दक्षिणेतील शाह्या. त्यामुळे वर उल्लेखलेल्या शक्यतेचा विचार तरी करायला हवा.

अवेस्तन फारसीमध्ये ‘आर्य’ या शब्दाचा उल्लेख आहे. झरतृष्ट व त्याच्याही आधीच्या ‘यिमा’ यांच्या संदर्भात, ‘आइरियाणाम् (आर्याणाम्) वाईजो’ असा शब्द वापरला गेलेला आहे. (पुरातन पर्शियनमधील या शब्दाचें इंग्रजीत ट्रान्सलिटरेशन असें : ‘Airiyanam vaejo ). पण, तरीही, फारसीमधून ‘आर्यमा’ हा शब्द मराठीत आयात केलेला किंवा डिराइव्ह केलेला दिसत नाहीं. माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) तसेच यू. म. पठाण या दोघांच्याही फारसी-मराठी कोशात ‘आर्यमा’ किंवा त्यासमान दुसरा एखादा शब्द सापडत नाहीं. उर्दूचें काय ? कारण, उर्दूमध्ये अनेक फारसी शब्द आहेत. तिच्याद्वारेंही हा शब्द मराठीत आला असेल काय, हेंही तपासलें पाहिजे. परंतु ‘मद्दाह’ यांच्या उर्दू-हिंदी शब्दकोशात तसेंच श्रीपाद जोशी-एन्. एस्. गोरेकर यांच्या उर्दू-मराठी शब्दकोशातही ‘आर्यमा’ किंवा त्यासमान शब्द सापडत नाहीं. ‘दखनी’ या दक्षिण भारतात मध्ययुगात विद्यमान असलेल्या भाषेतही बरेच फारसी शब्द येतात. पण या भाषेतूनही हा शब्द मराठीनें घेतला असण्याची शक्यता दिसत नाही. उलट, दखनीनेंच मध्ययुगीन मराठीकडून बरेच शब्द घेतले आहेत. डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘दखनी भाषा’ या पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या शब्दकोशातही हा, किंवा त्यासमान, शब्द नाहीं.
त्यामुळे, फारसीमधून हा शब्द मराठीनें, व पर्यायानें, प्रस्तुत कवयित्रीनें, घेतला असण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाहीं. }

• तें कांहींही असो, सबनीस म्हणतात तसा अर्थ, (म्हणजे, नुसतें ‘सूर्य’, किंवा ‘उगवता सूर्य’, किंवा ‘उगवत्या सूर्याची दिशा, पूर्व’, असा अर्थ), घेतला, तरीही आपल्या विवेचनाला मूलत: बाधा पोचत नाहीं. पृथ्वीच्या दृष्टीनें, सर्वात माननीय, सर्वात आदरणीय, सर्वात वंदनीय काय असेल तर तें म्हणजे, सूर्यच. (त्यामुळे, उगवत्या सूर्याची दिशा पूर्व हीसुद्धा पूज्यच).
मुखपृष्ठावरील चित्रात सूर्यही दाखवलेला आहे.

• पण मग, ‘आर्यमा’चा खरा अर्थ कोणता, कुठला अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे, अमुक की तमुक? याचें उत्तर असें की : कुठलाही एक असूं शकतो, दोन असूं शकतात, अनेकही असूं शकतात.
*आणखी एक गोष्ट : आपण जो अर्थ काढतो आहोत, तो अर्थ, कवयित्रीला अभिप्रेत नसलेला, असा असला, तरीही काही बिघडत नाहीं.

*संस्कृतमधे असे अनेकार्थी श्लोक खूप आहेत. अशा प्रकारच्या ‘मल्टि-मीनिंग’ श्लोकांबद्दल
अयोध्याप्रसाद गोयलीय त्यांच्या ‘शेरो-सुख़न’ या पुस्तकात लिहितात, ‘संस्कृत में एक-एक शब्द के कई-कई अर्थ होते हैं । अत: संस्कृत कवि अनेकार्थी श्लोक लिखकर अपनी प्रतिभा का परिचय देते रहे’.
(असे अनेकार्थी श्लोक माझ्याही वाचनात आलेले आहेत. उदा. – ‘केशवम् पतितम् दृष्ट्वा पांडवा: हर्षनिर्भरा: । रूरुदा: कौरवा: सर्वे हा हा केशव केशव ।’. जरा पहाच या श्लोकाचा वरवरचा अर्थ आणि आंत दडलेला भिन्न अर्थ ).
*एक जुनी आठवण : शालेय जीवनात बिहारीच्या ‘सतसई’मधील काहीं दोहे शिकत होतो. ‘सर’ म्हणाले की, काहीं दोह्यांचे दोन-दोन तीन-तीन अर्थ निघतात. तें शक्य आहे, असेच मला वाटलें ,
कारण अशा प्रकारचे संस्कृत श्लोक मी वाचलेले होते. ‘सरां’नी पुढे, बिहारीच्या एका दोह्याचें उदाहरण देऊन सांगितले की, याचे नऊ अर्थ निघतात. ऐकून मी थक्कच झालो. वाटलें, काव्य रचतांना, ९-९ अर्थांचा आधीच विचार करून त्याप्रमाणें शब्दरचना करणारा कवी किती बरें सृजनशील असेल !
नंतर काहीं वर्षांनी मला तें कोडें उलगडले. घडतें असें की, कवी काव्य रचतांना, दोन, किंवा कदाचित तीन, अर्थांचा विचार करून काव्य रचू शकतो, रचतोही ; पण नंतर, तें वाचतांना किंवा त्याचें अध्ययन करतांना भिन्नभिन्न वाचक त्याचे आणखी-जास्तीचे, अॅडिशनल, अर्थ काढत जाऊ शकतात. हे अधिकचे-अर्थ, अॅडिशनल अर्थ, रचना करतांना कवीला अभिप्रेत नसतात. तरीही, ते जर काव्याला पूरक असले, व वाचकवृंदाला योग्य वाटले, तर कांहींच हरकत नाहीं.

• तसेंच कांहींसें इथेंही आहे. कवयित्रीला पुस्तकाच्या शीर्षकाचा काय अर्थ अभिप्रेत आहे, हें तिलाच विचारायला हवे. परंतु, माझ्या विचारानुसार, मला जो-जो अर्थ ध्वनित होतो आहे, तो-तो प्रत्येक अर्थ
मला माझ्यापुरता तरी, योग्य वाटतो, ऍप्ट (apt) वाटतो, चपखल वाटतो.

• आणखी एक महत्वाची गोष्ट आहे , आणि ती म्हणजे, एकीकडे जरी कवयित्रीनें कवितांमधे कांहीं ठिकाणीं विद्रोही सूर लावला असला, तरी, ‘आर्यमा’ हें संस्कृतमय शीर्षक देऊन, तिनें दुसर्‍या बाजूला भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा संदर्भ ध्वनित करून, बॅलन्स साधायचा, समतोल साधण्याचा, प्रयत्न केलेला आहे, असेंही मला प्रतीत होतें.

• तेव्हां, कवयित्रीला असें सांगावयास हरकत नाहीं की , “हे आर्ये, तुझा ‘आर्यमा’ शब्द, हा काव्यसंग्रहाला शीर्षक म्हणून नुसता योग्यच नाहीं, तर तो संग्रहाचें सौंदर्य खचितच वाढवतो” .

• कुठल्याही सृजनशील व्यक्तीची गाडी एका संग्रहावर थांबत नाहीं. श्रीमती बेलसरे यांच्या पुढल्या संग्रहांबद्दल औत्सुक्य आहे. आणि, ते प्रसिद्धही झालेले आहेत. पण, (‘इरमा ला द्यूस’ या इंग्रजी सिनेमातील, किंवा ‘मनोरंजन’ या हिंदी सिनेमातील, वाक्याप्रमाणें), मी म्हणेन की, ‘तें सर्व पुन्हां केंव्हांतरी’.

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..